Tuesday, September 15, 2020

वेताळवाडी : अजिंठा डोंगरातील एक दुर्लक्षीत किल्ला !



उरूस, 15 सप्टेंबर 2020 

 अजिंठा डोंगर रांगांतील रूद्रेश्वर लेणी, जंजाळा किल्ला व घटोत्कच लेणी यांवर मी याच सदरात लिहीले होते. त्याच मालिकेतील हा पुढचा लेख. संपूर्ण तटबंदी आणि दोन भव्य दरवाजे शाबूत असलेला अजिंठा डोंगर रांगेतील किल्ला म्हणजेच वेताळवाडीचा किल्ला. औरंगाबाद अजिंठा रस्त्यावर अजिंठ्याच्या अलीकडे गोळेगांवपासून डाव्या बाजूला एक  रस्ता फुटतो. हा रस्ता उंडणगाव मार्गे सोयगांवला जातो. याच रस्त्यावर हळदा घाटात तीन्ही दिशेने डोंगर रांगांनी वेढलेला असा हा वाडीचा किल्ला.  


किल्ल्याची संपूर्ण तटबंदी लांबूनच दिसते आणि त्याची भव्यता लक्षात येते. भोवताली डोंगर रांगा आणि मध्यभागी मोदक ठेवावा असा एक डोंगर. लांबट आकारात पसरलेला भव्य भक्कम बुरूज पहिल्यांदा आपले लक्ष वेधून घेतो. यादव राजा भिल्लम याच्या काळातील हा किल्ला असल्याचे तज्ज्ञ सांगतात. पण याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. किल्ल्यावर एक तोफ पण सापडलेली आहे. तिच्यावरची चिन्हे आणि दरवाज्यावरची चिन्हे यांवरून किल्ला यादव काळातील असल्याची पुष्टी मिळते. 

किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार तीन बुरूजांच्या त्रिकोणी रचनेतून तयार झालेले आहे. त्याची रचना इतकी अवघड आहे की शत्रूला सहजा सहजी मुख्यद्वार सापडू नये. हल्ला करण्यासाठी दरवाजा समोर जराही जागा मोकळी सोडलेली नाही. परिणामी या दरवाजासमोर शरण गेल्याशिवाय कुणाला त्यातून प्रवेशच मिळू शकत नाही. 


किल्ल्याचे प्रवेशद्वार, अगदी त्याला लागूनच असलेले द्वारपालाचे दालन, मुख्य बुरूजावर टेहेळणीसाठी बांधलेली झरोके झरोके असलेली माडी. या गॅलरीवजा सज्जाच्या कमानीतून समोरचे डोंगर आणि त्याच्या पायाशी असलेले तळे हे दृश्य मोठे कलात्मक दिसते.

किल्ल्याच्या प्रवेशद्वार आणि परिसराची डागडुजी पुरातत्त्व खात्याकडून चांगल्या प्रकारे करण्यात आलेली दिसून येते आहे. किल्ल्यावर सापडलेली एक मोठी लोखंडी तोफ लाकडी गाड्यावर बुरूजावर मांडून ठेवली आहे. किल्ल्यावर चढताना बालेकिल्ल्याची दुसरी तटबंदी लागते. ही संपूर्ण नसली तरी बर्‍याच जागी चांगल्या स्थितीत शाबूत आहे. बालेकिल्ल्याच्या एका महालाचा बुरूज पडक्या अवस्थेत आहे.


किल्ल्यावर धान्य साठवणुकीचे दोन भव्य दालनं चांगल्या अवस्थेतील आहेत. शिवाय एक अतिशय देखणे असे दगडी चिर्‍यांचे अष्टकोनी बांधीव तळे आहे. त्याच्या एका बाजूला पूर्वेला तोंड करून ‘जलमहाल’ आहे. याच्या तीन भिंती शिल्लक आहेत. दगडांवरील सुंदर कोरीव काम कोण्या एके काळी हा महाल अतिशय रसिकतेने उभारलेला असावा याची साक्ष देतात.

या किल्ल्यावरील सर्वात देखणी आणि सुंदर जागा म्हणजे उत्तर टोकावर असलेल्या हवामहलच्या शिल्लक चार कमानी. मराठवाडा आणि खान्देश यांना विभागणार्‍या डोंगरकड्यावरील टोकाचा बिंदू म्हणजे ही जागा. एकेकाळी सुंदर असा हवामहल या ठिकाणी होता. त्याची पडझड होवून महालाच्या चार कमानी आणि दोन भिंतीच आता शिल्लक आहेत. या कमानींमधून दूरवर पसरलेला खानदेशचा परिसर, सर्वत्र पसरेली शेते, जागजागी पाणी साठून तयार झालेली सुंदर तळी असे मोठे नयनरम्य दृश्य दिसून येते. याच किल्ल्याच्या डाव्या अंगाला सोयगाव धरणाचा पाणीसाठा डोळ्याचे पारणे फेडतो. किल्ल्याच्या उजव्या अंगाला प्रसिद्ध अशी रूद्रेश्वर लेणी आणि धबधबा आहे. 


अजिंठा डोंगराची नैसर्गिक अशी भव्य संरक्षक भिंत औरंगाबाद आणि जळगांवला विभागते. तेंव्हा या डोंगराच्या कड्यांवर चार किल्ले बांधल्या गेले आहेत. त्यांची रचना टेहेळणीचे संरक्षक किल्ले अशी असावी. हे चार किल्ले म्हणजे वाडिचा किल्ला, त्याच्या बाजूचा जंजाळ्याचा किल्ला, सुतोंड्याचा किल्ला आणि गवताळा अभयारण्या जवळचा अंतुरचा किल्ला. वाडीच्या किल्ल्यावरून जवळचा जंजाळा किल्ला आणि घटोत्कच लेणीचा डोंगर दिसतो.  

वाडीच्या किल्यावर हवामहलच्या बाजूने खाली उतरल्यास किल्ल्याचा उत्तरेकडचा म्हणजेच सोयगावच्या दिशेचा दरवाजा आढळतो.  दरवाजापासून आतपर्यंत डाव्या बाजूला ओवर्‍या ओवर्‍यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना दिसून येते. कदाचित हा भाग किल्ल्यावरील बाजारपेठेसारखा असावा. उत्तरेकडील दरवाजापासून डाव्या हाताने तटबंदीला लागून चालत गेले तर आपण परत दक्षिणेकडील मुख्य दरवाजापाशी येतो.

वाडिच्या किल्ल्याजवळ डोंगरात उजव्या बाजूच्या (पूर्वेकडील) डोंगरात काही रिकाम्या लेण्या आहेत. हा परिसर अजिंठा लेणीच्या कालखंडात लेणी कोरण्यासाठी तपासला गेला होता. दगडा हवा तसा सापडला नाही म्हणून ही लेणी सोडून दिलेली दिसते. हौशी पर्यटकांसाठी अशा झाडांत लपलेल्या लेण्यांचा शोध घेणे हे एक आव्हान असते. 

वाडिचा किल्ला जून ते डिसेंबर काळात एक चांगले पर्यटन स्थळ म्हणून विकसित होवू शकते. किल्ल्यावरील माजलेली झाडी, झुडपे काढणे, हवामहल ते उत्तर दरवाजापर्यंत जाणारी चांगली पायवाट तयार करणे, मुख्य तटबंदीला लागून पर्यटकांना फिरण्यासाठी उत्तम पायवाट तयार करणे आवश्यक आहे.

किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची जशी डागडुजी झाली आहे तशीच किल्ल्यावरील इतर भग्न अवशेषांची व्हायला हवी. 

जंजाळा किल्ला, घटोत्कच लेणी, वाडीचा किल्ला, रूद्रेश्वर लेणी, रूद्रेश्वर धबधबा, वडेश्वर महादेव मंदिर, मुर्डेश्वर देवस्थान असा हा अगदी एकमेकांच्या जवळ असलेला परिसर. औरंगाबादेहून पहाटे निघून जंगलात एक दिवसाचा मुक्काम (तशी चांगली सोय उंडणगावात व जवळच गणेशवाडीत उपलब्ध आहे) केल्यास दोन दिवसात सर्वच ठिकाणं पाहणं शक्य होते.

जळगांव कडून सोयगांव मार्गे आल्यास तर हा परिसर अजूनच जवळ आहे. अगदी अर्ध्याच अंतरावर आहे.

पर्यटनाचा एक वेगळा विचार पंतप्रधान मोदींनी मांडला आहे. प्रत्येक भारतीयाने वर्षातून किमान एकदा देशांतर्गत पर्यटनासाठी गेले पाहिजे. कोरोना काळात जास्त खर्चिक पर्यटन करण्यापेक्षा आपल्या जवळच्या अशा स्थळांना भेटी दिल्यास हा उद्देश सफल होईल.

या प्रदेशात हौशी पर्यटकांसोबतच अभ्यासक विद्यार्थी आल्यास त्यांच्याकडून इतिहासातील अजून काही लपलेल्या बाबींवर प्रकाश पडू शकतो.

(छायाचित्र सौजन्य -ऍक्वीन टूरिझम)  

 

     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

    

 

No comments:

Post a Comment