Monday, September 14, 2020

घटोत्कच लेणीचा सुंदर निसर्ग आणि आपली अनास्था !


उरूस, 14 सप्टेंबर 2020 

 अजिंठा डोंगराचा परिसर विलक्षण अशा निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. इथल्या दगडाचा दर्जा पारखून दोन हजार वर्षांपूर्वीपासून इथे लेणी कोरल्या गेली आहेत. अजिंठा लेणी सर्वपरिचित आहे पण याशिवाय त्याच काळातील किंवा त्यापूर्वीचीही काही लेणी या डोंगरात आहेत. पितळखोरा लेणी तर अजिंठ्याच्या आधीची आहे. 

सिल्लोड तालूक्यात हळदा घाटात वाडीचा किल्ला आणि रूद्रेश्वर लेणी आहे. याच किल्ल्याच्या बाजूला दुसर्‍या घाटात आहे ऐतिहासिक जंजाळा किल्ला (याला वैश्यगड किंवा तलतमचा किल्लाही म्हणतात). याच किल्ल्यासमोरच्या दरीत घटोत्कच लेणी आहे. नितांत सुंदर अशा दाट जंगलाने हा परिसर वेढलेला आहे. जंजाळा किल्ला आणि घटोत्कच लेणी याच्या मध्ये दरीत आजूबाजूच्या शेत शिवारातून वाहत येणारे पाणी धबधबा बनून कोसळते. कोसळते म्हणण्यापेक्षा वहात येते असं म्हणणं जास्त संयुक्तीक आहे. हिंदीत ‘झरना’ असा जो शब्द आहे तो याला नेमका लागू पडतो. 


जून्या मोगल वास्तूंमध्ये दगडांवरून वहात जाणार्‍या पाण्याची कारंज्याजवळ रचना केलेली असते. तशीच रचना या अनोख्या धबधब्याची आहे. उंचावरून तिरक्या असलेल्या दगडावरून हे पाणी खळाळत येते. अन्य जागी उंच कड्यांवरून पाणी खाली झेप घेते. इथे अतिश वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी दगड रचना असल्याने या झर्‍याचे सौंदर्य वेगळेच जाणवते. (औरंगाबाद परिसरांत बिबीचा मकबरा, सोनेरी महाल, औरंगजेबाचा राजवाडा किलेअर्क, हिमायत बाग, विद्यापीठातील सलाबत खानाचा मकबरा अशा कितीतरी ठिकाणी दगडांवरून पाणी वाहण्याची सुंदर रचना केलेली आढळून येते.)

घटोत्कच लेणीला जायला मुळात रस्ताच नाही. अक्षरश: शेत शिवारांतून वाट काढत जावे लागते. स्थानिक माणसाच्या मदतीशिवाय लेणीचा रस्ता शोधणे अवघडच आहे. पुरातत्त्व खात्याने अगदी अशात प्रत्यक्ष लेणीपर्यंत डोंगरमाथ्यापासून नीट पायर्‍या खोदल्या आहेत. लेणीजवळही एक ओहोळ परत आडवा येतो. तो ओलांडून पाय पाण्यात भिजवूनच लेणीला जाता येते. लेणीजवळ पुरातत्त्व खात्याने माहितीचा फलक लावला आहे. एक रक्षक तिथे नेमला आहे जो की कधीच हजर नसतो.

महायान पंथातील ही पहिली लेणी आहे. वाकाटकांच्या काळातील ही लेणी अजिंठा लेणीला समकालीन अशी आहे. लेणीत एकच दालन आहे. वीस सुंदर भव्य खांबांवर एक मोठे सभागृह आहे. त्याच्या एका बाजूला बुद्धाची भव्य अशी धम्मचक्र परिवर्तन मुर्ती आहे. लेणीत फारसे कोरीव काम दिसून येत नाही. कदाचीत त्या काळात काढलेली चित्रे नष्ट झाली असावीत. ब्राह्मी भाषेतील एक शिलालेख लेणीच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला आहे. लेणी समोर प्रशस्त अशी जागा मोकळी सोडलेली आहे. लेणीला दोन खिडक्या आहेत. आतल्या अंधारातून बाहेर प्रवेशद्वार आणि खिडक्यांकडे पाहिल्यास खांबांमधून मोठे सुंदर चित्र दिसते. 


लेणी समोरची दरी पावसाळ्यात दगडावरून वाहणार्‍या पाण्याच्या आणि मोरांच्या आवाजाने भरून गेलेली असते. लेणीच्या अगदी समोर जंजाळा किल्ल्याचे अवशेष दिसतात किल्ल्याचा एक दरवाजा या दरीत उतरण्यासाठी आहे. तोच किल्ल्याचा दिल्ली दरवाजा म्हणून ओळखला जातो. तटबंदीचे थोडे अवशेष, दिल्ली दरवाजा, किल्ल्यावरील महाल आणि एक पडकी मस्जिद असे फारच थोडे अवशेष आता शिल्लक आहेत.

हा सगळा परिसर विलक्षण सुंदर आहे. सागाच्या हिरव्या गर्द वनराईने सगळा डोंगर भरून गेलेला आहे. घटोत्कच लेणी समोरच डोंगरात अजून लेणी कोरल्याच्या खुणा दाट झाडीतून डोकावताना दिसतात. ही लेणी रिकामी असून तिथे फारसे कोरीव काम नाही अशी माहिती स्थानिक हौशी गाईड अक्रम भाई यांनी दिली. 

हा परिसर हौशी पर्यटकांना आकर्षण ठरावा असाच आहे. पण याची किमान माहितीही पर्यटकांना होत नाही. अगदी गावात गेल्यावरही लेणीकडे जाणारा रस्ता सापडत नाही. आता गावामधून जाणार्‍या सिमेेंट रस्त्याचे काम चालू आहे. पण मार्गात येणार्‍या शेतकर्‍यांनी रस्ता आडवून ठेवला आहे. 

ऐतिहासिक पुराण वास्तूंबाबत आपली अनास्था जागजागी दिसून येते. दोन हजार वर्षांपूर्वीचा सुंदर वारसा जवळ आहे आणि त्याकडे जाणारा साधा रस्ता आपण आजतागायत बांधू शकलो नाही याची अत्यंत खंत वाटते. लेणीच्या शोधात आमच्यासोबत असलेला फ्रेंच मित्र व्हिन्सेंट वाटेत शेवाळलेल्या दगडांवरून पाय घसरून कॅमेर्‍यासह पडला. एक भारतीय म्हणून आणि त्याचा मित्र म्हणून मला विलक्षण शरम वाटली. कुणीतरी आपला ऐतिहासिक दिव्य वारसा आपली वास्तूकला आपली शिल्पं आपल्या परंपरा यांचा शोध घेत धडपडत आहे आणि आपण किमान सोयीही पुरवू शकत नाही ही फारच शोकांतिका आहे. 

बरं केवळ या लेणीसाठी रस्ता करायला पाहिजे असेही नाही. अगदी लेणीच्या जवळ जंजाळा या गावातील लोकांसाठीही याची गरज आहे. भराडीपासून अंभईपर्यंत किंवा उंडणगावपासून अंभईपर्यंत बर्‍यापैकी रस्ता आहे. तिथपासून जंजाळ्यापर्यंत चांगला रस्ता करणे हे केवळ लेणीच नाही तर येथील लोकसंख्येसाठीही आवश्यक आहे.

याच वाटेवर अंभई जवळ वडेश्वराचे पुरातन महादेव मंदिर आहे. तेही पुरातत्त्व खात्याने नोंदीकृत केले आहे. त्या ऐतिहासिक वास्तुसाठीही रस्ता गरजेचा आहे.  

प्रत्यक्ष लेणी आणि त्या परिसरांतील घाण, आतमध्ये मोकाट जनावरे शिरून त्यांनी टाकलेले शेणाचे पोवटे, वटवाघळांनी केेलेली घाण या तर अजून वेगळ्या बाबी. पण इथपर्यंत येण्यासाठी आपण किमान वाटही करू शकत नाही याला काय म्हणावे? बारमाही रस्ते ही बाब महत्त्वाची आहे. मग याचा उपयोग करून इथे बाहेरचे लोक येवू शकतात. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळू शकते. चलनवलन वाढू शकते. आणि त्यामुळे त्या भागातील अर्थकारणाला गती येवू शकते. पण आपण याचा विचार करत नाही. 

आम्हाला वाट दाखविणारे अक्रम भाई हौसेने आलेल्या पर्यटकांना लेणी दाखवतात, किल्ला दाखवतात, डोंगरावर फिरून आणतात. त्यांच्याच छोट्याश्या झोपडीवजा घरामसोर बसून चहाची खाण्याची व्यवस्था कुणी सांगितले तर ते करतात.  ही सामान्य माणसे आणि व्हिन्सेंट सारखे परदेशी पर्यटक/अभ्यासक विनातक्रार हे सर्व करत आहेत. आणि ज्यांच्या हातात निर्णयाचे अधिकार आहेत, सत्ता आहे ते मख्ख बसून आहेत. 

केवळ सरकारच नव्हे तर त्या त्या परिसरांतील लोकांची अनास्था पण याला कारणीभूत आहे. किमान स्वच्छता, किमान सोयी स्थानिक स्वराज्य संस्था करू शकते. त्यासाठी सरकारी यंत्रणेकडे पाठपुरावा करू शकते. 


अजिंठा डोंगराचा दिडदोनशे किलोमिटरचा पट्टा हा विलक्षण निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. या परिसरांत अभयारण्ये, लेण्या, मंदिरे, किल्ले दर्‍या डोंगर धबधबे असे पर्यटनाचे विविध पैलू उपलब्ध आहेत. सर्व परिसरांत अग्रक्रमाने बारमाही चांगले पक्के रस्ते पहिल्यांदा निर्माण करण्याची गरज आहे. नुसतं या परिसरांत फिरले तरी आनंदाची अनुभूती सामान्य पर्यटकांना होवू शकते. आधी आपण आपल्या मनातील अनास्थेवर मात करू. मग स्थानिक प्रतिनिधींवर दडपण आणू. आणि मग राज्य व केंद्र सरकारवर दबाव तयार करून हा परिसर विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करूया. परत कुणी व्हिन्सेंट सारखा परदेशी हौशी पर्यटक/अभ्यासक रस्ता नाही म्हणून शेवाळलेल्या दगडांवरून पाय घसरून पडला असे व्हायला नको.      

(फोटो सौजन्य अॅक्विन टूरीझम, या भागातील भटकंतीसाठी मला छोट्या भावासारख्या असलेल्या नीलेश महाजनचे विशेष धन्यवाद)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

 

 

    

 

3 comments: