बाल विद्या मंदिर, परभणी या शाळेत 1978 पासून ते 1986 पर्यंत मी शिकलो. आज लक्षात येते आहे की ज्ञानासोबतच अतिशय वेगळा आणि अतिशय सखोल असा कलात्मक संस्कार या शाळेनं माझ्यावर केला. एका दोघा शिक्षकांनी नाही तर आख्खी शाळाच हा संस्कार आपल्या मुलांवर अशा पद्धतीनं करते आहे हे फार दुर्मिळ उदाहरण त्या काळातलं असावं. आज शिक्षक दिनाच्या दिवशी इतर शिक्षकांसोबत ह्या कला जाणीवा रुजविणाऱ्या विशेष शिक्षकांची आठवण येते.
लेखाच्या शिर्षकात ‘आमची शाळा’ हे शब्द वापरले आहेत ते केवळ स्वत:ची शाळा सुचविण्यासाठी नाहीत. ‘आमची शाळा’ नावाचे एक मासिक वार्तापत्र माझ्या शाळेत निघायचे. (त्याच्या अंकाचेच छायाचित्र लेखात वापरले आहे) प्रसिद्ध लेखक कथाकार गणेश घांडगे त्याचे सर्वेसर्वा होते. ज्या काळात दै. मराठवाडा खेरीज दुसरे वर्तमानपत्र परभणी गावात यायचे नाही. त्या काळात एक शाळा आपल्या मुलांसाठी चार पानांचे एक मासिक वार्तापत्र चालवते ही एक फार मोठी सांस्कृतिक घटना होय. याचा एक फार सुंदर असा संस्कार आमच्यावर झाला.
वर्तमानपत्रांत सांस्कृतिक घडामोडींचे वार्तांकन आजकाल सर्रास वाचायला मिळते. पण 1983 ला हा प्रकार अतिशय कमी होता. मला चांगले आठवते बाल विद्यामंदिर मध्ये पलूस्कर भातखंडे पुण्यतिथीला गुणी विद्यार्थी, आमचे आवडते संगीत शिक्षक अरूण नेरलकर यांच्या गाण्यासोबतच औरंगाबादहून सतारवादक वैशाली बामणोदकर यांना आमंत्रित केले होते (इ.स. 1983 ऑगस्ट). त्यांचे अतिशय सुंदर सतारवादन त्या दिवशी झाले. मी तेंव्हा 8 वीत शिकत होतो. तानसेन नसलो तरी आम्ही कानसेन मात्र होतो. मला वाटले या कार्यक्रमाचे आपण शब्दांकन करावे. घांडगे सरांच्या कानावर घातल्यावर त्यांनी प्रोत्साहन देवून माझ्याकडून त्या कार्यक्रमावर आधारीत ‘रात्र ती स्वरात भिजलेली’ असे एक छोटे फिचर लिहून घेतले. अगदी आजही शाळांमधून असं काही कुणी शिक्षक करत नाही. नकळतपणे संगीत आणि त्याचा आस्वाद घेण्याचा एक संस्कार बाल विद्या मंदिरने आमच्यावर केला.
‘गीतमंच’ मध्ये सहभाग असायचा त्यांना संगीत शिकवले जायचे ते स्वाभाविक होते. पण पाचवी ते सातवी असे सगळे विद्यार्थी मैदानात गोळा करून त्यांना ‘समुह गीत’ शिकवले जायचे तो अनुभव विलक्षण असायचा. आम्हाला पाचवी ते सातवी या काळात शिकवलेले ‘वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्’ हे गदिमांचे गीत चांगलेच आठवते. एखादी ढगाळलेली दुपार असायची. मैदानात गाणं म्हणायचं म्हणून उत्साहात मुलं मुली रांगेत येवून बसलेली असायची. कुठलेही निमित्त शोधून पळून जाणारी मुलंही हमखास थांबायची. तीन चारशे मुलांचे कोवळे आवाज एका सुरात उमटायचे आणि अंगावर काटा उमटायचा. प्रकाश नारायण संत यांनी आपल्या कथेत सगळ्या सुरांचा मिळून कसा रेशमी दोर वळला जायचा असं एक सुरेख वर्णन केलं आहे. तसा अनुभव आम्हाला शाळेत समुहगीताच्या वेळी यायचा. हा फार वेगळा सांगितिक संस्कार शाळेनं आमच्यावर केला.
अरूण नेरलकर आमच्या या गीताचा सराव घ्यायचे. सातवीच्या वर्गाजवळ असलेल्या सैतुकाच्या झाडाखाली टेबलावर पेटी ठेवून ती वाजवत ते शिकवायचे. आणि त्यांच्या पाठोपाठ मुलं म्हणायची. कडवे संपवून धृवपदावर येताना मातरम् शब्द उच्चारताना एक मिंड घेतली जायची. ही अवघड मिंडही मुलं सरावाने अतिशय छान घ्यायचे. आठवी ते दहावी ला समुह गीत माधव वसेकर सर शिकवायचे. ते पुढे माझे वर्गशिक्षकही होते पण तेंव्हा विषय संगीत नव्हता.
जंगली बाई आम्हाला चित्रकला शिकवायच्या. एलिमेंटरी, इंटरमिडिऐट किंवा आनंद-आरंभ-बोध अशा चित्रकलेच्या परिक्षांसाठी जी मुलं बसलेली असायची त्यांना त्या शिकवायच्या. तो त्यांचा विषयच असल्याने त्यात वेगळेपण काही नव्हते. पण जन्माष्टमीला दहीहंडी च्या कार्यक्रमासाठी मडकी रंगवल्या जायची. हे काम आम्ही काही हौशी मुलं स्वेच्छेने करायचो. यासाठी जंगली बाईंचा उत्साह विलक्षण असायचा. त्यात केवळ परिक्षेसाठी हे नसून एक रंगांचा संस्कार मुलांवर व्हावा असा त्यांचा दृष्टीकोन असायचा. आज असे किती शिक्षक आहेत की जे आपल्या विद्यार्थ्यांवर रंगांचा संस्कार व्हावा म्हणून जीव टाकत असतील?
‘विठ्ठल तो आला आला’ ही पुलं देशपांडे यांची एकांकिका शाळेने बसवली होती. त्यासाठी विठ्ठल मंदिर आणि त्याचा गाभारा तयार करायचा होता. तो सेट बाईंनी ज्या पद्धतीनं रंगवून दिला तो मला आजही डोळ्यासमोर दिसतो. अनील गंडी हा माझ्या मोठ्या भावाचा मित्र विठ्ठलाचे काम करायचा. त्याचा मेकअपही बाईंनी आणि ह.प. पाटील सरांनी फार मेहनतीनं करून दिला होता.
अशात मी लिहीलेल्या एका कवितेत ‘पोपट रंगी मखमालीचा । हिरवा हिरवा दाटे पुर’ अशी ओळ आलेली आहे. माझ्या नंतर वाचताना लक्षात आलं हिरव्या रंगांच्या विविध छटांबाबत आपण हे लिहू शकलो कारण जंगली बाईंनी तेंव्हा केलेला तो रंगांचा संस्कार. विविध रंगांच्या छटा आणि त्यांचे वैशिष्ट्ये त्यांनी फार सुरेख समजावून सांगितली होती. नुसतं सांगणं नाही तर किमान फटकार्यांतून त्याचे जिवंत प्रात्यक्षिक त्या करून दाखवायच्या.
चित्रकला परिक्षेचा सराव म्हणून जास्तीच्या तासिका घेतल्या जायच्या त्यासाठी परभणीला वसमत रोडला विद्यापीठ कमानीपाशी असलेल्या ‘विष्णु जिनींग’ परिसरांतील त्यांच्या घरी जावे लागायचे. तिथे मोकळ्या मैदानात भरपूर झाडी आणि हिरवळ असायची. आम्ही कागदावर जे काढायचो ते हिरवे पोपटी निळे ढगांचे पांढरे लालसर पिवळे रंग आमच्या आजूबाजूला झाडं माती आभाळ यातून जिवंतपणे प्रकट होवून भोवती फेर धरायचे. तिथल्या वडाच्या झाडाच्या कलात्मक पारंब्या आपसुकच मग चित्रांत उमटायच्या.
केशव दुलाजी अडणे उर्फ के.डी. अडणे सर हा माणुस आमच्यासाठी साक्षात ‘नटसम्राट’ होता. खणखणीत विलक्षण प्रभावी आवाजाचा धनी असलेल्या या शिक्षकाने आमच्या रक्तात नाटक रूजवले. सरांचे व्यक्तीमत्व लौकिक अर्थाने प्रभावी कधी जाणवले नाही. पण एकांकिका त्यांनी बसवायला घेतली की त्यांच्या सुंदर संवादफेकीत आम्ही कधी ओढले जायचो ते कळायचं नाही. नाटक बसवतानाच्या काळात त्यांच्या अंगात खरोखरीच नटराज संचारायचा. ते मोठ्या गटाचे नाटक बसवायचे. छोट्या म्हणजे पाचवी ते सातवी गटाचे नाटक बसवायची जबाबदारी मंगला कुरूंदकर बाईंची असायची. बाईंची उंची कमी देहयष्टी किरकोळ. तेंव्हा जवळपास सर्वच मुलंमुली त्यांच्या इतकी किंवा त्यांच्याहीपेक्षा उंच होती. त्यामुळे त्यांना नावच ‘मी उंच बाई’ असं ठेवलं होतं. बाई विलक्षण मिश्कील. आवाजाला धार, डोळ्यांच्या किमान हालचालींतून भाव व्यक्त करण्याचे एक कसब त्यांचे अंगी होतं. अगदी हसत खेळत त्या नाटक बसवायच्या. सहजपणे अभिनय शिकवायच्या. त्यांची साडी नेसायची पद्धत, विशेषत: पदर घेण्याची पद्धत मला अजून आठवते. हा सगळा परफॉर्मिंगचाच एक भाग असायचा. कुठेही आक्रस्ताळेपणा न करता शब्दफेक करून प्रभाव कसा पाडावा हे त्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळाले. वर्गात शिकवत असताना एक लय त्यांच्या बोलण्याला असायची. बाकांच्या रांगांमधून फिरताना त्यांच्या चालण्यातला डौल जाणवायचा.
अडणे सर आणि कुरूंदकर बाईंनी आम्हा नाटकात सहभागी असणार्या मुलांना नाटक शिकवले असं कुणाला वाटू शकेल. ते वर वर पाहता खरेही आहे. पण यांच्या वागण्याबोलण्यांतून उच्चारांतून संवादफेकीतून नाटकाचा एक संस्कार आमच्यावरच नाही तर आख्ख्या शाळेवरच होत होता हे आज जाणवत आहे.
अडणे सर माझ्या वडिलांकडे काही तरी कामासाठी एकदा आले होते. तेंव्हाचे त्यांचे बोलणे ऐकून मला लक्षात आले की या माणसांत एक विलक्षण अशी अभिनयाची समज आहे. कुरूंदकर बाईंच्या बाबतीतला एक अनुभव अतिशय हृद्य असा आहे. शाळेत मराठी शिकवणार्या हंसा कुरूंदकर बाई होत्या. त्यांच्या नावाशी मंगला कुरूंदकर बाईंचे साम्य असल्याने बर्याचदा घोटाळे व्हायचे. त्यावर बाई मस्त फिरकी घ्यायच्या. मी त्यांना शिक्षण संपल्यावर एकदा सहजच भेटायला गेलो होतो. त्यांची मुलं आमच्या बरोबरचीच. त्यांचे घर माझ्या आजीच्या घरा जवळच म्युनिपल कॉलनीत दर्गा रोड परभणी येथे होते. मी सहजच त्यांना बोलता बोलता ‘बाई तब्येत कशी आहे?’ असं विचारलं. त्यावर खळाळून हसत त्या म्हणाल्या, ‘मला काय धाड भरली. हंसा गेली तेंव्हा सगळ्यांना वाटले मीच गेले की काय. आमचे गावाकडचे गडी तर घरी येवून मोठ्यानं रडू लागले. मी बाहेर आल्यावर ‘तूम्ही तर जित्त्या हायती की’ म्हणायला लागले.’ बाई बोलताना त्यांच्या हसण्यातून हंसाबाईंचे दु:ख त्या लपवत होत्या हे मला स्पष्ट जाणवलं. मला त्यांच्या अभिनयाची ताकद कळाली.
ह.प.पाटील हा एक विलक्षण असा शिक्षक आमच्या आयुष्यात आला. आज कुणाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही पण या सरांनी आख्ख्या शाळेला एकादशीच्या दिंडीत पावली खेळायला, अभंग गायला, टाळ मृदंग वाजवायला रिंगण घालायला शिकवलं. आता हा काही शाळेच्या अभ्यासक्रमातला विषय नाही. ह.प. पाटील सर निष्ठावंत वारकरी. टाकळी येथील (ता. पूर्णा जि. परभणी) दाजी महाराजांच्या संस्थानचे अनुग्रहीत कपाळाला. गंध बुक्का लावणारे. आषाढी एकादशीला परभणीच्या गांधी पार्कातील विठ्ठल मंदिरापासून दिंडी निघायची. ती नांदखेडा रस्त्यावरील रंगनाथ महाराजांच्या समाधीपर्यंत जायची. या दिंडीत भजनी मंडळांचा मोठा सहभाग असायचा. आमचे मुख्याध्यापक मा.रा. पोटेकर सरांसमोर ह.प. पाटील सरांनी एक प्रस्ताव ठेवला. दरवर्षी या दिंडीत शाळेचा संच सहभागी करू या. धोतर टोपी कपाळी गंध बुक्का गळ्यात तुळशी माळा अशा वेशात विद्यार्थी तयार केले जायचे. नाऊवार नेसून गळ्यात माळ घालून डोक्यावर तुळस अश्या मुली सजायच्या. हातात टाळ, एखादा तालात पक्का असलेला मुलगा मृदंग वाजविण्यासाठी पक्का असायचा. या दिंडीमधील अभंगांचा पाउलीचा सराव नियमितपणे आठ पंधरा दिवस आधीपासून कसून केल्या जायचा.
पाटील सरांचे घर माझ्या घराच्या अगदी मागेच होते. दर गुरूवारी त्यांच्या घरी भजन असायचे. दोन दोन खोल्यांची पाच घरे या बाजूला आणि पाच घरे समोरच्या बाजूला असा तो गजबजलेला डांगेचा वाडा होता. घरांच्या ओळींमधली मोकळी जागा म्हणजे भले मोठे अंगण. गुरूवारी रात्री हे अंगण म्हणजे पंढरीचे चंद्रभागे काठचे वाळवंट बनून जायचे. ज्यांना गळे नाहीत ते आमच्यासारखे कानसेनही गुरूवारी गाण्याच्या ओढीने तिथे तासंतास अभंग गवळणी ऐकत भारवल्या सारखे बसून रहायचे. आजही आषाढीच्या दिवशी माझ्या कानात त्या अभंगाचा नाद घुमत असतो. डोळ्यासमोर ती दिंडी येत राहते.
नाटक चित्रकला संगीत भक्तीसंगीत असा विलक्षण संस्कार माझ्या शाळेनं आणि या शिक्षकांनी आमच्यावर केला.
कुणी आपल्या शाळेची आठवण सांगताना शिक्षकांच्या ज्ञानाचा आवर्जून उल्लेख करतात. ते तसे आमच्या शाळेत होतेही. (त्यावर परत कधी सविस्तर लिहीन. साहित्यिक संस्कार करणार्या हंसा कुरूंदकर बाई, घांडगे सर, सेलमोकर बाई, जपे बाई, नजमा रंगरेज बाई, ग्रंथालयाचे लोनसने सर यांच्यावर स्वतंत्र लिहायला पाहिजे). उज्ज्वल निकालाची मोठी परंपरा आमच्या शाळेची राहिली आहे. पण हा परिक्षेसाठी नसलेला कलेचा संस्कार कुणाच्या भाग्यात असतो? तो आमच्या भाग्यात होता. आज समाजात वावरताना सहजपणे सांस्कृतिक क्षेत्रात मी काम करतो तेंव्हा संपन्न सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेलं घर आई वडिल भाउ यांच्या सोबत शाळेत हा संस्कार गडद करणारे शिक्षक आणि त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहणारे आमचे मुख्याध्यापक मा.रा. पोटेकर आणि उपमुख्याध्यापक वि.म. औंढेकर मला अतिशय महत्त्वाचे वाटतात. शिक्षक दिनाला यांना प्रणाम.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
अप्रतिम साक्षात शाळेचे ते दिवस डोळ्या समोर उभे राहिले तेव्हाचे सगळे गुरुजी हो ते सर नव्हते गुरुजी होते छडी मारणारे म श शिवणकर सगळे सगळे पुन्हा तरळले.....
ReplyDeleteवाचून खूप छान वाटल.शाळेतील आठवणी पुन्हा डाेळयापुढे उभ्या राहिल्या.
ReplyDeleteश्रीकांत खूपच छान लिहले आहेस, प्रत्येक सर अाणी मॅडम चा चेहरा नजरे समोर आला.. जुन्या आठवणी ताज्या झाल्या, शाळेत उपस्थित असल्याचा भास होत आहे.
ReplyDeleteअप्रतिम आणि ओघवत्या शैलीत प्रत्येक गुरूजनाचे वर्णन वाचून तो काळ डोळ्यासमोर उभा राहिला क्षणभर ! धन्यवाद श्रीकांत !
ReplyDeleteखुपच छान अप्रतिम ती शाळा...ते जीवन..ते गुरुजनाचे वर्णन.. मी गीता पातुरकर 1972 ते 83 साला पर्यंत 10 वी पास होवुन बाहेर पडले...पण हि शाळा .विसरले .नाही..
Deleteश्रीकांत उमरीकर आपण आज शिक्षकदिनी फारच जुन्या
ReplyDeleteसंस्कारमय आठवणींना उजाळा दिला.
माझ्या डोळ्यासमोर खरोखरच तो शालेय जीवनातील 1983 ते 1986 चा काळ रिवाईंड फास्ट प्ले सारखा डोळ्यासमोर उभा राहीला.
त्याबदद्ल आपले धन्यवाद !
(मित्राचे धन्यवाद मानायचे नसतात त्या परंपरेला फाटा देऊन )
आपलाच शालेय मित्र
पंढरीनाथ शहाणे
माझ्या देखील मनात अशाच भावना आहेत.
ReplyDeleteखुपच छान.
श्रीकांतसर तुम्ही लिहीत असलेला आठवणी खरंच भूतकाळातील शालेय जीवनात घेऊन गेल्या, खुप छान, असेच लिखाण...आठवणी बाकीच्या सरांच्या विषयी लिहावे अश..मित्र म्हणून..हाक्क.....आपला मित्र..विजय कोतवाल.
ReplyDeleteवाह श्रीकांत संपूर्ण शालेय जीवनपट उलगडला. अप्रतिम...खूप छान...
ReplyDelete👌👌👌
अप्रतिम श्री पुढे बोलण्यासाठी तू जागाच ठेवली नाहीस तरीदेखील खुप खुप धन्यवाद
ReplyDeleteव्वा... मी पण १९७८ पर्यंत शाळेत होतो. अडणे सर, कुरुंदकर बाई, ह प पाटील सर या सर्वांबद्दल वाचून खूप छान वाटले...❤️❤️❤️
ReplyDeleteश्रीकांत,
ReplyDeleteअतिशय समर्पक शब्दांमध्ये अतिशय सुंदर असे शब्दांकन झाले आहे. नेरळकर सर जंगली बाई डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.
खूप छान लिखाण, डोळ्यासमोरून चित्रपट गेल्याचा भास झाला.खूपच समर्पक लिखाण ,प्रत्येक शिक्षकांचे कौशल्य वर्णन अप्रतिम,खऱ्या अर्थाने शिक्षकदिन साजरा🙏🙏🙏
ReplyDeleteमाधुरी जयपुरकर न्यायधीश.