Tuesday, January 12, 2021

मूर्ती मालिका - २४


 
नृत्यमग्न शिव
वेरूळला (ता. खुलताबाद जि. औरंगाबाद) लेणी क्र.१३ ते २९ या हिंदू लेण्या आहेत. यात प्रामुख्याने शिवाची शिल्पे आहेत. यातही परत नृत्य करणार्या शिवाची शिल्पे खुप वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
इथे घेतलेले छायाचित्र लेणी क्र. १४ मधील आहे. मुर्ती आता खंडित झालेली आहे. पण अगदी पहिल्याच दर्शनात मुर्तीकाराने शिल्पबद्ध केलेली लयबद्धता डोळ्यात ठसते. प्रत्यक्ष शिवतांडव चालू असताना कॅमेर्याने शुटींग करावे आणि त्यातील एक फ्रेम स्थिर करून ठेवावी अशी एक विलक्षण गती या शिल्पात जाणवते. मुर्ती खंडित असल्याने इतर बारकावे तज्ज्ञ नजरेने शोधावे लागतात. उजव्या बाजूला खाली पखवाज सारखे वाद्य उभे ठेवून ड्रम सारखे वाजशिणारे तीन वादक आहेत. बाजूला कृश देहाची भृंगी आहे. पाठीमागे गणांसह पार्वती आहे. ब्रह्मा विष्णु आहेत. ऐरावतावर बसलेला इंद्र आहे. एडक्यावर बसलेल्या अग्निचिही मुर्ती कोरलेली आहे. पार्वती डावे कोपर टेकवून आरामात उभं राहून नृत्य करणार्या शिवाकडे कौतूकाने पहात आहे. आठ हातांचा हा नृत्यमग्न शिव विलक्षण कलात्मक उर्जेने भारलेला भासतो. शिल्पकाराने मुर्तीचा तोल साधण्यासाठी हातांची रचना, बाजूच्या शिल्पांची रचना, अगदी पायाच्या पंज्याची रचना विलक्षण सुंदर पद्धतीने केली आहे. मुख्य डाव्या उजव्या दोन हातांची बोटं एकमेकांत गुंतवून एक सुंदर नृत्यमुद्रा साकार झाली आहे. यातील बारकावे अभ्यासक अजून नेमके सांगु शकतील. पण एका सामान्य दर्शकाच्या डोळ्यात विलक्षण ऊर्जापूर्ण नृत्यआवेश ठसून राहतो. आता लगेच ही मुर्ती जिवंत होउन डावा टेकवलेला पंजा कायम ठेवून उजवा पाय फिरवत गिरकी घेईल की काय असेच वाटते.
Travel Baba Voyage
do u remember we watched shiv tandav dance at
Mahagami Gurukul
. u may have pic of that.



महिषासुर मर्दिनी - निलंगा
निळकंठेश्वर मंदिर (निलंगा, जि. लातुर) मंदिराच्या मंडोवरावरील देवकोष्टकात ही मूर्ती आहे. महिषासुराचा वध करण्यासाठी देवीने नउ दिवस उपासना केली. देवीला सर्व देवांनी आपली शस्त्रे बहाल केली. मग ती युद्धावर गेली अशी कथा आहे. या मूर्तीतील वेगळेपण माझ्या डोळ्यात चटकन भरले ते म्हणजे देवीच्या हातातील शंख व चक्र ही विष्णुची आयुधे. अभ्यासकांना (
Dr-Arvind Sontakke
आणि
Maya Shahapurkar Patil
) मी विचारले की ही महिषासुर मर्दीनीच आहे का? चक्र धरण्याची पद्धतही जरा वेगळी आहे.
शिल्पकाराने चारच हात दाखवले आहेत. सहसा आठ किंवा जास्त हात दाखवले जातात. महिषासुर केवळ डोके न दाखवता पूर्ण दाखवला आहे. खाली रेडाही पूर्ण आहे. डाव्या बाजूला सिंह आहे पण तो नीट दिसत नाही.
देवीचा त्रिशुळ जो भंगला आहे तो जोरकसपणे तिरका महिषासुराच्या देहात घुसवला आहे. देवीचा एक पाय महिषासुराच्या देहावर एक तिरका जमिनीवर. अतिशय सुरेख कलात्मक असा तोल साधलेले शिल्प. तिचे किमान दागिने, चेहर्यावरचे ठाम भाव, नाजूकता स्त्रीची स्वाभाविकता न सोडता शक्ती प्रकट करायची मोठं अवघड कसब इथे साधल्या गेले आहे. किमान अलंकरण आणि कमाल परिणाम असे हे शिल्प आहे.
छायाचित्र सौजन्य दत्ता दगडगावे लातूर.



तहान देवता - पैठण
पैठण (ता. पैठण जि. औरंगाबाद) येथील ज्ञानेश्वर उद्यानात (जे की आता पूर्णत: उद्ध्वस्त आहे) बाळासाहेब पाटील वस्तुसंग्रहालय आहे. या वस्तुसंग्रहालयाच्या अंगणात काही प्राचीन शिल्प अवशेष मांडून ठेवले आहेत. यात शेषशायी विष्णु, शिवपार्वती, सुरसुंदरी, कोरीव दगडी रांजण अशी शिल्पं आहेत. त्यातील हे एक शिल्प. प्रथमदर्शनी जलकुंभ घेतलेली सुरसुंदरी असावी असे वाटले. पण बारकाईने बघितल्यावर खालच्या आकृतीकडे लक्ष गेले. पाण्यासाठी ओंजळ पसरलेली एक व्यक्ती आढळून येते. ती पाहताच शिल्पाचा अर्थच बदलून जातो. तहानलेल्यांना पाणी देण्याचा शांत भाव स्त्रीच्या चेहर्यावर झळकायला लागतो. तहानेची कासावीस पसरलेल्या ओंजळीमागच्या चेहर्यावर दिसायला लागते. या शिल्पाला नाव काय द्यावे? सुरसुंदरी शोभत नाही. जलदेवता म्हणावं तर त्याला वेगळा अर्थ आहे. शिल्पशास्त्रात याला वेगळे नाव नाही. मुळात हे शिल्प केवळ शास्त्र म्हणून किंवा सौंदर्य म्हणून निर्माण झालेलं वाटतच नाही. तहानेने व्याकुळलेला माणुस आणि त्याची तहान भागवणारी स्त्री असं हे शिल्प आहे. म्हणून मी याला "तहान देवता" असं नाव देतो.
जागते रहो चित्रपटात राज कपुर रात्रभर पाण्यासाठी वणवण भटकतो. पहाटे पहाटे त्याला तुळशीची पुजा करून पाणी घालणारी सुस्नात नर्गीस दिसते. तिच्यासमोर तो ओंजळ पसरतो आणि ती वरतुन पाण्याची धार ओतते. "जागो मोहन प्यारे" हे लताच्या आवाजातील गाणं पार्श्वभुमीवर वाजत रहातं. सलील चौधरीच्या या अवीट गाण्याचे सुर हे शिल्प पाहताना माझ्या मनात घुमत होते.
Travel Baba Voyage
total credit goes to u friend.
Akash Dhumne
मित्रा तू या उद्ध्वस्त बगीचाकडे मागच्या दारानं नेलं नसतं तर माझेही लक्ष इकडे गेलेच नस्ते. तूम्हा दोघांचे धन्यवाद.
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575.

1 comment:

  1. खूपच सुंदर पद्धतीने वर्णन केलेले आहे आपण

    ReplyDelete