Friday, August 28, 2020

शर्जील इमाम - कायद्याने केले काम तमाम

 


उरूस, 28 ऑगस्ट 2020 

 दोन दिवसांपूर्वी दिल्ली दंग्यातील आरोपी विद्यार्थी नेता शर्जील इमाम याला पोलिसांनी युएपीए कायद्याअंतर्गत अटक केली आहे. हा तोच शर्जील इमाम आहे ज्याने इशान्य भारताचा मूख्य भूमीपासून वेगळा तुकडा पाडण्याचे भडक विधान केले होते, दिल्ली दंगे भडकविण्यास आपल्या भाषणांनी मोठे योगदान दिले होते. 

‘पाच लाख लोक आपल्या सोबत असतील तर आपण ईशान्य भारताला मुख्य भूमीपासून कायमचे तोडू शकतो’ शर्जीलच्या मुळ वक्तव्याचे हे मराठी भाषांतर. ‘आसाम को काटना हमारी जिम्मेदारी है’ हे त्याचे पुढचे वाक्य. आता यात नेमकं कुणाला काय संदिग्ध दिसतं आहे? सरळ सरळ देश तोडण्याची ही भाषा आहे (हे भाषण अलीगढ मध्ये 16 जानेवारी 2020 चे आहे).

बरं हे भाषण म्हणजे याचे हे एकमेव वक्तव्य आहे असेही नाही. यापूर्वीही त्याने अशीच विधाने केली होती. 13 डिसेंबर 2019 ला याने जामिया मिलिया मध्येही असेच भडक भाषण केले होते. हा तोच शर्जील आहे ज्याने रस्ता पूर्णत: बंद करण्याची कल्पना मांडली होती. आणि त्यातूनच पुढे 15 डिसेंबरला पहिल्यांदा शाहिनबाग रस्ता रोको सुरू झाले. 

ज्याला चिकन नेक म्हणतात ती एक चिंचोळी पट्टी आहे भारत आणि ईशान्य भारताला जोडणारी. तेंव्हाच्या बंगाल प्रांताचा मोठा हिस्सा पाकिस्तानात निघून गेल्यामूळे हा भूभाग चिचोळा बनला.

हा शर्जील बिहारच्या जेहानाबादचा आहे. पुढे पटनाच्या सेंट झेवियर शाळेत तो शिकला. हा अतिशय हुशार विद्यार्थी आयआयटी पवई मधून कम्प्युटर इंजिनिअर बनला. देश विदेशात मोठ्या कंपन्यांत काम केल्यावर तो आता जेएनयुमध्ये पीएचडी करत आहे. म्हणजे अविकसित मागास भागातील अशिक्षीत मुसलमान तरूण  नौकर्‍या नसल्याने सामाजिक दृष्ट्या मागे पडल्याने अशी पावले उचलतात अशी जी एक बनावट गोष्ट सांगितली जात होती ती शर्जील सारख्या तरूणांनी खोटी ठरवली आहे.  इतके उच्च शिक्षण मिळालेला, देश विदेशात मोठ्या मोठ्या आस्थापनांमध्ये काम करण्याची संधी मिळालेला हा तरूण या वाटेने का गेला? 

त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यावर हा गायब झाला होता. 23 जानेवारी 2020 रोजी बिहारमध्ये गयेत एका सभेत तो भाषण करताना आढळला. तेंव्हा त्याने काय भाषण केले तेही उपलब्ध आहे. ‘मामला कोर्ट मे दर्ज है. मॅटर अर्जंट है. हमारे पास 4 हफ्ते याने 28 दिन है. अगले हेअरिंग तक सरकार को छोडो कोर्ट को नानी याद आ जायेगी.’ या भाषणांत तो मुसलमांनाना सरकार विरोधी न्यायालयाविरोधी भाषेतून उकसत आहे. 

शर्जीलची भाषणे आत्ताही युट्यूबवर उपलब्ध आहेत. विविध वाहिन्यांनी त्यावर तेंव्हा सविस्तर कार्यक्रम केले होते. आज जेंव्हा त्याला प्रत्यक्ष अटक करण्यात आली तेंव्हा मात्र पुरोगामी पत्रकारांनी शर्जीलला बातम्यातून गायब करून टाकले.

त्याच्यावर रितसर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. त्याच्या पहिल्या जाहिर भडकावू भाषणापासून ते आजपर्यंत जवळपास 8 महिने कालावधी लोटला आहे. पोलिसांनी सखोल तपास केला. त्याच्या विरोधात पुरावे गोळा केले. 

शर्जील, उमर खालीद, शेहला रशिद, कन्हैय्या कुमार, आयेशी घोष, सफुरा झरगर, देवांगना कालिता, नताशा नरवाल ही सगळी अतिशय बुद्धीमान उच्च शिक्षीत अशी तरूण मंडळी आहे. यांच्यावर रितसर खटले भरून कायदेशीर प्रक्रियेद्वारे शिक्षा कशी देता येईल हे प्रयत्न होत आहेत. आणि हे नेमके चालू असताना याला विरोध करणारे कोण आहेत? या मार्गात अडथळा कोण आणत आहेत? हे पाप करणारी जमात म्हणजे पुरोगामी. 

याच पठडीत एक नाव होते शाह फैजल. हा तरूण स्पर्धा परिक्षांत देशांत 2010 मध्ये पहिला आला. एक मुस्लिम तरूण आणि तोही परत कश्मिरचा म्हणून त्याचे विशेष कौतुक झाले. या तरूणाचे डोके कुणी फिरवले? याच पुरोगाम्यांनी. 2018 मध्ये हा तरूण सरकारी मोठ्या पदाची नौकरी सोडून मोदी भाजप सरकार विरोधी चळवळीत उतरला. 

देशाच्या हितासाठी कुठल्याही पक्षाचा सदस्य होवून रितसर निवडणुका लढवणे यात काहीच गैर नाही. उलट ते सामाजिक पातळीवर खुप काही करू पाहणार्‍यांनी केलेच पाहिजे. लोकशाही बळकटीसाठी सक्षम विरोधी पक्ष हवाच आहे. 

पुरोगामी बहकाव्यात येत त्याने राजकीय पक्ष स्थापन केला. कश्मिरमध्ये निवडणुका लढविण्याचे ठरविले. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकात त्याला काहीही प्रभाव पाडता आला नाही. पुढे 370 हटल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली त्यात शाह फैजल सारख्यांची नाव पुरती बुडून गेली. त्याला उकसवणारे सगळे कसे भंपक आहेत हे खुद्द त्यालाच उमजले. त्याने आपल्या पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तो आता परत सरकारी नौकरीत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यपालांच्या सल्लागार मंडळात त्याचे नाव येणार असल्याचे बोलले जात आहे.

ज्या शेहला रशिदचे नाव मोठ्या उमेदीने पुरोगामी गाजवत होते तीनेही राजकीय संन्यास घेतला आहे. गुजरातचा जिग्नेश मेवाणी आठवतो का? गुजरात विधानसभा निवडणुक काळात त्याला माध्यमांच्या वतीने गाजविण्यात आले होते. मोदींचे वय झाले तेंव्हा त्यांनी राजकीय सन्यास घेवून ‘हिमालय मे जाके हड्डीया गलानी चाहिये ’अशी भाषा त्याने वापरली होती. तो आता कुठे संन्यास घेवून बसला आहे? याच गुजरात मध्ये हार्दिक पटेल याला पटेल आरक्षण आंदोलनात मोठी प्रसिद्धी दिल्या गेली. तो आता कॉंग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बनला आहे. त्या सोबतच याच गुजरातमध्यले अजून एक नाव तेंव्हा चर्चेत आले होते. ते नाव म्हणजे अल्पेश ठाकुर. तो तर सरळ सरळ भाजपातच चालला गेला आहे. 

ज्या कन्हैय्या कुमारने कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार म्हणून बिहारमध्ये निवडणुक लढवली होती त्याच्या विरोधात लालू प्रसाद यादवांच्या पक्षाने मुस्लिम उमेदवार दिला होता. त्याला कन्हैय्यापेक्षा लाखभर मते जास्त मिळाली. भाजपचे मंत्री गिरीराज सिंह तर या दोघांच्या बेरजेपेक्षा जास्त मतांनी निवडुन आले. मग हे पाप पुरोगाम्यांचे नाही का?

आता सामान्य माणसांना असा प्रश्‍न पडतो हे जे भाजप मोदी विरोधी आघाडीचे स्टार म्हणून तयार करण्यात आलेले तरूण यांची अशी वाट का लागली? ज्या माध्यमांनी यांना गाजवले होते तीच माध्यमे आणि उठवळ पुरोगामी याला जबाबदार आहेत. ते आता अडचणीत आले आहेत. शर्जील इमामच्या बातम्या दाबून टाकल्या जात आहेत. कारण आपलेच पाप त्यातून उघड होणार हे पुरोगाम्यांच्या हातातील खेळणं बनलेल्या माध्यमांना माहित आहे. 

कायद्याची लढाई लढताना पुरोगामी मागे पडताना दिसत आहेत. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे शाहिनबाग प्रकरणापासून मोठ्या प्रमाणावर मोबाईल, सीसीटिव्ही कॅमेरे यांच्या आधाराने वस्तुनिष्ठ पुरावे गोळा करता आले आहेत. मोबाईलवरची भाषणे, व्हाटसअप वरील चॅटिंग या सगळ्यांतून मोठे धागेदोरे तपास यंत्रणांच्या हाती लागत आहेत. याचा विचारच कधी पुरोगाम्यांनी केला नव्हता. पूर्वीची आपल्या कृत्यांकडे काणा डोळा करणारी सुरक्षा यंत्रणा आता बदलली आहे. अर्बन नक्षल, पुरोगामी यांची सुटका व्हावी अशा कायदेशीर फटी यांना आता सापडत नाहीत.

शर्जीलच्या बातम्या पुरोगामी माध्यमांनी दाबल्या पण सोशल मिडियात त्यांना वाचा फुटत आहे. काही छोटे यु ट्यूब चॅनेल पुराव्यासह या बातम्या वाचकांसमोर आणत आहेत. इतरांना ‘गोदी’ मिडिया म्हणणारा पुरोगामी मिडिया स्वत:च  पुरोगाम्यांच्या अर्बन नक्षलींच्या टूकडे टूकडे गँगच्या ‘गोदीत’ कसा आणि केंव्हा जावून बसला हे त्यांनाही कळायला मार्ग नाही. हे तर इतके टोकाला गेले आहेत की सुशांतसिंह प्रकरणांतील संशयीत आरोपी रिया चक्रवर्ती हीची मुलाखत दाखणारे पत्रकारही यांना जवळचे वाटायला लागले आहेत. प्रशांत भुषण यांना सत्यासाठी लढणारा गांधींचा आधुनिक वाटतो आहे.  


          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    


4 comments:

  1. शर्जील आणि ढोंगी पुरोगाम्यांची चिरफाड करणारा उत्तम लेख.
    पुरोगामी भुताटकी दिवसेंदिवस आणखी उघडी पडते आहे.

    ReplyDelete
  2. अशा लोकांना केंद्र सरकारने कायदेशीर कार्यवाही केलेच पाहिजे शरजील असो किंवा कोणी असाे !

    ReplyDelete
  3. मोदी है तो मुमकिन है...

    ReplyDelete
  4. अतिरेरेक्यांचा बुरखा फाडणारा जबरदस्त लेख!

    ReplyDelete