उरूस, 2 ऑगस्ट 2021
उसंतवाणी- 127
(संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू आहे. विरोधकांनी संसदेत गोंधळ घालून कामकाज बंद पाडले आहे. )
उदे लोकशाही । वाजते संबळ ।
चालला गोंधळ । दरबारी ॥
प्रतिष्ठापना ही । केली तुझी आई ।
नाव लोकशाही । म्हणोनिया ॥
निवडले भोपे । तुजा पुजणार ।
नावे खासदार । ओळखती ॥
नाचू लागले हे । होवोनिया भुत्ये ।
सर्व स्वार्थ शिते । चिवडिती ॥
जनहिताची ना । बांधतात पुजा ।
राजकिय इजा । फक्त चाले ॥
आई तुच दिला । वर भरपुर ।
‘खासदारा’सूर । माजलेले ॥
कांत म्हणे आई । नको बसू शांत ।
गोंधळाचा अंत । कर आता ॥
(31 जूलै 2021)
उसंतवाणी- 128
(चिनी कम्युनिस्ट पक्षाला 100 वर्षे पूर्ण झाली म्हणून एक ऑन लाईन कार्यक्रम झाला. त्यात भारतातील सिताराम येच्युरी आणि डी.राजा यांनी सहभाग घेत चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांचे अभिनंदन केले. त्यावरून वाद निर्माण झाला. )
चीनमध्ये वाजे । शताब्दीचा बाजा ।
येच्युरी डी.राजा । खुश येथे ॥
देशावर केला । होता ज्यांनी हल्ला ।
त्यांचा गोड सल्ला । यांच्यासाठी ॥
आपुल्या देशाची । खावुनिया पोळी ।
वाजविती टाळी । चायनाची ॥
चीनमध्ये जरा । पडता पाऊस ।
छत्रीची ही हौस । भारतात ॥
फॅसिस्ट म्हणूनी । इथे काढी खोट ।
चायनात ओठ । शिवलेले ॥
जगातले म्हणे । कामगार एक ।
ग्राहक का एक । नको जगी? ॥
कांत कम्युनिस्ट । सर्वार्थाने ‘डावे’ ।
त्यांच्यात ‘उजवे’ । कांही नाही ॥
(1 ऑगस्टे 2021)
उसंतवाणी- 129
(मुंबईच्या एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी अशी थप्पड मारू की परत उठणार नाही अशी मुख्यमंत्री पदाला न शोभणारी भाषा केली. भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या एका वक्तव्यावर ते प्रतिक्रिया देत होते. )
कोण बोले आम्हा । हसूनी खप्पड ।
मारू का थप्पड । एक अशी ॥
काकांना पुसून । बोलतो मी ठाम ।
काढतो हा घाम । भाजपचा ॥
दोन कुबड्यांची । खुर्ची माझी स्थिर ।
मला मीच धरी । रोज देतो ॥
सोनियाचे द्वारी । तलवार म्यान ।
हाची स्वाभिमान । जाणा खरा ॥
वसुलीची घेतो । मोजून रक्कम ।
सर्कार भक्कम । बिघाडीचे ॥
तिघे मिळूनिया । दावितो स्वबळ ।
कोण मळमळ । म्हणतसे ॥
कांत वाचाळांची । काय सांगू ‘थोरी’ ।
मरणाचे दारी । जनता ही ॥
(2 ऑगस्ट 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment