Monday, July 27, 2020

वाङ्मयीन नियतकालिके : 'छापील' नव्हे 'डिजिटल'चे दिवस


दै. सामना सोमवार 27 जूलै 2020 विशेष पुरवणी

साधारणत: 2010 नंतर समाज माध्यमांचा (सोशल मिडिया)  बोलबाला वाढायला लागला तस तसे छापिल नियतकालिके, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, दिवाळी अंक यांच्यावर गंडांतर यायला सुरवात झाली. मुळात संपूर्णत: व्यवसायिक असलेल्या वृत्तपत्रांचीच परिस्थिती गंभीर बनत चालली होती. त्यामुळे वाङ्मयिन/वैचारिक नियतकालिके यांच्याबाबत तर काही बोलायलाच नको. हा सगळा कारभार मुळातच हौशी पद्धतीनं महाराष्ट्रात चालत आलेला होता.

त्यातही परत आपण नको तेवढे सार्वजनिक वाचनालयांवर अवलंबून असलेलो. वैयक्तिक पातळीवरचा ग्राहक महाराष्ट्रात फार कमी. जो काही आहे तो प्रामुख्याने सार्वजनिक ग्रंथालये हाच. आणि यांचा प्राणवायू म्हणजे शासकिय अनुदान.

या सगळ्यांचा फटका 2010 नंतर बसायला लागला. या नियतकालिकांच्या वाटपाचा मोठा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला. सर्वच नियतकालिकांचा कारभार सरकारी पोस्ट खात्यावर अवलंबून होता. पण पोस्टाची व्यवस्था ढिसाळ बनली आणि त्याचाही एक मोठा फटका या नियतकालिकांना बसला.

आता कोरोनाच्या प्रचंड मोठ्या जागतिक आपत्तीत तर शेवटचा घाव बसावा आणि झाड कोसळून पडावे अशी अवस्था मराठी नियतकालिकांची झालेली आहे. ही आपत्ती दुसरीकडून एका मोठ्या संधीला जन्म देते आहे.
ऑनलाईन किंवा डिजिटल माध्यमाचा वापर करून ही नियतकालिके नविन आकर्षक स्वरूपात समोर येवू लागली आहेत. आता हाच एक योग्य पर्याय दिसतो आहे. ‘साधना’ साप्ताहिकाने आपला अंक ऑनलाईन देण्यास सुरवात केली आहे. पिडीएफ स्वरूपातील हा अंक मोबाईलवर सहज उपलब्ध आहे.

‘अक्षरनामा’ सारखे एक चांगले नियतकालिक ऑनलाईन चालवले जाते. त्याची मांडणी अतिशय चांगली आहे. मजकूर तपासलेला व्याकरणाच्या किमान चुका असलेला असतो.

ऑनलाईन किंवा डिजिटल माध्यमांचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हा अंक ऍण्ड्रॉईड मोबाईल असलेल्या कुणाही माणसापर्यंत तूम्ही ताबडतोब पोचवू शकता. लेखांची संख्या किंवा शब्दसंख्या यावरही कसले बंधन नाही. आधी ज्या प्रमाणे ठराविक तारखेला अंक निघायचा. म्हणूनच त्याला नियतकालिक संबांधले जायचे. तसंही आता करण्याची गरज उरलेली नाही. यावर कधीही कितीही मजकूर टाकता येवू शकतो.

आधीच्या व्यवस्थेत वाचकांचा प्रतिसाद कळायला वेळ लागायचा. बर्‍याचदा तर हा प्रतिसाद कळायचाही नाही. पण आता तो तातडीने मिळू शकतो. काही डिजिटल पोर्टलवर मोठ्या गंभीर मजकूरावरही लोक सविस्तर प्रतिसाद देतात. टीका केली जाते. समर्थन करतानाही सविस्तर केले जाते. हा एक फारच मोठा फायदा या नविन माध्यमाचा आहे. पूर्वीची माध्यमे एकतर्फा होती. पण आता ही नविन माध्यमे म्हणजे खर्‍या अर्थाने संवादी बनली आहेत.

विविध नियतकालिके जशी डिजिटल स्वरूपात येतात तसाच दुसरा पण एक प्रकार पहायला मिळतो आहे. वैयक्तिक पातळीवर काही लेखक आपले ब्लॉग तयार करत आहेत. त्यांना मिळणारा प्रतिसादही अतिशय चांगला आहे. भाउ तोरेसकर सारख्या पत्रकाराच्या ब्लॉगला एक कोटी पेक्षा जास्त दर्शकसंख्या लाभते ही एक मराठी वाचन विश्वात आगळी वेगळी घटना आहे. प्रवीण बर्दापुरकर यांच्यासारखे पत्रकारही नियमित ब्लॉग चालवत आहेत. संजय सोनावणी, हरि नरके यांच्या ब्लॉगला नियमित वाचक लाभलेला दिसतो आहे. (मी स्वत:  गेली 10 वर्षे मराठी ब्लॉग लेखन करतो आहे. आणि वाचक संख्या अडीच लाखांपर्यंत पोचली आहे.)

अजून एक प्रकार आपल्याला पहायला मिळतो आहे तो म्हणजे फेसबुकवरील लिखाण. कविता, छोटे लेख, रसग्रहण. अतिशय चांगले परिणामकारक लिखाण समाज माध्यमांवर नियमित नाही पण अधून मधून काहीजण करत असतात. त्यांना प्रतिसाद देणार्‍यांचीही संख्या मोठी आहे. मी हे सगळं विवेचन समाज माध्यमांचा गांभिर्याने वापर करणार्‍यांना गृहीत धरूनच करतो आहे. या माध्यमांचा उठवळपणे वापर करणार्‍यांसाठी हे विवेचन नाही. शिवाय वाढदिवस, बायकोचा वाढदिवस, घराचा वास्तु, स्वत:चे कुठले फोटो, कुठल्या कुठल्या नियुक्त्यांसाठीचे पुरस्कारांसाठीचे अभिनंदन या सगळ्या जवळपास 80 टक्के असणार्‍या पोस्टचा इथे विचार करत नाहीये. गलिच्छ असभ्य भाषा वापरणार्‍यांचाही इथे विचार केलेला नाही. त्यांना टाळूनच आपण विचार करूया.

कोरोना आपत्तीनंतर समोर येणारं वाङ्मयिन नियतकालिकांचे डिजिटल जग हे आकर्षक, सुटसुटीत, संवादी, सर्वस्पर्शी तळागाळापर्यंत पोचणारे असेल याची खात्री पटते आहे. पूर्वीची माध्यमे आपल्या मर्यादांमुळे जास्त पोचू शकत नव्हती. पण आताच्या नविन माध्यमांनी सर्व सीमा ओलांडल्या आहेत. कुठलीही कुंपणे त्यांना रोकू शकत नाहीत. मी स्वत: माझ्या ब्लॉगवर आत्तापर्यंत एकूण प्रतिसादापैकी 28 टक्के देशाबाहेरील वाचकांचा अनुभवला आहे. ही एक मोठी उपलब्धी या नविन माध्यमाची आहे.

पूर्वी नियताकलिकांची निर्मिती मर्यादीत ठिकाणांहून होत होती. पण आता नविन माध्यमांनी हे कृत्रिम बंधन उडवून लावले आहे. कुठेही बसून आता डिजिटल स्वरूपातील अंक प्रकाशित होवू शकतो. आणि कुठूनही निघाला तरी तो वाचकांपर्यंत पोचण्यात कसलाही अडथळा येत नाही. हा एक प्रकारे मोठाच क्रांतिकारी बदल आता झालेला आहे. अन्यथा आधिच्या प्रकारांत मक्तेदारी निर्माण होवून काही एक विकृती तयार झाल्या होत्या. आणि त्यात बर्‍याच प्रतिभावंतांचे बळी गेले होते. पण नविन माध्यमांत अशा अन्यायाला जागा शिल्लक राहिलेली नाही.

नविन माध्यमांना दृकश्राव्य जोड पण देता येवू शकते. काही चांगल्या कवितांचे प्रभावी वाचनाचे प्रयोग होत आहेत. त्याचे व्हिडिओ सर्वत्र सहजपणाने फिरत आहेत. इंद्रजीत भालेराव यांच्या कविता मोठ्या प्रमाणात यु ट्यूब वर उपलब्ध आहेत. या नविन माध्यमांच्या महसुल व्यवस्थेची वाढ निकोप पद्धतीने झाली पाहिजे. यात काम करणार्‍यांना पुरेसा आणि योग्य मोबदला मिळाल पाहिजे. नसता केवळ फुकटा फुकटी ही माध्यमे आहे त्या स्वरूपात जास्त काळ चालू शकणार नाहीत. भविष्य काळात ही समस्याही सुटेल याची आशा वाटते.

श्रीकांत अनंत उमरीकर
जनशक्ती वाचक चळवळ
औरंगाबाद मो. 9422878575

2 comments: