Friday, August 7, 2020

माझे मग ते फुल कोणते कसे ओळखू सांग ?


काव्यतरंग, शुक्रवार 7 ऑगस्ट  2020 दै. दिव्यमराठी


थांब जरासा बाळ || धृ० || 

सुंदर खाशा प्रभातकाळी
चहूंकडे ही फुले उमलली
बाग हांसते वाटे सगळी
शीतल वारा या जलधारा कारंज्याच्या छान ॥ १ ||

रम्य तडागी निर्मळ पाणी
गाति पांखरे गोजिरवाणी
आनंदाची बसली ठाणी
खरे असे रे तरी नको मारू लाडक्या धांव ॥ २ ||

तर्‍हेतर्‍हेची फुले विकसली
रंगीबेरंगी ही सगळी
तूंही शिरता त्यांच्या मेळी
माझे मग ते फुल कोणते कसे ओळखू सांग?॥ ३ ||

फूलपाखरे ही स्वच्छंदी
तूंही त्यांच्यासम आनंदी
क्षणांत पडशिल त्यांच्या फंदी
त्यांच्या संगे त्यांचे रंगे जाशिल उडूनी दूर ॥ ४ ||

बालरवीचे किरण कोवळे
कारंज्यावर पडति मोकळे
रंग खेळती हिरवे पिवळे
धरावयाची, त्या रंगासी जाशिल बाळा खास ॥ ५ ||

-गोविंदाग्रज (वाग्वैजयंती, पृ.224  प्रकाशक बा.म.नेर्लेकर पुणे, आ.1962)

राम गणेश गडकरी असे नांव उच्चारले तर बहुतांश मराठी वाचकांना ते ओळखीचे वाटते. ‘एकच प्याला’ सारखी त्यांची नाटके माहित असतात. पण तेच ‘गोविंदाग्रज’ असे नाव घेतले तर मात्र ओळखीचे वाटत नाही. गडकर्‍यांनी ‘गोविंदाग्रज’ या टोपण नावाने कविता लिहील्या. ‘मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा’ हे महाराष्ट्र गीत आपल्या ओठंावर असते पण ही रचना गोविंदाग्रजांची आहे हे माहित नसते. ‘राजहंस माझा निजला’ ही पण त्यांची एक त्या काळात अतिशय गाजलेली कविता. ही कविता ते गाउन सादर करायचे. ‘कृष्णाकांठी कुंडल आतां पहिले उरले नाही’ याही कवितेचा उल्लेख बर्‍याचदा होतो.

‘थांब जरासा बाळ’ ही कविता पूर्वीच्या काळी अभ्यासक्रमात होती. निसर्गाचे आणि त्यात रमलेल्या लहान मुलाचे या कवितेतील वर्णन अतिशय गोड असे आहे. ज्याला विशुद्ध कला/साहित्य म्हणतात अशी ही कविता. यात कुठलाही बोध नाही. फार अवजड शब्द उपमा आलेल्या नाहीत. 

पहाटे बागेत लहान मुलाला आई घेवून गेली आहे. नुकतेच चालणे शिकलेले हे छोटं मुलं गवतावरून दूडू दूडू धावत आहे. आणि आईला त्याच्याबद्दल आनंद अभिमान तर आहेच पण या सगळ्यात आपलं बाळ गुडूप होईल की काय अशी एक गंमतशीर भिती वाटत आहे. 

पहाटेचं वातावरण आहे. लहान मुल म्हणजे जीवनाची सुंदर पहाट. असाही एक अर्थ यातून काढता येतो. दिवसाचा हा प्रहर सगळ्यात प्रसन्न असतो. या लहान मुलाच्या आयुष्याची ही पहाट आहे. ती पण अशीच सुंदर आहे. सगळीकडे फुले उमलली आहेत. कारंज्यातून जलधारा उडत आहेत. 

एकीकडे फुलपांखरे उडत आहेत. त्यांच्या सोबत बागडणारे हे लहान मुलही त्या फुलपाखरांसारखेच भासते आहे. तिसर्‍या कडव्यांत एक अतिशय गोड कल्पना आलेली आहे. या सगळ्यांत आपले मुल हरवून गेले तर त्या आईला प्रश्‍न पडतो, ‘माझे मग ते फुल कोणते कसे ओळखू सांग?’

बागेत उडणार्‍या कारंज्यांचे वर्णन यात आलेलं आहे. मोगलांनी उभारलेल्या कित्येक वास्तुमध्ये कारज्यांची रचना आवर्जून केलेली दिसते. कारण ते वाळवंटी प्रदेशांतून आलेले असल्याने त्यांना पाण्याचे फार कौतूक होते असे सांगितले जाते. ते खरेही असेल पण आपल्या जून्या साहित्यातही कारंज्याची वर्णनं आहेत. कालिदासाच्या ऋतूसंहार या निसर्गवर्णनपर काव्यात जलयंत्रांचा उल्लेख आहे. उडणार्‍या पाण्याला चैतन्याचे प्रतिक समजल्या जाते. त्या अर्थाने हे वर्णन येथे आलेले आहे. या बागेत तळे आहे. अशा वाटिकांचा उल्लेख अगदी पुराणांतदेखील आलेला आहे. 

फुलं, फुलपाखरं, कारंंज्यातून उडणार्‍या जलधारा, पहाटेची कोवळी सुर्यकिरणं या सगळ्यांत ते लहानमुल हरखून जाते. रविंद्रनाथ टागोरांनी निसर्गाच्या सान्नीध्यातील शिक्षणाची ‘शांतीनिकेतन’ ची संकल्पना मांडली आणि प्रत्यक्षात राबवून दाखवली.  निसर्गाच्या सान्निध्यात मुलांना शिकवलं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. आज नेमकं हेच होताना दिसत नाही. शाळेच्या नावाखाली कोंदट खोल्यांमध्ये मुलांना डांबले जात आहे. 

1910 च्या दरम्यान कधीतरी ही कविता गोविंदाग्रजांनी लिहीली. जेंव्हा आपण आधुनिक म्हणतो अशी शिक्षण पद्धती सुरूही झाली नव्हती. आज शंभर वर्षानंतर काय परिस्थिती आहे? आजही आपण निसर्गाच्या सान्निध्यात मुलांना जावू द्यायला तयार नाहीत.

नुकतेच चालणे शिकलेल्या मुलाला गवतावर चालू द्या, त्याच्या कानावर पाखरांचे आवाज पडू द्या, त्याच्या डोळ्यांत कारंज्यावर पडणार्‍या सुर्यकिरणांमुळे उठलेले रंगाचे इंद्रधनुष्य साठवू द्या. हा संस्कार फार महत्त्वाचा आहे. अन्यथा आपण त्या मुलाच्या नैसर्गिक वाढीत बाधा आणतो आहोत. 
 
लॉकडाउनच्या काळात सर्वत्र पसरलेली शांतता अगदी शहरांतदेखील आपल्याला अनुभवायाला मिळाली. पाखरांचे आवाज कानावर येवू लागले. हवा स्वच्छ  होवून सभोवतालची दृष्ये स्पष्ट दिसू लागली. दुरवरचे डोंगर जवळ वाटायला लागले. ही ताकद निसर्गाची आहे. 

मेळघाट अभयारण्यात इ.स. 2000 साली कोलकाज येथे नदीच्या काठावर अगदी पहाटे माझ्या एक वर्षाच्या लहान मुलाला मी मांडीवर घेवून बसलो होतो तो प्रसंग मला आठवतो. त्याची हालचाल जराही जाणवत नसल्याने तो गाढ झोपला असेल असे मी गृहीत धरले. काही वेळाने त्याच्याकडे लक्ष गेले तर त्याचे डोळे टक्क उघडे होते. निसर्गाच्या त्या अद्भूत सान्निध्यात नदीच्या पाण्याच्या खळखळ आवाजात पाखरांच्या किलबिलाटात त्याचेही ध्यान लागले होते. ही खरी निसर्गाची किमया. अजून सगळ्या संवेदना पूर्णत: विकसित न झालेल्या मुलावर एक संस्कार निसर्गाकडून केला जात होता.

उपदेशाची भाषा न वापरता निसर्गाकडे जाण्याचा एक सुंदर संदेश ही कविता देत आहे.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

No comments:

Post a Comment