उरूस, 15 जूलै 2021
उसंतवाणी- 109
(कॉंग्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बारामती मध्ये जावून असं बोलले की शत्रूला घरात घुसून मारले पाहिजे. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी पटोले लहान आहेत असं सांगितलं. सोनिया गांधी बोलल्या असत्या तर मी प्रतिक्रिया दिली असती.)
बारामती मध्ये । ऐकून गर्जना ।
छोटा आहे नाना । म्हणे काका ॥
समकक्ष माझ्या । लागेल बोलाया ।
जैसे की सोनिया । कॉंग्रेसात ॥
‘बाळू’‘बाबा’‘भाई’। चिंटू पिंटू‘नाना’।
करू दे ठणाणा । वायफळ ॥
पटोले पवार । कोण छोटे मोठे ।
दोघे धुती गोठे । दिल्लीचेच ॥
बेडुक फुगुन । होईल का बैल ।
जीभ जरी सैल । सुटलेली ॥
कांत नव्हे नेता । स्टॅडप कॉमेडी ।
जनता न वेडी । मत द्याया ॥
(13 जूलै 2021)
उसंतवाणी- 110
(कॉंग्रेस कार्यकारिणी सदस्य विश्वबंधू रॉय यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून दिग्विजय सिंह यांना हिंदू विरोधी मतांसाठी आवरा असं कळवलं आहे. अशा मतप्रदर्शनामुळे हिंदू मते पक्षापासून दूर जात आहेत असा स्पष्ट आरोप करण्यात आला आहे. )
हिंदू विरोधात । बोले डिग्गी राजा ।
वाजवतो बाजा । कॉंग्रेसचा ॥
कार्यकर्ता लिही । पत्र सोनियाला ।
आवरा नेत्याला । बोलभांड ॥
यांच्यामुळे होतो । पक्ष पराभुत ।
नको ऐसे भूत । पक्षामध्ये ॥
हिंदूंची नाराजी । टाके संकटात ।
नाही पदरात । सत्ताफळ ॥
तुष्टीकरणाची । चुकलेली नीती ।
अँटोनी समिती । हेच सांगे ॥
कॉंग्रसी गणित । झाले उफराटे ।
वोट बँक फुटे । मुस्लीमांची ॥
कांत जाती धर्म । अस्मिता कहर ।
लोकशाहीवर । डाग जाणा ॥
(14 जूलै 2021)
उसंतवाणी- 111
(शरद पवार यांना राष्ट्रपती पदाचा उमेदवार विरोधी पक्षांकडून केले जाणार अशा बातम्या उठवायला सुरवात झाली आहे. पवारांनी तातडीने यांचे खंडन केले. पण प्रशांत किशोर हे नाव पुढे करून विरोधी एकजूट बनवत आहेत असे एक चित्र समोर येते आहे. ज्यांची काहीच राजकीय ताकद नाही त्या छोट्या मोठ्या पक्षांना धेवून भाजपचा पराभव कसा घडवून आणणार? याचे आकड्यांत उत्तर कांहीच मिळत नाही. पण माध्यमांना तेवढाच चेव चढला आहे.)
नविन स्वप्नात । गुंग बारामती ।
भावी राष्ट्रपती । पवारच ॥
बुडाला बेडूक । उडाला तो पक्षी ।
राजकीय नक्षी । काकांची ही ॥
काका तातडीने । करीती खंडन ।
नको हे भांडण । नेतृत्वाचे ॥
मोदी विरोधात । जाहला अशांत ।
किशोर प्रशांत । स्ट्रॅटजीस्ट ॥
पवार नावाचा । उठवू धूरळा ।
मेळवू सगळा । विरोधक ॥
पंतप्रधानाच्या । स्पर्धेतून बाद ।
जाईल ही ब्याद । हेच मनी ॥
कांत दरबारी । ऐसे उठवळ ।
राजकीय बळ । शुन्य जाणा ॥
(15 जूलै 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment