Monday, January 18, 2021

औरंगाबाद जिल्ह्यातील बारवांची भयाण स्थिती


उरूस, 18 जानेवारी 2021 

औरंगाबाद हे अगदी सव्वादोन हजार वर्षांपासून महाराष्ट्र आणि जवळपासच्या प्रदेशाच्या मध्य भारताच्या राजधानीचे ठिकाण राहिलेले आहे. सुरवातीला पैठणला सातवाहन, वेरूळला राष्ट्रकुट, देवगिरीला यादव आणि नंतर इस्लामी राजवटी, औरंगाबाद शहर हे निजामशाही (नगर), मोगल आणि निजामी (हैदराबाद) राजवटीच्या सुभ्याचे ठिकाण राहिलेले आहे. त्यामुळे या परिसरांत प्राचीन अवशेष मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यात लेण्या, मंदिरे आणि किल्ले यांबाबत काही एक जागृती तरी आहे. पण याच परिसरांत अतिशय प्राचीन अशा बारवा आहेत त्यांच्याबद्दल मात्र अतिशय उदासिनता आढळून येते. 

मुळात बारव म्हणजे काय हेच नविन पिढीला माहित नाही. पायर्‍या असलेली दगडी बांधणीतील विहिर म्हणजे बारव. विहिरीचे पाणी पोहर्‍याने उपसता येते. बारवेला पायर्‍या असल्याने खालपर्यंत जावून पाणी घेता येते. त्यासाठी पोहर्‍याची गरज नाही. 

औरंगाबाद परिसरांत बारवांची स्थिती भयानक बनली आहे. गेली दोन वर्षे पावसाळा चांगला असल्याने आपल्याला पाण्याची किंमत नाही. सर्वच ठिकाणी सध्या पाणी उपलब्ध आहे. पण तीनच वर्षांपूर्वी पावसाने ओढ दिली तेंव्हा सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते. मी हा लेख लिहीतो आहे त्या समर्थ नगरात प्लॉट क्र. 244 च्या बाजूलाच पेशवेकालीन पुरातन बारव आहे. तिचा गाळ काढणे साफसफाई करणे याचा आग्रह आम्ही धरला तेंव्हा ते काम झाले. गरज होती म्हणून तातडीने त्यावर मोटर बसवून पाणी वापरण्यात येवू लागले. पण नंतर पाण्याची गरज संपली. मोटर बंद पडली. परत कचरा साठला. झाडं वाढली. आता बारव दिसत पण नाही इतकी झाडे वाढली आहेत. अगदी या लेखासाठी फोटोही घेता येवू नये इतकी दाट झाडी वाढली आहे. 

औरंगाबाद तालूक्यात कुठे कुठे बारवा आहेत याचा शोध घेत 17 जानेवारी रविवार रोजी कचनेर ते कायगांव या टापूत फिरलो. पुरातन वारश्याबाबत जागरूक असणारा आमचा फ्रेंच मित्र, बोकुड जळगांवचा तरूण मित्र हरी नागे, शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता दत्ता भानुसे आणि मी आम्ही चौघे दोन मोटारसायकलवरून फिरलो. एकूण 9 बारवा आम्हाला आढळून आल्या. 

औरंगाबाद पैठण रोडवर गेवराई तांड्यापासून बोकुड जळगांवच्या रस्त्याने पुढे गेल्यावर जांभळी गावात एक प्राचीन बारव आहे. गावातील मस्जीदच्या भिंतीला खेटूनच ही बारव आहे. चारही बाजूने उतरत गेलेल्या पायर्‍या. अतिशय खोल अशी ही बारव संपूर्णत: सुस्थितीत आहे. वरचे काही दगड ढासळले आहेत. बारवेला चार देवकोष्टकं आहेत. एका ठिकाणी महादेवाची पिंड आहे. बारवेत कचरा गोळा झालेला आहे.

दुसरी बारव आढळली बीडकीन शहरात भर बाजारात. किल्लीच्या आकाराची ही सुंदर बारव संपूर्ण सुस्थितीत आहे. आजही या बारवेतून पाण्याचा उपसा जवळचे लोक मोटार लावून करतात. पण याची कुणीच साफसफाई करत नाही. बारवेचा अगदी एकही चिरा ढासळलेला नाही. 

बीडकीन शहरातच पैठणच्या दिशेने जाताना मुख्य रस्त्याला लागून साई मंदिरा जवळ असलेल्या मुस्लीम कबरस्तानात एक सुंदर बारव आहे. याच बारवेच्या काठावर प्राचीन महादेव मंदिराचे अवशेष आजही विखुरलेले आहेत. महादेवाची खंडित पिंड आहे. एक पालथा दगड आम्हाला मुर्ती असल्याचे लक्षात आले. तो उपडा केल्यावर झिजून गेलेली भंगलेली ती गणेश मुर्ती असल्याचे लक्षात आले. त्याला पाण्याने धुतले. दोन जणांनी मिळून तो उचलला आणि अलीकडे जिथे आसरा म्हणून शेंदूर लावलेले दगड होते तिथे ती गणेश मुर्ती स्थापित केली. तिला हात जोडले. आणि तिथे राहणार्‍या लोकांना सांगितले की याला शेंदूर फासू देवू नका. ही मुर्ती इथून हालवू नका. कबरस्तानात बारव आहे  बीडकीन शहरातीलच किती लोकांना हे माहित आहे कुणास ठावूक. 

चौथी बारव आढळली ती शेकटा या गावी. ही बारव पाहून अक्षरश: तोंडात बोटं गेली. अशा भव्य बारवा मराठवाड्यात अगदी दोन चारच असतील (चारठाणा आणि मादळमोही). बारव संपूर्ण चांगल्या स्थितीत आहे. केवळ आणि केवळ गावकर्‍यांची अनास्था दिसून येते. बारवेभोवती निव्वळ कचराकुंडी आहे. कुठेच न आढळणारा उपसलेले पाणी वाहून नेणारा पन्नास फुटाचा ओहोळ घडीव दगडांत बांधलेला सुस्थितीत आहे. तेथील तरूण मुलांना आम्ही बारवेची साफसफाई करा स्वच्छता राखा अशी विनंती केली. गावातील प्रतिष्ठीतांशी बोललो. बारवेजवळ राहणार्‍या बाया बापड्यांना हात जोडून विनंती केली की कचरा पडू देवू नका.

पाचवी बारव आढळली भगत वाडी गावाच्या शिवारात. ही बारव संपूर्णत: बूजवून टाकली आहे. काटेकुटे इतके आहेत की बारव दिसतच नाही. झाडांत एक दगडी मोठी शिळा पालथी दिसली. तिच्यावर काही कोरीवकाम असावे असे दिसत होते. कसे बसे काटे बाजूला सारत सरपटत मी आत गेलो. आत जी मुर्ती आढळली ती पाहून चकित व्हायला झालं. शेषशायी विष्णुची ती मुर्ती होती. आत गेलेल्या मला बाहेर येता येईना इतके काटे आणि झुडपे होती. माझ्या सोबतच्यांनी गाववाल्यांना बोलावले. कुर्‍हाड मागवली. बाभळीच्या काटेरी फांद्या तोडल्या. माझी सुटका केली.


मुर्ती बाहेर काढली. तिला पाण्याने स्वच्छ धुतले. ही मुर्ती उभी होती तीला स्थानिक शनीदेव म्हणून संबोधायचे. मुर्ती होती हे माहित होते लोकांना. एका म्हातार्‍याच्या स्वप्नात देव आला होता. त्याने मला बाहेर काढ म्हणून सांगितले. तेंव्हा बारवेतून ही मुर्ती बाहेर काढून काठावर ठेवली होती. आता बारव बुजली तशी काठावरची मुर्तीही झाडोर्‍यात मातीत लपून गेली. मुर्ती स्वच्छ करून ती जशी असायला हवी तशी आडवी ठेवली. शेषशय्येवर पहूडलेला विष्णु त्याचे पाय चेपणारी लक्ष्मी, त्याच्या नाभीतून निघालेल्या कमळावर विराजमान ब्रह्मदेव अशी ती खंडित झिजलेली मुर्ती. शेषशायी विष्णुची मुर्ती सहसा बारवेजवळच आढळते. 

सहावी बारव आढळली ती दहेगांव बंगला या गावात. ही बारव अतिशय चंागल्या पद्धतीने जपलेली आहे. बारवेत सध्या वरपर्यंत पाणी आहे. बारवेला गावकर्‍यांनी तारेचे फेन्सिंग करून संरक्षीत केले आहे. बाजूच्या मंदिराचाही जिर्णोद्धार केलेला आहे. 

नविन कायगांव गावांत जूळ्या गणपती मंदिराला लागून प्राचीन बारव आहे. ही आता बांधकामाच्या साहित्याने दबून गेली आहे. तिच्यावर अरेबिक लिपीत शिलालेखही आहे.  याच गावांतील अगदी दूर जूने कायगांव ते गंगापूर रस्त्यावर असलेल्या बारवेची शांकांतिका तर विलक्षण आहे. ही सर्वात मोठी प्रचंड अशी प्राचीन बारव 2019 च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांनी दुरूस्ती करण्याचे आश्वासन दिले. ही बारव उकलल्या गेली. निवडणुक संपली. झांबड यांचा पराभव झाला. आणि बारवेचाही पराभव झाला. दोन वर्षांपासून बारव आता तशीच उद्ध्वस्त अवस्थेत पडून आहे. तळाचे दगड तेवढे शाबूत आहेत. बारवेच्या भोवतालचा खड्डा पाहूनच आता पोटात खड्डा पडतो. 

बारवेतील गणपती म्हणून एक बारव आणि लहान गणेश मंदिर जामगाव शिवारात आहे. ही बारव चांगल्या स्थितीत आहे. पाण्याने पूर्ण भरलेली असल्याने सध्या खाली उतरता येत नाही. 

औरंगाबादला लागूनच असलेल्या या 9 बारवा आणि माझ्या अगदी सतत पाठीशी असलेली समर्थ नगर मधील एक बारव अशा 10 बारवांची स्थिती पाहून सुचत नाही काय करावे काय बोलावे कुणाला बोलावे ते. वारंवार विविध लोकांना भेटतो आहे बोलतो आहे लिहीतो आहे. प्राचीन वारश्याबाबतची आपली अनास्था कशी आणि केंव्हा जाणार हाच विचार मनाला भेडसावतो. हातनुरच्या लोकांनी (ता. सेलू जि. परभणी) आपल्या बारवेचा जिर्णाद्धार लोकवर्गणीतून केला तो एक आशेचा किरण मला दिसतो आहे. सर्वांना कळकळीची विनंती आपल्या भोवतीच्या प्राचीन वारशाबाबत जागरूकता बाळगा. 

(याच परिसरांत चार प्राचीन मंदिरांचा धांडोळा घेतला आकाश धुमणे आणि माझा पुतण्या नंदन याच्या सोबत त्यावर पुढच्या लेखात लिहितोय)        

 -श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


6 comments:

  1. Ankhin ek barav jadhavwadi nava mondha yethe aahe

    ReplyDelete
  2. सर आम्ही अनेक बारवा शोधल्या आहेत मात्र अज्ञानापोटी काही लोक बारवा बुजवण्यासाठी लोकांना उकसावत आहे तर अंबड शहरातील अनेक बारवांचे दरवर्षी संवर्धन करतो

    ReplyDelete
    Replies
    1. आपण सगळे मिळून हे अभियान महाराष्ट्रभर राबवू. हेच अहिल्याबाईंना खरे अभिवादन ठरेल.

      Delete
    2. आपण सगळे मिळून हे अभियान महाराष्ट्रभर राबवू. हेच अहिल्याबाईंना खरे अभिवादन ठरेल.

      Delete
  3. खूप चांगली माहिती ह्या ब्लॉग द्वारे आपण लोकांपर्यंत पोहोचवत आहात. आपल्या ह्या कार्याला सलाम 🙏🏻 बारव संवर्धन व्हायलाच हवे

    -
    रोहन काळे

    ReplyDelete
  4. खूप चांगली माहिती ह्या ब्लॉग द्वारे आपण लोकांपर्यंत पोहोचवत आहात. आपल्या ह्या कार्याला सलाम 🙏🏻 बारव संवर्धन व्हायलाच हवे

    -
    रोहन काळे

    ReplyDelete