Saturday, May 23, 2020

भाउ तोरसेकरांची 50 हजारी मनसबदारी!


उरूस, 23 मे 2020

एक पंच्याहत्तरीला पोचलेला वृद्ध पत्रकार डिजिटल माध्यमाचा वापर करून एक ब्लॉग सुरू करतो. त्याला कधीच  माध्यमांच्या मुख्य प्रवाहानं सामावून घेतलेलं नसतं. त्याच्यापाशी कसलीही साधनं नसतात. सामान्य वाचकांची नाडी त्याला समजते आणि त्याचे हेतू शुद्ध असतात इतक्या किमान भांडवलावर त्याची पत्रकारिता सुरू आहे. अशा या भाउ तोरसेकर नावाच्या वृद्ध पत्रकाराला सामान्य वाचक/श्रोते/दर्शक यांनी डोक्यावर घेतले आहे.

भाउंनी 2012 मध्ये ‘जागता पहारा’ नावाचा ब्लॉग सुरू केला. आज त्याला भेट देणार्‍यांचा आकडा 1 कोटी 73 लाख 89 हजार, 29 इतका आहे (सकाळी 11.21 वाजेपर्यंत, शनिवार दिनांक 23 मे 2020). मराठीतील किती पत्रकारांनी ब्लॉग चालवले? (अपवाद प्रवीण बर्दापूरकर).  लॉकडाउनच्या काळात भाउंनी ‘प्रतिपक्ष’ नावाचा यु ट्यूब चॅनेल सुरू केला. त्याला केवळ 50 दिवसांत 50 हजार सदस्य मिळाले.

आपल्याला मिळालेल्या या प्रतिसादाबद्दल भाउंनी सामान्य वाचकांपोटी कृतज्ञता व्यक्त करून सगळे श्रेयही या सामान्य वाचकांनाच दिले आहे.

लॉकडाउनच्या काळात पत्रकारांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे. छापील स्वरूपातील वृत्तपत्रे संकटात सापडली आहे. बहुतांश वृत्तपत्रांनी पाने कमी केली आहेत, कर्मचार्‍यांना नारळ दिला आहे, जिल्हा कार्यालये बंद केली आहेत, आवृत्त्या बंद केल्या आहेत.  मूळात जी काही पत्रकारीता कोरोनाच्या आधीपर्यंत चालू होती ती सामान्य वाचकांशी कितपत बांधीलकी राखून होती? भाउ आरोप करतात तशी ही अजेंडा पत्रकारीताच होती. मग आता कोरोनाच्या धक्क्यात या पत्रकारितेची पडझड होत असेल तर त्याची खंत कशाला.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा झेंडा मिरवणारे यातील किती लोक आणीबाणीत तुरूंगात होते? भाउंनी आदराने उल्लेख केला आहे ते दै. मराठवाड्याचे संपादक अनंत भालेराव यांचा खणखणीत अपवाद वगळता कोणता मोठा संपादक आंदोलन करून तुरूंगात गेला होता? मोठा संपादक तर सोडाच मूळात किती पत्रकार या आंदोलनात तुरूंगात गेले?

इतरांचे घोटाळे उघडकीस आणणारे पत्रकार स्वत:च्या क्षेत्रातील घोटाळे उघड करतात का? निखील वागळेंच्या निमित्ताने भाउंनी उपस्थित केलेल्या या जळजळीत वास्तवाला उत्तर द्यायला कुणी पत्रकार तयार नाही. अगदी आत्ताची ताजी घटना आहे. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचे लेखन चौर्य उघडकीस आल्यावर किती पत्रकारांनी त्यावर टीका केली?

भाउंचे यश या पार्श्वभूमीवर समजून घेता येवू शकते. सामान्य वाचक/दर्शक/श्रोता यांना प्रस्थापित माध्यमांतून त्यांच्या अवतीभवतीचे वास्तव-विश्लेषण- खरी माहिती मिळेनाशी झाली आहे. म्हणून या लोकांना भाउंसारखा पत्रकार आपलासा वाटतो जवळचा वाटतो. त्याच्यावर त्यांचा विश्वास बसतो.

2014 च्या मोदींच्या लोकशाहीच्या मार्गाने मिळवलेल्या यशावर 2019 च्या अजूनच उज्ज्वल यशानंतरही जमात-ए-पुरोगामी टिकेचे शिंतोडे उडवत राहतात तेंव्हा हा सामान्य वाचक भाउ सारख्यांकडेच आशेने पाहतो. तो काही मोदींचा भक्त नसतो. त्याला फक्त वास्तव समजून घ्यायचे असते. पण बातमी देण्यापेक्षा बातमी दाबण्याला महत्त्व आल्याने सामान्य वाचकांचा/दर्शकांचा प्रस्थापित माध्यमांवरचा विश्वास उडत चालला आहे. त्यामुळे त्यांना आता समाज माध्यमं (सोशन मिडिया) जवळची वाटू लागली आहेत. अजूनही याचे भान प्रस्थापित पत्रकारितेला आले नाही.

टिव्हीवरच्या चर्चेत कोण लोक बोलावले जातात? वर्तमानपत्रांत कुणाचे लेख सतत छापले जातात? हे सगळं सामान्य माणूस डोळसपणे पहात असतो ऐकत असतो. कालपर्यंत त्याला प्रस्थापित माध्यमांशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. आता त्याला समाज माध्यमांचा पर्याय उपलब्ध झाला आहे. भाउंसारखे अजून पत्रकार समोर यायला हवेत. केवळ याच क्षेत्रात नव्हे तर इतरही क्षेत्रात प्रस्थापितांची दादागिरी बाजूला सारून नविन मंडळी पुढे येताना आता दिसू लागली आहेत. याचं एक मोठं श्रेय आधुनिक तंत्रज्ञान आणि या तंत्रज्ञानाची भाषा जाणणार्‍या नविन पिढीला द्यावे लागेल. त्यांनी प्रस्थापितांचे किल्ले सुरूंग लावून परास्त केले आहेत. (उदा. म्हणून गावाकडच्या गोष्टी ही मराठी वेब मालिका किंवा इंदूरीकर महाराजांवरचे टिक टॉक व्हिडिओ पहा.)
सुरेश भटांच्या शब्दांत सांगायचे तर

साध्याच माणसांचा एल्गार येत आहे
हा थोर गांडूळांचा भोंदू जमाव नाही

फक्त यात जरासा फरक करून साधी माणसे म्हणजे श्रोते/वाचक/प्रेक्षक. पण जे प्रतिभावंत आहेत, बुद्धीमान आहेत ज्यांना या व्यवस्थेने दाबले होते ते तशा अर्थाने ‘साधे’ नाहीत. त्यांना हा एक मोठा मंच उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता ‘अजेंडा’ पत्रकारिता किंवा आपल्या गावठी भाषेत सांगायचे तर ‘सुपारी’ पत्रकारिता गोत्यात आली आहे.

भाउंनी अजून एक सणसणीत थप्पड प्रस्थापित पत्रकारिता व्यवस्थेवर लावली आहे ती कुणी समजून घ्यायला तयार नाही. पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रत्यक्ष पत्रकारिता करणारा सोडून व्यवस्थापनाच्या नावाखाली भलत्याच माणसांना महत्त्व प्राप्त होवून बसले होते. संपादक म्हणजे त्या त्या वर्तमानपत्राचा चेहरा असं वर्णन एकेकाळी केले जायचे. आणि आता काय परिस्थिती आहे? जाहिरात विभागाला आतोनात महत्त्व आले. मार्केटिंग विभागाचा माज सुरू झाला. प्रत्यक्ष लिहीणारा आणि तो वाचणारा या दोघांनाही दुय्यम तिय्यम ठरवल्या जावू लागले. जसं की शेतीत झालं. पिकवणारा आणि सामान्य ग्राहक दोन्ही बिनमहत्त्वाचे ठरून मधलीच माणसे मोठी होत गेली. साहजिकच यामूळे विकृती तयार झाल्या.

हेच पत्रकारितेत घडत आहे. विविध स्किमला महत्त्व आलं, जाहिरातदारांच्या हितासाठी बातमीचा बळी सुरू झाला,  चांगल्या मजकुराला जागा मिळेनाशी झाली, वाचक हाच मूळात महत्त्वाचा उरला नाही. मग हा पोकळ डोलारा टिकणार कसा? मूळात ज्या वाचकांसाठी पत्रकारिता सुरू झाली होती तोच नकोसा वाटू लागला की काय?

आज कुठल्याही चांगल्या मजकुराला सोशल मिडियावर अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो. आपली मतेही वाचक व्यक्त करतात. फार मोठा संवाद लेखक वाचकांत प्रस्थापित होतो. पण हे सगळं प्रस्थापित वर्तमानपत्रांत होताना दिसत नाहीत. चॅनेलवरच्या चर्चांत निव्वळ बाष्कळपणा सुरू झाल्यावर दर्शक आता त्यांना हव्या त्या छोट्या युट्यूब चॅनेलकडे वळताना दिसत आहेत. अर्बन नक्षलवाद प्रकरणांत प्रस्थापित माध्यमांनी बोटचेपेपणा केल्यावर दर्शक कॅप्टन स्मिता गायकवाड यांच्या शांत वक्तव्यानं भरलेल्या यु ट्यूब चॅनेलकडेच वळणार ना? जे सत्य तूम्ही लपवून पहात आहेत ते दुसरं कुणी शांतपणे तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय कमी खर्चात (जवळपास शुन्यच) दाखवत असेल तर लोक ते पाहतीलच ना? आणि ही आधुनिक माध्यमं खर्‍या अर्थानं लोकशाहीवाली आहेत. इथे कुणालाही व्यक्त होण्यास बंधन नाही.

सोशल मिडियाचे नेमकं हेच बलस्थान भाउंनी ओळखलेलं आहे.

भाउंपासून प्रेरणा घेवून महाराष्ट्रातील सत्याची चाड असलेल्या विद्वान पत्रकारांनी या माध्यमात प्रवेश करावा. सामान्य वाचकांना आजही चांगला मजकूर हवा आहे. चांगलं काही पहायचे आहे. कसलाही पूर्वग्रह न बाळगता विविध विषय समजून घ्यायचे आहेत.

ही सुपारी पत्रकारिता आपल्या मरणाने मरत असेल तर तीला मरू द्या.

जूने जावू द्या मरणा लागोनी
जाळूनी अथवा पुरून टाका
सावध ऐका पुढल्या हाका

असे केशवसुतांन म्हणून ठेवलेच आहे. भाउंनी हे ऐकले यासाठी त्यांना धन्यवाद! त्यांच्या चॅनेलला अजून मोठा प्रतिसद मिळो. भाउंसोबत त्यांच्या पत्नी स्वाती तोरसेकर आंतरराष्ट्रीय प्रश्‍नांवर अतिशय सुंदर नेमके मोलाचे विश्लेषण करतात. त्यांचाही आदराने उल्लेख करावा लागेल. त्यांचाही स्वतंत्र ब्लॉग आहे. त्यांचे जास्त व्हिडीओ इथून पुढे अपेक्षीत आहेत. (छायाचित्र सौजन्य नेट)     

   श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

12 comments:

  1. अगदी खरं आहे.

    ReplyDelete
  2. अत्यंत योग्य शब्दात मांडलंय. भाऊंचं विश्लेषण सडेतोड, सत्याला धरुन आणि जनतेची नाडी ओळखून केलेलं असतं.

    ReplyDelete
  3. आपण सगळे मिळून भाउंचे लिखाण जास्तीत जास्त लोकांपयंत पोचवू..

    ReplyDelete
  4. भाऊंचे लिखाण सर्वोत्तम असतेच. त्यांचा विडिओ 25 ते 30 मिनिटांचा असतो तो पुर्णपणे निष्पक्ष असतो त्यामुळे तो जास्त भावतो. चपखल जुने संदर्भ किंवा योग्य कथा यामुळे विषयाचे आकलन लवकर होते.
    त्यांचे हे कार्य आपण निःशुल्क पाहतो हे मला पटत नाही. खर तर त्यांच्या चॅनेलवर subscription हे उचित मूल्य देऊन घेतले पाहिजे असे माझे मत आहे. सर्वांनी सहमती दर्शविली तर आपल्याला काहीतरी करता येईल असे मला वाटते

    ReplyDelete
  5. भाऊंचे लिखाण सडेतोड व वस्तुस्थितीला धरुन असते. ते कुणाचाही मुलाहिजा ठेवत नाहीत.. लोकांना ते भावते.

    ReplyDelete
  6. भाऊ तोरसेकराचे व्हिडिओ ऐकण्यासारखे व ब्लाॅग्ज वाचण्यासारखे असतात...मी त्यांचे प्रतिपक्ष व पोस्टमन ही यूट्यूब चॅनल बघत असतो...त्यांच विश्लेषण तार्किक असतं...उगाच मोठा आव आणणारं नसतं

    ReplyDelete
  7. मस्त.... विश्लेषण

    ReplyDelete
  8. छान विश्लेषण... भाऊं न सारख्या नी पुढे यायला पाहिजे... भाऊंनी तरुण पिढी समोर आंबेकर, कुबेर, वागळे यांचा पुरोगामी आतंकवाद जगासमोर आणला.. त्यामुळे बाकीचे भामटे पुरोगामी आतंकवादी घाबरले सध्या.. खूप मोठी यादी आहे त्यांची

    ReplyDelete
  9. भाऊंचे लिखाण सडेतोड व वस्तुस्थितीला धरुन असते.

    ReplyDelete
  10. सद्यस्थितीत निर्भीड पत्रकारिता करणारे भाऊ एकमेव आहेत

    ReplyDelete
  11. जनतेची नाडी ओळखलेला पत्रकार.. खरंच सध्या अश्या पत्रकारांची गरज आहे. अत्यंत सध्या आणि सोप्या शब्दात भाऊ विषलेशन करतात.. भाऊ चे विडिओ मी The postman ह्या youtube चॅनेल वर ते बोलत होते तेव्हा पासून पाहतो. आमच्या पिढीत आता असे चांगले पत्रकार उरले नाहीत(फारच कमी आहेत). कोणताही आवाज कमी जास्त ना करता, उगाच हातवारे करून भाऊ बोलत नाहीत पण तरी सुद्धा पूर्ण वेळ श्रोत्यांना थांबवून ठेवण्याची कुमक त्यांच्या वाणीत आहे..
    पत्रकारांची खरी काय भूमिका असायला हवी हे भाऊंनी दाखवून दिले आहे.. औरंगाबाद मधील पाटीदार भवन येथे काही दिवसांपूर्वी त्यांचे व्याख्यान झाले होते त्यात सुद्धा पत्रकार सध्या कश्या बातम्या ठरवून दाखवल्या जात आहेत हे उदाहरणासहित सांगितले होते..
    त्यांनी त्यांच्या youtube channel वर जी एक गोष्ट केली आहे ती मला सर्वात जास्त आवडली ती म्हणजे ' comments चा lockdown'. ह्या मुळे जे फक्त विरोध करायचा म्हणून फक्त comment टाकायला येतात त्यांचा हिरमुड झाला आहे.. हा सर्वात चांगला उपाय मला वाटतो..
    भाऊ तोरसेकरांचे channel लवकरात लवकर आजून मोठी मजल मारो ही सदिच्छा..

    ReplyDelete