उरूस, 6 ऑगस्ट 2020
दिनांक 5 ऑगस्ट (श्रावण कृष्ण द्वितीया शके 1942, उत्तर भारतात पौर्णिमेनंतर महिना सुरू होतो तेंव्हा त्यांच्या पंचांगाप्रमाणे हा भाद्रपद महिन्यातील दुसरा दिवस) 2020 दुपारी 12 वा.44 मि. 8 सेकंद हा महूर्त होता राममंदिराच्या भूमिपुजनाचा. हा भूमिपुजन सोहळा संपन्न होत असताना असदुद्दीन ओवैसी आणि तमाम पुरोगामी यांच्या तोंडी एकच गाणे होते ‘बाबरा प्राण तळमळला!’
एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा ओवैसी आणि इतर पुरोगामी दाबून टाकत आहेत. 1977-78 मध्ये पुरातत्व विभागाने या ठिकाणी उत्खनन करून काही एक अहवाल शासनाला सादर केला होता. डॉ. लाल यांच्या नेतृत्वाखालील या तुकडीमध्ये सामील असलेले त्यांचे सहकारी के. के. मोहम्मद यांनी याबाबत सविस्तर माहिती लिहून ठेवली आहे. तसेच हा वाद न्यायालयात पोचल्यावर न्यायालयाच्या देखरेखीखाली काही उत्खनन करण्यात आले. त्याचेही अहवाल देण्यात आले आहेत.
न्यायालयाचा निकाल आल्यावर ही जागा अधिकृतरित्य रामजन्मभुमी न्यास तयार करून त्यांना हस्तांतरित करण्यात आली मंदिराच्या बांधकामासाठी. तेंव्हा बांधकाम सुरू करताना असलेले दगड मातीचे ढिगारे साफ करतानाही हिंदू मंदिराचे अवशेष सापडले. त्याचाही एक सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे.
आत्ता कालपासून भूमिपुजन झाल्यावर पायासाठी म्हणून जे खोदकाम सुरू होते आहे तेंव्हाही शक्यता आहे की अजून काही अवशेष सापडू शकतील. शक्यता तर अशी पण आहे की भव्य अशा मंदिराचे अवशेष सापडले तर ही जागा पुरातत्त्व संशोधनासाठी राखीव ठेवून लगतच्या दुसर्या जागी नविन मंदिराचे बांधकाम करावे लागेल.
पण याकडे कुठलाच पुरोगामी लक्ष द्यायला तयार नाही. रोमिला थापर यांच्यासारख्या इतिहास तज्ज्ञांनी शपथपत्र दिले होते की बाबरी मस्जिद ही समतल भुमीवर उभी आहे. मग या खोट्या शपथपत्रासाठी त्यांना आता काय शिक्षा केली जाणार आहे? वारंवार मंदिराचे पुरावे मागणारे लोक आता कुठे गायब झाले आहेत? मस्जिद मंदिर पाडून बांधली नव्हती याचा काय पुरावा आहे? असा प्रश्न रोमिला थापर यांना का नाही विचारला गेला?
के. के. मोहम्मद सारखा पुरातत्त्व अभ्यासक तज्ज्ञ आजही अशा इतर स्थळांबाबत (उदा. कुतूबमिनार) अहवाल देतो आहे. हे पुरोगामी त्याची दखल घेण्यास का तयार नाहीत?
ओवैसी सारखे मुसलमान असं सातत्याने सांगतात की आम्ही पण इथल्याच मातीतले आहोत. खरं तर हे सगळे पूर्वाश्रमीचे हिंदूच आहेत. मग यांना परकीय आक्रमक अशा बाबराचे कौतूक कशासाठी आहे? ज्याला बाबरी मस्जिद म्हणतात ती एका व्यक्तीच्या नावे कशी काय? इस्लाममध्ये तर व्यक्तीपुजनाला संपूर्ण बंदी आहे. एखादी व्यक्ती मृत्यू पावली आणि ती जर बडी हस्ती/सम्राट/बादशहा/सरदार असेल तर त्याला जिथे पुरले जाते तिथे मकबरा उभारला जातो. मस्जिद नाही. मस्जिद म्हणजे तिथे केवळ आणि केवळ अल्लाची प्रार्थना करायीच असते. इस्लाममध्ये परमेश्वर निर्गुण निराकार मानल्या गेल्याने मस्जिदमध्ये जावून प्रार्थना केली पाहिजे असेही नाही. नमाज कुठेही पढता येतो.
मुळात इस्लामला प्रतिकेच मंजूर नाहीत. अगदी मोहम्मद पैगंबर यांच्या नावानेही काही मागितलेले चालत नाही. कारण जे काही मागायचे ते केवळ अल्लाकडेच. केवळ ‘भर दे झोली मेरी या मुहम्मद’ असे शब्द कव्वालीत वापरल्याने कराचीचे कव्वाल अमजद साबरी यांची हत्या करण्यात आली. पैगंबरांची जयंती ‘ईद-ए-मिलाप’ मोठ्या प्रमाणात साजरी केली जात नाही कारण ती कुणा एका व्यक्तीची जयंती आहे. ही व्यक्ती महान मोहम्मद पैगंबर असले तरी काय झाले. अशी इस्लामची धारणा आहे. मग अशावेळी एका बाबराच्या नावाने असलेल्या वास्तुसाठी इतका आटापिटा का?
आता तर अधिकृतरित्या सर्वौच्च न्यायालयाने ही जागा धर्मदाय संस्था तयार करून तिच्या सुपूर्त केली आहे. मग असे असताना असदुद्दीन ओवैसी किंवा मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड ‘बाबरी मस्जिद थी, बाबरी मस्जिद है, बाबरी मस्जिद रहेगी’ असं म्हणतात याचा अर्थ काय? हा तर घटनाद्रोह आहे. संविधान विरोध आहे.
खुद्द ओवैसी यांच्या हैदराबाद शहरात निजामाचा एक तरी पुतळा आहे का? कारण इस्लामला प्रतिके प्रतिमा मंजूर नाही. एक तरी मस्जिद कुणा व्यक्तीच्या नावाने आहे का? मग हा सगळा अट्टाहास बाबरी मस्जिदच्या नावाने का? आता तर दुसरी एक मस्जिद अयोध्येत बांधून तिला बाबरी मस्जिद नाव द्या असं चालू आहे. हा अतिरेक कशासाठी?
पाकिस्तान, भारत, बांग्लादेश म्हणजेच पूर्वीचा जो भारतीय उपखंड आहे इथे जितके दर्गे आहेत, अप्रतिम शिल्पकाम केलेले स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेले मकबरे आहेत तसे जगात कुठे आहेत? म्हणजे या उपखंडातील इस्लाम हा वेगळा आहे. इथले रितीरिवाज वेगळ्या पद्धतीचे आहेत. आणि ते इथल्य जनतेने जतन केले आहेत. ही बाब ओवैसी तर सोडाच पण त्यांच्या सुरात सुर मिसळणारे मुसलमान नसणारे इतर पुरोगामी लक्षात का घेत नाहीत?
2014 च्या पराभवापासून पुरोगामी काही शिकले नाहीत त्याचा परिणाम म्हणजे 2019 चा अजून मोठा पराभव त्यांच्या वाट्याला आला. तसेच रामजन्मभुमी प्रकरणी ओवैसी आणि पुरोगामी काही शिकणार नसतील तर निश्चितच काशी, मथुरा आणि गावोगाच्या मस्जिदींची प्रकरणे चव्हाट्यावर येतील.
शहागडला शहामुनींची समाधी, श्रीगोंद्याला शेख महंमद समाधी, विजापूरला इब्राहीम अदिलशहाने बांधलेले सरस्वती मंदिर, देवगिरी किल्ल्यासमोरची चांद बोधलेंची समाधी अशी कितीतरी स्थळे हिंदूंची धार्मिक स्थळे म्हणून वाढत जातील. आम्हाला दर्गापूजन मंजूर नाही म्हणणारे कट्टरपंथी मुसलमान बाजूला पडून हे सगळं मंजूर असणारे भारतीय मुसलमान स्वत:ला वेगळं समजतील आणि यातून इस्लामच्याच दुहीची बीजं पेरली जातील.
तसेही ओवैसी किंवा इतर दक्षिण भारतीय मुलसमानांना कट्टरपंथी मुसलमान समजतच नाहीत. पूर्वी हैदराबादच्या निजामाच्या दरबारात स्थानिक मुलसमान विरूद्ध उत्तर प्रदेशातील गोमती नदीच्या किनार्यावरील मुसलमान यांच्यात गटबाजी असायची. हैदराबादच्या नदीचे नाव आहे मुसा. आणि हैदराबादच्या दखनी भाषेत डासांना डासच म्हणतात. मच्छर म्हणत नाहीत. त्यावरून एक म्हण तेंव्हाची फार प्रसिद्ध आहे
मुसां के डासां भौत है मगर
गोमती के मच्छर नक्कुच नक्कु
स्वत: ओवैसी शेरवानी आणि मुसलमानी टोपी घालून मिश्या छाटून दाढी वाढवत धार्मिक पोशाख करून वावरत असतात. त्यांच्या पक्षाचे नावही धार्मिकच आहे आणि ते मात्र इतरांना सेक्युरिझमचा शहाणपण शिकवतात.
इथल्या बहुसंख्य हिंदूंच्या भावभावनांचा विचार करून त्यांचा आदर करूनच इथे राहण्यात मुसलमानांचे हित आहे. परकिय आक्रमक असलेल्या बाबरासाठी तूमचा प्राण कितीही तळमळला तरी त्याचा फायदा इथल्या बहुतांश भारतीय मुसलमानांना काहीच होणार नाही. तेंव्हा ओवैसी ‘बाबरा प्राण तळमळला’ हे गाणं सोडा. समर्थ रामदासांनी करुणाष्टके लिहीली आहेत. त्यातील एकच ओठावर ठेवा. तूमच्या आणि तूमच्या सर्व धर्मबांधवांचे कल्याण होईल. आणि यासाठी तूम्ही जे मुळचे हिंदू अहात ते परत होण्याचीही गरज नाही. कुठल्याही धर्माच्या माणसाचे कल्याण आमचा राम करतो.
अनुदिनि अनुतापे तापलो रामराया ।
परम दिन-दयाळा नीरसी मोह-माया ।
अचपळ मन माझे नावरे आवरीतां ।
तुजविण शिण होतो धांव रे धांव आता ॥
(शीर्षकाचे श्रेय, पत्रकार मित्र संकेत कुलकर्णी)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
उत्तम प्रासंगिक लेख 🌹🙏
ReplyDeleteअप्रतिम लेखन 👌👌👌👌👌👍
ReplyDelete🙏जय भवानी । जय शिवराय ।🚩
खूप सुंदर अप्रतिम लेखन.
ReplyDeleteछान लेरव,आत्ताच्या रामजन्मभुमीच्या भुमीपुजनाच्या निमीत्ताने एकदम प्रासंगीक लेख.
ReplyDeleteहे फक्त ओवेसच म्हणत नसेल तर तुम्हाला नाव माहित आहे पण तुम्ही सांगु शकत नाही असे काही वयोवृद्ध देखील म्हणत असतील.
ReplyDelete