उरूस, 3 जूलै 2021
उसंतवाणी- 97
(उपमुख्यमंत्रीपद मुस्लीमांसाठी राखीव ठेवा अशी अजब मागणी ओवैसींच्या पक्षाने केली आहे. उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा मुद्दाम सुरू करून दिलेली दिसत आहे. )
मुस्लीम बनवा । उपमुख्यमंत्री ।
वाजते वाजंत्री । युपी मध्ये ॥
ओवैसींचा पक्ष । मागतसे खुर्ची ।
लागतसे मिर्ची । लिब्रांडूंना ॥
सपा नी बसपा । कॉंग्रेस इतर ।
करीती वापर । मुस्लीमांचा ॥
वोट बँकेचे हे । झाले गुत्तेदार ।
पंक्चर भंगार । मस्लीम हा ॥
दावूनिया त्याला । भाजपाची भिती ।
मते वळविती । स्वत:कडे ॥
मोदींमुळे सारी । वोट बँक फुटे ।
सत्तास्वप्न तुटे । दलालांचे ॥
कांत धर्माधारी । नको सत्तापद ।
घटना विरोध । त्यात वसे ॥
(1 जूलै 2021)
उसंतवाणी- 98
(विधीमंडळाचे दोन दिवसीय अधिवेशन 5 व 6 जूलैला होत आहे. विधानसभेत सभापतीची निवड झालेली नाही. नाना पटोलेंनी राजीनामा दिल्याने जागा रिकामी आहे. ती आधी भरा अशी सुचना राज्यपालांनी केली आहे. )
विधानसभेला । नाही सभापती ।
मागे साडेसाती । आघाडीच्या ॥
आधी भरा पद । सांगे राज्यपाल ।
करू नका हाल । प्रक्रियेचे ॥
दोन दिवसांत । उरकू सेशन ।
आधीच टेंशन । चौकशीचे ॥
अनिल जात्यात । परब सुपात ।
ईडीच्या मापात । सापडती ॥
आरक्षणापायी । पेटली रे लंका ।
स्वबळाचा डंका । वाजतो हा ॥
पटोलेंच्या जागी । आणु पृथ्वीबाबा ।
घेतील ते ताबा । हाऊसचा ॥
कांत आघाडीचे । हरवले सुत्र ।
प्रत्येक स्वतंत्र । वागु लागे ॥
(2 जूलै 2021)
उसंतवाणी- 99
(जरंडेश्वर साखर करखाना विक्रि प्रकरणांत अजीत पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची नावे आली आहेत. त्यांच्याशी संबंधीत कंपनीला हा लिलावात काढलेला कारखाना विकल्या गेला. त्या निमित्ताने ईडीने कारखान्याची मालमत्ता जप्त केली आहे. )
साखर घोटाळा । ये अडचणीत ।
पवार अजीत । चौकशीत ॥
ऊस-दूध-पत । सारा सहकार ।
केला स्वाहाकार । सत्तेपायी ॥
कारखाना स्वस्त । काढू लिलावात ।
आपुल्या घशात । घालू मग ॥
सत्ता शिडी केली । गाठले ‘शिखर’ ।
अवघी साखर । कडू केली ॥
उसाचे नव्हे हे । शेतीचे गाळप ।
करूनी कळप । नासविती ॥
शेती विरोधाचे । धोरण सगळे ।
बापाचेच गळे । कापताती ॥
कांत सहकार । भ्रष्टतेचे मुळ ।
उपटा समुळ । ताकदिने ॥
(3 जूलै 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment