वेरूळ (ता. खुलताबाद जि. औरंगाबाद) मधील कैलास लेणं वगळलं तर इतर लेण्याकडं पर्यटकांचे पाउल वळत नाही. "रावण की खाई" नावाने ओळखले जाणार्या १४ व्या क्रमांकाच्या लेण्यातील या सप्त मातृका. बसलेल्या सात स्त्रीया आणि त्यांच्या भोवती बागडणारी मुलं असा हा सुंदर लोभस शिल्पपट आहे. मुल आईच्या पायाशी घोटाळत असून मांडीवर घेण्याचं आर्जव करत आहे, कुठे मांडीवर बसून स्तनांना तोंडात घेवू पहात आहै, कुठे मांडीवर उभं राहून आईच्या कानातल्यां आभुषणाशी खेळत आहे, या सातही मातृका अलंकाराने नटलेल्या आहेत. पुत्रवल्लभेचं एक अतीव समाधान या मूर्तींच्या चेहर्यावर आहे. स्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता म्हणतात हे तंतोतंत सिद्ध करणारं हे शिल्प. ही बाळं नग्न आहेत. यातूनही परत एक निर्व्याजता दाखवली आहे. बोरकरांच्या पाणी कवितेत एक ओळ अशी आलेली आहे
खोल काळ्या बावडीचे
पारदर्शी मग्न पाणी
कोकरूसे नाचणारे
खेळणारे नग्न पाणी
तशी ही बाळं आई भोवती नागव्याने बागडत आहेत. देवदेवतांची शिल्पं पाहताना त्यातील स्वाभावीक मानवी भाव भावनांचे जे दर्शन होते त्याकडे आपले दूर्लक्ष होते. सप्तमातृका खुप ठिकाणी कोरलेल्या आढळून येतात. पण अशी लोभसता कुठे नाही. या शिल्पाचा कुणी फारसा उल्लेख करत नाही याची खंत वाटते. "वेरूळ लेणी" याच नावाने मधुसूदन नरहर देशपांडे यांचे सुंदर पुस्तक अपरांत प्रकाशनाने प्रकाशीत केले आहे. त्यात यावर लिहिले आहे. वेरूळ लेणी पाहायला येणार्यांनी या पुस्तकाचा वापर जरूर करावा.
Travel Baba Voyage
मित्रा तूझे छायाचित्रासाठी आभार. आम्हा भारतीयांना आमच्या संस्कृतीची ओळख करून देणार्या तूझ्या सुसंस्कारीत फ्रेंच मानसिकतेला लाख लाख प्रणाम.होट्टल मंदिरातील गर्भगृहाच्या तोरणावरील 3D शिल्पाचा उल्लेख यापूर्वी या मालिकेत आला आहे. हे आताचे शिल्प आहे अन्वा (ता. भोकरदन जि. जालना) येथील महादेव मंदिराच्या द्वारशाखेचे. अतिशय आकर्षक अशी ही द्वारशाखा. एकुण पाच द्वारशाखा या मंदिराला आहेत. शार्दूल शाखा, पुष्प शाखा, स्तंभ शाखा, पुष्प शाखा अशा क्रमाने चार शाखा आहेत आणि पाचवी छायाचित्रात दिसणारी विद्याहार शाखा. गायन वादन नृत्य करणारे स्त्री पुरूष यावर कोरलेले आहेत. यात मध्यभागी पुरूष आहेत आणि आजू बाजूला छोट्या आकारात स्त्रीया आहेत.
कोपर्याचा वापर करून त्यावर अशी नक्षी कोरायची हे आवाहन शिल्पकाराने लिलया पेलले आहे. आश्चर्य म्हणजे यातील प्रत्येक शिल्प वेगळे आहे. एकच आकृती परत परत डिझाईनचा भाग म्हणून काढलेली नाही. प्रत्येक शिल्पाचा वेगळा विचार केला आहे हे विशेष. या द्वारशाखांवर एका बाजूला विष्णु आणि एका बाजूला लक्ष्मी कोरलेली आहे. आपण ज्याला एकसारखे बारीक डिझाईन समजतो ते एकसारखे नसते. जवळून बारकाईने निरिक्षण केल्यास त्यातील फरक लक्षात येतात आणि थक्क व्हायला होतंं. एका पुष्पशाखेत कळी पासून अर्ध उमलले, पुर्ण उमललेले, कोमेजलेले अशा सर्व अवस्था दाखवलेल्या आहेत. एक एक मंदिर पहायचे तर किमान एक दिवस तरी पूर्ण घालवला पाहिजे. ज्या अनाम शिल्पकारांनी आयुष्य खर्च करून हे निर्माण केलं त्यांच्यासाठी किमान दिवस तर खर्च करून कलेला दाद द्यावी.
द्वारपाल - वालूर
वालूर (ता. सेलु, जि. परभणी) हे अतिशय प्राचीन वारश्याने संपन्न असे गाव.
Malharikant Deshmukh
या मित्राने याच गावावर लिहिलं आहे. या गावातील सिद्धेश्वर मंदिरावरील हे द्वारपाल. वेरूळच्या कैलास लेण्यांतील द्वारपालांवर नुकतंच लिहिलं होतं. त्याच्या साधारण ५०० वर्षानंतरचा या मंदिराचा कालखंड असावा. द्वारपालांचे मुकुट, पाठीमागची प्रभावळ, अलंकरण यादवांच्या काळातील समृद्धी दर्शवते. उत्तर यादवांच्या काळातील मंदिरं आणि बारवा या परिसरांत प्रामुख्याने आढळतात. सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकुट, चालूक्य आणि यादव या राजघराण्यांची समृद्धी या भागातील प्राचीन वारशावरून स्पष्ट होते.या दोन्ही द्वारपालांचे दरवाजाच्या दिशेचे पायाचे पंजे आत वळलेले आहेत आणि विरूद्ध दिशेचे सरळ समोर आहेत. म्हणजे आतून काही आज्ञा आली की आत वळायचेच आहे. या शिल्पांत उभं राहण्याची ललित मूद्रा मोहक आहे. मंदिराचा जो भाग शिल्लक आहे त्यावर फारसे शिल्पांकन नाही. इथेच एक मैथून शिल्पाची शिळा निखळून पडली आहे. त्यावरून आणि या द्वारपालांवरून कोसळलेल्या भागात काही शिल्पे असावीत याचा अंदाज येतो.
या मंदिराच्या प्रदक्षिणा पथावर वाळवणं घातली आहेत. भिंतींना खिळे ठोकून दोर्यांवर कपडे वाळत घातले आहेत. मंदिराच्या बाजूने गटार वहाते आहे. मंदिराच्या भिंतीला लागुन चुली मांडल्या आहेत पाणी तापविण्यासाठी. त्याची काजळी भिंतींवर चढत आहे. मंदिराच्या छतावर गवत वाढले आहे. काय अनास्था आहे कळत नाही. अशा उकिरड्यात हे शिल्पसौंदर्य पडलेलं आहे.
- श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575.
No comments:
Post a Comment