Monday, July 12, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ३६



उरूस, 12 जूलै  2021 

उसंतवाणी- 106

 (समान नागरी कायद्याचा आग्रह दिल्ली उच्च न्यायालयाने धरला आहे. या पूर्वीच सर्वौच्च न्यायालयाने 1985 मध्ये या साठी आग्रही विचारणा केंद्र सरकारकडे केली होती. पण तथाकथित पुरोगामी याला विरोध करत आहेत.  )

समान नागरी । चर्चा कायद्याची ।
नसे फायद्याची । कट्टरांना ॥
बोलण्यापुरते । सगळे समान ।
लाचार कमान । कुणापुढे ॥
मुस्लीमांच्यापुढे । टाकतात नांगी ।
सांगतात वांगी । कुराणाची ॥
जगी इतरत्र । एका कायद्याने ।
इथे शरियाने । कशासाठी ॥
उच्च न्यायालय । देतसे दणका ।
तुटतो मणका । पुरोगामी ॥
सुप्रिम कोर्टाने । झापले कधीचे ।
निर्णय आधीचे । पहा जरा ॥
कांत कायदा हा । समान नागरी ।
चढतो पायरी । समतेची ॥
(10 जूलै 2021)

उसंतवाणी- 107

(केंद्रात मंत्रीपद मिळाले नाही म्हणून प्रितम मुंढे नाराज आहेत असे पत्रकारांनी उठवून दिले. मुळात केंद्रीय मंत्रीमंडळात कुणाला घेणार कुणाला काढणार काहीच आतापता पत्रकारांना आधी लागला नाही. युपीए काळात बरखा दत्त सारखे कसे ढवळाढवळ करत होते यादी तयार करताना हे सगळ्यांनी बघितलं आहे. )

मंत्रीपदासाठी । नाराज भगिनी ।
लिहिते लेखणी । पत्रकारी ॥
खोट्या बातमीला । कल्पनेचे बळ ।
वास्तवाचा मेळ । कदापि ना ॥
युपीए काळात । यांची असे चांदी ।
हाती मंत्री यादी । आधी असे ॥
बरखा राडिया । करायाच्या फोन ।
मंत्रीपदी कोण । ठरवाया ॥
ल्युटन्स दिल्लीचा । उठला बाजार ।
म्हणून बेजार । पत्रकार ॥
लागेना हातात । बातमीचा धागा ।
‘ब्रेकिंगचा’ फुगा । फुटलेला ॥
पत्रकारितेची । कांत गेली लाज ।
सत्तास्पर्श माज । उतरला ॥
(11 जूलै 2021)

उसंतवाणी- 108

(मुंबई प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष भाई जगताप यांनी इंधन दरवाढी विरोधात बैलगाडी मोर्चा काढला. नेत्यांची इतकी गर्दी झाली की बैलगाडी मोडली. )

इंधन वाढीच्या । विरोधात मोर्चा ।
कॉंग्रेसची चर्चा । मुंबईत ॥
भाई जगताप । हाती घे कासरा ।
मिडिया आसरा । कॉंग्रेसला ॥
नेत्यांच्या ओझ्याने । मोडे बैलगाडी ।
मोर्च्याची बिघाडी । क्षणार्धात ॥
राजकारण ते । असो किंवा बैल ।
कासरा हो सैल । कॉंग्रेसचा ॥
चिन्ह बैलजोडी । गाय नी वासरू ।
माय नी लेकरू । आता फक्त ॥
दिल्लीच्या गोठ्यात । बसुन रवंथ ।
संपविती संथ । पक्ष जूना ॥
कांत जो न जाणे । जनतेची नाडी ।
चालणार गाडी । त्याची कशी ॥
(12 जूलै 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 





No comments:

Post a Comment