Saturday, May 30, 2020

चोरीच्या खुलाश्यात कुबेर अजूनच गोत्यात


उरूस, 30 मे 2020

गिरीश कुबेरांच्या वाङ्मय चौर्यावर समाज माध्यमांवर प्रचंड प्रमाणात टीका झाली. एरव्ही ‘व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी’ म्हणून हेटाळणी करणार्‍या कुबेरांना ही टीका खुपच बोचली आहे असे दिसते आहे. अन्यथा त्यांनी याची दखल घेतलीच नसती.  मुळात प्रस्थापित माध्यमे जे काही लपवत आहेत ते समाज माध्यमांवर (सोशल मिडिया) ठळकपणे समोर आणले जात आहे. याचाच एक भाग म्हणजे कुबेरांची चोरी. एकाही प्रस्थापित वृत्तपत्रांने किंवा ज्येष्ठ संपादकाने यावर लिहीले नाही. कुणीही याची दखलही घेतली नाही.

आपल्या चोरीचा खुलासा करणारा एक छोटा व्हिडिओ लोकसत्ताच्या वतीने समाज माध्यमांवर टाकण्यात आला. खुलासा करताना कुबेरांनी दिलेली सफाई फारच हास्यास्पद होवून गेली आहे.

जगभरात कोरोना संदर्भात जे काही घडतं आहे आणि त्यावर ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत त्या टिपण्यासाठी हे सदर त्यांनी चालवले आहे असा कुबेरांचा दावा आहे. जे कुणी समोर आणत नाही ते आपण आणतो आहोत असंही त्यांचं म्हणणं  आहे.

एक तर जी काही प्रतिक्रिया उमटत आहे ती कुठल्या देशातली आहे हे सांगतानाच ती कुणाची आहे हे पण सांगावे लागेल ना? का तेवढं मात्र सोयीप्रमाणे लपविले जाणार आहे? याचा खुलासा कुबेर करत नाहीत. कुबेरांनी ज्या कुणाच्या लेखावरून उचला उचली केली त्याचा खुलासा त्यांनी आपल्याच या प्रतिक्रिया लेखात का नाही दिला?

बरं जर जगभरातील प्रतिक्रियाच नोंदवायच्या आहेत तर मग त्याखाली स्वत:चे नाव तरी कशाला? वर्तमानपत्रांत असे खुप वेळा केले जाते. विविध ठिकाणची माहिती संकलीत करून छापल्या जाते. त्याखाली कुणाचेच नाव नसते. मग कुबेरांना असेही करता आले असते. जिथून माहिती उचलली त्याचे नाव न देता स्वत:चे मात्र लिहीण्याचा अट्टाहास कशाला?

कुबेरांच्या खुलाश्यात अजून एक मुद्दा समोर येतो आहे. हा खुलासा समाज माध्यमांवर कुबेर का करत आहेत? त्यांनी एखादा सविस्तर मोठा लेखच लोकसत्तात लिहायचा होता. शिवाय लेख न देता मुलाखतीचा व्हिडिओ त्यांनी केला आहे. हे कशासाठी? समाज माध्यमांवर हीच मंडळी टीका करतात. आणि आता आपल्यावरील टीकेला उत्तर देण्यासाठी यांनाही परत याच समाज माध्यमांचा वापर करावा लागतो आहे. हा एक प्रकारे प्रस्थापित पत्रकारितेवर या समाज माध्यमांनी उगवलेला सुडच म्हणावा लागेल.

कुबेरांच्या या मुलाखतीच्या व्हिडिओने एक बाब ठळकपणे समोर आणली आहे. प्रस्थापित माध्यमे या नविन प्रभावशाली ठरत चाललेल्या समाज माध्यमांसमोर हात टेकू लागली आहेत. आधीच कोरोना संकटाने छापिल माध्यमांचे कंबरडे मोडले आहे. कित्येक पत्रकारांना आपली नौकरी गमवावी लागली आहे. अगदी छोट्या छोट्या गावापर्यंत पसरलेल्या वाचकांपर्यंत पोचायला छापिल वृत्तपत्रं माध्यमे अपुरी पडली आहेत. त्यांचा विस्तार अगदी तळागाळापर्यंत शक्य झाला नाही. कुबेरांचा लोकसत्ताने या बाबतीत कमालीचा माज एकेकाळी दाखवला होता. आपल्या मर्यादीत प्रती हेच आपले कसे मोठेपण आहे असे ‘लोकसत्ता’कार समजत होते. समाज माध्यमांनी या समजाला तडाखे लगावले आहेत.

आपल्या उपक्रमात ‘फिड बॅक’ फॉर्म भरून घेताना त्यात ज्या सुचना समोरच्यांनी सुचवल्या आहेत त्याचा विचार तरी कधी लोकसत्ताने केला का? वेगळी काही सुचना करणार्‍या कुणाला तरी संपर्क करून त्याचा हेतू समजून घेतला का?  आपल्याकडे आलेली सगळी पत्र तटस्थपणे लोकसत्तात कधी छापली जातात का? सोयीची पत्रं छापायची आणि विरोधातली दाबायची ही असली धोरणं या आधुनिक काळात किती दिवस चालणार?

कुबेर लोकसत्ताचे संपादक आहेत याचा अर्थ असा नाही की त्यांनीच सर्व विषयांवर लिहीत सुटावे. त्यांच्या अभ्यासाचे जे विषय नाहीत त्यावरही त्यांचे पान पान भर लेख वाचकांच्या माथी का म्हणून मारले जातात? (उदा. राशिद खां यांच्या संगीतावरील लेख कुणीही काढून परत वाचावा.) संपादक म्हणून तूमचे काम आहे की त्या त्या विषयांतील लेखकांना शोधून त्यांच्याकडून लिहून घेणे. अग्रलेखही मीच लिहीणार, शनिवारचे सदरही मीच चालवणार, रविवारच्या पुरवणीत मुख्य लेखही मीच लिहीणार हे वाचक कुठपर्यंत खपवून घेतील? कुबेरांचे विषय आहेत हक्काचे तोपर्यत ठीक आहे. पण सर्वच विषयावर त्यांनी लिहीत राहिल्यावर वाचकांची काय प्रतिक्रिया उमटणार? 

नविन पिढीच्या संपादकांत सगळ्या जास्त वाचकप्रियता संपादक म्हणून कुबेरांना लाभली. वर्तमानपत्रांतील एखाद्या लेखाची चर्चा व्हावी याचे सगळ्यात जास्त भाग्य त्यांच्याच वाट्याला आले. मग साहजिकच त्या सोबतच अपेक्षांचे ओझेही वाढत जाते. हे ओझे पेलायचीही तयारी असली पाहिजे.

लोकसत्ताने नविन तंत्रज्ञानाचा वापर करून पत्रकारितेला जास्त उंचीवर नेणे अपेक्षीत आहे. पण ते न करता जर ही अशी चोराचोरी करून वर परत स्वत:चेच समर्थन करायचे असेल तर कठिण आहे. एकेकाळी मराठी वाचकांना पर्याय नव्हता म्हणून  जो काही सुजाण वाचक होता तो तुमच्याकडे आवर्जून वळला. आता समाज माध्यमांवर चांगल्या वाचकांसाठी चांगला मजकूर उपलब्ध होतो आहे. आणि हा वाचक तिकडे वळत आहे. सत्ताधार्‍यांच्या विरोधात लिहीतो म्हणणारे कुबेर दिल्लीच्या सत्ताधार्‍यांच्या विरोधात लिहीणार आणि महाराष्ट्रातल्या सत्ताधार्‍यांच्या बाबत मात्र बोटचेपेपणा करणार हे कसे चालायचे?

नविन पिढी तंत्रज्ञानाचा अतिशय कुशलतेने वापर करते. असल्या चोर्‍या एकेकाळी उघड झाल्याही नसत्या. पण आता तसे होवू शकत नाही. तेंव्हा याचे भान जपायला हवे. 
 
    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

1 comment:

  1. तुम्ही जो मुद्दा शेवटी मांडला आहे तो म्हणजे कुबेर म्हणतात की मी सत्ताधारी लोकांच्या विरोधात लिहितो हे सुद्धा खोटे आहे हे त्यांनी आता सिद्ध केले आहे.. दिल्ली विरुद्ध लिहिणारे कुबेर राज्यातील सरकार विरुद्ध चकार शब्द काढत नाहीत..
    पुन्हा एकदा ह्यांची अजेंडा पत्रकारिता समोर येते..चोरी तर चोरी वरून शिरजोरी असे कुबेरांचे झाले आहे.. बाकी मी माझ्या मतावर ठाम राहतो म्हणणारे कुबेर 'असंताचे संत' हा पूर्ण अग्रलेख मागे घेतात तेव्हा कोणाच्या दडपणामुळे त्यांनी हा लेख माघे घेतला हे आज पर्यंत त्यांनी सांगितले नाही..

    ReplyDelete