उरूस, 30 जूलै 2021
उसंतवाणी- 124
(दिल्लीच्या सीमेवरचे किसान आंदोलन पूर्णपणे पेचात सापडले आहे. राकेश टिकैत सारख्या नेत्यांच्या आडमुठपणाने या आंदोलनाचे नुकसान केले. 11 चर्चेनंतर जर हे आंदोलन मागे घेतले असते तर त्याचा फायदा झाला असता. पण कुठलाच वैचारिक पाया नसल्याने हे आंदोलन नि:संदर्भ झाले आहे. )
कृषी आंदोलन । अडके पेचात ।
आरंभ टेचात । झाला ज्याचा ॥
आठ महिन्यांत । घेरूनिया दिल्ली ।
कृषी हित किल्ली । सापडेना ॥
निवडणुकीचा । उत्तरेत रंग ।
स्वप्न करू भंग । भाजपाचे ॥
योगींचे वाजवू । म्हणे तीन तेरा ।
लखनौत डेरा । टाकू आता ॥
पंधरा ऑगस्ट । फडकू तिरंगा ।
या नावाने दंगा । करू ऐसा ॥
शेती शेतकरी । बाजूला ठेवला ।
सत्तेचा चढला । रंग सारा ॥
कांत बुद्धीची ना । पडे भेटगाठ ।
सोला दूने आठ । ऐसे जाट ॥
(28 जूलै 2021)
उसंतवाणी- 125
(कोल्हापुर सांगली भागात पुर परिस्थितीची पाहणी करताना नदीला भिंत बांधू असे अजब वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. )
नदीच्या किनारी । बांधू मोठी भिंत ।
बोले बुद्धीवंत । मुख्यमंत्री ॥
त्याहीपेक्षा सोपे । फोटो काढा बाका ।
पीसीवर टाका । अलगद ॥
हवा तो पोर्शन । करावा सिलेक्ट ।
टाका डायरेक्ट । हवा तिथे ॥
करा हिर्वागार । माणदेशी पट्टा ।
औद्योगीक थट्टा । विदर्भाची ॥
ड्रायरने करा । मुंबई कोरडी ।
कोकणी तिरडी । बांधलेली ॥
मराठवाड्यात । समुद्र ढकला ।
खान्देश तापला । लोणी लावा ॥
कांत फेसबुक । करावे लाईव्ह ।
कशाला ड्राईव्ह । दूर दूर ॥
(29 जूलै 2021)
उसंतवाणी- 126
(प्रशांत किशोर यांनी सर्व राजकीय वातावरण अशांत केले आहे. आधी तिसरी आघाडी आणि आता प्रत्यक्ष कॉंग्रेसशीच चर्चा. कॉंग्रस प्रवेशाची तयारी असं सगळं चालू आहे. )
गठबंधनाची । सुरू झाली चर्चा ।
उघडला मोर्चा । विरोधाचा ॥
नेहमीचा आहे । राजकीय खेळ ।
कुणाचा न मेळ । कुणाशीच ॥
पी.एम.पदाची । ही संगीत खुर्ची ।
माझ्याच घरची । म्हणताती ॥
पत्रकार देती । लावुनिया काडी ।
काडीवर माडी । नेता बांधी ॥
वारंवार ऐसा । उडतो पतंग ।
राजकीय रंग । उधळतो ॥
राजकीय हवा । बनवी अशांत ।
किशोर प्रशांत । स्ट्रॅटजीस्ट ॥
कांत खेळ पाही । मतदार राजा ।
वाजवितो बाजा । नको त्याचा ॥
(30 जूलै 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment