उरूस, 25 सप्टेंबर 2020
समाज माध्यमांवर (सोशल मिडिया) विविध चॅलेंज दिली जातात. सध्या कपल चॅलेंज म्हणजेच बायको सोबत फोटो टाकण्याचे चॅलेंज दिल्या गेले आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने (27 सप्टेंबर, रविवार) सर्वांना मी एक विनम्रपणे चॅलेंज देतो आहे. कृपया त्याचा स्विकार करावा.
सध्या कोरोना आपत्तीमुळे फिरण्यावर बंदी आलेली आहे. अतिशय प्रसिद्ध अशी पर्यटन स्थळे बंदच आहेत. गर्दीची ठिकाणं तर टाळायलाच हवी. आपली आणि आपल्या कुटूंबाची काळजी घ्यायला हवी. या सगळ्यांतून व्यवहार्य मार्ग काढत जागतिक पर्यटन दिन (27 सप्टेंबर) कसा साजरा करावयाचा?
आपल्या आजूबाजूला गावातून बाहेर पडल्यावर अगदी 50 किलोमिटरच्या परिसरांत दूर्लक्षीत असलेली खुप अशी सुंदर ठिकाणं असतात. पण आपलं तिकडे लक्ष गेलेलं नसतं. ही ठिकाणं पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येत नाहीत. यांची फारशी माहिती पण उपलब्ध नसते. स्थानिक पातळीवर थोडीबहुत माहिती कुणाला असते.
जूनी मंदिरे, गढ्या, भक्कम सागवानी वाडे, काही दुर्लक्षीत दर्गे, मकबरे, धबधबे, नदीचे घाट, दर्या, डोंगर आपल्या परिसरांत आहेत. जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने यांना भेटी देवून ते फोटो व माहिती समाज माध्यमांवर टाकण्याचे ‘चॅलेंज’ विनम्रपणे सर्वांसमोर ठेवतो आहे.
परभणी जवळच्या जाम गावच्या महादेव मंदिराचे उदा. म्हणून समोर ठेवतो. हे मंदिर मुळचे विष्णु किंवा लक्ष्मी मंदिर असावे. अकराव्या शतकातील हे मंदिर अभ्यासकांकडून दुर्लक्षीत राहिले. या मंदिरावरील अप्रतिम शिल्पकाम अजूनही शाबूत आहे. मंदिराचे प्रवेशद्वार, त्यावरील नक्षीकाम, गाभारा, सभामंडप सर्वच सुरक्षीत आहे. याची कुठे नोंद नाही. जागतिक पर्यटनाच्या निमित्ताने या मंदिराला भेट देता येईल.
पळशी (ता. पारनेर, जि.नगर) येथील सरदार पळशीकरांचा लाकडावरील अप्रतिम कोरीव काम असलेला वाडा आवर्जून भेट द्यावा असा आहे. समाज माध्यमांवर नुकतेच त्याचे फोटो काही हौशी पर्यटकांनी टाकलेले आहेत. त्यावर एक छोटासा व्हिडिओही आता सर्वत्र फिरत आहे. याच गावांत होळकर काळांतील सुंदर असे विठ्ठल मंदिर आहे. मंदिराला किल्ल्यासारखी तटबंदी आहे बुरूज आहे. ही ठिकाणं पर्यटकांकडून दुर्लक्षीत राहिलेली आहेत.
औंढा नागनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग मंदिर औंढा(जि. हिंगोली) येथे आहे. त्याचा सर्वांना परिचय आहे. पण याच औंढ्यापासून हिंगोलीच्या दिशेने जाताना मुख्य रस्त्यापासून डाव्या बाजूला जरासे आत गेल्यावर राजापूर नावाचे गाव आहे. या गावात एका साध्या मंदिरात तीन अप्रतिम अशा मुर्ती ठेवलेल्या आहेत.
यातील सरस्वतीच्या अप्रतिम मुर्तीचे छायाचित्र (सौजन्य श्रीकृष्ण उमरीकर) लेखाच्या सुरवातीला दिले आहे. सरस्वतीच्या हाती एकतारीसारखी दिसणारी वीणा, पुस्तक आहे. मुर्तीच्या मागची प्रभावळ सुंदर आहे. चेहर्यावरील शांत सात्विक भाव विलक्षण आहेत. उभी असलेली सरस्वतीची सुडौल मुर्ती सहसा आढळत नाही. सरस्वती बसलेली जास्त करून दाखवलेली असते.
याच मंदिरात ठेवलेली दुसरी मुर्ती ही नरसिंहाची आहे. सहसा दोन प्रकारच्या नरसिंह मुर्ती मंदिरातून पुजल्या जातात. एक असतो तो लक्ष्मी नरसिंह. ज्याला भोग नरसिंह असेही म्हणतात. ज्याच्या डाव्या बाजूला लक्ष्मी असते म्हणून तो लक्ष्मी नरसिंह. या मुर्तीच्या चेहर्यावरी भाव प्रसन्न असतात. दुसरा असतो तो उग्र नरसिंह. अर्थातच याच्या चेहर्यावरील भाव उग्र असतात. मांडीवर हिरण्यकशपू असून त्याचे पोट नखांनी फाडणारा असा हा उग्र नरसिंह. हळेबिडूच्यामंदिरावर उग्र नरसिंहाची एक अतिशय अप्रतिम मुर्ती आहे. त्यात हिरण्यकशपुचे आतडेही बाहेर आलेले दाखवलेले आहेत. इतके बारकावे शिल्पात अचुकपणे आले आहेत. औंढ्या जवळच्या राजापुरमध्ये असलेली नरसिंह मुर्ती मात्र अतिशय वेगळी आहे. हा योग नरसिंह आहे. अशी सर्वात भव्य नरसिंह मुर्ती हंपीला आहे. मांडी घातलेल्या या नरसिंहाच्या पायांना योगपट्टा वेढलेला आहे. औंढ्याजवळच्या राजापुरी येथील नरसिंह जरा याहून वेगळा आहे. ही मुर्ती अर्धसिद्धासनातील आहे. चेहर्यावरील भाव अतिशय शांत आहे.
तिसरी जी मुर्ती आहे ती अतिशय वेगळी दुर्मिळ अशी अर्धनारेश्वराची मुर्ती आहे. शिव पार्वती असे दोन एकाच मुर्तीत दाखविण्यात आले आहे. मुर्तीचे उजवे अर्धे अंग म्हणजे शिव आहे. त्याच्या हातात त्रिशूळ आहे. दुसरे डावीकडचे अर्धे अंग म्हणजे पार्वती आहे. तिच्या हातात नाजूकपणे कलश धरलेला आहे. हा कलश धरतानाच्या तीच्या बोटांचा नाजूकपणा व दुसरीकडे त्रिशुळ धरतानाच्या शिवाच्या बोटांची ताकद यातून या अनामिक शिल्पकाराच्या प्रतिभा दिसून येते. गळ्यात एक सुंदर अशी माळ आहे. पार्वतीच्या बाजूंनी ही माळ वक्ररेषांची असून माळेच्या बाहेर गोल पताका लोंबाव्यात अशी नक्षी आहे. आणि तीच माळ शिवाच्या बाजूने सरळ आणि तिच्यातील मण्यांची रचना ठसठशीत ढोबळ बनून जाते. हे सौंदर्य खरेच अदभूत आहे. (नृसिंह व अर्धनारेश्वर छायाचित्र सौजन्य अनिल स्वामी जिंतूर)
अंबाजोगाईच्या जवळ धर्मापुरी म्हणून गाव आहे. तिथे केदारेश्वर महादेवाचे मंदिर आहे. पडझड झालेल्या या मंदिराचा जिर्णोद्धार पुरातत्व खात्याने अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे. हे मंदिर आवर्जून पहा. मंदिराच्या बाह्य भागावरील मुर्तीकाम फारच अप्रतिम आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 68 मुर्ती कोरलेल्या आहेत.
नाशिक जवळ सिन्नर मध्ये गोंदेश्वराचे मंदिर अतिशय सुंदर आहे. या परिसरांतच काही भग्न मंदिरांचे अवशेष आढळून येतात. नांदूर माधमेश्वर जवळच्या एका अशा मंदिराचे फोटो समाज माध्यमांवर नितीन बोडखे या इतिहास प्रेमी मित्राने टाकले. त्याच्याशी संपर्क साधून मी तेथली माहिती घेतली. आता त्या परिसराला भेट देण्याचे नियोजन केले आहे.
महाराष्ट्रभर अशी कितीतरी ठिकाणं आहेत जी काहीशी दुर्लक्षीत राहिलेली आहे. नदीचे सुंदर घाट आहेत (कृष्णा नदी वाई). मुदगल येथील पाण्यातील महादेवाचे व गणपतीचे मंदिर पाहण्यासारखे आहे. सध्या गोदावरील पुर आल्याने तिथे जाता येत नाही. मंदिर बुडून जावे इतके पाणी सध्या पात्रातून वहात आहे. पश्चिम महाराष्ट्रात शिवकालीन कितीतरी ठिकाणं अतिशय उत्तम निगा राखलेली अशी आहेत. पण त्यांची माहिती स्थानिकांशिवाय इतरांना फारशी होत नाही. नगर जिल्ह्यात अकोले गावात गंगाधरेश्वराचे अप्रतिम अगदी संपूर्ण चांगल्या स्थितीतले मंदिर आहे. बडोड्याच्या गायकवाडांचे कोषाधिकारी पोतनिस यांनी हे मंदिर बांधले. या मंदिराच्या बांधकामाला तेंव्हा इ.स. 1782 मध्ये 4 लाख रूपयांचे खर्च झाल्याची नोंद आहे. याच गावात अतिशय पुरातन असे सिद्धेश्वराचे मंदिर आहे.
अकोला (विदर्भ) जिल्ह्यात बाळापुर येथे मिर्झा राजे जयसिंह यांची अतिशय देखणी सुबक राजस्थानी शैलीतील छत्री आहे. अमरावती जवळ मातापुरला सात मजली पुरातन बारव आहे. अशी कितीतरी फारशी परिचित नसलेली ठिकाणं सांगता येतील. बरिच ठिकाणं अस्वच्छ बकाल झाली आहेत. जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने मी विनम्र आवाहन करतो की अशा आपल्या जवळच्या ठिकाणांना भेटी द्या. स्थानिक प्रशासन आणि गावकर्यांच्या सहकार्याने तेथे साफसफाई करता आली तर जरूर प्रयत्न करा. या ठिकाणाची माहिती गोळा करा. अशा ठिकाणांचे फोटो व माहिती आपल्या आपल्या प्रोफाईलवर टाका.
27 सप्टेंबरला आपण सर्वांनी जवळपासच्या रम्य पुरातन ठिकाणांना नैसर्गिक सौंदर्य स्थळांना किल्ल्यांना वाड्यांना गढ्यांना भेटी देवून त्याचे फोटो व माहिती सोमवार 28 सप्टेंबर रोजी समाज माध्यमांवर द्यावी अशी विनंती आहे.
मित्रांनो मैत्रिणींनो इतिहास प्रेमींनो कृपया हे ‘चॅलेंज’ स्वीकारा. अगदी फारही दूर जायची गरज नाही. परभणी ला माझा जन्म गेला. पण तिथे क्रांती चौकात टाकळकर कुटूंबियांच्या राम मंदिरात असलेली शेषशायी विष्णुची मुर्ती माझ्या पाहण्यात आली नाही. तिचा उल्लेख बारव स्थापत्यावरील आपल्या ग्रंथात डॉ. अरुणचंद्र पाठक यांनी केला तेंव्हाच आमचे डोळे उघडले. कृपया तूम्ही तूमचे डोळे झाकून घेवू नका. आपल्या जवळपासच्या स्थळांबाबत मुर्तींबाबत लिहा. माहिती घ्या. फोटो काढा. संस्कृती जागृती अभियानात सक्रिय व्हा.
(शेषशायी विष्णू मूर्ती छायाचित्र सौजन्य डॉ. संजय टाकळकर नांदूर मधमेश्वर छायाचित्र सौजन्य नितीन बोडखे)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment