Sunday, April 19, 2020

भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना!


काव्यतरंग, रविवार १९ एप्रिल २०२०  दै. दिव्य मराठी

भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना!
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना!

कोणते आकाश हे? तू आम्हा नेले कुठे?
तू दिलेले पंख हे.. पिंजरे गेले कुठे?
या भरार्‍या आमुच्या.. ही पाखरांची वंदना!

कालचे सारे मुके आज बोलू लागले
अन् तुझ्या सत्यासवे शब्द तोलू लागले
हे वसंता, घे मनांच्या मोहरांची वंदना!

तू उभा सुर्यापरी राहिली कोठे निशा
एवढे आम्हा कळे ही तुझी आहे दिशा
मायबापा घे उद्याच्या अंकुरांची वंदना!

धम्मच्रकाची तुझ्या वाढवू आम्ही गती
हा तुझा झेंडा अम्ही घेतलेला सोबती
ऐक येणार्‍या युगांच्या आदरांची वंदना!
-सुरेश भट

(एल्गार, पृ. 17, सुपर्ण प्रकाशन, आवृत्ती 2)
(मूळ कविता 7 कडव्यांची आहे.)

14 एप्रिलला आंबेडकर जयंती साजरी झाली. लॉकडाऊनमुळे ही जयंती सार्वजनिक रित्या समारंभपूर्वक साजरी करण्यास बंदी होती. त्यामुळे घरोघरीच लोकांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन केले.  

सुरेश भटांची कविता या पार्श्वभूमीवर समजून घेतली पाहिजे. लाखो कराडो दीन दलितांच्या मनात बाबासाहेब आज देव बनून राहिले आहेत. भटांनी ही नेमकी भावना ओळखून त्या अनुषंगाने हे गीत लिहीले.
गुलामांना गुलामिची जाणीव करून द्यावी लागते. ‘कोणते आकाश हे?’ या ओळीत आम्हाला स्वातंत्र्य माहितच नव्हते. तू पंख दिल्यावर आम्हाला कळले आपल्याला पण उडता येते. आणि आजच्या दुबळ्या दीन दलितांच्या या उंच आकाशातील भरार्‍या तूला वंदना करत आहेत. ही भावना व्यक्त होते.

पुढच्या कडव्यात सुरेश भटांनी दलितांची मानसिकता कशी बदलत गेली याचे वर्णन केले आहे. ‘कालचे मुके आज बोलू लागले’ हे खरं आहे. पण हे बालणे म्हणजे साधेसुधे नव्हे. बाबासाहेबांनी दाखविलेल्या ‘सत्यासवे शब्द तोलू लागले’ या ओळीमध्ये एक मोठा अर्थ दडलेला आहे. 

बाबासाहेबांनी बुद्ध धम्म स्विकारला तो आंधळेपणाने नाही. जशाचा तसा बुद्ध त्यांनी स्विकारला नाही. बाबासाहेबांचा बुद्ध धम्म जरा वेगळा आहे. उदा. पूनर्जन्म बाबासाहेब नाकारतात. ‘बुद्धा ऍण्ड हिज धम्मा’ या पुस्तकात राजपुत्र गौतमाच्या आयुष्यातील तीन प्रसंग वृद्ध दिसणे, प्रेतयात्रा दिसणे, रोगी दिसणे हे सगळे बाबासाहेबांनी कठोरपणे नाकारले आहे. अतिशय प्रखर बुद्धिवादी तर्क करून गौतमाच्या सन्यासाची चिकित्सा केली आहे. आठ वर्षे प्रस्थापित राज्यव्यवस्थेचा अनुभव घेतल्यानंतर राजपुत्र गौतम सन्यास घेवून बाहेर पडतो याची त्यांनी केलेली मिमांसा अपुर्व अशी आहे. त्यामुळे सुरेश भटांनी ‘अन् तूझ्या सत्यासवे शब्द तोलू लागले’ अशी ओळ लिहीली आहे. 

बाबाहसोबांचा जन्म 14 एप्रिलचा. हा काळ वसंत ऋतूचा. हा संदर्भ कसा काय कळत नाही पण बहुतेक लेखकांच्या  लिहीण्यात येत नाही. पण सुरेश भटांनी मात्र याचा अतिशय चपखल उपयोग या कवितेत करून घेतला आहे. वसंत ऋतूत बाबासाहेबांचा जन्म आहे. सोबतच या काळात सर्वत्र झाडांच्या मोहराचा घमघमाट पसरलेला असतो. दलितांच्या मोहरलेल्या मनांची सुंदर प्रतिमा इथे येते. शिवाय दुसराही एक अर्थ आहे. बाबासाहेब नावाचा वसंत आयुष्यात प्रवेशल्याने ही सर्व झाडं मोहरली आहेत. 

प्रखर बुद्धीवादी असा एक धम्म बाबासाहेबांना अपेक्षीत होता. भारतीय दर्शन परंपरेत एकूण 9 प्रमुख दर्शनं मानली गेली आहेत. सहा दर्शनं ही आस्तिक  (न्याय, योग, वैशेषिक, पुर्व मिमांसा, उत्तर मिमांसा, सांख्य) तर उर्वरीत 3 दर्शनं ही नास्तिक (जैन, बौद्ध, चार्वाक) मानली गेली आहेत. वेद मानतो तो आस्तिक आणि वेद नाकारतो तो नास्तिक असा हा दर्शन परंपरेतील अर्थ आहे. (देव मानतो तो आस्तिक आणि न मानणारा नास्तिक अशा चुक पद्धतीनं हे शब्द आपण वापरतो). बाबासाहेबांना नास्तिक दर्शनांची परंपरा पुढे न्यायची आहे. म्हणून ते बौद्ध धम्माचा स्वीकार करतात. बुद्धीचा वापर करून हाती येणारे ज्ञान हे प्रखर सुर्यासारखे तेजस्वी आहे. नविन पिढीवर आपली बुद्धी वापरण्याचा संस्कार होवो. केवळ वाडवडिलांनी सांगितलं म्हणून त्यांनी ऐकू नये. यासाठी ‘तू उभा सुर्यापरी राहिली कोठे निशा?’ ही ओळ येते. ‘मायबापा घे उद्याच्या अंकुरांची वंदना’ ही ओळ पुढच्या प्रखर बुद्धिवादी पिढीसाठी आहे. 

भारतात एक मोठी बुद्धीवादी परंपरा राहिलेली आहे. या सगळ्याचे प्रतिक म्हणून धम्मचक्र हा शब्द येतो. तो केवळ बुद्ध धम्माच्या अनुयायांसाठीच येतो असे नाही. भारतीय परंपरेतील सर्वात मोठा शेवटचा दार्शनिक म्हणून गौतम बुद्ध येतो. तर्काची ही परंपरा अजूनही पुढे चालू राहिली पाहिजे. परंपरेने चालत आले आहे म्हणून पुढे चालू ठेवायचे हे आपल्या वैचारिक विश्वात अपेक्षीत नाही. जो काही विचार ज्याने कुणी मांडला त्याची दखल घेत पुढे पुढे जाणे ही आपली परंपरा राहिली आहे. 

बाबासाहेब या परंपरेचे निष्ठावान पाईक होते. सुरेश भटांनी हे ओळखून केवळ दलितांसाठीच नव्हे तर बुद्धीचा वापर करू पाहणार्‍या सर्वच दबल्या गेलेल्या पिचल्या गेलेल्यांसाठी ही रचना केली आहे. आपण दुर्दैवाने त्याला केवळ निळ्या रंगात रंगवून टाकतो आणि आपला काहीच संबंध नाही अशा आविर्भावात राहतो. 

श्री.दि. इनामदार यांनी अतिशय प्रसादिक शैलीत बाबासाहेबांवर लिहीताना असे शब्द वापरले होते

ग्रंथ थकले गे माय, संत थकले ग माय
नाही थकला भीमाचा काटे तुडविता पाय

दीन दलितांच्या उद्धाराचा हा मार्ग काट्यांनी भरलेला आहे. हा मार्ग कठिण आहे. मोठं अंतर कापायचे आहे. यासाठी थकून चालणार नाही. हे अंतर कापण्यासाठी धम्मचक्राची गती वाढविली पाहिजे.
14 एप्रिल बाबासाहेबांची तर 15 एप्रिल सुरेश भटांची जयंती. या महाकवीने बाबासाहेबांसारख्या महामानवाला वाहिलेली ही श्रद्धांजली. बाबासाहेबां सोबतच आपण रसिक सुरेश भटांनाही श्रद्धांजली अर्पण करू.

    श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

1 comment:

  1. सध्याची खंत इतकीच आहे की सगळे लोक महापुरुषांना आपल्या आपल्या जाती धर्मात बंदिस्त करत आहेत... ज्यांनी आयुष्यभर समाज प्रबोधनाचे काम केले त्या लोकांबद्दल ह्या गोष्टी होत आहे त्याचे जास्त दुःख आहे...

    ReplyDelete