काव्यतरंग, शुक्रवार 21 ऑगस्ट 2020 दै. दिव्यमराठी
आजीचे घड्याळ
आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक
देई ठेवुनि ते कुठें अजुनि हे नाही कुणा ठाउक
त्याची टिक् टिक् चालते न कधिंही, आहे मुके वाटते
किल्ली देई न त्यास ती कधिं, तरी ते सारखे चालते ॥
‘‘अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी,’’
जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावरी
साडेपांचहि वाजतात न कुठे तो हांक ये नेमकी
बाळा झांजर जाहले, आरवले तो कोंबडा, ऊठ की’’ ॥
आजीला बिलगुन ऐकत बसूं जेव्हां भुतांच्या कथा
जाई झोप उडून, रात्र किति हो ध्यानी न ये ऐकतां
‘‘अर्धी रात्र किं रे’’ म्हणे उलटली, ‘‘गोष्टी पुरे! जा पडा! ’’
लागे तो धिडधांग पर्वतिवरी वाजावया चौघडा ॥
सांगे वेळ, तशाच वार-तिथिही आजी घड्याळांतुनी
थंडी पाउस ऊनही कळतसे सारे तिला त्यांतूनी !
मौजेच असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले?
गाठोडे फडताळ शोधुनि तिचे आलों ! तरी ना मिळे ! ॥
-केशवकुमार (आठवणीतील कविता 1, पृ.15, प्रकाशक ‘आठवण’, आ.2008)
13 ऑगस्ट हा दिवस म्हणजे आचार्य अत्र्यांची 123 वी जयंती होती. वर्षभरातच त्यांच्या स्मृतीचा शतकोत्तर रौप्य महोत्सव सुरू होतो आहे. आचार्य प्र.के. अत्रे यांचा मराठी माणसाला त्यांच्या विविध पैलूंनी परिचय आहे. सिद्धहस्त लेखक, प्रभावी वक्ते, यशस्वी नाटककार, चित्रपट दिग्दर्शक निर्माते, ‘मराठा’ सारख्या लोकप्रिय दैनिकाचे संपादक मालक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील झुंझार नेते राजकारणी. पण कवी म्हणून त्यांची ओळख मात्र फारशी समोर येत नाही. अत्र्यांनी ‘केशवकुमार’ या नावाने कविता लिहील्या. तसेच अतिशय फर्मास अशी विडंबनेही लिहीली. ‘झेंडूची फुले’ या नावाने त्यांचा विडंबन कवितांचा संग्रह प्रसिद्ध आहे.
आता जसे ‘बालभारती’ अभ्यासक्रमाची पुस्तके प्रकाशीत करते तसे पूर्वी नसायचे. काही प्रकाशक चांगला मजकुर संपादीत करून ती पुस्तके शिक्षणखात्याकडून मंजूर करून घ्यायचे. नंतर ही पुस्तके शालेय अभ्यासासाठी लावली जायची. आचार्य अत्र्यांनी अशी शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके संपादीत केली. त्यांच्यातील शिक्षणतज्ज्ञाला लहान मुलांची मानसिकता चांगली समजत होती. या पुस्तकांत ज्या कविता असायच्या त्यांची निवड अतिशय अचूक केलेली असायची.
अत्र्यांनी आपण स्वत: संपादीत केलेल्या पूर्वीच्या अभ्यासक्रमांतील पुस्तकांत काही कविता लिहील्या आहेत. त्यातीलच ही एक सुंदर शार्दूलविक्रिडीत छंदातील कविता. मुळात आजी आणि नातवंडे यांचे एक अतिशय वेगळे वैशिष्ट्यपूर्ण नाते भारतीय कुटूंबसंस्थेत आहे. घराचा कारभार सांभाळणारी, सगळ्यांना माया लावणारी, घर सावरून धरणारा बळकट खांब म्हणजेच आजी. हीच्या भोवतीच सगळा गोतावळा जमा होता.
साधारणत: 1920 च्या काळातील ही कविता. तेंव्हा आताच्यासारखी घड्याळं सार्वत्रिक झाली नव्हती. मनगटी घड्याळं अजून आली नव्हती. लहान मुले आजीला दिवसभर वेळ विचारायची. पहाटे अभ्यासाला उठवणे, शाळेची वेळ होताच आठवण करून देणे, संध्याकाळी खेळात गुंगल्यावर अभ्यासासाठी घरात बोलावणे आणि रात्री गोष्टी सांगून झोपवणे या दिवसभराच्या सर्व प्रहरात ही आजी नातवंडांना वेळेची आठवण करून देई.
एकीकडून अत्र्यांनी आपण कसे काळाशी जोडले गेलो आहोत हे सांगताना आजीशीही त्यासारखेच जोडले गेलो आहोत असंही संागितलं आहे. शांता शेळक्यांनी आजीसाठी नावतंडे म्हणजे ‘दुधावरची साय’ असे वर्णन केले आहे. या आजीलाही ही नातवंडे परंमप्रिय आहेत. स्वयंपाक आणि घरच्या रगाड्यात आई गुंतलेली असते. वडिल बाहेरचे व्याप सांभाळत असतात. आजोबांचा एक धाक असतो. मग मुलांच्या वाट्याला येते ती हक्काची आज्जीच.
ही आज्जी संध्याकाळी मुलांना खेळातून बोलावून घेते. देवासमोर बसवून त्यांना स्त्रोत्र श्लोक पाढे म्हणावयास लावते. त्यांचा अभ्यास घेते. तान्ह्या लहान मुलास मांडीवर घेवून जोजवते. बी. रघुनाथ यांच्या ‘सांज’ या कवितेत या आजीचे म्हणजेच माउलीचे वर्णन मोठे सुंदर आलेले आहे
माऊलीच्या वातीतून सांज तेज ल्याली
माऊलीच्या गीतातून सांज भाव प्याली
माऊलीच्या अंकावरी सांज मुल झाली
मुलासाठी निदसुरी सांज भूल झाली
ही आजी मुलांना जेवणं खाणं झाल्यावर गोधडीत पहुडतांना गोष्टी सांगते. गोधडीच्या ऊबेसोबतच आजीच्या गोष्ट सांगणार्या वेल्हाळ आवाजाचीही एक ऊब नातवंडांच्या भोवती पसरते. भूताखेताच्या गोष्टी ऐकताना झोप कशी उडून जाते आणि मग आजी दटावते मध्यरात्र झाली आहे. पहाटे शाळा आहे आता झोपा.
सुदर्शन फाकिर यांच्या एका कवितेत आजीच्या गोष्टींचा संदर्भ फार सुरेख आला आहे. जगजित-चित्रा सिंग यांनी गायलेलं हे गाणं अतिशय प्रसिद्ध आहे. ‘ये दौलत भी ले लो ये शोहरत भी ले लो’. यातील एक कडवं असं आहे
मुहल्ले की सबसे निशानी पुरानी
वो बुढिया जिसे बच्चे केहते थे नानी
वो नानी के बातों मे परियां डेरा
वो चेहरे की झुरियों मे सदियां का फेरा
भुलाये नही भूल सकता है कोई
वो छोटीसी राते वो लंबी कहानी
आपल्या कुटूंबव्यवस्थेचा कणा असणारी अशी आजी. या आजीचा घड्याळाशी संबंध जोडताना अत्र्यांनी नकळतपणे काळाला बांधून ठेवणारी किंवा काळावर विजय मिळवणारी ती आजी अशी पण एक व्याख्या करून ठेवली आहे. गावाकडच्या भाषेत चिवटपणे परिस्थितीशी दोन हात करत जगणार्या लोकांना ‘दु:ख दळून खाणारी माणसे’ म्हटलं जातं. तशी ही आजी काळाला कनवटीला बांधून ठेवणारी आहे.
गो.नि.दांडेकरांची ‘पडघवली’, श्री.ना.पेंडश्यांची ‘रथचक्र’, अरूण साधूंची ‘मुखवटा’ या कादंबर्या आणि महेश एलकुंचवारांचे नाटक ‘वाडा चिरेबंदी’ या महान कलाकृतींमधून ही आजी मध्यवर्ती पात्र म्हणून ताठपणे उभी राहते. महाभारताचा बारीक विचार केल्यास आधी सत्यवती आणि मग कुंती या दोन आज्ज्याच सर्व कथेच्या केंद्रभागी आहेत किंबहुना सर्व महाभारत त्यांच्यामुळेच घडले हे लक्षात येते.
(लेखासोबत वापरलेले चित्र जून्या पाठ्यपुस्तकांतील आहे. हे चित्र सुप्रसिद्ध चित्रकार दलाल यांनी काढलेले आहे. आठवणीतील कविता या सुंदर संपादीत पुस्तकांत अशी काही जूनी अभ्यासक्रमांतील चित्रे कवितेसोबत दिलेली आहे. या संपादकांचे, प्रकाशकाचे, चित्रकाराचे मन:पूर्वक धन्यवाद.)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
रम्य आठवणी 🌹💐🌸
ReplyDeleteआजीचे घड्याळ ही कविता आम्हाला नव्हती पण माझ्या मोठ्या भावाला होती. त्यातील दलाल यांचे चित्र आणि कानात रूतून बसलेलं शार्दुलविक्रीडीत जसेच्या तसे आठवते.
ReplyDeleteधन्यवाद!
अतिशय सुंदर...
ReplyDeleteखूप छान असेच चांगल्या कविता पाठवत रहा.......... 👍👍👍👍👍
ReplyDeleteखूप छान वाटले!👍
ReplyDeleteह्या कवितेची एकूण सहा कडवी आहेत!
[ निरनिराळ्या वेळी आपण काय करावे हे आजी नेहमी सांगते. तिला या वेळ नेमक्या कशा समजतात, याचे तिच्या नातवाला मोठे आश्चर्य वाटते, तो तिचे घड्याळ शोधून पाहतो. शार्दूलविक्रिडीत छंदातील कविता]
आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक,
देई ठेवुनि ते कुठे अजुनि हे नाही कुणा ठाउक; त्याची टिकू टिक् चालते न कधिही, आहे मुके वाटते;
किल्ली देइ न त्यास ती कधि, तरी ते सारखे चालते ! १
" अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी — "
जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावरी.
साडेपाचहि वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी, 'बाळा,
झांजर जाहले, अरवला तो कोंबडा, ऊठ की !" २
ताईची करण्या गम्मत, तसे बाळूसवे भांडता,
जाई संपूनिया सकाळ न मुळी पत्ता कधी लागता !
" आली ओटिवरी उन्हे बघ !" म्हणे आजी, “दहा वाजले."
"जा जा लौकर." कानि तो घणघणा घंटाध्वनी आदळे. ३
खेळाच्या अगदी भरात गढुनी जाता अम्ही अंगणी,
हो केव्हा तिनिसांज ते न समजे, आजी परी आतुनी
बोले, “ खेळ पुरे, घरात परता झाली दिवेलागण, ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येउन ! ४
आजीला बिलगून ऐकत बसू जेव्हा भुतांच्या कथा,
जाई झोप उडून, रात्र किति हो ध्यानी न ये ऐकता,
"अर्धी रात्र कि रे" म्हणे “ उलटली, गोटी पुरे, जा पडा.
लागे तो धिडधांग पर्वतिवरी वाजावया चौघडा ! ५
सांगे वेळ, तशाच वार तिथिही आजी घड्याळातुनी,
थंडी, पाउस, ऊनही कळतसे सारे तिला त्यातुनी.
ऐसे चित्र घड्याळ ते दडवुनी कोठे तिने ठेविले ? गाठोडे, फडताळ शोधुनिं तिचे आलो, तरी ना मिळे ! ६
- केशवकुमार (प्र. के. अत्रे)
झांजर - पहाट.
चित्र - चमत्कारिक, विचित्र.