Wednesday, April 8, 2020

तबलीग व आव्हाड प्रश्‍नी मौनाचा पुरोगामी कट !


उरूस 8 एप्रिल 2020

शाहिनबाग आंदोलनातील लोकांनी अवैध (या आंदोलकांना रस्त्यावर बसण्याची परवानगी नव्हती. त्यांची बाजू घेणार्‍यांनी नीट अभ्यास करावा.) पद्धतीनं लाखो लोकांचा रस्ता 100 दिवस अडवून ठेवला होता. त्या आडमुठपणाला ‘तमाशा’ शब्द उपहासाने वापरला तर बर्‍याच पुरोगाम्यांना तो झोंबला होता. या शब्दामुळे माझ्यावर तिखट टीका केली गेली. भयंकर ट्रालिंग झाले. आता हेच सगळे पुरोगामी तबलीगचे कोरोना पसरविण्याचे भयानक घातक प्रकरण समोर आल्यावर मात्र मिठाची गुळणी धरून गप्प आहेत. पाठोपाठ महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या अंगरक्षकांनी विरोधात फेसबुक पोस्ट टाकल्याने अनंत करमुसे यांना प्रचंड मारहाण केल्याचेही प्रकरण समोर आले आहे. याही बाबतीत ही सगळी जमात-ए-पुरोगामी आळीमिळी गुपचिळी बाळगून शांत आहे.

2019 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुका होण्याच्या आधी कॉंग्रेस खासदार माजी पत्रकार (आता कॉंग्रेसच्या अधिकृत दावणीला बांधल्या गेल्यावर त्यांना माजी पत्रकार असेच म्हणावे लागेल ना) मा. कुमार केतकर यांनी असा आरोप केला होता की मोदी  शहा निवडणुकाच होवू देणार नाहीत. झाल्यातरी सत्ता सोडणार नाहीत. दंगे होतील. मुळात मोदी पंतप्रधानपदी येणे हाच कसा आंतरराष्ट्रीय कट आहे हे केतकर आवर्जून सांगत होते. भगवान राम जरी पृथ्वीवर अवतरले तरी मोदी पंतप्रधान होणार नाहीत असंही ते बोलले होते. केतकरांना या आंतरराष्ट्रीय कटाची इतकी माहिती होती तर आंतरराष्ट्रीय पोलिसांना त्यांनी का नाही दिली?

2019 च्या निवडणुका पार पडल्या. आधीपेक्षा जास्त जागा निवडून येउन मोदीच परत पंतप्रधान झाले. त्यामुळे केतकरांची भविष्यवाणी खोटी ठरली. कुठेही निकालावर दंगे झाले नाहीत. मग हा कट असल्याची अफवा केतकर का पिकवत होते? हेच केतकर आता तबलीग आणि जितेंद्र आव्हाड प्रकरणी कुठे आहेत?

कलम 370, ट्रिपल तलाक, राम जन्मभूमी निकाल, सीएए कायदा आणि त्याच्या विरोधातील शाहिनबाग आंदोलन या सर्वांवर जमात-ए-पुरोगामी सगळे तुटून पडले होते. राम जन्मभुमी प्रकरणांत तर रोमिला थापर सारख्या पुरोगाम्यांनी लिहीलेली इतिहासाची पुस्तकेही खोटी असल्याचे सिद्ध झाले.

माझ्यासारखा एक सामान्य माणूस जेंव्हा शाहिनबागेला ‘तमाशा’ हा शब्द उपहासाने वापरतो तेंव्हा तुटून पडण्याची उबळ यांना येते. जे कधी नियमित माझ्या ब्लॉगवर कधी व्यक्त होत नाहीत. विरोध दर्शविण्यासाठी का होईना ज्यांना काही लिहीण्याची उसंत नसते. ते सगळे महाराष्ट्रातले पुरोगामी मित्र एका शब्दावर आक्रमक होवून शब्दबाण बरसू लागतात.

आणि आज भारताला इतका मोठा धोका तबलीगींनी दिला तेंव्हा मात्र शांत बसतात. महाराष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जपमाळ ओढणारे एका सामान्य माणसाला महाराष्ट्राचा मंत्री आपल्या बंगल्यावर आणून प्रचंड मारहाण करतो आणि इथेही हे शांत बसतात?

आता मात्र मला वेगळीच शंका येउ लागली आहे. लहान मुलांच्या भांडणात ज्याची चुक असते ज्याने मारहाण केली असते तोच मोठ्यानं ओरडायला लागतो रडायला लागतो. तसेच कुमार केतकरांना हा सगळा जमात-ए-पुरोगाम्यांचा कट माहित होता. ते स्वत:ही याच कटात सहभागी आहेत.  म्हणून त्यांनीच आधीच आरडा ओरड सुरू केली. प्रत्यक्षात ते म्हणाले तसे काहीही झाले नाही. निवडणुक शांततेत पार पडली. नविन सरकारने सत्ताग्रहण केले. या निवडणुकीत हिंसाचारही अतिशय कमी झाला. म्हणजे या जमात-ए-पुरोगामींचेच ढोंग उघडे पडले.

आव्हाडांच्या प्रकरणांतही मारहाणीची माहिती समोर आली आणि या सगळ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पाठराखण करण्यातला ढोंगीपणा उघड झाला.

ज्यानं आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकली त्याच्यावर कायद्यान्वये जी काही कारवाई अपेक्षीत ती झालीच पाहिजे. त्याबाबत मला कसलीही सहानुभूती नाही. तो कुणाही पक्ष संघटनेचा कार्यकर्ता असो त्याच्यावर कायद्याद्वारे शिक्षा मिळावी. पण एखाद्या राज्यात कायदा करणारे मंत्रीच जर कायदा स्वत:च्या हातात घेत असतील तर सामान्य माणसांनी करायचे काय?

हेच आव्हाड आणि त्यांचे नेते शरद पवार मोदी विरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिणार्‍यां बाबत कसे वागले होते? मुुंबईला सोशल मिडीयावर ट्रोल होणार्‍या मोदी भाजप विरोधी तरूणांची बैठक घेवून शरद पवारांनी या तरूणांच्या पाठिशी आपण असल्याचे सांगितले होते. शिवाय त्यांना लागणारी कायदेशीर मदतही करणार असल्याचे घोषित केले होते.

मग आता फेसबुक पोस्टवरून ज्याला मारहाण झाली त्याला शरद पवार कायदेशीर मदत करणार का? शरद पवार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूचे आहेत ना? म्हणजे त्यांनीच तशी घोषणा केली होती.

शिवाय मा. जितेंद्र आव्हाड हे महान गांधीवादी आहेत. ते गांधींची अहिंसा मानतात असं त्यांच्याच ट्विटरवरून दिसून येतं. मग आता त्यांच्या नजरेसमोर त्यांच्या बंगल्यावर कुणाला मारहाण होते तो भाग अहिंसेच्या कक्षेत येत नाही का? का त्यांचा गांधीवाद त्यांच्या बंगल्याच्या बाहेर पडल्यावर सुरू होतो आणि बंगल्याच्या आत येताना चपलीसारखा ते गांधीवादही बाहेरच सोडून टाकतात?

पुरोगामी माध्यमांची भूमिका तर अजूनच विचित्र. कुठलेच वर्तमानपत्र या बातमीची दखल घेण्यास तयार नाही. सोशल मिडियातून यावर आवाज उठवला जात आहे. पत्रकार सुशील कुलकर्णी यांनी आपल्या ऍनालायझर या वेब चॅनलवरून याला वाचा फोडली आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात आता प्रतिक्रिया उमटत आहेत.

अनंत करमुसे या अभियंत्याला मारहाण झाली त्याची बाजू घेतली की लगेच हे भाजप संघवाले आहेत, भिडेंच्या आंबराईतील हे नासके आंबे आहेत, नथुरामाच्या अवलादी आहेत असली टीका सुरू होते.

मला स्वत:ला करमुसे यांची जात काय हे माहित नाही आणि समजून घेण्यात रस नाही. ते कोणत्या संघटनेचे आहेत याचाही पत्ता नाही. त्यांच्या आक्षेपार्ह पोस्टवर कुठलीही कायदेशीर कारवाई झाली तरी मी त्यासाठी बचावार्थ पुढे येणार नाही.

अनंत करमुसेला जितेंद्र आव्हाडांच्या समोर मारहाण झाली. त्यांच्या निवास्थानी मारहाण झाली. हे निषेधार्ह आहे. आव्हाडांना मंत्री मंडळातून काढून टाकले पाहिजे. आव्हाडांच्या समर्थनार्थ सोयीचा बुद्धीवाद करणार्‍यांचाही मी निषेध करतो.

देशपातळीवरील भयानक घातक प्रकरण तबलीग असो की महाराष्ट्रातील एका व्यक्ती पुरते आव्हाड प्रकरण जमात-ए-पुरोगामी ही एका आंतरराष्ट्रीय कटात सहभागी आहेत की काय अशी शंका आता येत चालली आहे. नसता ते असे मौन  बाळगून चुप्प बसले नसते.


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

5 comments:

  1. तुमची मांडणी भंपक आहे.मुळात ताब्लिगीना परवानगी का दिली?मुसलमान होईल तितका बदनाम करा म्हणजे आपली वोट बँक शाबीत राहील,हा कट नाही कशावरून?
    आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली मारहाण याला बचावात्मक का म्हणू नये?नाहीतर त्यांचा दाभोलकर कशावरून झाला नसता?

    ReplyDelete
  2. आव्हाडांच्या ५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तबलिग वर देशभरात कारवाई चालू आहे. तूम्ही मला भंपक म्हटल्याने वास्तव बदलत नाही.

    ReplyDelete
  3. समर्पक! अतिशय संयमित भाषेतील असे लेख आता फारसे वाचायला मिळत नाहीत!

    ReplyDelete
  4. शाहीनबाग मधील आंदोलन हे चुकीचे असून सुद्धा पुरोगामी लोक या बद्दल काहीच बोलात नाहीत. संसदेने संमत केलेला कायदा रद्द करायचा असेल तर 370 रद्द केले तसे त्याच्या विरोध विधेयक आणून बहुमताने ते संमत करून घ्यावे लागते आणि त्यासाठी बहुमत आवश्यक असते.. पण ही गोष्ट पुरोगामी लोक त्यालोकांना न सांगता त्यांची दिशाभूल करून आपल्या स्वार्थाची पोळी भाजून घेत आहेत...म्हणजे आता पर्यंत घेतली..
    जितेंद्र आव्हाड फक्त राजकारणासाठी गांधीजींचं वापर करतात तसे तर सगळ्याच काँग्रेस हेच करतात नाही तर 2016 मध्ये बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणार होते त्यावेळेस ह्यांनीच सरकारला धमकी दिली होती की त्यांना पुरस्कार देऊ नका म्हणून... जर खरंच ह्यांना इतके इतिहासाबद्दल माहित होते तर मग पुरस्कार भेटल्यानंतर जे गप्प का झाले?? त्याच्या बोलण्यात जर काही सत्य होते तर मग त्यांनी जनतेला ते सांगायला पाहिजे होते आणि आपला विरोध नंतर पण चालू ठेवायला पाहिजे होता ना??
    कुमार केतकर यांनी जो जावईशोध लावला होता त्याबद्दल तर त्यांनी पोलीसा ला सांगायला पाहिजे होत?? आणि जर ते चुकीचे असेल म्हणजे तर सिद्धच झाले तर पत्रकार म्हणवून घेणारे ह्यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे ना??
    ह्या पुरोगामी लोकांचा चेहरा समोर आणल्याबद्दल धन्यवाद सर..🙏🙏

    ReplyDelete