Thursday, August 20, 2020

समाधी छोटी गोष्ट मोठी !


उरूस, 20 ऑगस्ट 2020 

 सोबतच्या छायाचित्रात दिसते आहे ही एक घडीव दगडाची छोटी साधी देखणी समाधी. वृंदावनाच्या आकारात कोरलेल्या दगडांत वरती एक शिवलिंग आहे. त्याला वाहिलेले पाणी निघून जाण्यासाठी छोटीशी खोबण दगडांतच कोरलेली आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालूक्यात ऐतिहासिक सुप्रसिद्ध चारठाणा गावाजवळ धानोरा हे गांव आहे. जवळच्या वाघी गावामुळे याला वाघी धानोरा असेच संबोधले जाते. 

या गावात एकोणविसाच्या शतकाच्या उत्तरार्धात अद्वैयानंद नावाचे एक सन्यासी सत्पुरूष वास्तव्यास आले. वाशिम जवळच्या एका गावाहून कायंदे कुळातील हे सत्पुरूष धानोर्‍यात चालत आले. उर्वरीत आयुष्य त्यांनी याच गावात व्यतित केले. 1920 च्या दरम्यान त्यांचे देहावसान झाले. गावातील वतनदानर देशपांडे धानोरकरांनी आपल्या गढीवजा वाड्याच्या परिसरात या सत्पुरूषाची ही समाधी उभारली. या जागेला देवघर या नावाने ओळखले जाते.

समाधीची पुजा, समाधीस्थळी भजन किर्तन नियमित होत असायचे. मधुकरराव धानोरकर यांनी या समाधीची नित्यपूजा फार काळ केली. जिंतूरचे नरहर गुरू जिंतूरकर यांनी 35 वर्षे भागवताचे पारायण या जागी केले. पुढे काळाच्या ओघात वतनदार देशपांडे स्थलांतरीत झाले. गढी ढासळली. समाधीची जागाही बेवारस बनत गेली. तिथे मोकाट जनावरांचा वावर सुरू झाला. 

2010 मध्ये येथील सुप्रसिद्ध किर्तनकार व्यंकटराव धानोरकर गुरूजी यांचे निधन झाले. त्यांनी आपल्या आयुष्यातील पहिले किर्तन 1955 सालादरम्यान याच समाधी स्थळी केले होते. याची आठवण ठेवून त्यांचे सुपुत्र माझे मित्र जयंत देशपांडे धानोरकर यांना प्रमाणिकपणे असे वाटले की वडिलांची स्मृती म्हणून आपण या समाधीचा जिर्णोद्धार केला पाहिजे. त्यांनी आपले किर्तनकार बंधू भालचंद्र आणि पडद्यामागचा सुत्रधार संजय या तिघांनी भाउबंदकिला विचारले. सगळ्यांनी एकमताने समाधीचा कायापालट करण्याचे ठरवले. आपल्या गढीवजा वाड्याचा चांगल्या अवस्थेत असलेला जो माळवदाचा (लाकडी छताचा, आताच्या पिढीला हा शब्द माहित नसतो) भाग उचलून घेतला. शिल्लक मजबूत खांब आणि भक्कम तळखडे यांचा वापर करून समाधी भोवती चांगले छत उभारले. समाधी समोर छोटेसे अंगण मोकळे ठेवले. चारीबाजूंनी चांगली बांधबंदिस्ती केली. मोकाट जनावरे येवू नये म्हणून जागेला दरवाजा बसवला. त्याला कडी घातली. 

खरं तर ही तशी साधीच गोष्ट होती. पण यापुढे जयंत देशपांडे यांनी जे केले ते मात्र अतिशय महत्वाचे होते. तीच खरी मोठी गोष्ट मला वाटते. त्यांनी या जागेला कुलूप घातले नाही. जागा चांगली करून गावकर्‍यांच्या स्वाधीन केली. सगळ्यांसाठी हे समाधीस्थळ कधीही उघडे असावे अशी व्यवस्था केली. गावकर्‍यांवर विश्वास ठेवून त्यांनाच सर्व व्यवस्था पाहण्यास सांगितले. रोज एक म्हातारी आजी येवून ही जागा साफसुफ करून जाते. समाधीजवळ कोनाड्यात दिवा पेटवते. महादेवाला पाणी घालून चार फुले वाहते. 

जवळपास उकिरडा बनलेली ही जागा आता परत माणसांनी गजबजून गेली आहे. प्रवचनं किर्तनं इथे आता होतात. सामान्य माणसांच्या श्रद्धेने या जागेला परत एकदा जिवंतपणा प्रदान केला आहे. 

समाधीच्या बाजूला देशपंाडे धानोरकरांच्या पडलेल्या वाड्याचा मोठा परिसर आहे. ती सगळी जागा समतल करून तिथे साफ सफाई करून ज्येष्ठ नागरिकांसाठी लहान मुलांसाठी खेळायची जागा बगीचा करण्याचा मनोदयही जयंत देशपांडे यांनी सांगितला. 

परभणी, हिंगोली, नांदेड, बीड या परिसरांत (इतरत्रही हीच स्थिती आहे) छोट्या गावांमध्ये वतनदारांचे जूने वाडे, गढ्या उद्ध्वस्त झालेल्या आढळून येतात. त्या जागा अगदी बेवारस बनल्या आहेत. तिथे कुणाचाही वावर नाही. काही ठिकाणी मालकिचे वाद चालू आहेत. अशी परिस्थिती असताना जयंत देशपांडे सारखा एक वतनदार आपल्या कृतीने एक आगळा वेगळा आदर्श लोकांसमोर ठेवतो. आपल्या वाडवडिलांच्या जागेचा सद्उपयोग नविन काळात गावकर्‍यांना व्हावा अशी दृष्टी बाळगतो ही फार मोठी गोष्ट आहे. 

खेड्यांमधल्या असे जूने वाडे, गढ्या ज्या बर्‍यापैकी अवस्थेत आहेत त्यांची दूरूस्ती बांधबंदिस्ती केली गेली पाहिजे. ही ठिकाणं एका अर्थाने ऐतिहासिक पुरातत्वीय दृृष्ट्या महत्त्वाची आहेत. इथे किमान रहायची सोय झाली तर परदेशी पर्यटक येथे येण्यास उत्सूक आहेत. जानेवारी महिन्यात चारठाण (ता. जिंतूर जि. परभणी) येथील देशपांडे यांचा वाडा आणि  होट्टल (जि. नांदेड, ता. देगलूर) येथील देशमुखाची गढी व्हिन्सेंट पास्किलीनी या फ्रेंच मित्राला आम्ही दाखवली. त्याने हीची दूरूस्ती आणि जतन करण्याबाबत तळमळ व्यक्त केली.  

चारठाणा येथील काही वाडे बर्‍यापैकी अवस्थेत आहेत. पैठण उंडणगाव गंगापूर माजलगाव  येथेही जूने भव्य वाडे आहेत. अशा खुप जून्या वास्तू आहेत. या शिवाय ज्या जागा पूर्णत: पडलेल्या आहेत तिथे जयंत देशपांडे यांनी केलेल्या कृती प्रमाणे काही एक उपाय करता येईल. ही जागा साफसुफ करणे. तिला संरक्षक भिंत उभारणे. त्यासाठी दगड तिथेच असतात. झाडे लावणे. हा परिसर गावकर्‍यांना वापरासाठी उपलब्ध करून देणे. जागा मूळ मालकाच्याच नावावर राहणार असल्याने मालकीचे वाद उदभवणार नाहीत. हा सगळा विश्वासाचा प्रश्‍न आहे. सध्या उद्ध्वस्त असलेल्या जागेचे रूपांतर सुंदर बगीच्यात झाले तर त्याचा फायदा गावकर्‍यांसाठी आणि पर्यटकांसाठी होणार आहे. 

याच परिसरांतील संत समर्थ रामदास यांनी ‘क्रियेवणी वाचाळता व्यर्थ आहे’ असे  सांगून ठेवले आहे. जयंत देशपांडे यांनी एक आदर्श घालून दिला आहे. तेंव्हा आता इतरांनी आपल्या आपल्या गावची परिस्थिती जाणून त्या प्रमाणे काही एक कार्यवाही केली पाहिजे. ही अतिशय साधी सहज होऊ शकणारी गोष्ट आहे. 

सातवाहनापासून वाकाटक राष्ट्रकुट ते देवगिरीच्या यादवांपर्यंत महान सम्राटांचा हा प्रदेश. आपल्या या पुरातन वारश्याची जाण ठेवून आपण त्या प्रमाणे आपल्या परिसरांतील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करत असताना आपल्या घराण्याच्या पडक्या जागाही चांगल्या करण्याचे व्रत हाती घेवू या.        


          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    


1 comment: