Wednesday, August 5, 2020

राममंदिराच्या धामधुमीत सीतामंदिराचे विस्मरण !


उरूस, 5 ऑगस्ट 2020 
 
सीतेची एक दंतकथा सांगीतली जाते. गरोदर असताना वनवासी सीता विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात रावेरी येथे आली होती. तीने लापशीसाठी पसाभर गहू गावात मागीतले. पण गावात कुणीच तीला गहू दिले नाही. सीतेने गावाला शाप दिला की या परिसरात इथून पुढे गहूच पीकणार नाहीत. 

अशा दंतकथांचा खरेखोटेपणा कसा तपासणार? पण दोन गोष्टी अगदी प्राचीन काळापासून या गावात घडल्या. एक तर खरेच या परिसरांत गहू पीकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सीतेचे एक प्राचीन मंदिर इथे आहे. पुढे गावकर्‍यांनी इ.स. 2001 मध्ये देवीची ओटी भरली माफी मागीतली. मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे कबुल केले व मगच गहु पेरायला सुरवात केली. त्याला कारण घडले ते शेतकरी संघटनेचे महिला आंदोलन.

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी हे विदर्भात दौर्‍यावर असताना त्यांना ही कथा समजली. त्या गावात ते गेले. स्त्री शक्तीचे प्रतिक म्हणून देवी सीतेचे मंदिर आहे. तेंव्हा या मंदिराचा जिर्णाद्धार झाला पाहिजे. शेतकरी महिला आघाडीचे मोठे अधिवेशन 1986 ला चांदवड येथे संपन्न झाले होते. एकाचवेळी इतक्या महिला गोळा होण्याची देशाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ. 

रावेरी या गावी नोव्हेंबर 2001 मध्ये विशेष महिला अधिवेशन शेतकरी संघटनेच्यावतीने घेण्यात आले. याच वेळी रावेरी येथील सीतामंदिराचा जिर्णाद्धार करण्याचा ठराव करण्यात आला. मा. शरद जोशी यांनी या मंदिरासाठी 10 लाखाची देणगी दिली. गावकरी आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वेच्छानिधीतून बाकी रक्कम गोळा केली.
2 ऑक्टोबर 2010 ला शरद जोशींच्या 75 च्या निमित्त एक मोठा महिला मेळावा रावेरी येथेच घेण्यात आला. तेंव्हा सीता मंदिराचे काम पूर्ण झाले नव्हते. मंदिराचे काम पूर्ण झाल्याशिवाय मी गावात पाय ठेवणार नाही असे शरद जोशींनी सांगितले. त्यांची ही भावना लक्षात घेवून कार्यकर्त्ये/गावकरी मोठ्या जबाबदारीने कामाला लागले. वर्षभरातच गांधी जयंतीच्या निमित्ताने 2 ऑक्टोबर 2011 ला या सीतामंदिराचा जिर्णोद्धार पूर्ण झाला. शरद जोशी यांच्याच हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले.

आज राममंदिराची धामधुम सुरू झाली आहे. पण या सीतामंदिराची मात्र फारशी कुणाला आठवण नाही. विदर्भातील बायाबापड्या मात्र या रावेरीच्या सीतामाईला विसरल्या नाहीत. आजही या बायाबापड्या या मंदिराला आवर्जून भेट देतात.  आयोध्येतील भव्य राममंदिराचे काम सुरू झाले आहे. येत्या काही दिवसांत काम पूर्ण होवून भाविकांचा सागर तेथे लोटेल. अपेक्षा आहे की रामा बाबत ज्या ज्या पवित्र स्थळांचा संदर्भ यात्रेसाठी घेतला जातो त्यात रावेरीचाही समावेश करण्यात यावा. या गावाला जाणार्‍या रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी. तसेच मंदिरापर्यंत जाणारा चांगला मोठा रस्ता तयार करण्यात यावा. 

सीता ही केवळ रामाची पत्नी होते असे नाही तर ती भूमीकन्या होती. त्यामुळे सीता ही केवळ पुराणातील एक व्यक्तिरेखा उरत नसून कृषीप्रधान देशात तीला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते.

गीतरामायणात गदिमांनी ‘आकाशाशी जडले नाते धरती मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे’ असे शब्द वापरले आहेत ते संयुक्तीक आहेत. आभाळातील पाऊस आणि धरती माता यांच्या संयोगातून शेतीला सुरवात झाली. मारून खाणारा शिकारी मानव पेरून खाणारा बनला. आणि इथून मानवी संस्कृतीची सुरवात झाली. तेंव्हा सीतेचे हे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. आजही शेतीत सर्वात जास्त मेहनत शेतकर्‍याची बायकोच करते. 

जात्यावरच्या ओव्यांमधूनही सीतेची वेदना तिची झालेली उपेक्षा हजारो वर्षांपासून आयाबायांनी स्पष्टपणे मांडून ठेवली आहे. 

राम म्हणून राम नाही सीतेच्या तोलाचा
सीतामाई हीरकणी राम हलक्या दिलाचा

अशी एक ओवीच आहे. डॉ. ना.गो. नांदापूरकरांनी गोदाकाठी जात्यावरच्या ओव्या गोळाकरून संपूर्ण रामकथाच तयार  सिद्ध करून दाखवली आहे. जगातील हे एकमेव महाकाव्य आहे की जे संपूर्णपणे लोकसाहित्यातून गोळा करत सिद्ध केल्या गेले. या स्त्रीरचित रामकथेत सीतेबाबत एक मोठी सुंदर ओवी आहे

धनुष्याचा घोडा जनकीने केला
जनका अंगणी असा खेळविला

ज्या धनुष्याला बाण लावणे मुश्किल असे धनुष्य सीता लहानपणी घोडा घोडा म्हणून जनकाच्या अंगणी खेळवीत होती. सीतेची उपेक्षा जन्मापासून झाली. अगदी रामराज्य सुरू झाल्यावरही सीतेला वनवास भोगावा लागला. आणि शेवटी भूमीच्या पोटात ती गडप झाली. भूमीतूनच आली आणि भूमीतच समाविष्ट झाली. सीता ही उपेक्षा झेलून कुटूंब सावरून धरणार्‍या भारतीय स्त्रीचे प्रतिक आहे. पंढरपुरलाही विठ्ठलाची मुर्ती एकटीच आहे. रूक्मिणी बाजूला नाही. 

बाईची उपेक्षा बायकांनी जात्यावरच्या ओव्यांत आर्तपणे मांडली आहे

बाईचा जलम जसा गांजराचा वाफा
येड्या तूम्ही मायबापा जल्मा घालून काय नफा
बाईचा जलम कुनी घातला येड्यानं
परायच्या घरी बैल राबतो भाड्यानं
बाईचा जलम जशी फुटणारी लाही
खाणारा म्हनतो कशी भाजलीच नाही

अशा खुप ओव्या आहेत. इंद्रजीत भालेराव यांनी आपल्या परिसरांतील अशा काही ओव्या गोळा केल्या आहेत.त्यात हे स्त्रीजन्माचे दु:ख प्रकट झाले आहे.

आज राममंदिराच्या उभारणीची सुरवात होते आहे. या मुहूर्तावर सीतेच्या उपेक्षेचा म्हणजेच भारतीय स्त्रीच्या उपेक्षेचा अंत व्हावा ही अपेक्षा. महाराष्ट्रातील लोकांनी विनंती यवतमाळच्या निसर्गसंपन्न अशा डोंगराळ भागातील सीतामाईच्या रावेरी येथील मंदिराला जरूर भेट द्या.

(रावेरी सीतामंदिर छायाचित्र : सौजन्य अविनाश दुधे यांचा लेख दै. दिव्य मराठी दि. 5 ऑगस्ट 2020)

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    

6 comments:

  1. चांगली माहिती,🌹🙏

    ReplyDelete
  2. नवीन माहितीसह महिलांच्या भावनांचा ऊल्लेख .... छान .👌👌

    ReplyDelete
  3. रामाचे भक्त पक्के रामाचे भक्त आहेत.
    त्यांना भूमिकन्या सीतामाई शी काही देणं-घेणं नाही.

    ReplyDelete
  4. सुंदर लेख नविन माहिती सीता मंदिर संदर्भात.

    ReplyDelete
  5. सुंदर लेख नविन माहिती सीता मंदिर संदर्भात.

    ReplyDelete
  6. श्रीकांत, सुंदर लेख. धन्यवाद .
    आपल्या समाजात , धर्मात पार्वती, लक्ष्मी व सारस्वती चे महत्त्व बरोबरीचे आहे. राम , सीतेशिवाय पूर्ण होणे शक्य नाही. मागील ५०० वर्षांतिल राजकीय परिस्थीती मुळे , स्री घरात असल्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्यात. आता पुन्हा घरात, बाहेर महिला बरोबरीने दिसत आहेत. शेतात तर पुरुषांच्या पुढे आहेत. स्री , घर एकत्र टिकावे म्हणून मागे राहते (आपल्याला उपेक्षा वाटते) काही वर्षात बदल दिसेल.
    पुन्हा एकदा चांगली माहिती शेअर केल्याबद्दल धन्यवाद

    ReplyDelete