Tuesday, July 21, 2020

राहूल गांधींचे देशविरोधी ट्विट


उरूस, 21 जूलै 2020 

राहूल गांधी यांचे ट्विट ते स्वत:ही वाचत नसतील याची पूर्ण खात्री आहे. त्यांच्या ट्विटची दखल घेण्याची गरज त्यांनी स्वत:च संपवून टाकली आहे. खरंचच त्यांच्या ट्विटमध्ये काहीएक मुद्दा असला असता तरी त्यासाठी त्यांचे ट्विटर हाताळणारे निखील अल्वा (कॉंग्रेसनेत्या मार्गारेट अल्वा यांचे चिरंजीव) यांच्याकडे विचारपूस करता आली असती. त्यांच्याशी काही वाद करता आला असता.

राहूल गांधी यांचे ताजे ट्विट आणि त्यासोबतचा त्यांचा व्हिडिओ यात काही देशविरोधी बाबी आल्याने तेवढ्यापुरता त्याचा विचार करावा लागेल. इच्छा नसताना त्याची दखल घेणे भाग आहे.

पहिली गोष्ट म्हणजे मे महिन्यापासून गलवान खोरे आणि परिसरांत चीनी सैनिकांसोबतचा संघर्ष धुसफुस मारामारी चालू आहे. अशा प्रसंगी कुठल्याही जबाबदार नेत्याने परराष्ट्र धोरण, सुरक्षा यंत्रणा, सीमाविवाद, संरक्षण नीती या बाबत जपून बोलले पाहिजे. राहूल गांधी जबाबदार नाहीतच. पण एका जून्या पक्षाचे खासदार आहेत. माजी अध्यक्ष आहेत. शिवाय याच प्रश्‍नावर त्यांच्या पक्षाची सत्ता असताना विविध भूमिका ठरवल्या गेल्या विविध निर्णय घेतल्या गेलेले आहेत.

भारताच्या सध्याच्या कारभारावर टीका करण्याचा त्यांचा हक्क लोकशाहीत अबाधीत आहे. पण परराष्ठ्र धोरणावर संरक्षण नीतीवर त्यांनी टीका केली ती पूर्णत: अस्थानी आणि चुक आहे. परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी त्यांच्या ट्विटला सविस्तर उत्तर दिले आहे. एक दोन नाही तर दहा ट्विट करून (एका पेक्षा जास्त सलग ट्विटला ‘थ्रेड’ असा शब्द आहे). खरं तर इतक्या जबाबदार मंत्र्याने शिवाय असा मंत्री जो की पूर्वी उच्चपदस्थ अधिकारी म्हणून त्याच खात्यात कार्यरत राहिलेला आहे.  तेंव्हा एस. जयशंकर यांच्या मतांना फार महत्त्व आहे.

अपेक्षा अशी होती की राहूल गांधींनी आता या ट्विटला उत्तर द्यावे. पण राहूल गांधी यांची खासियत म्हणजे  बेजबाबदार मुला सारखे दगड मारायचा आणि पळून जायचे. त्यांनी एस. जयशंकर यांच्या ट्विटला काहीही उत्तर दिले नाही. गप्प न बसता परत आपल्या व्हिडिओचा दुसरा भाग ट्विटला जोडून प्रसिद्ध केला.

गलवान खोर्‍यातील चकमकीबाबत सातत्याने राहूल गांधीं खोटे ट्विट करत आले आहेत. त्यांच्या ट्विटला सडेतोड उत्तर देत उघडे पाडण्यात आले आहे. अगदी सैन्याच्या जबाबदार अधिकार्‍यांनी अधिकृतपणे खुलासे करत राहूल गांधींना निरूत्तर केले आहे.  आताही एस. जयशंकर यांनी गेल्या सहा वर्षांतील (राहूल गांधींनी तेवढ्याच कालावधीतील धोरणावर टिका केली आहे) भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत अतिशय कमी शब्दांत राहूल गांधींची कानउघडणी करत सत्य समोर मांडले  आहे. अगदी सामान्य माणसालाही समजेल अशी भाषा एस. जयशंकर यांनी वापरली आहे.

आपल्या ट्विट सोबत जो कश्मिरचा नकाशा राहूल गांधींनी जोडला आहे तोही आक्षेपार्ह असा आहे. 5 ऑगस्ट 2019 ला 370 कलम हटवल्यानंतर जम्मु आणि कश्मिर व लद्दाख हे दोन स्वतंत्र केंद्र शासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आले. त्याप्रमाणे या प्रदेशाचा नविन नकाशाही सरकारने जाहिर केला आहे. तेंव्हापासून ज्याला कुणाला या प्रदेशाचा नकाशा वापरायचा असेल तर नविन नकाशा वापरणे बंधनकारक आहे. पण राहूल गांधी मात्र जूनाच नकाशा वापरतात.

बरं यातही काही एक अज्ञान असेल तर आपण समजू शकतो. जणिवपूर्वक पाक व्याप्त कश्मिर, आझाद कश्मिर, सियाचीन, अक्साई चीन हा भूभाग नावासगट दाखविण्याची विकृती कशामुळे?  ही देशविघातक वृत्ती कशी काय बाळगली जाते? सामान्य भारतीयाने जर असा नकाशा वापरला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होवू शकते. मग राहूल गांधींवर का नाही?

मोदिंच्या परराष्ट्र धोरणावर राहूल गांधी यांनी टिका केली आहे. नेमके हेच राहूल गांधी आणि सर्व पुरोगामी आत्ता आत्ता पर्यंत मोदिंच्या परराष्ट्र दौर्‍यांची टिंगल करत आले आहेत. एनआरआय पंतप्रधान अशी मोदींची संभावना करत आले आहेत. अगदी ढोबळमानाने बघितले तरी असे लक्षात येते की भारत विषयक इतर देशांत एक आस्था निर्माण झालेली दिसून येते आहे. याचे अगदी वरवरचे कारण म्हणजे मोदींनी सातत्याने साधलेला संपर्क व त्यातून निर्माण झालेला संवाद. तसेच भारताची विस्तारणारी मध्यमवर्गीय ग्राहकांची बाजारपेठ. भारतात लाख समस्या असल्या तरी आपल्या देशाने जपलेली लोकशाही मुल्ये. परदेशांतील भारतीय ही त्या त्या देशांसाठी एक उत्सुकतेची बाब आहे. कारण या बुद्धिमान भारतीयांनी परदशांत मोठे योगदान दिले आहे.

गलवान खोर्‍यात चीनी सैनिकांसोबत जी धुसफुस झाली त्यानंतर लगेच अमेरिका, रशिया, फ्रांस,  इंग्लंड, आॅस्ट्रेलिया आदी बलाढ्य देश भारताच्या बाजूने तातडीने उभे राहिलेले दिसले.  चीनच्या विरोधात एक मोठं जनमत जागतिक पातळीवर तयार होताना दिसत आहे. कोरोना व्हायरसला वुहान व्हायरस किंवा चीनी व्हायरस असे सर्रास संबोधले जावू लागले आहे. नेमके अशा काळातच राहूल गांधी मात्र बेजबाबदारपणे भारताची परराष्ट्र नीती कमजोर पडली/ चुक ठरली अशी भूमिका मांडत आहेत.

काही गोष्टी कुठल्या वेळी मांडावे याचेही काही औचित्य पाळावे लागतात. राहूल गांधींना तेही नाही.

खरं तर राजस्थानात त्यांच्या पक्षात घमासान चालू आहे. त्याकडे अजूनही राहूल गांधींनी लक्ष दिलेले नाही. पक्षाचे मोठे नेते माजी अध्यक्ष आणि भावी अध्यक्ष म्हणूनही राहूल गांधींची ही जबाबदारी आहे पक्षातील पेच सोडवला पाहिजे. पण त्याकडे ढुंकूनही न बघता हे मोदी विरोधात म्हणत म्हणत देश विरोधात ट्विट करण्यात मग्न आहेत.

भाउ तोरसेकरांनी अशी टीका केली आहे की रोम जळत असताना तिथला सम्राट नीरो हा फिडल वाजवत होता. तसे राहूल गांधी पक्ष जळत असताना ट्विटर वाजवत बसले आहेत.

राहूल गांधींना कुणी समजावून सांगू शकत नाही. पण देशविरोधी त्यांच्या कृतीची यथोचित दखल घेवून त्यावर कारवाई मात्र आवश्यक आहे.

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

3 comments:

  1. अक्कल, बुद्धी, समजुतदारपणा कुठेही विकत मिळत नसतो,,,
    तो उपजत असावा लागतो.
    मोदींचा अंधविरोध करताना बाळराजेंनी आपण देशविरोधी भुमिका घेत आहोत याचे भान ठेवायला हवे होते.

    ReplyDelete
  2. पप्पूच्या बुद्धीहीनतेचा झळाळता अविष्कार वाचनात आलेला नाही अश्या माझ्या सारख्या अल्पमतीला हि पोस्ट कळणार नाही. जर शक्य असेल तर ते ट्विट पाठवली तर समजून घ्यायला सोप जाईल.

    ReplyDelete
    Replies
    1. ते उपलब्ध आहे नेटवर...

      Delete