Wednesday, April 1, 2020

जिथल्या तेथे पंख मिटूनियां निमूट सारी घरेपाखरे


उरूस, 1 एप्रिल 2020

शिशासारखी भरली मळभट
मृत्यूची चाहूल सुरूंना
अवचित हबकुनि थबके वारा
वाळूंतुन पाऊल सुटेना

घळींघळींतुन अडेआदळे
उजेड वेडा दिसांधळासा
मुकी जखम झाल्या हृदयाचा
तटून आहे एक उसासा

जिथल्या तेथे पंख मिटुनिया
निमूट सारी घरेपांखरे
राख माखुनी पडून आहे
लूत लागले सुणे बिचारे

त्रिशूळसा अन् कुणी कावळा
अवकाशाला कापित येतो
जातां जातां या जखमेचा
झटकन् लचका तोडुन नेतो
-बा.भ.बोरकर
(गितार पृ.44, मौज प्रकाशन. बोरकरांची समग्र कविता, खंड 2, पृ. 41. देशमुख आणि कंपनी)

सध्या लॉकडाउन मुळे बोरकरांच्या या ओळी ‘निमूट सारी घरेपाखरे’ सर्वत्रच लागू पडत आहेत. सारं कांही ठप्प आहे. नेमके हे उन्हाळ्याचे दिवस आहेत. सर्वत्र एक करडा राखेसारखा रंग जाणवतो आहे. बोरकरांनी जी पहिली ओळ लिहीली त्यालाही हा काळ अनुकूल आहे.

ही शांतता आहे पण भयाण आहे. कोरोनाच्या भयाचे सावट सार्‍या जगावरच पसरले आहे. रातअंधळा असा शब्द आपण नेहमी वापरतो. पण ‘दिसांधळा’ असं काही नाही. बोरकरांनी नेमका हा नविन शब्द तयार करून कवितेत चपखल वापरला आहे. सध्याची परिस्थिती मुकी जखम झाल्यागत आहे. भळभळ काही वहात नाही. काही व्यक्त करता येत नाही. पण सारे काही ठप्प असल्याने मनाची विचित्र अशी घालमेल होते आहे.

पंख मिटून पाखरे रात्री झाडावर शांत बसून असतात हे आपल्याला माहित आहे. पण इथे लॉकडाउन मुळे घरेही पंख मिटून आहेत. तेंव्हा बोरकरांच्या कवितेतील ही ओळ इथेही लागू पडते आहे.  तिसर्‍यात जो ‘सुणे’ हा शब्द आला आहे त्याने बर्‍याच जणांचा गोंधळ होतो. एक तर हा शब्द कोकणी आहे. मराठी नाही. सुणे याचा अर्थ कुत्रा. लूत लागलेले कुत्रे जसे पडून असते तसे सगळे जगणे पडून आहे असा अर्थ इथे आहे. बोरकरांच्या प्रतिभेचा कस या शब्दावर लागलेला आहे. एक तर सुणे हा कुत्र्यासाठी आहे पण त्यातून ‘जिणे’ असाही ध्वनीत अर्थ निघतो. दुसरा एक अर्थ सुने म्हणजे एकटे असाही निघतो. या सगळ्यामुळे या शब्दाचे सौंदर्य अजूनच वाढले आहे.

शेवटच्या ओळीत ‘त्रिशुळसा कुणी कावळा’ अशी प्रतिमा येते. इथे कावळ्याला त्रिशूळसा म्हटलेले नसून तो आभाळातून खाली उतरताना तिरका येतो म्हणजेच जमिनीशी जवळपास 60 अंशाचा कोन करतो. आणि नेमका हा कोन त्रिशुळाचा दैत्याला मारतानाचा आहे. देवीच्या हातातील त्रिशुळाने ती दैत्याचा वध करते तो कोन आहेच तसाच कावळ्याचा जमिनीवर झेपावण्याचा कोन आहे.

कोरोनामूळे मृत्यूच्या भयानक बातम्या कानावर येत आहेत. या बातम्या म्हणजे कावळ्याने जखमेचा लचका तोडून न्याव्या तशाच वेदनादायी आहेत.

बोरकरांनी ही कविता 8 एप्रिल 1962 ला लिहीली. आज 58 वर्षांनी बरोबर एप्रिल महिन्यातच आपल्याला हाच अनुभव येतो आहे. हा एक विलक्षण योग आहे. बोरकरांची प्रतिभेला सलाम.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    

2 comments:

  1. बोरकरांची कविता चांगल्यापध्दतीने अर्थासहित विस्तारित केलेली आहे. छान सर.!

    ReplyDelete
  2. बोरकरांची कविता चांगल्यापध्दतीने अर्थासहित विस्तारित केलेली आहे. छान सर.!

    ReplyDelete