Thursday, April 30, 2020

पालघर बुलंदशहर तुलना- पुरोगामी गोत्यात!


उरूस, 30 एप्रिल 2020

पालघर प्रकरणात हळू हळू नव नविन बाबी समोर येत चालल्या आहेत आणि हे प्रकरण दाबू पाहणारे उघडे पडत चालले आहेत. बरं हे कमी म्हणून की काय पालघर प्रकरणात तीन दिवस आळीमिळी गुपचिळी करणारे पत्रकार यांच्या हाताशी बुलंदशहर प्रकरण लागलं. व्यक्त होण्याचा आळस झटकून तात्काळ प्रतिक्रिया देणं सुरू झालं.

खरं तर जरा शांत बसून बुलंदशहर प्रकरणातील काही एक बाजू समोर येण्याची वाट पहायची होती. पण तेवढा संयम यांना राहिला नाही. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये दोन साधूंची हत्या झाली ही बातमी समोर येताच जमात-ए-पुरोगामी एकदम उत्साहात आली. बघा भगवे वस्त्र परिधान करणार्‍या भाजपच्या योगी यांच्या राज्यातच साधूंची हत्या होते. आता कुठे गेले मोदी? कुठे गेले अमित शहा? आता कसे बिळात लपून बसले सगळे?
पालघर आणि बुलंदशहर यांची तूलना करणे अतिशय चुक होते. बुलंदशहर हत्याकांड घडो अथवा न घडो त्याने पालघरला काय फरक पडणार आहे? पण तेवढी सद्सद्विवेकबुद्धी हरवूनच बसल्यावर काय होणार?

जमात-ए-पुरोगामी आणि त्यांचे सोशल मिडियावरचे पाठिराखे केवळ 5 तासातच उघडे पडले. बुलंदशहर प्रकरण वैयक्तिक कारणाने घडले आणि ज्याने खुन केले तो आरोपी पोलिसांनी तात्काळ कारवाई करून ताब्यात घेतला. तो सांधूंच्याच धर्माचा असून आणि त्याच धर्माचे मुख्यमंत्री असूनही कुणीही हे प्रकरण दाबले नाही. कुणीही आरोपीचे नाव लपवून ठेवले नाही.

एक तर पालघर प्रकरण हे झुुुंडबळीचे (मॉब लिंचिग) आहे बुलंदशहर तसे नाही. दुसरी गंभीर बाब म्हणजे पालघर झुंडबळी प्रकरण पोलिसांच्या उपस्थित झाले आहे. तसे काही बुलंदशहरला घडले नाही. पुरोगामी खोटं सांगत राहिले की पालघरला पोलिस नव्हतेच जो होता तो वन विभागाचा कर्मचारी होता. आता पुढे आलेल्या व्हिडिओत तीन पोलिस स्पष्ट दिसत असून त्यांना निलंबीतही केलं आहे.

पालघर प्रकरणांतील आक्षेपार्ह गंभीर बाब म्हणजे हे प्रकरण 17,18 व 19 एप्रिल असे तीन दिवस दाबून ठेवण्याचा झालेला प्रयत्न. देभरांतील कुणाही नेत्याच्या ट्विटरवर या तीन दिवसांत पालघर बद्दल काहीही नाही. कुणीही यावर प्रतिक्रिया दिली नाही. असं काहीच बुलंदशहर बाबत घडले नाही. काही तासांतच हा हत्याकांडाला वाचा फुटली आणि त्यावर लगेच प्रतिक्रिया उमटल्या.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणांत कुणीही मुस्लीम गुंतलेला नाही असा एक अजब खुलासा तातडीने केला. मग दुसरीकडून असा प्रश्‍न उपस्थित होतो की मग आहेत कोण ते तरी सांगा? पण ते सांगायला अनिल देशमुख किंवा अजून कुणीही पुढे आले नाही. 101 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. पण किती जणांना प्रत्यक्ष अटक झाली? ही कोण माणसे आहेत? या बाबत संशय ठेवल्या गेला.

बुलंदशहर प्रकरणात असे काहीही घडले नाही. कुठलेही नाव लपवले गेले नाही. कारवाईत दिरंगाई झाली नाही.
मोठ मोठे पत्रकारही ‘मुलं पळविणारी टोळी या भागात फिरत होती. तसे मेसेज व्हॉटसअप वर फिरत होते’ अशी लोणकढी थाप मारत आहेत. आश्चर्य म्हणजे जर असे काही या भागात घडत होते तर त्यावर कसलीच कारवाई का केली गेली नाही? लॉकडाउनच्या काळात सोशल मिडियावर बारीक लक्ष ठेवले जात आहे. व्हॉटसअप ग्रुप वर तातडीने कारवाई केली जात आहे. महाराष्ट्रातच पालघरला लागून असलेल्या नाशिकलाच अशी कारवाई तबलिग प्रकरणी पोलिसांनी केली. तीन जणांना तुरंगवासही झाला आहे. मग पालघर मध्ये कसल्याही अफवा पसरविणार्‍यांवर कारवाई झाल्याचे उदाहरण 16 एप्रिल पूर्वीचे काही आहे का? 

वांद्रे येथे जी गर्दी जमा झाली होती त्या बाबतही खोटी बातमी सोशल मिडियावरून पसरविणारा सध्या तुरूंगात आहे. त्यावर कारवाई झाली आहे. मग जे कुणी पालघर प्रकरणात मुलं पळविणार्‍या टोळीचा उल्लेख करत आहेत त्या बाबत कारवाई का नाही झाली?

मूळात लॉकडाडनमध्ये मुलं पळविणारी टोळी तरी कशी सक्रिय असेल? स्वत:च्या आवश्यक कामासाठी बाहेर पडणे मुश्कील असताना सामान्य लोकांचा तरी या मेसेजवर विश्वास कसा बसणार?

पालघर प्रकरणांतील संपूर्ण सत्य बाहेर निश्चितच येईल. डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणांच्या तपासाबाबत न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. भीमा कोरेगांव सारखा हाही तपास केंद्रिय तपास यंत्रणेकडे सोपवावा अशी मागणी जोर धरत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आमदारकी आणि पर्यायाने महाविकास आघाडी सरकारच संकटात सापडले आहे. वाधवान प्रकरणांतील ‘मानवतावादी’ दृष्टीकोन प्रचंड टीकेचा विषय होवून बसला आहे. अनंत करमुसे मारहाण प्रकरण न्यायालयाात पोचले असून पोलिस आयुक्तांना वैयक्तिक शपथपत्र सादर करण्याचे उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींनी सांगितले आहे. जितेंद्र आव्हाड यांचे सोलापुर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद काढून घेण्यात आले आहेत. कोरोनामुळे आव्हाड सध्या दवाखान्यात आहेत. धारावीतील कोरोना संकट हाताबाहेर जात आहेत.

आधी सीएए, मग त्यातून शाहिनबाग, जामिया मिलीया व जेएनयु तील हिंसाचार, दिल्ली दंगल मग तबलिग प्रकरण, शहरी नक्षलवाद प्रकरणी आनंद तेलतुुंबडे यांची अटक प्रत्येक वेळी पुरोगामी चुक बाजू घेवून अडचणीत सापडले आहेत. आताही बुलंदशहर-पालघर तुलना करून काय साधले?

बँक कर्ज प्रकरणी राहूल गांधींच्या ट्विटला रिट्विट करणे एकच दिवसांत या सर्वांना उघडे पाडणारे ठरले आहे.
जमात-ए-पुरोगामी असंच वागत राहिले तर हळू हळू नि:संदर्भ होवून बसतील. तसेही आज बर्‍याच प्रमाणात होवून बसलेच आहेत. 

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

2 comments:

  1. खूप सुंदर विश्लेषण केले आहे सर.. धन्यवाद खूप गोष्टी समजल्या ह्या लेखामूळे...👌👌
    सर माझ्या मते ह्यांना पत्रकार सुद्धा म्हणू नये... जर हे खरंच पत्रकार असतील तर मग जसे बुलंदशहर मधील घटनेबद्दल बोलले तसे पालघर बद्दल बोलले नाही.. पत्रकार हा नेहमी निःपक्षपाती आणि निर्भीड असतात.. जर हे असे वागत नसतील तर मग ह्यांना पत्रकार नाही तर अजेंडा राबवणारे लोक म्हणावे लागेल...
    जमात-ए-पुरोगामी मधील लोक कधीच सद्सद्विवेक बुद्धी वापरत नाहीत..हे पदोपदी ते सिद्ध करतात.. सध्याचे त्यांचे बोलणे ह्याचेच उदाहरण आहे..
    तुम्ही म्हणाल्या प्रमाणे खरंच पालघर आणि बुलंदशहर ह्या दोन घटने मध्ये फरक आहे.. त्यांना एक वेळेस हा फरक समजत पण असेल पण एक वेळेस अजेंडा ठरवला कि माणसाची बुद्धी काम करणे बंद करते..महत्वाचा फरक म्हणजे पालघर मधील प्रकरण हे 3 दिवस दडपून टाकण्याचा प्रयत्न झाला होता..
    आणि प्रश्न राहिला तिथे पोरं पाळवणारी टोळी फिरत होती ह्याचा जर अश्या अफवा पसरवण्यात येत होत्या तर मग पोलीस काय करत होते?? आणि जर हे खरे असेल तरीही टोळीला पकडण्याचे काम पोलीसांचे होते..
    सध्या सोशल मीडिया वर सरकार इतक्या मोठ्या प्रमाणावर लक्ष ठेवून आहे.. परभणी मध्ये सुद्धा ताब्लिकी बद्दल पोस्ट टाकली म्हणून 2 लोकांना पकडण्यात आले.. अनंत कारमुसे, राहुल कुलकर्णी ह्यांना पकडण्यात आले तर मग तेथील अफवा पसरवनाऱ्या लोकांना पोलीसानी का पकडले नाही??
    तुम्ही म्हणालात तो महत्वाचा प्रश्न आहेच की lockdown मध्ये बाहेर पडणे मुश्किल आहे कर मग अशी टोळी कसं काय सक्रिय असेल?? आणि आसली तर लोक का ह्यावर विश्वास ठेवतील...
    जमात-ए-पुरोगामी हळूहळू निःसंदर्भ होत आहेत...

    ReplyDelete
  2. I read your blog .. Nice explanation of hypocrisy of left liberals

    ReplyDelete