Friday, July 24, 2020

गायी पाण्यावर काय म्हणूनी आल्या !


काव्यतरंग, शुक्रवार 24 जूलै 2020 दै. दिव्यमराठी

गायी पाण्यावर काय म्हणुनि आल्या?
कां ग गंगायमुनाहि या मिळाल्या?
उभय पितरांच्या चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला?

उष्ण वारे वाहती नासिकांत
गुलाबांला सुकविती कश्मिरांत
नंदनांतिल हलविती वल्लरीला
कोण माझ्या बोलले छबेलीला?

पंकसपर्के कमळ का भिकारी?
धूलिसंसर्गे रत्न का भिकारी?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी
कशी तूंही मग मजमुळे भिकारी?

देव देतो सद्गुणी बालकांना!
काय म्हणूनी आम्हांस करंट्यांना?
लांब त्याच्या गावांस जाउनीया
गूढ घेतो हे त्यांस पुसोनीया

‘‘गांवी जातो’’ ऐकतां त्याच काली
पार बदलुनि ती बालसृष्टी गेली
गळां घालुनि करपाश रेशमाचा
वदे ‘‘येते मी’’ पोर अज्ञवाचा!

-बी. (फुलांची ओंजळ- ‘बी’ कवींची समग्र कविता, पृ. 58  प्रकाशक कॉन्टिनेन्टल प्रकाशन, आ.1986)

शाळा बंद असल्याने सध्या ऑनलाईन शिक्षण चालू आहे. मुलांना त्यासाठी लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाईल अशा सुविधा हव्या आहेत. मुख्यत: नेट कनेक्शनची आवश्यकता आहे. जिथे हे नाही तिथे शिक्षणाची मोठी हेळसंाड चालू आहे. अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थ्याला लॅपटॉप घेवून देता आला नाही म्हणून शेतकरी बापाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

ही कविता साधारणत: 1920 च्या सुमारास लिहील्या गेली. आज 100 वर्षांनी विद्यार्थ्यांत आर्थिक असमतोल दिसून त्यातून समस्या उत्पन्न होत आहेत. तेंव्हा काय वातावरण असेल?

आपल्या सोबत शिकणार्‍या इतर मुली चांगले कपडे दागिने घालून शाळेत येतात. या मुलीच्या अंगावर अगदी साधे कपडे असतात. हीला गरिब म्हणून भिकारी म्हणून त्या चिडवतात आणि या मुलीला रडू येते. तिचे हमसून हमसून रडणे पाहून बापाला कळत नाही काय करावे. गरिबी हा काही तिचा दोष नाही. दोन्ही डोळ्यांतून पाण्याच्या धारा वाहत असल्याने ‘गंगा यमुना’ असा शब्द वापरला आहे. नाकांतून उष्ण श्‍वास वाहत आहेत. त्यामुळे गुलाबासारखे ओठ सुकून गेले आहेत.

कवितेचा आशय खुप साधा आहे. हा गरिब बाप मुलीला धुळीत सापडले म्हणून रत्न भिकारी नसते, चिखलात उगवले म्हणून कमळ भिकारी होते का? असे सांगत माझ्या गरिबाच्या पोटी जन्माला आली असली तरी तू एक रत्न आहे हे आपल्या लाडकीला समजावून सांगतो. शेवटी अशी सद्गुणी गोड बालके आमच्या सारख्यांच्या पोटी का जन्माला घालतोस? आम्हाला त्यांचे लाड पुरवता येत नाहीत अशी तक्रार देवाकडे करतो. आणि मुलीला सांगतो की मी देवाकडे जावून हा जाब देवाला विचारतो.

देवाच्या ‘गावाकडे’ जाण्याची गोष्ट काढताच ती मुलगी एकदम दचकते. आपले रडणे थांबवून बापाच्या गळ्याभोवती आपल्या रेशमी हाताचा विळखा घालते. मी पण तूमच्यासोबत येते असे अज्ञपणे बापाला सांगते. असा कवितेचा गोड शेवट आहे. मूळ 25 कडव्यांची असलेली ही कविता. यातील केवळ 5 कडवेच इथे घेतले आहेत.

बाप आणि मुलगी असा नातेबंध आपल्याकडे कवितेत फारसा विचारात घेतला गेलेला नाही. 1920 साली शिकणारी मुलगी आणि तिचा बाप यावर लिहीणे म्हणजे खरेच कमाल आहे. तेंव्हा मुळात शिक्षणाचाच फारसा प्रसार झाला नव्हता. आणि मुलींचे शिक्षण तर अजूनच दूर. अशा काळातही एक कवी या विषयावर गोड कविता लिहीतो.

बरं यात कुठेही मुलींचे शिक्षण, त्याचे महत्त्व असा आव आणत पांडित्य सांगितलेले नाही. गरिब बाप मुलीचे लाड पुरवू शकत नाही पण तिला शिकवतो ही एक छोटी पण महत्त्वाची बाब कवितेतून सौंदर्यपूर्ण रित्या आली आहे.
‘बी. रघुनाथ’ ज्यांच्या नावाचा गोंधळ नेहमी कवी ‘बी’ यांच्याशी केला जातो त्यांनीही एक फार गोड कविता मुलीवर लिहीली आहे.

चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली
पंढरी ही ओसरीची आज ओस झाली
कोनाड्यात उमडून पडे घरकुल
आज सत्य कळो येई दाटीमुटीतील
काही दिसे भरलेले रित्या बोळक्यात
गवसले आजवर जे न रांजणात

अंगणात बागडणारी, ओसरीत खेळणारी मुलगी सासरी निघून गेली आहे. तिचे खेळणे रक्तचंदनाची बाहुली म्हणजेच विठोबाची मुर्ती एकटी पडून आहे. तिच्या खेळण्यातल्या संक्रांतीच्या बोळक्यात खाउ शिल्लक आहे. असे एक गोड वर्णन बी. रघुनाथ यांनी केले आहे. या शिवाय बाप मुलगी या नात्यांवर फारसे त्या काळात आले नाही. आई मुलगा यांच्यावर आले आहे.

कवी ‘बी’ यांचे पूर्ण नाव नारायण मुरलीधर गुप्ते. यांचा जन्म 1872 साली बुलढाणा जिल्ह्यात मलकापुरला झाला. गुप्ते यांचे वडिल यवतमाळ येथे वकिल होते. वडिलांच्या निधनानंतर शालेय शिक्षण अर्धवट सोडून कवी बी यांनी सरकारी खात्यात कारकुनीची नौकरी सुरू केली. वाशीम, मूर्तिजापूर, अकोला येथे त्यांना या निमित्त रहावे लागले. आपले बहुतांश आयुष्य बी कवींनी अकोला येथेच व्यतित केले. 

30 ऑगस्ट 1947 ला या कवीचे निधन झाले. त्यांच्या कवितांचा संग्रह ‘फुलांची ओंजळ’ नावाने 1934 मध्ये प्रकाशीत झाला होता. त्याला आचार्य प्र.के.अत्रे यांनी सुंदर सविस्तर प्रस्तावना लिहीली आहे. कमळा नावाने बी यांनी थोरांतांच्या मुलीवर एक सुंदर कविता लिहीली. शिवकालीन घटनेवरील ही कविता अतियश सुंदर अशी आहे. शिवाय बी कवींचे ‘चाफा बोलेना’ हे गाणे अतिशय गाजलेले आहे. त्यांची ‘डंका’ नावाची कविता पूर्वी अभ्यासाला होती. आचार्य अत्रे यांनी बी यांच्यावर लिहीताना असं म्हटलं आहे,

‘.. बी कवींची कविता ही सोन्याच्या साखळ्या पायांत घालून संगमरवरी जिन्यावरून उतरणारी एखाद्या  राजघराण्यांतील तेजस्वी राजकन्या आहे..’

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

12 comments:

  1. खुप सुंदर,,
    ह्रदयस्पर्शी 🌹🌹🙏

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर.मस्त.

    ReplyDelete
  3. खूप छान लिहिलंय.. जुन्या काळातील अवीट गोडीची रचना..

    ReplyDelete
  4. बाप लेकीचे नाते. खूप सुंदर वर्णन केले आहे. बापाला लेकीची माया आणि बाप देवाकडे जातो म्हणताच लेकीने बापाच्या गळ्याला मिठी मारून मीही येते म्हणणे हृदय पिळवटून टाकते. खूपच छान. कविता आणि विश्लेषण.

    ReplyDelete
  5. गाई पाण्यावर काय म्हणूनी आल्या....सदर कविता आम्हाला सहाव्या किंवा सातव्या वर्गात मराठीच्या त्या काळच्या आभ्यास क्रमात होती.त्या काळी आम्ही वर्गात समूहाने गायचो.कविता आठवते कवि बी हे त्यांचे टोपण नांव ही चांगलेच स्मरणात आहे.कवि बी यांचे पुर्ण नांव आठवायचे नाही.आपण जुन्या कवितेची सार्थ आठवण करुन दिलीत.त्या कवितेच्या आशयाच लपलेल्या बापाच्या दारीद्र्याची तीव्रता आपण सहज मांडलीत.आपले कौतुक करावे तेवढे कमी आहे.धन्यवाद.

    ReplyDelete
  6. मला आठवलं बापाने रडणाऱ्या मुलीला कडेवर उचलून धरलेले चित्र होते पाठ्यपुस्तकात..
    सुंदर कविता आणि सुंदर लेखन.

    ReplyDelete
  7. तुमचे लिखाण वाचनिय असते. फारसं सातत्याने आणि चौफेर वाचन नसणा-यांना वेगळेच पर्स्पेक्टिव्ह मिळते. उदा. बाबा आमटे यांच्यावरील लेख.

    ReplyDelete
  8. ऐसे काव्य पुन्हा होणे नाही

    ReplyDelete