Tuesday, January 12, 2021

मराठवाड्यातील उपेक्षीत प्राचीन मंदिरे



दै. लोकमत 10 जानेवारी 2021 (वर्धापन दिन पुरवणी)

मराठवाड्यातील पर्यटनाचा शिल्पांचा प्राचीन वारश्याचा विषय समोर आला की अजिंठा वेरूळ बिबी का मकबरा इथपर्यंत  विचार होतो आणि विषय संपून जातो. धार्मिक पर्यटनाच्या नावाखाली घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही नावं उच्चारली की मुद्दा संपून जातो. या शिवाय मराठवाड्यात चालूक्यांच्या यादवांच्या काळातील अप्रतिम अशी मंदिरे आहेत, त्यावरील शिल्पाविष्कार चकित करणारा आहे हे लक्षातच घेतले जात नाही.

पर्यटन, अभ्यास, स्थानिक सहलींसाठी स्थळे असा विचार केल्यास मराठवाड्यातील काही प्राचीन मंदिरांचा विचार अग्रक्रमाने झाला पाहिजे. (या ठिकाणी विषयाच्या जागेच्या मर्यादेमुळे केवळ मंदिरांचा विचार केला आहे. लेण्या, किल्ले, दर्गे, कबरी, मकबरे यांचा समावेश यात विस्तारभयास्तव नाही. हे विषय स्वतंत्रपणे मांडल्या गेले पाहिजेत.)

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील अंभई वडगांव, रहिमाबाद व पिशोर  (सर्वांचा ता.सिल्लोड) येथील मंदिरे प्राचीन आहेत. तिन्ही ठिकाणी स्थानिक लोकांनी मंदिराचा जिर्णाद्धार केला आहे. शिवुर बंगला (ता. वैजापूर) येथे रावणेश्वराचे मंदिर आहे.  परिसराचा विकासही केला आहे. पण याची माहिती बाहेरच्या पर्यटकांना अभ्यासकांना होत नाही. औरंगाबाद शहरात सातारा परिसरांत खंडोबा मंदिर आहे. पण त्याची ख्याती धार्मिक स्थळ इतकीच आहे. मराठेशाहीतील वास्तुशिल्पाचा हा एक उत्तम नमुना आहेे हे लक्षातच घेतले जात नाही. वेरूळला घृष्णेश्वर मंदिराच्या अगदी जवळ मुख्य रस्त्याला लागूनच अहिल्याबाईंनी बांधलेली अप्रतिम अशी बारव आहे. या बारवेत 8 छोटी मंदिरं आहेत. या ठिकाणी पर्यटक भेट देत नाहीत.

पैठणला सातवाहन कालीन स्तंभ हे तर महाराष्ट्राच्या इतिहासातील एक मानाचे पान आहे. त्या परिसरांचा विकास पुरातत्त्व खात्याकडून करण्यात आला आहे. पण तिथपर्यंत पर्यटक पोचत नाहीत.

औरंगाबाद जिल्ह्यातील या मंदिरांसोबतच पैठणच्या गोदावरी काठचे घाट मोठे सुंदर आहे. या घाटांवर विविध उत्सव प्रसंगी दिव्यांची आरास करून पर्यटकांना इथे आकर्षित करून घेता येवू शकते.

जालना : भोकरदन तालुक्यातील अन्वा येथील महादेव मंदिर 12 व्या शतकातील अतिशय उत्कृष्ठ असा स्थापत्य अविष्कार आहे. या मंदिरावरील विष्णुच्या शक्तिरूपातील मुर्ती भारतभरच्या अभ्यासकांचे आकर्षण ठरलेल्या आहेत. अतिशय भव्य आणि उंच पीठावर हे मंदिर स्थापित आहे. पुरातत्त्व खात्याने मंदिराचा जिर्णाद्धार चांगल्या पद्धतीने केला आहे. पण तिथपर्यंत जाताना कुठलाही माहिती फलक उभारलेला नाही. मंदिराच्या भोवताली बकाल वस्ती आहे. ग्रामस्वच्छता अभियानात या परिसराची स्वच्छता का झाली नाही हे कळत नाही.

अंबड तालुक्यात जामखेड येथील खडकेश्वर मंदिर हे अतिशय एक महत्त्वाचे प्राचीन मंदिर. गावकर्‍यांनी चांगल्या पद्धतीने याचा जिर्णाद्धार केला आहे. अंबड शहरातील मत्सोदरी मंदिर सर्वपरिचित आहे. पण याच शहरांत अहिल्याबाईंच्या काळातील सुंदर पुष्करणी बारव आहे. त्यात एक शिवमंदिरही आहे. या परिसराचा नगर पालिकेच्या वतीने विकासही करण्यात आला आहे. पण तिथपर्यंत पोचणारा रस्ता, बाहेरच्या परिसरांतील आक्रमणे, नाला यांनी हे ठिकाण दूर्लक्षित राहिले आहे. अंबड शहरांतच खंडोबाचे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम आजही संपूर्ण शाबूत उत्तम अवस्थेत आहे.

अंबड तालुक्यातच चिंचखेड येथील खंडोबा मंदिरही प्राचीन काळातील आहे. या परिसराची स्वच्छता आणि डागडुजी गावकर्‍यांनी उत्तम केली आहे. मंठा तालुक्यात हेलस येथे प्राचीन मंदिर आहे.

बीड : शहरांतील कंकालेश्वर मंदिर सर्वपरिचित आहे. या मंदिराचा जिर्णोद्धार संस्थानने केला. पण मंदिराचा परिसर अतिशय बकाल आहे. ज्या कुंडात मंदिर आहे त्या जलाशयाच्या पाण्याच्या निचरा होण्याचे मार्ग बंद झाल्याने साठलेल्या पाण्याची दुर्गंधी येते. परिसराचे सुशोभन होण्याची नितांत गरज आहे. माजलगांव नजीक केसापुरी येथे केशवराज मंदिर आहे. आताचे जे मंदिर गावात आहे त्याचे बांधकाम दोनशे वर्षांपूर्वीचे आहे. पण मुळ मंदिर गावाबाहेर चार किमी अंतरावर भग्नावस्थेत आहे. त्याचा जिर्णाद्धार होण्याची गरज आहे. हा परिसर तळ्याकाठी असून जवळच मराठा कालखंडातील हनुमान मंदिर आहे. त्याला भव्य असा दगडी ओटा आहे.  

अंबाजोगाई परिसर तर असंख्य शिल्पे आणि प्राचीन मंदिर अवशेषांनी भरलेला आहे. बाराखंबी भागात उत्खननाने काम चालू आहे. ते अपूर्ण अवस्थेत पडून आहे. जवळच धर्मापुरी येथे केदारेश्वर मंदिर आहे. तेथे जिर्णाद्धाराचे काम पुरातत्त्व खात्याने पूर्णत्वास आणले आहे. याच गावात भुईकोट किल्ला आहे. मादळमोही गावात तर बारवेत आख्खे मंदिरच आहे. या परिसराचा विकास गावकर्‍यांनी आस्थेने केला आहे.

उस्मानाबाद : भूम तालुक्यातील प्राचीन माणकेश्वर मंदिर महाराष्ट्रातील मोजक्या अप्रतिम मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरांवरी शिल्पे अभ्यासकांना कायम आकर्षित करत आलेली आहेत. सात द्वारशाखा असलेले महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर. चालुक्यांच्या काळातील अतिशय उत्कृष्ठ अशा कोरीव कामांनी येथील स्तंभ सजलेले आहेत.
उमरगा येथील शिव मंदिर अतिशय चांगल्या स्वरूपात आहे. स्थानिकांची मंदिराचा जिर्णाद्धार केलेला असून परिसरही उत्कृष्ठ राखला आहे.

लातुर : निलंगा येथील शिवमंदिर आणि पानगांव येथील विठ्ठल मंदिर ही दोन मंदिरे लातुर जिल्ह्यातील प्राचीन मंदिरांपैकी सगळ्यात सुस्थितीत असलेली मंदिरे आहेत. निलंगा मंदिरातील हरगौरीचे शिल्प अप्रतिम आहे. मंदिरावरील भैरव शिल्पे किंवा केवल शिवाची शिल्पे विशेष आहेत.

पानगावच्या विठ्ठल मंदिराकडे खुपसे दुर्लक्ष पर्यटकांकडून झाले आहे. या मंदिर परिसराचा विकास, तिथपर्यंत पोचण्याचा रस्ता याचा विचार झाला पाहिजे. हे मराठवाड्यातील प्राचीन काळातील महत्त्वाचे मंदिर आहे.

नांदेड : होट्टल (जि. देगलुर) हे आख्खे गावच शिल्पांनी समृद्ध असे गांव आहे. मंदिरांचे गाव म्हणूनच या परिसराची ओळख आहे. दोन मंदिरांचा जिर्णाद्धार झालेला आहे. आता उर्वरीत मातीत गाडल्या गेलेल्या मंदिराचा जिर्णोद्धार होणे गरजेचे आहे. होट्टलच्या मंदिरावरील नृत्य गणेशाची मृर्ती आणि येथील सुरसुंदरींच्या मृर्ती विशेष आहेत.

राहेरचे नृसिंह मंदिर आणि मुखेडचे मंदिर ही मंदिरे प्राचीन आहेत. राहेर गोदावरी काठी असल्याने हा परिसर रम्य आहे. राहेरला गोदावरीचे नाभीस्थान आहे असा उल्लेख दासगणु महाराजांच्या काव्यात आहे.
नांदेड शहरातील गोदावरीवरील घाट पण पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय होवू शकतात. या परिसराचे सुशोभन झाले पाहिजे.

हिंगोली : औंढा नागनाथ मंदिर प्रसिद्ध आहे पण याच गावात अजून प्राचीन मंदिरे आहेत त्याची दखल फारशी घेतली जात नाही. जवळच राजापुर गावात सरस्वती, अर्धनारी नटेश्वर आणि योग नरसिंहाच्या अप्रतिम मुर्ती आहेत. येहेळेगांव तुकाराम या गावांत प्राचीन बारव आहे.

परभणी :  धारासुर (ता. गंगाखेड) येथील गुप्तेश्वर मंदिर महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांमध्ये त्याच्या शिखरासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिरावरील विष्णुच्या विविध मुर्ती अप्रतिम अशा आहेत. गोदावरीच्या काठावर हे मंदिर असल्याने सर्व परिसर धार्मिक आणि इतर पर्यटनासाठी अतिशय योग्य असा आहे. या मंदिराचा अर्धा भाग ढासळला असून जिर्णोद्धाराचा प्रस्ताव पुरातत्त्व विभागाकडे पडून आहे. त्यावर तात्काल कार्यवाही झाली पाहिजे.

चारठाणा (ता. जिंतूर) येथील विविध मंदिरे, नृसिंह तीर्थवरील नदीचा घाट, पुष्करणी बारव या सगळ्याचा विचार करून संस्कृती ग्राम म्हणून या परिसराचा विकास झाला पाहिजे. आजही या परिसरांत प्राचीन शिल्पे सापडतात. याच परिसरांत अजून उत्खनन होण्याची गरज आहे.

गंगाखेड हे नदीकाठी वसलेले प्राचीन गाव. संत जनाबाईंची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. या गावात नदीकाठी सुंदर असे घाट आहेत. या घाटांच सौंदर्य वाढवून परिसर विकसित केला गेला पाहिजे.  

पैठण, गंगाखेड, नांदेड येथील नदीकाठ हा एक स्वतंत्र विषय पर्यटनासाठी विचारात घेतल्या गेला पाहिजे.
लेखात अतिश त्रोटकपद्धतीने काही मोजक्या मंदिरांचा विचार केला आहे. गावोगावची प्राचीन मंदिरे, गावोगावच्या बारवा, मठ, समाधीस्थळे यांचा जिर्णोद्धार झाला पाहिजे. ही कामे तीन पातळीवर होवू शकतात.

1. पुरातत्त्व खात्यातर्फे  त्यांच्या अखत्यारीतील पुरातत्त्वीय स्थळांचा विकास केला जावू शकतो. त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे.
2. सामाजिक कृतज्ञता निधी (सी.एस.आर.) या माध्यमांतून काही निधी इतर स्थळांसाठी वापरला जावू शकतो. मराठवाड्यातील औद्योगीक क्षेत्रात काम करणार्‍या संघटना व्यक्ती आस्थापना यांनी यात लक्ष घालून आपल्या निधीतील काही रक्कम या कामासाठी वळवली पाहिजे.
3. स्थानिक पातळीवर निधी उपलब्ध करूनही काही कामं होवू शकतात. हतनुर (ता.सेलू जि. परभणी) येथील ग्रामस्थांनी आपल्या परिसरांतील शेतमालाच्या विक्रीतून 1 कोटी इतकी विक्रमी रक्कम पाच वर्षांत गोळा केली. गावातील प्राचीन शिव मंदिर आणि बारव यांची दुरूस्ती केली. जवळच मंगल कार्यालय उभारले. हा एक आदर्श या परिसरांतील लोकांनी उचलला पाहिजे.

या लेखात केवळ मंदिरांचा विचार केला आहे. पण किल्ले, दर्गे, मकबरे, कबरी यांचा विचार केल्यास किमान 50 स्थळे अतिशय उत्कृष्ठ पद्धतीने पर्यटकांसाठी म्हणून सहज विकसित करता येवू शकतात. त्यातून पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. याच परिसरांत प्राचीन वाडे आहेत. त्यांची डागडुजी करून पर्यटकांना राहण्याची पण वेगळी वैशिष्ट्यपूर्ण अशी व्यवस्था करता येवू शकते. उंडणगांव (ता.सिल्लोड जि. औरंगाबाद) अशी चाचपणी आम्ही केली आहे. परदेशी पर्यटक येथे राहून गेले आहेत. शाश्‍वत पर्यटनाचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे.  
मराठवाड्यात प्राचीन वारसा जतन व संवर्धनाची चळवळ आता सुरू झाली आहे. त्याला सगळ्यांनी मिळून गती देण्याची गरज आहे.
 
       श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

No comments:

Post a Comment