Wednesday, June 30, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग 32



उरूस, 30 जून  2021 

उसंतवाणी- 94

(अनिल देशमुखांचे स्वीय सहाय्यक शिंदे आणि पाळंदे यांना अटकेत टाकल्या गेले. अनिल देशमुखांभोवती फास आवळत चालला आहे. )

गेले अटकेत । शिंदे नि पाळंदे ।
देशमुख वांधे । बहु झाले ॥
वाझे सांगतसे । वसुली रॅकेट ।
पैसे गेले थेट । मंत्र्यापाशी ॥
कोरोना काळात । चालली वसुली ।
आपत्तीच्या झुली । पांघरूनी ॥
समन्स पोचता । धावतो वकिल ।
येइना अनिल । कोर्टापुढे ॥
‘हप्ता’ वसुलीचा । घातला वरवा ।
सत्तेचा गारवा । भोगताना ॥
वसुलीचे वाटे । बारामती वाटे ।
टोचती हे काटे । शरदासी ॥
कांत पोल खोले । सचिन हा वाझे ।
जड झाले ओझे । आघाडीला ॥
(28 जून 2021)

उसंतवाणी- 95

(आधीच मराठा आरक्षणा विरोधात सर्वौच्च न्यायालयाचा निकाल लागलेला. त्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणा विरोधात उच्च न्यायालयाचा निकाल गेला. राज्य सरकारला न्यायालयनी पातळीवर सतत अपशय येत चालले आहे.)

मराठा ओबीसी । आरक्षण वांधे ।
खिळखिळे सांधे । आघाडीचे ॥
आघाडी हारते । कोर्टाची लढाई ।
नाही चतुराई । कायद्याची ॥
परबांसारखे । ‘विधी’ सल्लागार ।
बुद्धीने सुमार । वकिलीत ॥
लावती वकिल । सिब्बल कपील ।
करण्या अपील । कोर्टापुढे ॥
सर्कारी तिजोरी । मोजते भक्कम ।
खिशात रक्कम । सिब्बलच्या ॥
एवढे करून । साधतो न मोका ।
आरक्षण नौका । फुटतसे ॥
कांत ज्यांचा धंदा । हप्ते वसुलीचा ।
ओळखा चालीचा । रोख त्यांच्या ॥
(29 जून 2021)

उसंतवाणी- 96

(सेंट्रल विस्टा प्रकरणांत उच्च न्यायालयाकडून दंड आणि थप्पड खाल्ल्यावर पुरोगामी सर्वौच्च न्यायालयात पोचले. तिथेही जोरात थप्पड बसली आणि हे प्रकरण एकदाचे संपले. सातत्याने नविन संसद भवनाच्या बांधकामाला विरोध केला गेला. अडथळे आणले गेले. कोरोनाचे निमित्त करून या बांधकामावर संशय निर्माण करण्याची पुरोगामी खेळी फसली. आता नविन कुठले निमित्त उकरून काढले जाईल आणि परत एकदा हे आंदोलनजीवी न्यायालयात जनहित याचिका दाखल करून वेळकाढूपणाचा खेळ खेळतील.  )

नविन संसद । निर्माण जोरात ।
दुखते पोटात । लिब्रांडूंच्या ॥
सुप्रीम कोर्टात । अंतिम निवाडा ।
बसल्या थपडा । हेतूवर ॥
लढविती केस । नाव जनहित ।
हेतू संकुचित । दुषित हा ॥
बांधकाम चाले । जिकडे तिकडे ।
बोट वीस्टाकडे । कशामुळे? ॥
आंदोलनजीवी । काढतात गळे ।
होती अडथळे । विकासात ॥
एक एक शब्द । कोर्टाचा बोचरा ।
जाहला कचरा । याचिकेचा ॥
कांत जनहित । याचिकेचा धंदा ।
पुरोगामी गंदा । खेळ सारा ॥
(30 जून 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 





No comments:

Post a Comment