दै. दिव्य मराठी काव्य तरंग रविवार १२ एप्रिल २०२०
माझी माय सरसोती | माला शिकविते बोली ||
लेक बहिनाच्या मनी | किती गुपितं पेरली ||
माझ्यासाठी पांडुरंगा | तुझं गीता भागवत ||
पावसात सामावतं | माटीमधी उगवतं ||
अरे देवाचं दर्सन | झालं झालं आपसुक ||
हिरिदात सूर्यबापा | दाये अरूपाचं रूप ||
तुझ्या पायाची चाहूल | लागे पानापानांमधी ||
देवा तुझं येनं जानं | वारा सांगे कानामधी ||
फुलामधी सामावला | धरत्रीचा परिमय ||
माझ्या नाकाले इचारा | नथनीले त्याचं काय? ||
किती रंगवशी रंग | रंग भरले डोयात ||
माझ्यासाठी शिरिरंग | रंग खेये आभायात ||
धर्तीमधल्या रसानं | जीभ माझी सवादते ||
तव्हा तोंडातली चव | पिंडामधी ठाव घेते ||
-बहिणाबाई चौधरीे
(पृ. 113, बहिणाईची गाणी, सुचित्रा प्रकाशन, 16 वी आवृत्ती)
अनाम बायाबापड्यांच्या जात्यावरच्या ओव्यांनी मराठी कविता संपन्न केली आहे. इंद्रजीत भालेराव यांनी या जात्यावरच्या ओव्यांबाबत असं लिहीलं आहे
... अशा पुरूषांपासूनच इतिहासात
कवितेला कायम भीती होती
म्हणून सातशे वर्ष कविता फक्त
जात्याभोवतीच जीती होती
संत जनाबाईंपासून ठळकपणे मराठी कवितेची परंपरा दाखवता येते (महदंबेचे धबळे त्याआधी आहेत.) या जनाबाईच्या रचना म्हणजे जात्यावरच्या ओव्यांचंच एक रूप आहे. आधुनिक काळात याच परंपरेतील कवयत्री म्हणजे बहिणाबाई चौधरी. तुकारामांच्या शिष्या संत बहिणाबाई या वेगळ्या. काही जणांना हा गैरसमज होतो की या दोन्ही बहिणाबाई एकच आहेत की काय.
जात्यावर बसल्यावर ओवी सुचत जाते असा बापा बापड्यांचा अनुभव आहे. बहिणाबाईंची कविता तर त्याचा जिता जागता पुरावाच आहे.
जात्या इसवरा तू रे कोन्या डोंगराचा ऋषी
माईवानी उकलीते काळीज हे तूझ्यापाशी
अशी एक गोदावरी नदीच्या काठी गंगाखेड परिसरात जात्यावरची ओवीच आहे.
बहिणाबाईंनी आपल्या या कवितेत आपल्या काव्यनिर्मितीचं रहस्य अतियश सोपं करून उलगडून दाखवलं आहे. सरस्वती असा शब्दही जिला नीट उच्चारता येत नाही ती आपल्या प्रतिभेनं कवितेचं महावस्त्र विणत जाते या मागे ही माय ‘सरसोती’च कशी आहे हे त्यांनी सांगितलं आहे. बहिणाबाईंनी संतांच्या रचनांमधला सगळा वेदांत आजूबाजूच्या निसर्गात शेतीत शोधला आणि शब्दांतून मांडून दाखवला.
बोली भाषेतील एक गोडवा, निसर्गदत्त अशी लय बहिणाबाई नेमकी पकडतात. बोरकरांची एक प्रमाण भाषेतील ओळ आहे
होउ आपणही निळ्या घेउ त्याशी अंगसंग
निळ्या झाल्या त्यांच्या संगे रंग खेळतो श्रीरंग
आणि हीच ओळ बहिणाबाईंच्या कवितेत किती सहजतेने येते. ‘श्रीरंग’ सोपा असा ‘शिरीरंग’ होवून जातो. बोरकरांना तरी निळ्या होवून श्रीरंगाकडे जाण्याची आवश्यकता वाटते पण बहिणाबाईंना मात्र त्याच्याकडे न जाताच ‘माझ्यासाठी शिरीरंग रंग खेये आभायात’ असा ठाम विश्वास आहे.
माणूस निसर्ग आणि शेती अशा त्रिसुत्रात बहिणाबाई आपलं सगळं जगण्याचं अध्यात्म बांधतात. या तिनही घटकांचा आपसांतला संबंध जितका सुंदर बहिणाबाईंनी मांडला तो तसाच कुणाला लिहीता आला नाही. आणि परत ही सगळी रचना अतिशय कलात्मक अशा अष्टाक्षरी छंदात आहे. म्हणजे छंदशास्त्राला कुठेही धक्का लावला नाही. अन्यथा लोकगीतांमध्ये हे स्वातंत्र्य घेतलं जातं.
शेवटच्या कडव्यात एक मोठं सत्य त्या कलानिर्मितीबाबत सांगून जातात. धरतीमधल्या रसाचा जीभेला अनुभव येतो मगच त्याची चव पिंडाला कळते. अनुभवातूनच शब्दकळा समृद्ध होते. रोजच्या जगण्याचा निसर्गाचा समृद्ध असा अनुभव घेतल्याशिवाय कळणार कसं आणि मग ते सारं आपल्या शब्दांत उतरणार कसं?
जगण्याच्या अनुभवांतून संतांची रचना जशी सोपी साधी शब्दवेल्हाळ झालेली आहे तशी बहिणाबाईंची आढळते. सोपानदेव चौधरी यांनी एक आठवण लिहून ठेवली आहे. त्यावरून कळते बहिणाबाईंचे जिवनविषयक तत्त्वज्ञान सोप्या भाषेतले पण किती पक्की वैचारिक बैठक असलेले होते. त्या बोलतात ‘जो असतो परंतू दिसत नाही तो देव आणि जे दिसतं पण कधीच नसतं ते भेव’
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मुकनायक’ आणि ’बहिष्कृत भारत’ या आपल्या नियतकालिकांवर बोधवाक्य म्हणून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या रचना वापरल्या आहेत. शिवाय हे नियतकालीकं चालू करताना सहा महिने आधी सर्व संत वाङ्मय आणून वाचून काढले. त्यांचा अभ्यास केला. त्यांच्या एका कार्यकर्त्याला याचं मोठं आश्वर्य वाटलं की हिंदू धर्मातील या संतांच्या रचना कशाला? त्याला उत्तर देताना बाबासाहेबांनी सांगितलं होतं, ‘आपल्या निरक्षर अडाणी लोकांना समजून सांगण्याची भाषा ही साधी सोपी असली पाहिजे. संतांनी अशी भाषा शेकडो वर्षे वापरली. या भाषेचा अभ्यास केल्या शिवाय आपल्यालाही कळणार नाही सामान्य लोकांशी कसा संवाद साधावा.’
बहिणाबाई कुणी सामाजिक राजकीय आंदोलनातील नेत्या नव्हत्या. त्या संतही नव्हत्या. पण त्यांना सामान्यांच्या हृदयाची भाषा नेमकी कळली होती म्हणून त्यांची कविता आज इतक्या वर्षांनीही संतांच्या रचनांसारखी लोकांच्या ओठांवर खेळते आहे. हृदयात ठसून बसली आहे.
श्रीकांत उमरीकर जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575
बहिणाबाईंची कविता सहज आणि सोप्या शब्दात पराकोटीचा अर्थ देवून जाते. बहिणाबाईंच्या कवितेतून जगण्याचा ध्यास स्पष्ट होतो.
ReplyDeleteखूप छान अर्थ स्पष्ट केला आहे.
खुप सुंदर माहिती 🙏
ReplyDelete