Saturday, September 19, 2020

अन्वा महादेव मंदिर : देखणा शिल्पाविष्कार!

 

उरूस, 19 सप्टेंबर 2020 

अजिंठा डोंगररांगा आणि परिसरांत अतिशय अप्रतिम असे निसर्गसौंदर्य आहे, कातळात कोरलेल्या लेण्या आहेत. या शिवाय दोन अतिशय प्राचीन अशी मंदिरे आहेत. ही मंदिरे महाराष्ट्राच्या एकुणच मंदिर स्थापत्य शैलीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची मानली जातात. यातील जंजाळा किल्ल्या जवळचे अंभईचे वडेश्वर मंदिर हे त्रिदल पद्धतीचे पण त्याची बरीच पडझड झालेली आहे. नविन बांधकाम करताना जून्या बर्‍याच गोष्टी नाहिशा झाल्या. 

पण दूसरे जे मंदिर वडेश्वरापेक्षा प्राचीन आणि अतिशय महत्त्वाचे आहे ते म्हणजे अन्वा येथील शिव मंदिर. हे मंदिर अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. इ.स. 1000 ते 1100 या काळातील आठ महत्त्वाची मंदिरे मराठवाड्यात आहेत.    त्यापैकी हे एक अतिशय सुंदर सुबक असा शिल्पाविष्कार असलेले मंदिर.

औरंगाबाद अजिंठा मार्गावर अजिंठ्याच्या अलीकडे गोळेगांव वरून डाव्या बाजूला जो रस्ता आत जातो त्याच रस्त्यावर 8 कि.मी. अंतरावरील अन्वा गावात हे मंदिर आहे. मंदिराच्या परिसरांची अतिशच चांगली बांधबंदिस्ती दुरूस्ती पुरातत्व खात्याने केली आहे. मंदिराची संरक्षक भिंत उभारल्या गेली आहे. संपूर्ण परिसरांत दगडी फरशी बसवली आहे. मंदिराचीही डागडुजी करण्यात आली आहे. मंदिराला लोखंडी खांबांचा आधार देवून पुढील पडझड होण्यापासून वाचवले आहे. 


हे मंदिर उत्तर चालूक्यांच्या काळातील आहे. याला लागूनच भोकरदन ही एकेकाळची राष्ट्रकुटाची राजधानी असलेले गाव आहे. राष्ट्रकुटांची सत्ता लयाला गेल्यावर या परिसरावर उत्तर चालुक्यांची सत्ता होती. त्या काळातील हे मंदिर आहे.

अन्व्याच्या तूल्यबळ त्याकाळातील फारच थोडी मंदिरे महाराष्ट्रात आहेत. बदलापुर अंबरनाथचे शिवमंदिर, कोल्हापूरजवळील खिद्रापूरचे कोपेश्वर शिवमंदिर शिवाय विदर्भातील काही मंदिरे या काळातील आहेत.

अतिशय देखणे असे कोरीव स्तंभ हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. पाच सहा फुटी उंच पीठावर हे मंदिर विराजमान आहे. मंदिर पूर्वाभिमुखी असून त्याला दक्षिण आणि उत्तर दिशेनेही पायर्‍या आहेत. तिन्ही बाजूच्या पायर्‍यांवरून आपण प्रदक्षिणापथावर येतो. पण मंदिरात प्रवेश मात्र फक्त पूर्व दिशेनेच ठेवलेला आहे. 

एक दोन नाही तर तब्बल 50 कोरीव देखण्या स्तंभावर हे मंदिर तोलल्या गेलेले आहे. मंदिराच्या बाह्यभागावर अतिशय सुंदर नाजूक असे मुर्तीकाम केलेले आहेत. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे विष्णूच्या शक्ती रूपातील म्हणजेच स्त्रीरूपातील मुर्ती. अशा मुर्ती फारशा कुठे आढळून आल्याची नोंद नाही. विष्णूची शंख, चक्र, गदा व पद्म ही चारही चिन्हे या मुर्तींच्या चार हातात आहेत. त्या स्त्रीरूपात दाखविल्या म्हणजे त्या मूर्ती लक्ष्मीच्या नाहीत. यांना विष्णूची शक्ती असे संबोधले गेलीे आहे. 


गर्भगृहाचे द्वार अतिशय कोरीव कामगिरीने नटलेले आहे. एकानंतर एक अशा चार द्वारशाखा या ठिकाणी आढळून येतात. गर्भगृहात मध्यावर महादेवाची पिंड आहे. 

मंदिराच्या मंडप छताला मध्यभागी अर्धवट उमलते खाली लोबलेले फुल कोरलेले आहे. त्याच्या भोवती आठ दिशांना म्हणून आठ फुले कोरलेली आहेत. ही सर्व रचना एक चौरस दगडी चौकटीत  बसवलेली आहे. मंडपाच्या जमिनीवर वर्तूळाकार असे उंचावलेले पीठ आहे. त्यावर नंदी बसवलेला आहे. तिन्ही बाजूला बसण्यासाठी ओटे आहेत. खांबांची रचना अशी आहे की कुठेही बसले तरी सभामंडपाच्या मध्यभागी आपण पाहू शकतो. एकही खांब मध्ये येत नाही. यावर हा अंदाज लावता येतो की या ठिकाणी नृत्य, संगीत सेवा अर्पण केली जात असावी. आणि त्यासाठी गर्भगृहाची दिशा सोडून इतर तिनही ठिकाणी लोक बसून त्याचा आनंद घेत असावेत.


भारतीय परंपरेत पुजेचे दोन प्रकार सांगितले आहेत. एक म्हणजे रंगभोग आणि दुसरा अंगभोग. धुप दिप वस्त्र फुले गंध अक्षता या सगळ्याला अंगभोग म्हणतात. तर रंगभोग म्हणजे गायन वादन नृत्य. मंडपाच्या रचनेवरून येथे रंगभोग पद्धतीने पुजा होत असावी. याला पुरावा म्हणजे गायन वादन करणारे भक्त या मंदिरावर कोरलेल्या शिल्पांमधून दिसून येतात. अशीच शिल्पे होट्टल आणि धर्मापुरी येथेही आढळून आलेले आहेत.  

मंदिराच्या बाह्यभागात गजलक्ष्मी आणि नृसिंह शिल्पे देवकोष्टकांत बसवलेली आहे. ती खुप देखणी आहेत. मंदिराच्या  बाह्य भागात हंसपट्टीका, सिंहपट्टीका आढळून येतात. 

अन्व्याच्या मंदिराचा परिसर आता स्वच्छ करण्यात आला आहे. पण मंदिर संरक्षक भिंतीच्या बाहेरील परिसरांत मात्र घाण बकालीचा अनुभव येतो. ग्रामपंचायतीने याची जबाबदारी घेवून मंदिरालगतचा भाग स्वच्छ चांगला केला तर मंदिराचे सौंदर्य वाढेल. पर्यटकांना इथपर्यंत आणता येईल पण परिसराची बकाली पाहून तो परत येण्याची शक्यता नाही.

हे मंदिर पूर्वी विष्णुचे अथवा लक्ष्मीचे असावे असा अंदाज बाहेरील शिल्पांवरून वर्तवल्या जातो. पण अर्थात हा अभ्यासकांचा विषय आहे. सामान्य दर्शकाला शिल्पांचे सौंदर्य न्याहाळायचे असते. हे शिल्पसौंदर्य पाहून तो विस्मयचकित होतो. एक हजार वर्षांपूर्वी हा प्रदेश कलात्मकदृष्ट्या किती संपन्न होता याचा पुरावाच या मंदिरावरील अप्रतिम कोरीवकामातून मिळतो.

हा प्राचीन वारसा फार महत्त्वाचा आहे. आपल्या अगदी जवळच हे ठिकाण आहे. किमान एकदा तरी हे मंदिर नजरेखालून घातले पाहिजे.   

(अन्व्या शिवायची इ.स. 1000 ते इ.स. 1100 काळातील मराठवाड्यातील महत्वाची सुंदस मंदिरे - 1. खडकेश्वर मंदिर जामखेड, ता. अंबड जि. जालना, 2. केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी, ता, अंबाजोगाई जि. बीड, 3. सिद्धेश्वर मंदिर होट्टल, ता. देगलूर जि. नांदेड, 4. सोमेश्वर मंदिर, होट्टल 5. विठ्ठल मंदिर पानगांव, ता. परळी, जि. बीड 6. नागनाथ मंदिर, औंढा, जि. हिंगोली 7. गुप्तेश्वर मंदिर, धारासूर ता. गंगाखेड, जि. परभणी.)

(इ.स. 1100 ते 1200 या काळातील त्रिदल पद्धतीची मंदिर शैली विकसित झाली. अशी सहा मंदिरे मरावाड्यात आहेत. 1. निळकंठेश्वर मंदिर निलंगा, जि. लातूर, 2. कंकाळेश्वर मंदिर बीड, 3. शिवमंदिर उमरगा, जि. उस्मानाबाद 4. महादेव मंदिर माणकेश्वर, ता. परंडा, जि. उस्मानाबाद 5. वडेश्वर मंदिर, अंभई, ता.सिल्लोड, जि. औरंगाबाद 6. केशव मंदिर, केसापुरी ता. माजलगांव जि. बीड) 

(या लेखासाठी डॉ. प्रभाकर देव यांच्या ‘मराठवाड्यातील प्राचीन मंदिर स्थापत्य शिल्पाविष्कार’- अनुवाद सौ. कल्पना रायरीकर यांच्या पुस्तकाचा आधार घेतला आहे).  

(फोटो सौजन्य AKVIN tourism)  

  

      श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

4 comments:

  1. खुप सुंदर माहिती
    वैभवशाली परंपरा 🌹💐❤️

    ReplyDelete
  2. मंदिर शिल्पाची उत्तम माहिती सर...

    ReplyDelete
  3. खूप छान माहिती! मराठवाड्यातील प्राचीन मंदिरांच्या शैलीवर अजून संशोधन व्हायला हवे ! या मंदिरांना संरक्षण मिळायला हवे !

    ReplyDelete
    Replies
    1. त्यासाठीच आम्ही प्रयत्न करतो आहोत. देवगिरी सांस्कृतिक प्रतिष्ठान नावाने एक चळवळ चालवली जाते आहे. प्राचीन वास्तुंचे रक्षण, त्यांचा जिर्णोद्धार, त्याबाबत जनजागृती आदी काम हाती घेतले आहे. आपणही सहकार्य करा

      Delete