Sunday, May 24, 2020

पवित्र मजला आणिक गहिवर, माणुसकीचा, माणुसकीचा!


काव्यतरंग, दै. दिव्यमराठी, रविवार २४ मे २०२० 

पवित्र मजला जळजळीत ती
भूक श्रमांतुन पोसवणारी
पवित्र मजला दगडी निद्रा
दगडाची दुलई करणारी

पवित्र मज यंत्राची धडधड
समाजहृदयातिल हे ठोके
पवित्र मजला सत्यासाठी
धडपडणारे स्वतंत्र डोकें

पवित्र सुखदु:खाची गाणी
वेदांतिल सार्‍या मंत्रांहुन
पवित्र साधा मानवप्राणी
श्रीरामाहुन, श्रीकृष्णाहुन

पवित्र मज पोलादी ठोसा
अन्यायाच्या छातीवरचा
पवित्र मजला आणिक गहिवर
माणुसकीचा माणुसकीचा
-विंदा करंदीकर, (विंदा करंदीकर यांची समग्र कविता, पॉप्युलर प्रकाशर,  पृ. 31)

करंदीकरांची ही कविता 1949 सालातली आहे. स्वातंत्र्यानंतर जो एक उत्साह भारतीय जनतेत जाणवत होता त्या खुल्या मोकळ्या वातावरणातील ही कविता आहे. अजून एक पार्श्वभूमी या कवितेला आहे. दुसर्‍या महायुद्धात हिरोशिमा आणि नागासाकीवरच्या भयानक अणुहल्ल्यात लाखो माणसे मारली गेली. त्यानंतर सगळ्या युद्धखोरांचे डोळे उघडले. सर्वांनाच तीव्र जाणीव झाली की मनुष्य संहार फार मोठा कलंक आहे. माणसाला सर्वात जास्त ओढ आहे ती माणसाचीच.

आज कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आपणही हा अनुभव घेत आहोत. सगळेच जखडले गेले आहेत जागजागी. त्यामूळे तीव्रतेने दूरवरच्या आपल्या माणसांची आठवण येते आहे. जे जवळ आहेत त्यांचे मोल आणखीच जाणवते आहे. आठवून आठवून नातेवाईकांना मित्रांना फोन केले जात आहेत.

विंदा करंदीकरांच्या प्रतिभेची झेप पहा. 1949 मध्ये ते यंत्रयुगाचे स्वागत करत असताना श्रमाचे महत्त्व नाकारत नाहीत. उलट ‘पवित्र मजला दगडी निद्रा दगडाची दुलई करणारी’ म्हणत श्रमाचा गौरवच करत आहेत. आज सगळे घरांत अडकून पडले असताना किमान जरा चालून तरी येवू म्हणून जवळपास फिरू पहात आहेत. घरांतली कामं करू पहात आहेत. श्रमांची पण गरज असते हे जास्तच तीव्रतेने जाणवत आहे. जे श्रमिक पायपीट करत आहेत त्यांची वेदनेला काळजाला भिडत आहे.

कारखाने बंद आहेत. एरव्ही आपल्याला या यंत्राचे महत्त्व लक्षात येत नाही. पण आता यंत्राची धडधड, समजाहृदयातील ठेाके असल्याचे लक्षात येते आहे.

दुसर्‍या युद्धानंतर ज्या पद्धतीनं जगभरातील देश स्वतंत्र झाले आणि तेथे आधुनिक पद्धतीची शासन व्यवस्था सुरू झाली. सर्वांनाच माणूसकीचे महत्त्व जास्तच पटू लागले. पिकासोचे गाजलेले चित्र आहे ‘द ब्रेड’ नावाचे. एका खोलीत मानवी अवयवांचा खच पडला आहे. त्यातून उठून एक हात ओट्यावरील बशीत असलेल्या ब्रेडकडे झेपावत आहे. माणसाची ही जी चिवट जीवन लालसा आहे ती तीव्रतेने अशा भयंकर प्रसंगातून ठळकपणे समोर येते.

मर्ढेकरांची ‘अजून येतो वास फुलांना’ ही कविता दुसर्‍या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरचीच आहे. आणि त्यात शेवटी जी ओळ येते ती, ‘तरीही येतो वास फुलांना, तरीही माती लाल चमकते’ अशीच आहे.

माणसाचे इहलोकावर विलक्षण प्रेम आहे. इथल्या सुखदु:खातच त्याचा जीव अडकला आहे हे खरे आहे. बोरकरांनी जे लिहीले आहे

स्वर्ग नको सुरलोक नको
मज लोभस हा इहलोक हवा
तृप्ती नको मज मुक्ती नको
मज येथील हर्ष नी शोक हवा

‘पवित्र सुखदु:खाची गाणी’ असं करंदीकर म्हणतात ते याच दृष्टीने. कोरोनात आपल्या लक्षात येतं दूरवर मृत्यू पावलेल्या नातेवाईकासाठी जागेवरच आपले डोळे पाझरत आहेत. आठवणींचे लोटच्या लोट मनी उसळत आहेत. आपले लक्ष गेले नसते एरव्ही पण आपल्याच इमारतीच्या वॉचमनचे नुकतेच जन्मलेले गोंडस मुल झोके घेत मजेत अंगठा चोखत आहे, झोका देणार्‍या त्याच्या छोटूकल्या बहिणीचा गोड आवाज आपल्या कानात भरून राहिला आहे.

खरंच आहे माणसाला माणसाच्या सुखदु:खा शिवाय पवित्र दुसरं काहीच नाही.

कोरोना संकट काळात हजारो मजूर पायपीट करत निघाले आहेत. त्यांच्या वेदनेला पारावार नाही. पण याही स्थितीत त्यांना खावू घालणारे मदत करणारे हात पुढे येत आहेत. जागजागी लोकांनी अन्नदान चालवले आहे. उत्स्फुर्तपणे संकट काळातही लोक आपल्या अडचणीवर मात करून भुकेल्यांच्या पोटी अन्न घालत आहेत.
शासनाने केलेल्या मदतीपेक्षा जास्त मदत स्वयंसेवी संस्था, व्यक्तींनी या काळात सामान्य कष्टकर्‍यांसाठी केली आहे. करंदीकरांच्या ओळीचा प्रत्यय ‘पवित्र मजला आणिक गहिवर, माणूसकीचा माणूसकीचा’ क्षणोक्षणी जागजागी दिसून येतो आहे.

आपला जीव धोक्यात घालून डॉक्टर, पोलिस, कार्यकर्ते काम करत आहेत. यातील कित्येकांना कोरोनाची बाधा झालीही आहे. काहींचे प्राणही गेले आहेत. पण माणूस माणसासाठी तळमळतो आहे हे खरं आहे.

सम्राट अशोकाला युद्धातील रक्तपात पाहून शांतीचा मार्ग पत्करावा वाटला आणि त्याने युद्ध नाकारून बुद्ध स्विकारला. हा बुद्ध आपल्या मनात नेहमीच वसत आला आहे. तो धर्मात, राजकारणात, समाजकारणात, कलेत, साहित्यात सर्वत्रच आहे. सम्राट राजे महाराजेच कशाला अगदी सामान्यातल्या सामान्य माणसांच्या मनांतही तो घर करून बसला आहे. या बुद्धाने सांगितलेल्या करूणेलाच ‘माणूसकीचा गहिवर’ म्हणतात.  जग कितीही आधुनिक होत जावो, कितीही तंत्रज्ञान प्रगत होत जावो ‘पवित्र मजला माणुसकीचा गहिवर’ हाच खरा मानवी संस्कृतीचा सारांश आहे.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

2 comments: