Thursday, January 14, 2021

पैठणच्या नाथसागरावर सुचलेली कविता




उरूस, 14 जानेवारी 2021 

औरंगाबादच्या आजूबाजूला प्राचीन स्थळांना भेटी देत असताना सोबतच निसर्ग लक्ष वेधून घेतो आहे असा एक अनुभव मला आला. या निसर्गाच्या ओढीतून काही कवितांचा जन्म झाला. पूर्वी मराठीत लिहील्या गेलेल्या सुंदर निसर्ग कविता डोक्यात घालायला लागल्या. बालकवी, बोरकर, सदानंद रेगे, इंदिरा संत, मंगेश पाडगांवकर, महानोर, वसंत बापट यांच्या निसर्ग कवितांच्या ओळी निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेता आपुसकच ओठांवर आल्या. 
शाश्‍वत पर्यटनाचा प्राचीन मंदिरं मुर्ती वास्तू यांच्या जतन संवर्धनाचा एक विषय सध्या डोक्यात चालू आहे. सोबतच त्या त्या भागातील संगीत, खाद्य पदार्थ, वस्त्र यांचाही संदर्भ त्याच्याशी जूळत होता. धारासुर, होट्टल, केदारेश्वर मंदिरांवरील पत्रसुंदरी बघितल्या आणि अचानक असे वाटले की या भागातील साहित्य हा विषयही विचारात घ्यायला पाहिजे. मला स्वत:ला काही कविता यातून सुचल्या. अंतुरचा किल्ला गौताळा अभयारण्य, रूद्रेश्वर लेणी, अजिंठा घाटातील हिरवाई, औरंगाबाद जवळच्या सातारा टेकडीवरील बाभळी यांच्यावर कविता लिहून झाल्या होत्या. 
9 जानेवारी एकादिवशीच्या दिवशी पैठणला नाथसागरावर पहाटे पहाटे गेलो असताना जे सुंदर पक्षी दर्शन झाले त्यातून एक कविता सहजच सुचत गेली. 

शुभ्र पांढरा । पक्षी घेतो
हवेमधुनी । गर्कन गिरकी ॥
पाण्यामधल्या । मासोळीची
सळसळ वेधक । चाल ही फिरकी ॥

अशा ओळी सुरवातीला सुचल्या. कारण नाथसागराच्या काठावर येणार्‍या पक्ष्यांसाठी एक छोटा मुलगा लाह्या, पावाचे तुकडे असं काहीतरी खाद्य टाकत होता. तो खाण्यासाठी मासोळ्या पृष्ठाभागावर येत होत्या. त्यांना खाण्यासाठी पक्षी पाण्यावर सूर मारून उतरत होते. 

उन्हे लेवुनी । आणि पिउनी
नाच नाचती । पक्षी थवे ॥
पुलकित होवूनी । पाण्यावरती 
तरंग उठती । नवे नवे ॥

एक विलक्षण अशी शांतता सर्व आसमंतात भरून राहिली होती. पक्ष्यांचे आवाज, लाटांचा काठावर होणारा बारीक आवाज या व्यतिरिक्त कसलेच आवाज नव्हते. पाण्यात गाळ बसत जावा तसे आपल्याही मनातील सर्व क्ष्ाुब्धता खाली बसून नितळ नितळ आपण झालो आहोत असा काहीसा अनुभव येत होता. काठावर नुसतं बसून राहण्यात एक विलक्षण सुख अनुभवास येत होते. पाण्यात पाय टाकल्यावर त्या पाण्याचा एक जिवंत असा स्पर्श उर्जा निर्माण करत होता. 

किलबिलणार्‍या । पाक्षीरवाचे
पायी बांधून । नाजुक पैजण
इथे शांतता । करिते नर्तन ॥
अथांग पाहून । निळा जलाशय
क्ष्ाुब्ध मनातील । मिटवूनी आशय
घुमू लागते । शुभ संकिर्तन ॥

काठावरचे दगड गोटे पाण्याने भिजून गेले होते. पण मला वाटले ते निसर्गात हे जे संगीत चालू आहे त्या स्वरातच चिंब भिजून गेले आहेत की काय असं वाटून गेले. सगळ्याची गती थांबली आहे. काळही थांबला आहे. अनिलांच्या कवितेत महटल्या सारखे ‘जिथे शांतता स्वत:च निवारा शोधीत थकून आली असते’ असं जाणवायला लागलं. 

काठावरचा । पत्थर भिजला 
जरी भासतो । पाण्याने ॥
चिंब चिंब तो । न्हाउनी गेला
मंजुळ । पाखरगाण्याने ॥

पळता पळता । या जागेवर
काळाचे । पाउल अडे ॥
ताजी ताजी । हवा भोवती
सोन उन्हाचे । पडती सडे ॥

अथांग तळ्याकाठी सागराकाठी नेहमी येणारा अनुभव म्हणजे आभाळाचा निळा आणि जळाचा निळा एकमेकांत मिसळून जातात. सावरकरांनी आपल्या कवितेत असं लिहिलं आहे, ‘नभात जळ ते जळात नभ ते संगमुनी जाई’ असं काहीसा विलक्षण अनुभव येत राहतो. हा निळा काहीतरी वेगळा आहे. नाथांच्या वास्तव्याने पावन झालेली ही भूमी. इथे काही एक प्रसन्नता पवित्रता जाणवत राहते. 

नभी-जळाचा । मिसळूनी झाला
एक अनोखा । रंग निळा ॥
भाळावरती । रेखून घेवू
प्रसन्नतेचा । गंध टिळा ॥

नाथांना शांतीब्रह्म असे म्हटले जाते. नाथसागराच्या काठावर शांतीरसाचा एक अद्भूत असा अनुभव आला. त्यामुळे कवितेचा शेवट करताना अशी ओळ सुचली

जळात बुडता । पाउल, शिरते
पवित्र काही । अंगात ॥
नाथांची ही । भूमी रंगे
शांतीरसाच्या । रंगात ॥

(छायाचित्र सौजन्य व्हिंसेंट पास्किंली)
 -श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

7 comments:

  1. विषय, लिखाण वाचनानंद प्रसन्नतेचा टिळा मनाच्या भाळी सहजच लावून जाते.नकळत लावलेल्या अत्तराचा मनस्वी गंध दरवळत राहावा मनांत, डोक्यात मागे कोणत्यातरी स्तरावर व ऊठत राहावेत मृदगंधाचे थवे अशीच मनोवस्था आहे.
    अतिशय मनस्वी लिहीलंत एवढंच म्हणेन...पुढे निःशब्दति.

    ReplyDelete
  2. अतिशय काव्यात्म प्रतिक्रिया... मन:पूर्वक धन्यवाद !

    ReplyDelete
  3. पाखर गाण्याने चिंब पत्थर. वा वा. अतिशय सुंदर

    ReplyDelete
  4. पाखर गाण्याने चिंब पत्थर. वा वा. अतिशय सुंदर

    ReplyDelete
  5. पक्षीरव,पाखरगाणं हे नवे शब्द मराठीला तुम्ही दिले सर
    सहज पण खुप सुंदर

    ReplyDelete
  6. सर
    सहजच पण सुंदर
    पक्षीरव, पाखरगानं नवे शब्द मराठीला आपण दिले.

    ReplyDelete