Wednesday, April 22, 2020

पालघर झुंडबळी। आळीमिळी गुपचिळी॥


उरूस, 22 एप्रिल 2020

शुक्रवारी 17 एप्रिल रोजी रात्री 200 लोकांचा जमाव मुंबईपासून 80 कि.मी. अंतरावर पालघर मध्ये तीन लोकांची हत्या करतो. आणि ही बातमी दोन दिवस कुणाला कळतही नाही. कायद्याचे संरक्षक समोर असताना कायदा हातात घेवून हत्या केली जाते आणि याची जराही चाहूल कुणाला लागत नाही. कोरोनामुळे लॉकडाउन चालू आहे. अशा वेळी 200 चा जमाव गोळा होतोच कसा? आणि हे सगळं चालू असताना पोलिस बघ्याची भूमिका घेवून शांत बसतात कसे काय?

तिसर्‍या दिवशी या हत्याकांडाला वाचा फुटली ती सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ मुळे. कुठल्याही जागृत पत्रकाराने ही बातमी समोर आणली नाही. कुठल्याही छोट्या मोठ्या माध्यमांना याची दखल घ्यावी वाटली नाही. जेंव्हा समाजमाध्यमांतून ही बातमी समोर आली तेंव्हा अपरिहार्यपणे सर्वांना तिकडे वळावे लागले.

पुरोगामी पत्रकार माध्यमे विचारवंत चित्रपट कलावंत यांची तर कमाल आहे. उशीरा का होईना ही बातमी बाहेर आली तरी यापैकी कुणीच यावर काही बोलायला तयार नाही. तातडीने निखिल वागळें सारखे पत्रकार या प्रकरणी भाजपच्या सरपंचाला अटक़ असे खोटे ट्विट करून मात्र मोकळे होतात. यातील खोटेपणासाठी त्यांच्यावर तक्रार दाखल होते तेंव्हा ते माघार घेतात.

डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या अटकेबाबत तातडीने पत्रक काढणार्‍या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाला या हत्याकांडाबाबत चकार शब्दही काढावा वाटत नाही. जे मुख्य 6 आरोपी या प्रकरणांत पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत त्यातील 5 तर प्रत्यक्ष कम्युनिस्टच आहेत. आणि एक राष्ट्रवादी कॉंग्रेसशी संबंधीत आहे.

यथावकाश याचा तपास पूर्ण होईल. कायदेशीर कारवाई होईल. सत्य बाहेर येईल. पण या प्रकरणांत पुरोगाम्यांचे मौन भयानक आहे. जर तूम्हाला एखाद्या प्रकरणाची संपूर्ण माहिती समोर येईपर्यंत बोलणे उचित वाटत नाही तर मग इतर वेळी तातडीने निषेध का केला जातो? आनंद तेलतुुंबडेंवर कायदेशीर मार्गाने कारवाई केली जाते तरी त्या विरोधात मोठा आरडा ओरडा केला जातो. बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशीच कशी अटक करतात? असे प्रश्‍न उद्धटपणे विचारले जातात. पोलिस, सरकार, न्यायालय यांच्यासाठी अपशब्द वापरले जातात. पण हेच पुरोगामी पालघर हत्याकांडाबाबत मात्र आळीमिळी गुपचिळी बाळगतात. हे नेमके काय गौडबंगाल आहे?

मुख्यमंत्री दोन दिवस उशीरांनी तोंड उघडतात आणि सांगतात याला कसलाच सांप्रदायिक पैलू नाही. जाणते राजे शरद पवार सांगातात पालघर प्रकरणी राजकारण करू नये. गृहमंत्री अनिल देशमुख तर गायबच आहेत. या सगळ्यांनी याचे उत्तर द्यावे की हे प्रकरण तीन दिवस दाबून का ठेवल्या गेले?

मुंबईहून सूरतच्या दिशेने अंत्ययात्रेसाठी निघालेले दोन साधू रात्रीच्यावेळी 200 जणांच्या जमावात सापडतातच कसे? ही माहिती कुणी कुणाला दिलेली असते? आणि हे सगळे झाल्यानंतर माध्यमं, सरकारी यंत्रणा, पोलिस यंत्रणा हे सगळे मौनात कसे काय जातात?

या निमित्ताने पुरोगामी विचारवंत आणि माध्यमांतील तथाकथित  पुरोगामी पत्रकार यांचे पितळ मात्र उघडे पडले आहे. रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याची आत्महत्या ही या लोकांना हत्याच वाटते आणि त्याचे देशभर भांडवल केले जाते. दादरी येथील अखलाख याची हत्या तातडीने देशव्यापी विषय बनतो. पुरस्कार वापसी अभियान सुरू होते.

या उलट दोन साधूंची 200 च्या जमावाने केलेली हत्या मात्र यांना दखल न घेण्याची बाब वाटते. हे भयानक बौद्धिक कारस्थान आहे. मॉब लिंचिंगच्या घटना घडल्या त्या सर्वांच्या मुळाशी काही एक सकृत दर्शनी दिसणारे कारण तरी होते. त्या त्या व्यक्तीची काही एक कृती इतरांना पसंद नाही असे समोर आले होते. पण या प्रकरणांत तर असे काहीही नाही. या साधूंचा त्या गावातील लोकांशी काहीही संबंध नाही.

शहरी नक्षलवादाचा इथे परत एकदा संबंध येतो. कुठल्या तरी कारणाने लोकांमधील अस्वस्थता हेरून त्याचा वापर करून हिंसाचार घडवून आणायचा. एल्गार परिषद, भीमा कोरेगांव दंगल, शाहिनबाग आंदोलन, जेएनयु व जामिया मिलीयांतील हिंसाचार, दिल्ली जाफराबाद दंगल या सगळ्यांतून नागरी भागांत कसल्यातरी कारणांनी हिंसाचार पेटविणे हा एक सामायिक अजेंडा समोर येतो आहे. आता पालघर प्रकरणांतही असलेच काही तरी शहरी नक्षलवादाचे कारस्थान आहे का याचा शोध घेतला गेला पाहिजे. कारण या प्रकरणांत पकडल्या गेलेले आरोपी कम्युनिस्ट पक्षांशी संबधीत आहेत.

शहरी नक्षलवादावर कडक कारवाई सुरू झालेली आहे. कायद्याचा मार्ग अवलंबून एक एक संशयीत ताब्यात घेणं चालू आहे. 14 तारखेला आनंद तेलतुुंबडे व गौतम नवलखा हे दोन संशयीत शहरी नक्षलवादी तपास यंत्रणेला शरण येतात आणि  लागलीच दोन दिवसांत हे हत्याकांड घडते हा योगायोगही तपासून घ्यावा लागेल. कम्युनिस्ट पक्षाचे सुधीर सुर्यवंशी, पत्रकार निखिल ळागळे, काॅग्रेसचे सचिन सावंत यांनी खोट्या बातम्या ट्विट केल्या आहेत. कम्युनिस्ट पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही अशीच दिशाभुल केली गेली आहे.

पालघर भागात आदिवासींची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. या आदिवासींमध्ये कम्युनिस्टांची दादागिरी प्रचंड आहे. एखाद्या विषयात बुद्धीभेद करून लोकांचे लक्ष वळविण्याचे उद्योग दोनच वर्षांपूर्वी ‘किसान लॉंग मार्च’ या नावाने पालघर नाशिक या आदिवासी पट्ट्यातूनच झाले होते. आदिवासी प्रश्‍नावर प्रचंड जनमत तयार होवू शकत नाही म्हणून त्याला शेतकर्‍यांच्या हिताचा मुद्दा जोडला गेला. एक वर्ष हा लॉंग मार्च निघाला. दुसर्‍या वर्षी जागच्या जागीच जिरला. नंतर परत कुणी किसान लॉंग मार्चचा विषयच काढला नाही. शेतकर्‍यांचा संप घडवून शेतकरी व शहरी ग्राहक यांच्यातील कटूता याच डाव्यांनी वाढविण्याची खेळी केली होती.

पालघरच्या आदिवासी पट्ट्यात अफवा पसरवून हे हत्याकांड घडवून आणले गेले असा निष्कर्ष काढला जातो आहे. हीपण एक दिशाभूलच आहे. हे हत्याकांड अफवा पसरवून नव्हे तर जाणिवपूर्वक घडवून आणलेले आहे.

सोशल मिडियाच्या माध्यमातून हे भीषण हत्याकांड समोर आले. सर्वसामान्य जनतेने सोशल मिडियाची ताकद लक्षात घ्यावी. आणि हीचा वापर सत्यसंशोधनासाठी करावा. प्रस्थापित माध्यमे जनसामान्यांच्या व्यथांना न्याय देतीलच असे नाही. नक्षलवादी कारस्थानाची पाळेमुळे कायद्याच्या आधाराने उखडली जात आहेतच. आपण सोशल मिडियाच्या सहाय्याने या अभियानात सरकारला मदत करू.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

2 comments:

  1. मुघलांनी डोकी उडवली तर ब्रिटिशांनी बुद्धिभेद केला हे शेवडे सरांच्या पुस्तकातील वाक्य आता सिद्ध होत आहे... स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणारे सगळे लोक सध्या मूग गिळून गप्प आहेत.. पत्रकार जर खरंच लोकशाहीत चौथा स्तंभ असतील तर मग ही बातमी त्यांच्या पर्यंत कशी पोहचत नाही ,किंवा आली असेल तर मग त्यांनी ही बातमी का दाखवली नाही??
    पुरस्कार वापसी गॅंग( फक्त ट्रॉफी परत करणारे, पैसे नाही) ह्यावर काहीच बोलत नाहीत.. आज जर हि गोष्ट दुसऱ्या धर्मीय लोकांसोबत झाली असती तर ह्यांनी आकाश पाताळ एक केले असते.. हा वागण्याचा प्रकार म्हणजे "स्वतःच ते पोरग आणि दुसऱ्याच ते कार्ट" असा आहे..
    ह्या घटनेमुळे अनेक लोकांचे मुखवटे गळून पडले आहेत.. लोकांनी ह्याचा विचार करायला हवा.. मला ह्यासर्व गोष्टीबद्दल तर्क देणाऱ्या व्यक्तींना फक्त एक विचारायचे आहे , तुमच्या घरातील एखादी जेष्ट व्यक्ती आसली असती तर तुम्ही असेच तर्क मांडले असते का?? कोणी वैयक्तिक घेउ नये पण विचार नक्की करावा..
    कमीत कमी त्या घटनेतील साधूचे वय पाहून तरी काही कुतर्क करू नयेत...

    ReplyDelete
  2. कलम १२० (ब) हे सूचित करते की इथे कट रचल्या गेला आहे.
    राज्याचे गृहमंत्री आरोपीची नावे जाहीर करत आहेत त्यांचा धर्म कळावा म्हणून आरोपीला धर्म नसतो हे नेहमीचे वाक्य विसरून

    आरोपीच्या जामिनासाठी एक ख्रिश्चन संस्था काम करत आहे.

    संचारबंदी असताना ५०० लोकांचा जमाव (एफआयआर प्रमाणे) जमतो हेच नवल वाटावे असे आहे.

    मयत व्यक्तीस एका सुरक्षित चेकपोस्ट मधून जिथे पोलीस आहेत तिथून बाहेर काढून जमावाच्या स्वाधीन करणे ही कृती कशी वाटते?

    ReplyDelete