Saturday, January 16, 2021

नाही ‘मनोहर’ तरी..


उरूस, 16 जानेवारी 2021 

ज्येष्ठ मराठी कवी यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती सन्मान स्वीकारण्यास नकार दिला. त्यासाठी जे कारण दिले ते असे, या सन्मान प्रदान करण्याच्या समारंभात सरस्वतीची प्रतिमा विदर्भ साहित्य संघाच्या वतीने मंचावर ठेवण्यात येणार आहे. ही सरस्वतीची प्रतिमा स्त्री शूद्रांवर अन्याय करणार्‍या व्यवस्थेचे प्रतिक आहे.  

पहिली गोष्ट म्हणजे मनोहर ज्या बुद्धाचे अनुयायी आहे त्याने आपल्या बुद्धीचा वापर करण्याचा आग्रह धरलेला आहे. मनोहरांनी आपल्या बुद्धीचा वापर करून नेमके कोणते प्रतिक कशाचे आहे याचा तरी विचार करायचा होता. नटराज ही कलेची देवता आहे. तिचे पुजन अगदी दलित असलेला कलावंतही करतो. मग तो तेंव्हा अशी भूमिका घेेतो का की हे सनानत धर्मातील ब्राह्मणी धर्माचे प्रतिक आहे. मी नटराज पुजन करणार नाही? 

विष्णुच्या अवतारांमध्ये 9 वा अवतार भगवान गौतम बुद्ध दर्शविला जातो. ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येतील अप्रतिम अशा केशव विष्णु मुर्तीवर हा अवतार कोरलेला आहे. आता मनोहर हे नाकारणार आहेत का? किंवा याच्या उलट जे कुणी सनातन धर्माचे कट्टर समर्थक भक्त असतील त्यांनी यावर बुद्ध मुर्ती आहे म्हणून ही विष्णु देवता नाकारायची का?

मुळात सरस्वती ज्या ज्या ठिकाणी प्रतिक म्हणून अर्वाचीन काळात समोर येते ते कशाचे प्रतिक म्हणून? विद्येची अधिदेवता म्हणूनच ना. मग मनोहरांनी आयुष्यभर जी काय साहित्य सेवा केली, जे काय समाज जीवन अनुभवलं, ज्या  काही चळवळीत काम केलं त्यात त्यांना काय शिकवलं गेलं? त्यांचा अनुभव काय होता? 

एकेकाळी अन्याय करणारा सनातन धर्म त्याजून बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारला. त्यालाही आता 60 वर्षे उलटून गेली. बाबासाहेबांनी ज्या घटना समितीत काम केले, ज्या मंत्रीमंडळात काम केले त्या सर्व ठिकाणी कितीतरी हिंदू प्रतिके वापरली गेली. 64 योगीनींचे जे मंदिर मध्यप्रदेशातील मुरैना येथे आहे त्याच मंदिराची रचना संसदेसाठी वापरली गेली होती. बाबासाहेब असे म्हणाले का की माझ्यावर अन्याय करणार्‍या सनातन धर्मातील देवतेच्या मंदिराची रचना असलेल्या संसद भवनात मी प्रवेश करणार नाही? 

अशोक स्तंभ त्यावर असलेले सिंह हे प्रतिक भारतीय प्रशासनाने स्वीकारले. मग कट्टर पथियांनी अशी भूमिका घेतली का की बौद्ध धम्मातील हे प्रतिक आम्हाला चालणार नाही? 

कितीतरी धर्म संकल्पनांचा मिलाफ होवून भारतीय संस्कृती घडत गेलेली आहे. त्यात कित्येक प्रतिकांची सरमिसळ होवून गेली आहे. मग आपण जर या प्रतिकांबाबत अशी काही कट्टर भूमिका आग्रहाने मांडत गेलो तर भारतीय समाज जीवनात अडथळेच अडथळे येत राहतील. 

ताजमहालाचा कळस, त्या खाली असलेली पाकळ्यांची रचना हे सर्व हिंदू पद्धतीचे प्रतिक आहे. मुळात कळस हाच हिंदू आहे. पण इस्लामच्या कितीतरी वास्तूंवर हा कळस दिसून येतो. मनोहरांच्या घरातील किंवा आजूबाजूच्या बौद्ध स्त्रिया अजूनही कुंकू कपाळावर लावतात. ते कशाचे प्रतिक आहे? आजही गळ्यात काळी पोत घालतात. अक्षता नाकारल्या तरी फुलांचा वर्षाव करण्याचे प्रतिक नेमके कुठून येते? आजही बुद्ध मुर्तीसमोर उदबत्ती पेटवली जातेच ना? बुद्धच कशाला पण बाबासाहेबांच्या पुतळ्यालाही हार घातले जातातच ना. 

मनोहरांनी हे स्पष्ट करावे गल्लो गल्ली गणपती बसतात तेंव्हा त्या समोर दलित मुलं नाचत असतील तर ते त्यांच्या कानफटीत लगावणार का? देवीची गाणी गाणारे दलित लोककलाकार आहेत. त्यांच्या घराण्यात परंपरेने ते चालू आहे. यातील धार्मिकता आपण बाजूला ठेवू. पण कला म्हणून त्याचा विचार करणार की नाही? पोतराज हा दलित समाजाचा लोक कलाकार होता. तो हलगी वाजवायचा. हलगी म्हणजेच चर्म वाद्य वाजवणारा कलाकार म्हणून त्याचा सन्मान करणार का त्याला हे फालतू हिंदू धर्मातील धंदे बंद कर म्हणून खडसावणार? 

प्रल्हाद शिंदे कोणत्या समाजाचे होते? त्यांच्या आवाजातील ‘ऐका सत्यनारायणाची कथा’ आणि ‘चल ग सखे चल ग सखे पंढरीला’ ही दोन गाणी आजही तुफान लोकप्रिय आहेत. या प्रल्हाद शिंदेंना मनोहर काय समजत असतील? आजही प्रल्हाद शिंदेंच्या आवाजातील भक्ती गीतांची तुफान लोकप्रियता कुठल्याही दुसर्‍या गायकाला लाभलेली नाही. 

शाहिर विठ्ठल उमप हे कोणत्या जातीत जन्मले? ते कोणती गीतं गायचे? मग आपण त्यांना काय म्हणायचे? अगदी आजचे आघाडीचे संगीतकार अजय अतूल यांनी रचलेले ‘देवा श्रीगणेशा देवा श्रीगणेशा’ गाणं अतिशय लोकप्रिय आहे. त्याबाबत यशवंत मनोहर काय भूमिका घेणार आहेत? 

साहित्य अकादमी सरकारी संस्था आहे. तिच्या पुस्तकांमध्ये  बुद्ध जातकातील लेखनाचा प्रसंग चित्रित केलेली पानं आसपास साठी वापरलेली असतात. मग कोणा कट्टर सनातन्याने अशी भूमिका घेतली का की मला हे बुद्ध धम्मातील प्रतिकच मंजूर नाही? 

औरंगाबाद लेण्यात (हो औरंगाबादलाही लेण्या आहेत. बहुतेक लोकांना अजिंठा वेरूळच माहित असते) आम्रपालीचे शिल्प आहे. गायन वादन नृत्य करणार्‍या स्त्री कलाकार असे हे शिल्प आहे. गायन वादन नृत्य यांचा एकत्रित असा हा पहिला पुरावा मानला जातो. हा संदर्भ बुद्ध जातकातला आहे. मग कट्टरपंथी हिंदूंनी अशी भूमिका घेतली का की हे आम्हाला मंजूरच नाही? 

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रतिक म्हणजेच एलिफंटा गुफेतील  त्रिमुर्ती शिव आहे. मग मनोहरांनी अशी भूमिका घेतली का की मी एमटीडिसीच्या विश्राम गृहात कधी उतरणारच नाही? कितीतरी महानगर पालिका, नगर पालिका यांच्या सभागृहांत मनोहरांनी आक्षेपार्ह वाटतील अशी सनातन हिंदू धर्माची प्रतिकं कोरलेली आहेत. मग मनोहर त्या मंचावर पण जात नाहीत का? शिवाजी महाराजांची राजमुद्रा हिंदू धर्माप्रमाणेच आहे ना.  मग मनोहरांनी या मुद्रेला विरोध केला का कधी? 

कोल्हापुरची अंबाबाई ही जैन बौद्ध यांची पण देवता आहे असा उल्लेख संत एकनाथांचे नातू मुक्तेश्वरांच्या आरतीमध्ये आला आहे. मनोहर असे म्हणणार आहेत का की आम्हाला हे मंजूरच नाही. करिता आम्ही त्या मंदिरातच जाणार नाही. लक्ष्मी या देवतेची पूजा कितीतरी आर्थिक उलाढाल होणार्‍या ठिकाणी केली जाते. ते प्रतिक लावून ठेवलेले असते. अशा नावाच्या काही वित्तविषयक उलाढाल करणार्‍या संस्थाही आहेत. मग अशा बँकेचा धनादेश मनोहर नाकारतात का? 

प्रतिकांचा स्वतंत्र विचार साने गुरूजी, राम मनोहर लोहिया, श्रीपाद अमृत डांगे यांच्या सारख्या डाव्या समाजवादी विचारंवंतांनी सुंदर पद्धतीने मांडला आहे. देवीप्रसाद चटोपाध्याय सारख्या डाव्या विचारवंताने लोकायत नावाचे भले दांडगे पुस्तक आर्यपूर्व देवता आणि परंपरांवर लिहीले आहे. त्यातील कितीतरी प्रतिके आज सर्वत्र रूजलेली आहेत. त्यांचा वापरही सर्वत्र होतो. मग मनोहरांसारखे या बुद्धपूर्व प्रतिकांचा जे की ते टीका करतात त्या सनातन हिंदू संस्कृतीच्याही आधीच्या संस्कृतीमधील आहेत स्वीकार करणार का? 

मनोहर अतिशय ज्येष्ठ लेखक आहेत. प्रतिभावंत आहेत. अशा मनोहरांनी मंचावर सरस्वती असेल तर त्या मंचावरील सन्मानच मला नको अशी आततायी भूमिका घेणे त्यांच्या सहिष्णु करूणामयी बुद्ध परंपरेला शोभणारे नाही. गालिब याने बनारसवर एक सुंदर कविता रचली आहे. बनारस मधील मुर्तींचे वर्णन करताना गालिब लिहून जातो

पैगंबराला दिसलेल्या 
दिव्य प्रकाशापासून
घडलेल्या येथील मुर्ती 

इतका उदारमतवाद एका इस्लामी संस्कृतीत जन्मलेल्या महाकवीला दोनशे वर्षांपूर्वी सुचला. आणि आज आमच्याच परंपरेचा दर्शनांचा भाग असलेल्या बुद्धाच्या अनुयायाला सरस्वतीची केवळ प्रतिमा आक्षेपार्ह वाटत आहे? हे तर अतिशय संकुचित पुरोगामीत्व झाले.    

 -श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 


2 comments:

  1. छान लिहिले आहे. विदर्भ साहित्य संघाच्या लोगोमध्ये सरस्वतीचा उल्लेख आहे.

    ReplyDelete
  2. अतिशय समर्पक कसं उघाडणी करणारा लेख . यालोकांची प्रतिभा अनावश्यक हेकटपणाचे ज्वकंत प्रतीक आहे. सारासार विचारशक्ती पासून तुआनी फारकत घेतली आहे. दुर्दैव म्हणावयाचे महाराष्ट्राचे!नकोब्तीथे यांची अस्मिता उचल खाते

    ReplyDelete