Saturday, January 2, 2021

विद्यापीठाचे नामांतर चालते तर शहराचे का नको?



उरूस, 2 जानेवारी 2021 

औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करावे अशी एक अतिशय जूनी मागणी आहे. शिवसेनेने औरंगाबाद महानगर पालिकेची पहिली निवडणुक झाली तेंव्हापासून (1987 पासून) ही मागणी लावून धरली आहे.

औरंगाबादचे नामकरण हा विषय पेटता राहण्याचे कारण अगदी सरळ साधे स्वाभाविक आणि अस्मितेचे आहे. मराठी साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची हाल हाल करून हत्या करण्यात आली. याची वेदना सर्वच मराठी माणसांना आहे. त्यामुळे औरंगजेबाचे कुणी कितीही गोडवे गावो मराठी माणूस त्याला हृदयात किंचितही जागा देवू शकत नाही.  औरंगजेबाचे नाव मराठी माणूस सहनच करू शकत नाही. आणि ही भावना शिवसेनेनेच अलीकडच्या काळात तीव्रतेने जागवली आहे. तेंव्हा त्यांची यापासून सुटका नाही. शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा हे बाळासाहेबांचे स्वप्न होते तर औरंगाबादचे नामंतर हा तर त्यांचा ध्यासच होता. तो कधी पूरा करणार? 

पुरोगामी जेंव्हा विकासाच्या गोष्टी करतात तेंव्हा एका गोष्टीचे हसू येते. हे सर्व पुरोगामी मराठवाडा विद्यापीठाच्या नामंतराच्या वेळी काय भूमिका घेत होते? हा प्रदेश निजामाविरूद्ध लढला आहे. या प्रदेशाची म्हणून एक अस्मिता आहे. तेंव्हा मराठवाडा हे नाव बदलू नका अशी भूमिका अतिशय पुरोगामी असलेले, समाजवादी चळवळीत आख्खे आयुष्य झोकून दिलेले अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, नरहर कुरूंदकर यांनी घेतली होती. तेंव्हा त्यांच्यावर बाकी सर्व पुरोगामी तुटून पडले. या पुरोगामी धुरीणांना खड्यासारखे बाजूला ठेवल्या गेले. यांचा पदोपदी अपमान झाला. दै. मराठवाड्याच्या कार्यालयावर मोर्चा काढला गेला. यांच्या पुरोगामीत्वावर शंका घेतल्या गेली. 

विद्यापीठाचे नामांतर करण्याचा ठराव विधीमंडळात झाला तेंव्हा 1978 ला शरद पवार मुख्यमंत्री होते. पण प्रत्यक्षात हा ठराव अमलात येवू शकला नाही कारण लोकांचा विरोध होता. पुढे शरद पवारच मुख्यमंत्री असताना 1994 मध्ये मधला मार्ग काढण्यात आला. मराठवाड्याची शैक्षणिक दृष्ट्या विभागणी करण्यात आली. परभणी-नांदेड-हिंगोली-लातूर या चार जिल्ह्यांसाठी वेगळे विद्यापीठ तयार करण्यात आले. त्या विद्यापीठाला स्वामी रामानंद तीर्थ यांचे नाव देण्यात आले. मराठवाडा विद्यापीठाचे नामंतर न करता त्याचा नामविस्तार करण्यात आला. आंबेडकरांच्या नावासोबत मराठवाडा हे नाव कायम ठेवल्या गेले.

ही सगळी राजकीय सामाजिक उठाठेव का करण्यात आली? हा काही विकासाचा प्रश्‍न होता का? नामांतरा नंतर विद्यापीठाचा दर्जा सुधारला का? हे विद्यापीठ जगातल्या सोडा, भारतातल्या सोडा, राज्यातल्या विद्यापीठात तरी अव्वल ठरले का? आज कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात किंवा कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे जेंव्हा विकासाचे प्रश्‍न महत्त्वाचे मानतात तेंव्हा त्यांनी याचे स्पष्टीकरण करावे की मराठवाडा विद्यापीठ नामांतर प्रश्‍नी कॉंग्रेसची काय भूमिका होती? प्रत्यक्ष कॉंग्रेस सत्तेत असतानाच नामांतर झाले आहे ना? 

तेंव्हा बाबासाहेब आंबेडकर हा विषय अस्मितेचा होता. बाबासाहेबांनी पहिल्यांदा या भागात महाविद्यालय काढले असे सांगितले जाते. मग याच प्रदेशातील वेरूळ हे शिवाजी महाराजांचे मुळ गाव आहे. तेथील पाटीलकीचे वतन त्यांच्या घराण्यात आहे. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांची समाधी वेरूळला घृष्णेश्वर मंदिरासमोर आहे. शिवाजी महाराजांचे काका शरिफजी राजे भोसले यांचीही समाधी वेरूळला आहे. तेंव्हा भोसले कुळातील हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव औरंगाबादला देण्यास विरोध कसा काय असू शकतो? 

औरंगाबादसाठी दुसरे नाव विचारार्थ घ्यावे लागेल ते देवगिरी. शिवाय महाराजांचे आजोबा (जिजाबाईंचे वडिल) लखुजी जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज आहेत. याच यादवांची देवगिरी ही राजधानी होती. आजही महाराष्ट्रातील एक अतिशय अप्रतिम बेजोड असा हा किल्ला. मराठी साम्राज्याचे संपन्न बलशाली प्रतिक. हा किल्ला एकेकाळी संपूर्ण भारताची राजधानी होता. तेंव्हा औरंगाबादचे नामकरण करताना दुसरा पर्याय म्हणून देवगिरी या नावाचा विचार झाला पाहिजे.

तिसरे नाव विचारार्थ पुढे येते ते म्हणजे प्रतिष्ठान. सर्वात जास्त काळ संपूर्ण महाराष्ट्रासह मध्यभारत आणि दक्षिणेपर्यंत ज्याचे साम्राज्य टिकलेले होते असा राजवंश म्हणजे सातवाहन. सातवाहन राजे सर्वात जास्त काळ म्हणजे 450 वर्षे सत्तेवर होते. गोदावरीच्या काठावर इतके संपन्न राजकुल दुसरे नव्हते असा अभिमानाने उल्लेख गाथा सत्तसई मध्ये आला आहे. या सातवाहनांची राजधानी पैठण हीचे मुळ नाव प्रतिष्ठान नगरी असे आहे. त्यावरूनच औरंगाबादचे नाव प्रतिष्ठान करावे ही मागणी अस्मितेचा विचार करता योग्य ठरते. 

चौथे नाव समोर येते ते खडकी. देवगिरी किल्ल्याच्या जवळ लष्कराची छावणी जेथे बसायची ते खाम नदी काठचे खेडेगाव म्हणजे खडकी. मलिक अंबरने या गावाला मोठ्या नगरीचे रूप दिले. तेंव्हा मुळ खेडेगावचे जे नाव आहे खडकी तेच नाव औरंगाबाद ऐवजी कायम ठेवावे. असाही एक विचार पुढे येतो आहे. 

मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर कराताना जसा विकासाचा मुद्दा मागे सारून दलित अस्मितेचा विचार पुढे आणण्यात आला होता तसाच आताही या प्रदेशाची अस्मिता असलेली नावे समोर आणून नामांतर करण्यात यावे. औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर-देवगिरी-प्रतिष्ठान-खडकी असा विचार झाला पाहिजे. विकासाचे मुद्दे समोर आणणार्‍या सगळ्या पुरोगाम्यांची भूमिका मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्यावेळी काय होती हे तपासून पहायला पाहिजे. जे कोणी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या बाजूने होते त्या सर्वांना सध्याच्या शहर नामांतर प्रकरणी बोलण्याचा काही एक नैतिक अधिकार नाही. याच्या शिवाय औरंगाबाद नावाचे समर्थन करणार्‍यांनी औरंगजेब आमच्या अस्मितेचा जिव्हाळ्याचा विषय का आणि कशासाठी असू शकतो हे पटवून द्यावे. या प्रदेशातील जनतेच्या अस्मिता ज्याने पायदळी तुडवल्या त्या औरंगजेबाचे नाव त्वरीत हटवले गेले पाहिजे. त्यावर चर्चा करण्यात वेळ घालवू नये. 
           
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

6 comments:

  1. उत्तम विवेचन 👍

    ReplyDelete
  2. सर आपण आपली भूमिका एकदम स्पष्ट वाक्यात मांडली आहे ज्या वेळेस मराठवाडा विद्यापीठाला नाव आमंत्रण करण्याचा विचार त्यावेळच्या घटकांनी केला त्यावेळी राज्यकर्त्यांनी शासनकर्त्यांनी तो मंजूरही केला आज ज्या धर्माच्या नावाने हे शहर बसलोय ते नाव बदललं तर काय हरकत आहे आपण फक्त छत्रपती शिवरायांचे छत्रपती संभाजी राजांचे नाव घेऊन राजकारण करत आहे याचा विचार करा मग तुमच्या मनामध्ये किती खोट आहे निवडणुका आल्या कि शिवाजी महाराज नाव घ्यायचं आणि जास्त छत्रपती संभाजी महाराजांचे नाव शहरात जायचं त्यावेळेस आमचा स्पष्ट विरोध आहे असं थोरात सांगतात त्यावेळेस शरद पवार साहेब एक शब्दही बोलत नाही आता रक्त सांडले तरी चालेल पण ह्या औरंगाबाद जिल्ह्याला संभाजीनगर नाव झालं पाहिजे हे प्रामुख्याने आमची मागणी आहे

    शिवभक्त गणेश शेषराव मोहन मोबाईल नंबर 9623822114

    ReplyDelete
  3. झालंच पाहिजे.यासाठी आपण सगळे आग्रही असलो पाहिजे.

    ReplyDelete
  4. नामांतर सगळ्याच शहरांचे झाले पाहिजे.

    ReplyDelete
  5. सहमत.अतिशय योग्य भूमिका.हा अस्मितेचा विषय आहे. छत्रपती संभाजीराजेंची हालहाल करून हत्या करणाऱ्या धर्मांध औरंगजेबचे नाव नकोच. #संभाजीनगर नाव अठरापगड जातींची अस्मिता आहे.

    ReplyDelete
  6. सहमत.अतिशय योग्य भूमिका.हा अस्मितेचा विषय आहे. छत्रपती संभाजीराजेंची हालहाल करून हत्या करणाऱ्या धर्मांध औरंगजेबचे नाव नकोच. #संभाजीनगर नाव अठरापगड जातींची अस्मिता आहे.

    ReplyDelete