Friday, September 4, 2020

मालोजी राजांची अतिक्रमणाने वेढलेली समाधी !


उरूस, 4 सप्टेंबर 2020 

 वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी समोर टपर्‍यांनी वेढा घातलेली एक अतिशय जूनी दगडी समाशी आहे. ही समाधी शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांची असल्याचे सांगितले जाते. या शिवाय मंदिराच्या डाव्या बाजूला अगदी संरक्षक भिंतीला लागून एक कबर आहे. कबरीच्या चार दरवाज्यांना लागून आठ कोरीव कातीव दगडी खांब आहेत. आतूनही ही कबर अतिशय चांगल्या अवस्थेत आहे. पण इथे कुणाला पुरलेलं दिसत नाही. ती जागा रिकामी आहे. या कबरीला जायला जागाच नाही. गच्च रानगवताने झाडा झुडूपांनी वेढलेला आहे हा परिसर. याला लागूनच पुढे शांतिगिरी महाराजांच्या आश्रम परिसरांत अजून एक छत्री आहे. 

या तिनही वास्तु अतिशय उपेक्षीत अशा आहेत. मालोजी राज्यांची समाधीचा दरवाजा पुरातत्व विभागाच्या रक्षकाने कुलूप लावून बंद केल्याने आत स्वच्छता राखलेली आढळून येते. बाकी सर्व परिसरांत घाण केलेली दारूच्या बाटल्या पडलेल्या आढळून येत आहेत. 


मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूलाच मालोजी राजांची गढी आणि भव्य असा पुतळा नव्याने उभा केला गेला आहे. मग ही जूनी समाधी का अशी उपेक्षीत ठेवल्या गेली? ही समाधी मालोजी राजांची नसून त्यांचे वडिल बाबाजी भोसले यांची असल्याचे पण सांगितले जाते. या बाबत नेमकी माहिती उपलब्ध होत नाही. 

मंदिरावर असलेले अप्रतिम असे कोरीवकाम, जून्या लाकडी वाड्यासारखी दगडावर कोरलेली नक्षी, सागवानी दरवाजे जसे असतात तसे तीन दगडी दरवाजे समाधीच्या तिन बाजूला आहेत. ते इतके हुबेहुब लाकडाचे वाटतात की आपण लाकूड समजून त्यांना ढकलू पाहतो. खिडक्यांच्या कमानी नक्षीच्या जून्या मंदिराच्या कमानींसारख्या वळणा वळणाच्या नक्षीने कोरलेल्या आहेत. 


लाकडी माळवदाला आधार देणारे खांब किंवा जून्या मंदिरावर यक्ष कोरले असतात तसे सुंदर अशी दगडी रचना समाधीच्या प्रदक्षिणा पथाला खालच्या बाजूने करण्यात आली आहे. समाधीच्या मुख्य घुमटाच्या भोवताली चारही बाजूने दोन दोन आणि कोपर्‍यावर एक असे एकूण बारा सुंदर छोटे मिनार आहेत.

हे सगळे बांधकाम निजामशाहीच्या काळातील आढळून येते. ही समाधी मालोजी राजांची असण्याची खात्री पटते कारण लखुजी जाधव यांची समाधी याच पद्धतीची सिंदखेड राजा येथे आहे. त्याच्या आधीचा कालखंड मालोजी राजांचा आहे. मालाजी राजांचा मृत्यू इंदपूरला झाल्याचे सांगण्यात येते. त्यावरून काही संशोधक ही समाधी मालोजी यांची नाही असे प्रतिपादन करतात. पण खुद्द लखोजी जाधव यांचाही मृत्यू देवगिरी किल्ल्यात झाला होता. त्यांची समाधी पण त्यांच्या मुळ गावी सिंदखेड राजा येथेच आहे. मालोजी राजांची गढी मंदिराच्या जवळच असल्याने ही समाधी त्यांचीच असण्याची जास्त शक्यता आहे. शिवाय शंभू महादेव हे भोसल्यांच कुलदैवत. तेंव्हा मंदिरा समोर समाधी असण्यासही एक संयुक्त कारण आहे. बाजूची रिकामी कबर कुणा सरदाराची असावी. पण त्याचे निधन दुसरीकडे झाले आणि मृतदेह तिथपर्यंत आणता आला नसल्याने ही जागा रिक्त राहिली. अशा पण काही कबरी याच परिसरांत आहेत. 


तिसरी जी समाधी आहे ती कुणाची आहे याची माहिती नाही. पायर्‍या नसल्याने गर्भगृहात जावून पहाता येत नाही. तिथे वटवाघुळांचा मुक्त संचार आहे. कसरत करत वर चढल्यावर गाभार्‍यात वटवाघूळांच्या विष्टेची प्रचंड घाण साठलेली दिसून येते. घाणीचा भपकारा इतका आहे की नाक झाकून घ्यावे लागते. ही समाधी आतून पूर्ण शाबूत आहे. बाहेरून बराचसा भाग ढासळला आहे. शिल्लक अवशेषांवरून मुळ समाधीची भव्यता आणि मुख्य म्हणजे नक्षीकामाचा दर्जा याची कल्पना येते.  


सुवर्णसिंहासनाचे पाय असतात तसे देखणे समाधीच्या चार कोपर्‍यात चार पाय कोरलेले आहेत. जे आजही संपूर्ण शाबूत आहेत. या समाधीला तळघर आहे. जे सध्या दगड लावून बूजून टाकलेले दिसते आहे. पश्चिमेच्या खिडकीला सुंदर नक्षीकाम केले असून राजस्थानी पद्धतीने समोर छज्जा काढला आहे. 


कबर, समाधी आणि छत्री असे तीनही प्रकार इथे आढळून येतात. इतिहास संशोधकांनी यावर अजून प्रकाश टाकायला हवा. मुळात घृष्णेश्वर परिसरांतील सर्व अतिक्रमणे हटवून तिथे स्वच्छता केली गेली पाहिजे. या जून्या वास्तूंभोवती संरक्षक भिंती उभारल्या गेल्या पाहिजेत. नुकतीच मलिक अंबर कबर आणि परिसराची ज्या प्रमाणे डागडुजी केली आहे तशी इथे करण्याची नितांत आवश्यकता आहे. 

मुळात आपल्याला जून्या वास्तुंबाबत अनास्था का आहे? नविन तर आपण तसं बांधूच शकत नाही तर किमान जतन तर केलं पाहिजे. हा संपन्न असा वारसा आहे. पाश्चिमात्य पर्यटक आपल्या देशांत केवळ आपल्या संपन्न इतिहासाचा वारश्याचा अभ्यास करायला येतात. त्यांची अपेक्ष किमान स्वच्छता असावी ही पुरातन स्थळं सुरक्षीत असावीत इतकीच आहे. ती पण आपण पूर्ण करत नसूत तर कुणावर आणि किती टिका करायची? 

मालोजी राजे हा मराठी अस्मितेचा विषय आहे. त्यांच्या नावाने नविन गढी उभारण्याची पुतळा उभा करण्याची आपल्याला मोठी हौस. पण त्यांचीच समाधी मात्र घाणीत सापडलेली. हा नेमका काय विरोधाभास?

समाधी कोणाची यावर तज्ज्ञांनी प्रकाश टाकावा. पण या समाधीची भव्यता, कारागिरी आणि तिचे स्थान भोसले घराण्यातीलच कुणा व्यक्तीची असल्याची ग्वाही देतात हे निश्चित.    

(फोटो सौजन्य : आकाश धुमणे, व्हिन्सेंट पास्किनली)

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    


2 comments:

  1. सुरेख माहितीपूर्ण लेख, शुभेच्छा💐💐💐

    ReplyDelete
  2. मालोजी राजांबद्दल फार कमी वाचण्यात येते.ते अत्यंत शूर लढवय्ये होते हे मी वाचून आहे पण बहुधा विजापूर संस्थानात असल्यामुळे त्यांना प्रसिद्धी कमी मिळाली असेल.असो.मराठा इतिहास अप्रतिम आहे.प्रेमाने, जाज्वल्य अभिमानाने आणि करुणेने तो भरलेला आहे.धर्माचा तो एक उत्तम नमुना आहे आणि राज्य कारभाराचा एक सुंदर धडा आहे.मात्र नुसते पुतळे उभारा ह्या मताचा मी नाही.पुतळे उभारण्या पेक्षा त्यांचा समग्र इतिहास लोकांच्या डोळ्या समोर आणा.

    ReplyDelete