Tuesday, July 27, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- ४१



उरूस, 27 जूलै  2021 

उसंतवाणी- 121

 (ओल्या दुष्काळाचे संकट कोकणावर कोसळले आहे. त्याकडे लक्ष द्यायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. शिवसेनेचा बालेकिल्ला पण तिकडे शिवसेनेचाच मुख्यमंत्री दुर्लक्ष करतो. )

ओल्या दुष्काळात । अवघे कोकण ।
सारे चिपळुण । पाण्याखाली ॥
अर्थ राजधानी । लाडकी मुंबई ।
जाहली तुंबई । पर्जन्याने ॥
डोंगर कोसळे । जाहले कफन ।
जिवंत दफन । माणसे ही ॥
पाण्याविना कधी । डोळ्यामध्ये पाणी ।
पाण्यामुळे पाणी । आज डोळा ॥
बुडता पाण्यात । सेना बालेकिल्ला ।
पुजेचा हा सल्ला । कोण देई ॥
चक्रीवादळाने । होते थोबडले ।
नाही उघडले । डोळे तरी ॥
कांत सत्तेवर । कोकण सुपुत्र ।
सिद्ध हा कुपुत्र । भुमीसाठी ॥
(25 जूलै 2021)

उसंतवाणी- 122

(उत्तर प्रदेशांत बहुजन समाज पक्षाने ब्राह्मण संमेलन घेतले. आता समाजवादी पक्ष अस संमेलन घेत आहे. ज्यांना आधी शिव्या घातल्या त्यांच्यासाठी ओव्या का गायल्या जात आहेत? )

सत्तेसाठी सुरू । यु.पी.त देखावा ।
ब्राह्मण मेळावा । भरलेला ॥
कला ज्याला दिल्या । मनसोक्त शिव्या ।
आज त्याला ओव्या । कशासाठी ॥
तिलक तराजू । और तलवार ।
जूते मारू चार । पूर्वी म्हणे ॥
हत्ती नका म्हणू । आहे हा गणेश ।
ब्रह्मा नी महेश । विष्णुसवे ॥
पुरोगामी सारे । का बावचळले ।
बुद्धीने ढळले । सत्तेपायी ॥
शर्टावर जरी । घातले जानवे ।
मेंदूत जाणवे । पोकळीच ॥
कांत ओळखावा । बुद्धीने ब्राह्मण ।
जन्माचे कारण । चुक आहे ॥
(26 जूलै 2021)

उसंतवाणी- 123

(राहूल गांधी यांनी ट्रॅक्टर चालवत आज संसदेत प्रवेश केला. वस्तुत: त्या वाहनाला बंदी असून कलम 144 लागू केल्याने जमावाला पण बंदी आहे. पण कांहीतरी पोरकटपणा करून राहूल गांधी स्वत:चे आणि पक्षाचे हसू करून घेतात. )

राहूल नेता की । कॉमेडी ऍक्टर ।
चालवी ट्रॅक्टर । दिल्लीमध्ये ॥
निघे अचानक । येताच लहर ।
विचित्र कहर । राजकीय ॥
‘कानुन वापसी’ । इतका फॅक्टर ।
त्यापायी ट्रॅक्टर । दौडविले ॥
कायदा त्रुटीचा । एकही ना मुद्दा ।
म्हणून हा भद्दा । खेळ केला ॥
स्व-जाहिरनामा । वाचला ना कधी ।
हेच मुद्दे आधी । त्यात होते ॥
कॉंग्रेस मुक्तीचा । केवढा उरक ।
स्टार प्रचारक । भाजपचा ॥
कांत नेतृत्वाचा । सारा पोरखेळ ।
धोरणात मेळ । कुठे नाही ॥
(27 जूलै 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 





No comments:

Post a Comment