Tuesday, July 27, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- ४०

 

उरूस, 24 जूलै  2021 

उसंतवाणी- 118

 (मुंबई आणि कोकणांत पावसाने आतंक माजवला आहे. चिपळून तर पूर्ण पाण्याखाली गेले. ज्या शिवसेनेचा बालेकिल्ला मुंबई आहे त्यांना पंढरपुरला गाडी चालवत जायला वेळ आहे पण मुंबई कोकणाच्या पूरग्रस्तांकडे पहायला वेळ नाही. सवड नाही. )

पावसाने मेले । मुंबईत लोक ।
त्याचा नाही शोक । आघाडीला ॥
पावसाची मिळो । जनतेला सजा ।
सरकारी पुजा । महत्त्वाची ॥
गाडी चालवीत । गाठली पंढरी ।
आषाढीची वारी । इव्हेंट तो ॥
विठ्ठलाची पुजा । देखणे ते दृश्य ।
समस्य अदृश्य । राज्यातील ॥
युगे अठ्ठावीस । विठु विटेवरी ।
दीड वर्षे घरी । मुख्यमंत्री ॥
ओळखून भाव । विठ्ठल दे मार ।
आमदार गार । आघाडीचा ॥
कांत म्हणे घ्यावा । कांहीतरी धडा ।
नीट हाका गाडा । आघाडीचा ॥
(22 जूलै 2021)

उसंतवाणी- 119

(फोन टॅपिंगचा बहाणा करून संसदेत गोंधळ घातला गेला. तृणमुलचे राज्यसभेतील खासदार सुशांत सेन यांनी मंत्री उत्तर देत असताना त्यांच्या हातातील कागद हिसकावून फाडले आणि तुकडे अध्यक्षांच्या दिशेने उडवून दिले. )


फोन टॅपिंगचा । करूनी बहाणा ।
घालती धिंगाणा । संसदेत ॥
संसद नव्हे ही । बाजार भरला ।
फाडूनी फेकला । कायदाच ॥
ऍम्नेस्टी संस्थेने । झटकला पल्ला ।
विरोधाचा कल्ला । वाया जाई ॥
आत हा धिंगाणा । बाहेर गोंधळ ।
कृषी चळवळ । भरकटे ॥
कृषी आंदोलन । झाले छु मंतर ।
जंतर मंतर । बसुनिया ॥
‘कनुन वापसी’ । अडकली सुई ।
शुद्ध वेडापायी । टिकैतच्या ॥
कांत विरोधक । शक्तीने हो क्षीण ।
विचाराने हीन । सांप्रतला ॥
(23 जूलै 2021)

उसंतवाणी- 120

(संसदेमध्ये गोंधळ घातला जातो आहे तो जाणीवपूर्वकच आहे. कारण या मुळे लोकशाहीलाच धोका उत्तन्न झाला आहे. पाश्चिमात्य देशांतून भारतातील लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा हे कारस्थान असावे अशी शंका येवू लागली आहे. वारंवार विविध मुद्दे पुढे करून गोंधळ निर्माण केला जातो. न्यायालयात खटले दाखल करून अडथळा आणला जातो.)

गोंधळाच्या डोही । गोंधळ तरंगे ।
विरोधाची अंगे । प्रकटली ॥
आरोपा आरोपी । जुना खेळ पुन्हा ।
न घडला गुन्हा । रंगवीती ॥
निरर्थक प्रश्‍न । मागती उत्तरे ।
संसदी लक्तरे । मिरवती ॥
पाश्चात्य माध्यमे । लिहिती द्वेषात ।
उचले जोशात । पुरोगामी ॥
केल्या आरोपाचा । मागता पुरावा ।
नुस्ता गवगवा । करताती ॥
आरोपांचा फक्त । उडावा धुराळा ।
याहुनी निराळा । हेतु नसे ॥
विरोधकांपाशी । उरले ना मुद्दे ।
म्हणून हे गुद्दे । कांत म्हणे ॥
(24 जूलै 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 





No comments:

Post a Comment