Sunday, April 5, 2020

गाउलीच्या पावलात सांज घरा आली !


काव्यतरंग, दै. दिव्य मराठी 5 एप्रिल 2020

सांज

गाउलीच्या पावलात सांज घरा आली
तुंबलेल्या आचळांत सांज भरा आली
शिणलेल्या डोळुल्यांचा सांज प्राण झाली
आतुरल्या हंबराचा सांज कान झाली

माउलीच्या वातीतून सांज तेज ल्याली
माउलीच्या गीतातून सांज भाव प्याली
माउलीच्या अंकावर सांज मुल झाली
मुलासाठी निदसुरी सांज भूल झाली

वहिनीच्या हातासाठी सांज क्ष्ाुधा झाली
वहिनीच्या हातातून सांज सुधा झाली
वहिनीच्या मुखासाठी सांज चंद्र झाली
वहिनीच्या सुखासाठी सांज मंद्र झाली

-बी. रघुनाथ
(समग्र बी. रघुनाथ खंड 1 कविता, प्रकाशक गणेश वाचनालय परभणी.)

संध्याकाळी घराकडे परत निघालेल्या गायी, त्यांच्या खुरांमुळे उडालेली धूळ, त्या धुळीत मिसळलेली मावळत्या सुर्याची सोनेरी किरणे, ओढ, हुरहुर, अंगणात तुळशीसमोर लावलेला दिवा, अंगणार आजीच्या मांडीवर पहूडलेला तान्हूला, आत चुलीपाशी भाकरी करणारी घरची गृहीणी अशा वातावरणाला शब्दबद्ध करते बी. रघुनाथांची ही कविता.

काळ कितीही आधुनिक होत जावो अगदी पहाटेचा सुर्य उगवतानाचा प्रहर आणि सुर्य मावळतानाची सांजवेळ या दोन्ही प्रसंगी सारं विसरून माणूस पार अगदी आदिम काळात जावून पोचतो. संध्याकाळी हळू हळू वातावरण गडद होत जातं. अगदी दाट अंधार पडतो. तुळशीसमोरच्या दिव्याचा छोटासा प्रकाश मनात आशेचा किरण जागवतात. 

1940 च्या दरम्यान कधीतरी बी. रघुनाथांनी लिहीलेली ही कविता. आज 80 वर्षांनंतरही अगदी ताजी वाटत राहते. पहिल्या कडव्यात घराकडे परतणार्‍या गायी आणि त्यांची हंबरणारी वासरं येतात. त्यांच्या निमित्ताने ताटातुट झालेल्या सगळ्यांच जीवांचे प्रतिक कवितेत प्रकट होते. 

दुसरं कडवं मोठं विलक्षण आहे. काळवंडत चाललेली सांज आपल्या मायमाउल्यांनी तुळशीसमोरच्या छोट्याशा दिव्याच्या तेजाने उजळून टाकली आहे. ही एक फार मोठी आशादायी बाब बी. रघुनाथ लिहून जातात. सगळ्या कठीण प्रसंगांवर मात करण्यासाठी या आपल्या बायाबापड्या नेहमीच सज्ज राहिल्या आहेत. संध्याकाळी तुळशीसमोर अंगणात दिवा लावणे असो की अमावस्येला पणत्या लावून सण साजरा करणं असो. अंधारावर मात करण्याची अदम्य अशी इच्छाशक्ती बायाबापड्यांच्या या कृतीतून सतत दिसत आली आहे. 

मांडीवरच्या तान्ह्यासाठी ती स्तोत्र, अंगाई काहीतरी गात आहे. त्यामुळे ‘माउलीच्या गीतातून सांज भाव प्याली’ असे जे शब्द येतात ते फार अर्थपूर्ण आहे. केवळ अंधारावर मातच केली जाते असे नाही तर तिच्या गीतातून एक सुंदर असा भाव व्यक्त होतो आहे. 

स्त्रीयांचे हे एक वैशिष्ट्य आहे. कष्ट करताना त्यांनी जो कलाविष्कार प्रकट केला आह तो मोठा विलक्षण राहिलेला आहे. भुपाळ्या, आरत्या, ओव्या, स्तोत्रं या सगळ्यांतून बाईने सामान्य कष्टकरी आयुष्याला भावात्मक सौंदर्य बहाल केलं आहे. रांगोळीतून कलात्मक दृष्टी बहाल केली आहे. जात्यावरच्या ओवीतून तर ही कलात्मकता ठसठशीतपणे समोर येते. म्हणूनच एका जात्यावरच्या ओवीत बाईने जे जीवन आणि कला याबद्दलचे वैश्‍वीक सत्य सांगितले आहे ते तसे त्या भाषेत आणि इतक्या साध्या पद्धतीनं आजतागायत कुणालाच लिहीता आले नाही.

दाण्याच्या जोडीने जिण्याचा रगडा
गाण्याच्या ओढीने ओढीते दगडा

बाईच्या आविष्कारातील हे सौंदर्य बी. रघुनाथ नेमके टिपतात. गाय, माय या नंतरचे तिसरे कडवे घरी कष्ट करणार्‍या प्रौढ गृहीणीला समर्पित आहे. सावरकरांच्या शिवाय या पद्धतीनं वहिनीला काव्यात कुणी स्थान दिलेलं नाही. 

घरातील ही मोठी वहिनी सगळ्यांसाठी जेवण बनवते आहे. तिच्या हाताला चव आहे. तीच्या हातचं खाण्यासाठी सांज ‘क्ष्ाुधा’ झाली आहे. भूक लागली आहे. आणि ती जे काही ताटात वाढते त्याची गोडी अविट आहे. ‘वहिनीच्या हातातून सांज सुधा झाली’ अशी ओळ त्यासाठीच येते.

शेवटच्या दोन ओळी तर अतिशय सुंदर आहेत. दिवसभराची घाई कामाची गडबड आता शांत झाली आहे. सुर्य मावळून चंद्र उगवला आहे. दिवसभराचा कामाचा ‘तीव्र’ सप्तक संपून सांज ‘मंद्र’ झाली आहे. अगदी शेवटच्या ओळीत वहिनीच्या मुखासाठी चंद्राची उपमा येते. आणि कवितेचा कलात्मक शेवट होतो. 

मराठी नव कथेची पायवाट ज्यांनी घालून दिली असे कथाकार बी. रघुनाथ, निजामकालीन मराठवाड्याच्या जनजीवनाचा आडचा छेद आपल्या लेखनातून दाखवून देणारे बी. रघुनाथ, ‘आज कुणाला गावे’ अशी तीव्र सामाजिक भाष्य करणारी कविता लिहीणारे बी. रघुनाथ मोजक्या शब्दांत गाउली, माउली आणि घरावरची साउली (वहिनी) अशा तिन स्त्री प्रतिकांतून ‘सांज’ ही कविता रसिकांच्या ओंजळीत टाकतात. हा नाजूक कलाविष्कार मोठा विलक्षण आहे. 

एखाद्या संगीतकाराने मारवा अथवा पुरिया धनाश्री रागाच्या सुरावटीत या कवितेची चाल बांधून हीचे सौंदर्य अजून वाढवावे असे मला फार वाटत रहाते.

(बी रघुनाथ रेखाटन ल. म. कडू यांचे आहे)

    श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575

No comments:

Post a Comment