Saturday, July 10, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ३५




उरूस, 10 जूलै  2021 

उसंतवाणी- 103

(महाराष्ट्र विधीमंडळाचे अधिवेशन दोन दिवसांत उरकण्यात आले. 12 भाजप आमदरांचे निलंबन करण्यात आले.  कृषी विधेयक मांडले पण त्यात केंद्राच्या कायद्यांपेक्षा वेगळे काहीच नाही. )

अधिवेशनाची । ऐसी झाली गती ।
जणू गणपती । दो दिसांचा ॥
सत्ताधार्‍यांसाठी । एक उपचार ।
टाकी बहिष्कार । विरोधक ॥
कृषी विधेयक । मांडे कसे बसे ।
स्वत:चेच हसे । करविती ॥
स्वप्नील मरण । नव्हे आत्महत्या ।
सरकारी हत्या । धोरणाची ॥
सर्कारी फाईल । जागोजाग अडे ।
जनलोक रडे । कामासाठी ॥
दोन तृतिअंश । वाटा करी फस्त ।
नेता-बाबू मस्त । बांडगुळे ॥
कांत सरकार । स्वत:च समस्या ।
निष्फळ तपस्या । लोकशाही ॥
(7 जूलै 2021)

उसंतवाणी- 104

(केंद्रिय मंत्रीमंडळात फेर बदल करण्यात आले. महाराष्ट्राच्या वाट्याला नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार आणि भागवत कराड हे चार मंत्री नव्याने मिळाले. तर पूर्वीचे प्रकाश जावडेकर कमी झाले. पियुष गोयल यांच्याकडून रेल्वे खाते काढून घेण्यात आले.)

मंत्रीमंडळाला । तारूण्य झळाळी ।
वृद्धांची गळाली । नावे कांही ॥
‘प्रकाश’ मावळे । येई ‘नारायण’ ।
घालाया वेसण । सेने मुखी ॥
‘गोयल’ हटले । रूळावरतूनी ।
चाललो आतुनी । खेळ कांही ॥
‘कपिल’ ‘भारती’। नविन चेहरे ।
आहेत उपरे । भाजपात ॥
जलील खैरेंना । देण्यास टक्कर ।
‘कराड’ चक्कर । चालविली ॥
देवेंद्र जाण्याच्या । जे आशेवरती ।
बंद हो बोलती । त्यांची आधी ॥
कांत सह्याद्रीने । गाजवावी दिल्ली ।
आपुलीच गल्ली । सोडा आता ॥
(8 जूलै 2021)

उसंतवाणी- 105

(अर्बन नक्षली फादर स्टेन सामी याचा तुरूंगात असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यावर मोठे काहूर पुरोगाम्यांकडून उठवले जात आहे.)

लिब्रांडु अवघे । बुडाले शोकात ।
मेला तुरूंगात । स्टेन सामी ॥
देश विरोधाचे । बक्कळ पुरावे ।
तरी का गोडवे । गातात हे ॥
अर्बन नक्षल । पेटवी विखार ।
बुद्धिची शिकार । करिती हे ॥
भीमा कोरेगांव । दंगलीचा कट ।
चाले खटपट । शस्त्रांस्त्रांची ॥
कायदा आपुले । करितसे काम ।
फुटतो का घाम । लिब्रांडूंना ॥
युपीए काळात । सुरू कारवाई ।
आता का आवई । अन्यायाची ॥
कांत विषवल्ली । उपटा समुळ ।
नक्षल्यांचे कुळ । नष्ट होवो ॥
(9 जूलै 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 





No comments:

Post a Comment