Tuesday, July 6, 2021

उसंतवाणी - शतक महोत्सव



उरूस, 6 जूलै  2021
 
उसंतवाणी- 100

(रोज एक अभंग असे सलग 100 दिवस लिहिले. उसंतवाणीचा आज शतक महोत्सव. )

‘उसंतवाणी’ने । गाठले शतक ।
मी नतमस्तक । तूम्हापुढे ॥
केलेत कौतुक । देवोनिया दाद ।
तोची हा प्रसाद । माझ्यासाठी ॥
संतांनी रचले । रसाळ अभंग ।
माझा शब्द ढंग । साधासाच ॥
चालु घटनांना । दिले शब्द रूप ।
त्याचेच अप्रुप । वाचकांना ॥
लोकगंगेमध्ये । अभंग सोडले ।
तरले बुडले । तुम्हा हाती ॥
उतणार नाही । मातणार नाही ।
टाकणार नाही । शब्द वसा ॥
शब्द सहाय्याने । वेचु जरा काटे ।
प्रबोधन वाटे । कांत म्हणे ॥
(4 जूलै 2021)

उसंतवाणी- 101

(ज्ञानेश्वर माउली पादुका पालखीचे आळंदीहून काल प्रस्थान झाले पंढरपुरसाठी. कोरोना निर्बंधामुळे वारी प्रतिकात्मक करण्यात आली.)

आळंदीवरून । निघाल्या पालख्या ।
गर्दिला पारख्या । कोरोनात ॥
संकटावरती । करोनिया मात ।
छोट्या स्वरूपात । वारी चाले ॥
रोहिण्या मृगाचा । पडता पाऊस ।
कुणब्याची हौस । पेरणीची ॥
तैसेची हो वारी । भक्तीचे कारणी ।
करिते पेरणी । काळजात ॥
कोरोनात सारे । उलट पालट ।
श्रद्धा ही चिवट । टिकलेली ॥
जो तो आपुल्याच । बसुन अंगणी ।
विठ्ठल चरणी । धावे मन ॥
कांत संकटात । एकेक क्षणाला ।
लागते पणाला । खरी श्रद्धा ॥
(5 जूलै 2021)

उसंतवाणी- 102

(महाराष्ट्र विधी मंडळाचे दोन दिवसीय अधिवेशन 5 जूलैला सुरू झाले. पहिल्याच दिवशी भाजपचे 12 आमदार एक वर्षासाठी निलंबीत करून एक खेळी सत्ताधार्‍यांची केली. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती लांबली त्याचा असा हिशोब चुकता केला. )

निलंबीत केले । आमदार बारा ।
केला चोख पुरा । हिशोब हा ॥
गल्लीत पोरांची । चालतसे कुस्ती ।
तैसी दिसे मस्ती । सभागृही ॥
तोडला माईक । केली शिवीगाळ ।
सगळा गचाळ । कारभार ॥
लोकप्रतिनिधी । यांना का म्हणावे ।
जोड्याने हाणावे । रस्त्यावर ॥
विधानसभा का । कुस्तीचा आखाडा ।
सत्तेचा झगडा । उठवळ ॥
दोनातील एक । नासवला दिस ।
पुढे काय कीस । पाडणार ॥
कांत लोकशाही । नेते सारे शाही ।
बोटालाच शाई । सामान्यांच्या ॥
(6 जूलै 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 





No comments:

Post a Comment