Friday, April 24, 2020

अर्णब यांचा आक्रस्ताळेपणा पुरोगामी ढोंगाची प्रतिक्रिया!


उरूस, 24 एप्रिल 2020

पत्रकार अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नी  बुधवारी रात्री 12.30 वा. स्टुडिओतून कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना दोन कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. तशी रीतसर तक्रार अर्णब यांनी पोलिस स्टेशनमध्ये नोंदवली.

या प्रकरणांवर जशी प्रतिक्रिया पुरोगामी गँग कडून उमटायला हवी होतीच तशीच ती उमटली. बहुतांश जणांनी अर्णब यांच्या आक्रस्ताळेपणावर टीका केली. पण ही टीका करत असताना त्यांनी उपस्थित केलेल्या मुळ प्रश्‍नाला मात्र सोयीस्करपणे बगल दिल्या गेली. अर्णब आक्रस्ताळे आहेत यात काही वाद नाही. त्यांचा कार्यक्रम त्यामुळे बघवला जात नाही. मी स्वत: हा कार्यक्रम फारसा पहात नाही. यु-ट्यूबवर रात्री उशीरा या कार्यक्रमातील इतरत्र न आलेला एखादा मुद्दा असेल तर तेवढं कधी कधी पाहतो. अर्णब यांच्यावर कालपासून जी टीका होते आहे त्याच्या मुळाशी आहे पालघर हत्याकांड.

दोन साधूंची 200 जणांच्या जमावाकडून क्रुर हत्या होते आणि हे प्रकरण दाबल्या जाते. याची कुठलीही दखल महत्त्वाच्या वाहिन्या अथवा वृत्तपत्रांकडून घेतली जात नाही. कुठल्याही मॉब लिंचिंगवर आकांडव तांडव करणारे पुरोगामी या प्रकरणी चिडीचूप आहेत. अर्णब यांनी विचारलेला प्रश्‍न हा सोनिया गांधींवर आहे. कॉंग्रेस आणि सोनिया गांधी यांनी या प्रकरणात निषेध का केला नाही असा अर्णब यांचा साधा प्रश्‍न आहे.

अर्णबवर टीका करणारे नेमके याच प्रश्‍नाचे कसलेही उत्तर द्यायला तयार नाहीत. सोमवारी दुपारी 2 वा. 40 मि. निखील वागळे सारखे पत्रकार खोटे ट्विट करतात, कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, कम्युनिस्ट सुधीर सुर्यवंशी त्याला प्रतिसाद देतात. मग जेंव्हा हा खोटेपणा उघड होतो त्यावर मात्र काहीही प्रतिक्रिया यांच्याकडून येत नाहीत. माध्यमे यावर चुप बसतात.

हे जे पुरोगामी ढोंग आहे त्या पार्श्वभूमीवर अर्णब गोस्वामी यांचा आक्रस्ताळेपणा उफाळून येतो. हे समजून घ्यायला हवे.  इतर मॉब लिंचिंगच्या प्रसंगी सोनिया गांधींना दु:ख होते. कॉंग्रेसकडून याचा निषेध केला जातो. मग आता हे सगळे मौनात का जातात? असा हा प्रश्‍न आहे. आणि याचे उत्तर पुरोगामी द्यायला तयार नाहीत.

गृहमंत्री अनिल देशमुख या प्रकरणाचे राजकारण करून नका असे सांगत आहेत. पत्रकार भाउ तोरसेकर यांनी एक प्रश्‍न अनिल देशमुखांच्या या उद्गारावर उपस्थित केला आहे. दिल्लीच्या तबलिग मरकज प्रकरणी परवानगी कुणी दिली असा गैरलागू प्रश्‍न उपस्थित करून राजकारण कुणी सुरू केलं? जाणते राजे शरद पवार यांनीही हा परवानगीचा अनावश्यक अनाठायी प्रश्‍न उपस्थित केला होता. केंद्रीय गृहमंत्र्यांना प्रश्‍न विचारणारे एक खोटे पत्र सोशल मिडियात व्हायरल केल्या गेले. मग जर हे राजाकरण शरद पवार आणि अनिल देशमुख करत असतील तर पालघर प्रकरणी हेच लोक चुप्पी साधून का आहेत?

सरकारच्या वतीने गृहमंत्री यांनी खुलासा केला की पालघर आरोपी पैकी कुणीही मुसलमान नाही. या खुलाश्याने गैरसमजात अजूनच  भर पडली आहे. जर कोण नाही हे आवर्जून सांगितल्या जाते तर कोण आहे हे का नाही सांगितल्या जात? पालघर हत्याकांडातील आरोपी कोण आहेत ही नावे समोर का नाही आणली जात? अखलाख, तबरेज यांच्या मॉबलिंचिंग बाबत अशीच भूमिका तेंव्हा घेतल्या गेली होती का?

केवळ महाराष्ट्राचाच विचार केला तर एक दोन नव्हे तर तीन घटना या आधी लॉकडाउनच्याच काळात घडल्या आहेत. कपिल वाधवान प्रकरणी सरकारी पातळीवर असेच घडले. हे प्रकरण दाबण्याचाच प्रयास झाला. सोशल मिडियाच्या माध्यमातून हे बाहेर पडले. स्थानिक लोकांनी वाधवान यांच्या गाडीच्या ताफ्यावर प्रचंड आक्षेप घेतला. मग अपरिहार्यपणे सरकारला कारवाई करणे भाग पडले. त्यातही परत अमिताभ गुप्ता हा अधिकारी कसा संघाचाच माणूस आहे. आणि ही चुक कशी भाजपचीच आहे असाही खोटा आरोप केला गेला. दुसरे प्रकरण वांद्रे येथे जमा झालेल्या दोन एक हजाराच्या जमावाचे. या बाबतही अतिशय खोटे अविश्वसनीय वक्तव्य सत्ताधारी पक्षाकडून आणि पुरोगामी पत्रकारांकडून समोर आले. युपी बिहारचे मजूर आहेत असं म्हणायचं तर दुसरीकडून त्यांच्या हातात सामान दिसत नाही, हे सगळे जमा होतात ते मस्जिद समोर आणि सांगितलं जातं की स्टेशनवर गाडीसाठी जमा झाले आहेत. बातमी मराठी वाहिनीवर येते आणि जमा झालेले सगळे अमराठी. तिसरं प्रकरण अनंत करमुसे या अभियंत्याला मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावरील मारहाणीचे आहे. सातत्याने अशा विविध  प्रकरणांत पुरोगामी ढोंगाचे पुरावे समोर येत जातात. यामुळे अर्णब गोस्वामी सारख्यांनी अक्रस्ताळेपणा केल्यावर तो सामान्य लोकांना खटकत नाही उलट योग्यच वाटतो.

आचार्य विनोबा भावे यांनी ‘जशास तसे’ याचा अर्थ फार सुंदर सांगितला आहे. जशास तसेचा अर्थ तलवारीला उत्तर तलवारीने द्यावे असा होत नाही, तलवारीला ढालीने उत्तर द्यायचे असते, अंधाराला प्रकाशाने उत्तर द्यायचे असते. जसे आव्हान समोर उभे राहते त्याला त्याप्रमाणे उत्तर देणे म्हणजे जशास तसे असे विनोबा सांगतात. लॉकडाउन काळात महाराष्ट्रात ज्या तीन घटना घडल्या त्यावर पुरोगाम्यांच्या समंजस उचित प्रतिक्रिया आल्या असत्या तर चौथ्या पालघर प्रकरणी अर्णब सारख्यांचा आक्रस्ताळेपणा असा उफाळून वर आला नसता. जशी समस्या आहे तशी त्यावरची समंजस प्रतिक्रिया उमटायला हवी होती.

आज अर्णबवर टीका करताना मुळ कारणाकडे मात्र लक्ष दिल्या जात नाही. यामुऴे पुढेही यावरच्या प्रतिक्रिया अशाच उमटू शकतात. सामान्य माणसांना आधी याची फारशी दखल घ्यावी वाटत नसायची. पण परत परत पुरोगामी त्याच पद्धतीनं वागणार असतील तर मग मात्र सामान्य मतदार अजूनच मोदींकडे झुकत जाईल. 2014 मधील 272 जागा 2019 मध्ये 303 वर पोचल्या. 2024 मध्ये मग त्या 350 झाल्यातर आश्चर्य वाटायला नको. मग पुरोगामी अजूनच छाती बडवत बसतील.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

2 comments:

  1. अर्णब गोस्वामी यांच्यावरील हल्ल्यानंतर काही प्रश्न उपस्तिथ होतात.. महत्वाचा म्हणजे त्यांच्याच पत्रकार बांधवांना कढून ह्या हल्ल्याचा निषेध केला जात नाही.. महत्वाचं म्हणजे लोकडोवन च्या काळात हे दोन काँग्रेस कार्यकर्ते बाहेर कसे पडतात?? वावधान कौटुंबिया प्रमाणे ह्याच्या मागे कोणाचा हात आहे??
    स्वतःला पुरोगामी निर्भीड पत्रकार म्हणवून घेणाऱ्या एकाही पत्रकाराने आधी पालघरची बातमी दिली नाही.. सोशल मीडिया मूळे खरं तर हे प्रकरण समोर आले.. अर्णब यांनी जो प्रश्न उपस्तिथ केला त्याबद्दल कोणीच उत्तर द्यायला तयार नाही.. मराठी पत्रकार निखिल वागळे, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत ह्यात भाजपा कार्यकर्ते सहभागी आहे असे म्हणतात त्याबद्दल पण काही त्यांना प्रश्न विचारत नाही की तुमच्या कडे हि माहिती कुठून आली...
    ताब्लिकी जमात च्या कार्येक्रमाला परवानगी देणे म्हणजे केंद्रीय गृह मंत्र्याची चूक आहे म्हणणारे अनिल देशमुख पोलीसांन समोर घडलेले हे पालघर हत्याकांड काय होते?? त्यातल्या त्यात आजून म्हणजे ही बातमी दाबून टाकण्याचा पण प्रयत्न होतो.. पण ह्या बद्दल कोणी काहीच बोलणार नाही..
    ह्या लोकडोवन च्या काळात ज्या घटना घडल्या आहेत त्यामुले ह्या पुरोगामी लोकांचे मुखवटे गाळून पडले आहेत.. एकटी दूट्टपी भूमिका घेणे ह्या राजकीय पक्षांना महागात पडणार आहे.. जनतेला नेहमीच गृहीत धरणाऱ्या ह्या राजकीय पक्षांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की जनता आता हुशार झाली आहे.. तुम्ही तुमचा सावळा गोंधळ घालत राहा जनता मतदानातून उत्तर देईल..

    ReplyDelete
  2. खरं आहे. प्रस्थापित पत्रकारीता आवाज उठवायला तयार नाही म्हणूनच माझ्यासारखी माणसं सोशल मिडियात हा विषय लावून धरत आहेत.

    ReplyDelete