Tuesday, July 27, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- ३९



उरूस, 21 जूलै  2021 

उसंतवाणी- 115

 (कावड यात्रेबाबत सर्वौच्च न्यायालयाने सुमोटो दाखल करून घेत त्यावर निर्बंध घालण्याचा आग्रह उत्तर प्रदेश सरकारला धरला. तसे निर्बंध घातले गेले. पण नेमकं याच वेळी 20-21 जूलैला बकरी ईद साजरी होणार आहे. त्याला मात्र केरळ सरकारने खुली सुट दिली. त्यावर सर्वौच्च न्यायालयाने चकार शब्द काढला नाही. सगळे पुरोगामी कुंभमेळा, कावड यात्रा यावर टिकेची झोड उठवतात पण बकरी ईद आणि किसान आंदोलन यावर मात्र काहीच बोलत नाहीत. हा दुट्टप्पीपणा आहे. )

बकरी ईदला । केरळात संधी ।
कावडीला बंदी । उत्तरेत ॥
कोरोना आमचा । किती सेक्युलर ।
फक्त हिंदूवर । जोर त्याचा ॥
इस्लामला लाभे । कवच कुंडले ।
विचार बंडले । पुरोगामी ॥
कावड यात्रेचा । कोर्टात सुमोटो ।
बकरीचा फोटो । दिमाखात ॥
भला हा कायदा । सतीला दे बत्ती ।
शिंदळीला हत्ती । हेच खरे ॥
कृषी आंदोलन । पुरोगामी पक्के ।
त्याला नाही धक्के । कोव्हिडचे ॥
कांत ओळखा हे । बुद्धीजीवी चाळे ।
बुद्धीचे दिवाळे । निघालेले ॥
(19 जूलै 2021)

उसंतवाणी- 116

(आषाढी एकादशीचा हा दिवस. कोरोना आपत्तीत जग होरपळून निघाले आहे. त्यातून मार्ग निघू दे या शिवाय विठ्ठलापाशी काय मागणार? )

युगे अठ्ठावीस । विठेवरी उभा ।
पाहतोस शोभा । कोरोनाची ॥
तुच निर्मिलेली । माणसेही जिद्दी ।
संकटाच्या हद्दी । ओलांडती ॥
नसे हाती काही । श्रद्धा हेची बळ ।
काढतात कळ । दुष्काळात ॥
शतके लोटली । कांही नसे थाट ।
दिंडी चाले वाट । साधेपणी ॥
प्रेमे जोडलेले । दोन हे हस्तक ।
झुकले मस्तक । प्रमाणीक ॥
जाणतोस देवा । संकटाची धग ।
पुर्वपदी जग । येवू दे रे ॥
कांत आषाढीचे । हेची संकिर्तन ।
विशुद्ध वर्तन । राहो देवा ॥
(20 जूलै 2021)

उसंतवाणी- 117

(कायद्या समोर सगळे समान आहेत असा आपला गैरसमज आहे. प्रत्यक्षात कांही जणांसाठी कायदाच वेगळा असतो. अनिल देशमुख माजी मंत्री यांच्यासाठी कायदा वेगळा आहे. अजूनही त्यांना ई.डी. समोर चौकशीला यायला जमले नाही. आणि त्यावर कांही कडक कारवाई पण शासनाला करता आलेली नाही. )

कायद्या पुढती । सारेच समान ।
परी असमान । कायदाच ॥
इतर कुणाला । ईडीचे समन्स ।
जीव कासावीस । होई त्याचा ॥
व्हावेच लागते । समोर हजर ।
पण जर तर । कांही नाही ॥
माजी मंत्री मात्र । फिरती मोकळे ।
कोर्टामध्ये गळे । काढताती ॥
कायद्याचे हात । सामान्यांना लंबे ।
यांच्यासाठी ‘खंबे’ । असतील ॥
न्यायदेवतेच्या । डोळ्यांवर पट्टी ।
ओठांवर शिट्टी । यांच्यासाठी ॥
कांत समतेचे । हेची अधिष्ठान ।
‘जास्तीचे’ समान । कांही जण ॥
(21 जूलै 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 





No comments:

Post a Comment