उरूस, 27 ऑगस्ट 2020
औरंगाबाद लेण्याजवळ उगम पावणारी खाम नदी मकबर्यापासून पाणचक्की जवळून वहात पूढे शहराबाहेर पडते. वाळूज जवळून ही नदी पुढे शेंदूरवादा गावा जवळ जाते (औरंगाबादपासून अंतर 30 किमी. बीडकिनजवळूनही या गावाला जायला चांगला रस्ता आहे). या गावी नदीच्या काठावर शेंदूरवदन गणेशाचे सुंदर दगडी अष्टकोनी छोटेसे मंदिर आहे. मंदिराला छानसा दगडी चौथरा आहे. तिथेच एक दगडी कुंडही आहे.
हे मंदिर जागृत गणेशस्थळ म्हणून परिसरांत प्रसिद्ध आहे. पण मंदिराला लागूनच संतकवी मध्वमुनीश्वरांची (जन्म 1640-मृत्यू 1731) समाधी आहे त्याची फारशी माहिती कुणाला नाही. मूळचे नाशिकचे असलेले त्र्यंबक नारायण हे औरंगाबादला आले. या ठिकाणी त्यांना योगानंद मौनपुरी, निपट निरंजन, अमृतराय यांचा सहवास लाभला. अमृतराय यांनी तर त्यांचे पुढे शिष्यत्वच स्विकारले. मध्वमुनीश्वरांनी शेंदूरवादा गावी गणेश मंदिराजवळ एका अश्वत्थ वृक्षाखाली मुक्काम केला. तिथेच आजचा मध्वमुनींचा आश्रम आहे. त्यांची समाधी आहे. जहागिरदार कुटूंबाच्या मालकीची ही जागा त्यांनी एक आश्रम म्हणून सुंदर बांधून काढली. भक्कम दगडी कमानी ओवर्या असलेली ही सुंदर इमारत वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना आहे.
ज्या अश्वत्थ वृक्षाखाली मध्वमुनीश्वरांनी मुक्काम केला त्या वृक्षाला चांगला दगडी चौथरा बांधला असून त्या भोवती भक्कम दगडी कमानींच्या ओवर्यांची रचना केलेली आहे.
पाच कमानींच्या दर्शनी ओवर्या या वास्तूचे खरे सौंदर्य दर्शवतात. समोर खुले पटांगण असून त्याच्या चारही बाजू बंदिस्त आहेत. एका बाजूला ओवर्या आजही सुस्थितीत आहे. त्याखाली तळघरही आहे.
दर्शनी भिंतीला दोन मोठे बुरूज आहेत. त्यांची दुरूस्तीही करण्यात आली आहे. गणपती मंदिराला लागून असलेली ही देखणी वास्तू लगेच नजरेला भरते.
या आश्रमाला लागूनच हनुमानाचे छोटे दगडी मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला कळस नाही. या मंदिराला लागूनच एक मस्जिद आहे. तिथे मध्वमुनीश्वरांचे शिष्य सुभानशा यांची कबर आहे. या सुफी शिष्याला मध्वमुनीश्वरांनी आपल्या जवळ जागा दिली. मध्वमुनीश्वरांच्या समाधीजवळही सुभानशांची समाधी प्रतिकरूपात आहे.
शेंदूरवादा गावात अजून एक महत्त्वाची मुर्ती आहे. मध्वमुनीश्वरांनी आयुष्यभर नियमित पंढरपुरची वारी केली. ते जेंव्हा थकले आणि वारी थांबली तेंव्हा त्यांनी व्याकुळ होवून विठ्ठलाला पत्र लिहीले. विठ्ठलाने त्यांना सांगितले की तू माझ्यापाशी येवू नकोस. मीच तुझ्यापाशी येतो. आणि तिथे एक विठ्ठलमुर्ती प्रकट झाली. ही विठ्ठलमुर्ती गावातच एका वाड्यात स्थापन केलेली आहे. इतकी सुंदर विठ्ठल मुर्ती अतिशय क्वचित पहायला मिळते. तुकाराम महाराजांनी याच मुर्तीकडे पाहून ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा’ हा अभंग लिहीला असावा. मूर्तीचे पाय तर इतके देखणे आहेत की संतांना विठ्ठल चरणाचे इतके का आकर्षण असते ते लक्षात येते. या मूर्तीच्या शेजारी गरूडाचे आणि हनुमानाच्या देखण्या सुबक मुर्ती आहेत. विठ्ठल हे विष्णूचेच रूप आहे. पण विठ्ठल मंदिरात सहसा विष्णुचे वाहन असलेला गरूड आढळत नाही. पंढरपुरला गरूड खांब आहे. पण गरूडाची मुर्ती नाही (कुठे असल्यास अभ्यासकांनी सांगावे). उत्सव काळात ही मुर्ती मध्वमुनींच्या आश्रमात आणली जाते.
हे गाव गणपतीसाठी प्रसिद्ध आहे. ते मंदिर छोटेखानी अष्टकोनी असून त्याचे वैशिष्ट्य म्हणजे आठही दिशांना त्याला कमानी आहेत. आता इथे जाळी बसवली आहे पण मुळचे मंदिर आठही दिशांना खुले असे आहे. गणपतीची मुर्ती शेंदूर फासलेली पुरातन असून वालूकामय दगडाची आहे. सिंधूसुराचा वध गणेशाने केला व त्याचे रक्त गणेशाच्या तोंडावर उडाल्याने तो लाल भासू लागला. त्यामुळे त्याला सिंधूरवदन असे म्हटल्या जाते. अशी एक पुराणातील अख्यायिका सांगितली जाते. या सिंधूरवदन गणेशामुळेच गावाला शेंदूरवादा असे नाव पडले असावे. सिंधूरासुराचा वध केला म्हणूनही नावाची व्युत्पत्ती शेंदूरवादा झाली असावी.
गावात भटकत असताना एका पडक्या वाड्याचा दरवाजा आणि त्याची कोरीव दगडी चौकट दृष्टीस पडली. चौकटीवर दोन बाजूला सुंदर फुल कोरले आहे. जे तसे सर्वत्रच आढळते. पण या फुलावर बसलेला एक पोपट कोरलेला आढळला. एरव्ही समतोल अशा भौमितिक रचना सहसा आढळतात. ज्याचे एक ठराविक सुत्र असते. पण पोपटासारखा आकार कोरायचा असेल तर ते कसब कारागिराचे नसून कलाकाराचेच असावे लागते.
मध्वमुनीश्वरांना संगीताची खुप चंागली जाण होती. त्यांची पदे आजही लोकांच्या ओठी आहेत. ‘उद्धवा शांतवन कर जा त्या गोकुळवासी जनांचे’ ही त्यांची रचना पूर्वी अभ्यासक्रमात असायची. ‘पावन तुझे नीर गंगे, पावन तुझे नीर’ ही त्यांची रचना अतिशय गोड आवाजात आजही गायली जाते.
मध्वमुनीश्वरांमुळे हे गाव संगीत साहित्य संस्कृतीचे हे केंद्र बनले होते. गणेश स्थानामुळे एक अध्यात्मिक धार्मिक अधिष्ठान या गावाला लाभले आहे. अशा छोट्या गावांनी आपल्या परंपरा जतन करत सांस्कृतिकदृष्ट्या फार मोठे काम केले आहे. हौशी पर्यटकांनी अशा जागी आवर्जून गेले पाहिजे. ही सांस्कृतिक केंद्रं परत गजबजली पाहिजेत.
(छायाचित्रांसाठी सौजन्य आकाश धुमणे, व्हिन्सेंट पास्किलीनी)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
खूप छान
ReplyDeleteसुरेख वर्णन 🌹🙏
ReplyDeleteसुंदर माहिती एक वेळ भेट देण्यासाठी जरुर जावे असे ठीकाण.
ReplyDeleteसुंदर माहिती एक वेळ भेट देण्यासाठी जरुर जावे असे ठीकाण.
ReplyDeleteभेट देण्या योग्य ठिकाण आहे
ReplyDeleteमाहिती अत्यंत छान आहे.
गावातल्या लोकांना ही त्यांंचा गाव कळण्यास उपयुक्त
आपले लिखाण वाचनिय असते च
भेट देण्या योग्य ठिकाण आहे
ReplyDeleteमाहिती अत्यंत छान आहे.
गावातल्या लोकांना ही त्यांंचा गाव कळण्यास उपयुक्त
आपले लिखाण वाचनिय असते च
छान माहिती, छान ठिकाण ! ह्या लॉक डाऊन मध्ये प्रवास आपल्या धाडशी वृत्तीला नमस्कार
ReplyDeleteजवळ असलेल्या गावाचे महत्त्व समजले.
ReplyDeleteVery good and lucid information. I am now motivated to tour this place.
ReplyDeleteखुपच छान... नविन माहिती मिळाली. धन्यवाद सर.
ReplyDeleteऐतिहासिक,समाधी मंदिर, उत्कृष्ठ बांधकाम
ReplyDeleteखुप छान माहिती 👌👌👌🙏🙏🙏
ReplyDelete