Friday, July 3, 2020

एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण !



काव्यतरंग, शुक्रवार ३ जुलै  २०२० दै. दिव्यमराठी

तहान

सारा अंधारच प्यावा
अशी लागावी तहान
एका साध्या सत्यासाठी
देता यावे पंचप्राण

व्हावे एव्हढे लहान;
सारी मने कळो यावी;
असा लाभावा जिव्हाळा
पाषाणाची फुले व्हावी.

सर्व काही देता यावे
काही राहू नये हाती;
यावी लाविता कपाळी
भक्तिभावनेने माती

फक्त मोठी असो छाती
दु:ख सारे मापायला;
गळो लाज गळो खंत
काही नको झाकायाला

राहो बनून आकाश
माझा शेवटचा श्‍वास
मनामनांत उरावा
फक्त प्रेमाचा सुवास !

-म.म.देशपांडे (अंतरिक्ष फिरलो पण.., संपा. द.भि. कुलकर्णी, पृ. 33, पद्मगंधा प्रकाशन, आ.1, 2006)

‘गांधी’ चित्रपटांत एक अप्रतिम प्रसंग रिचर्ड ऍटनबरो यांनी रंगवला आहे. लोकांनी हिंसा केली म्हणून महात्मा गांधी उपोषणाला बसले आहेत. सगळा देश चिंतित आहे. एक वयस्क फाटका माणूस आपल्या खिशातून रोटी काढून गांधीसमोर करून ‘आम्ही करत नाही हिंसा, खा आता ही रोटी गुमान’ असं म्हणतोय जणू असा तो विलक्षण प्रभाव प्रसंग आहे. 

सामान्य माणसे आंदोलनासाठी उभी करणं हे महात्मा गांधींचे स्वातंत्र्यलढ्यातील फार मोठे योगदान आहे. त्यांना लढण्यासाठी ‘असहकार, सविनय कायदेभंग’ असली साधी वाटणारी पण फार प्रभावी हत्यारे त्यांनी दिली. 

म म देशपांडे यांच्या या कवितेत असा एक सुर सापडतो, ‘एका साध्या सत्यासाठी’ त्या काळात लोक पंचप्राण अर्पायला तयार झाले. म म देशपांडे हे जून्या पिढीतील कवी. महात्मा गांधींना त्यांनी केवळ बघितलं असं नाही तर त्यांच्या तरूणपणीच्या आठणीच त्यांच्याशी निगडीत असणार. ‘सारा अंधारच प्यावा’ म्हणत असताना सर्व वाईट वृत्ती नकारात्मकता संपविण्याची एक विलक्षण ताकद सामान्य माणसांत असते हे पण सुचवले जाते.   

‘व्हावे एव्हढे लहान’ म्हणत असताना लहान मुलाचे मन जसे अपेक्षीत आहे तसेच आपला सगळा अहंकार बाजूला सारून कुणाच्याही मनात शिरता यावे इतके लहानपण लाभावे हाही अर्थ इथे निघतो. याच ओळींसारख्या ओळी बोरकरांनी लिहील्या आहेत

उन्हासारखा हर्ष माझा असावा
घरातून बाहेर यावी मुले
नभासारखा शोक माझा असावा
तृणांतून देखील यावी फुले

पाषाणांची फुले व्हावी ही एक सुंदर कल्पना आहे. ग्रेस यांनीही एके ठिकाणी असं लिहून ठेवले आहे, 

मी महाकवी दु:खाचा
प्राचीन नदीपरी खोल
दगडाचे माझ्या हाती
वेगाने होते फुल

तिसर्‍या कडव्यात मातीचा संदर्भ येतो. आज शहरी व्यवस्थेत राहणार्‍या आणि शहरांतच जन्मल्या वाढलेल्या लोकांना कदाचित कल्पना येणार नाही की गावगाड्यांत ‘माती’ला किती अतोनात महत्त्व असते. मातीची शपथ घेतली जाते, मातीत नाळ पुरली असल्याने मातीचा जिव्हाळा जन्मभर जपला जातो, अगदी आयुष्याचा शेवटही गावच्या मातीतच व्हावा असा ध्यास असतो. शहरात राहणार्‍या काही लोकांच्या बाबतीत तर आजही असं घडतं की अंत्यविधी गावाकडेच केले जावे असा त्यांचा अट्टाहास असतो. 

इंद्रजीत भालेराव यांच्या ‘आम्ही काबाडाचे धनी’ या दीर्घ कवितेत मातीसंबंधी एक फार सुंदर तुकडा आलेेला आहे

भन उन्हात जल्मला 
माती तोंडात घेवून
वाढलास एवढा तू 
धान मातीचे खावून

मातीसाठीच जगावं 
मातीसाठीच मरावं
बाळा माती लई थोर 
तिला कसं इसरावं

विठ्ठलाच्या काळ्या रंगात या मातीचे काळेपणही अंतर्भूत आहे. त्यामुळे ‘यावी लाविता कपाळी भक्तिभावनेने माती’ असे शब्द उमटतात. सृजनाचे प्रतिक म्हणूनही ही माती ओळखली जाते. ज्ञानेश्वरीतील ओवी प्रसिद्ध आहे, ‘मातीचे मार्दव । सांगे कोंभाची लवलव॥

सामान्य माणूस काय मागणे मागतो? पसायदान ही तर फार मोठी गोष्ट झाली. ‘विश्वात्मके देवे’ ही प्रार्थना संतांना शोभून दिसते. सामान्य माणूस मात्र 

पुसता येईल इतकंच पाणी
डोळ्यामध्ये हलू दे
गाता येईल इतकं तरी
गाणं गळ्यात खुलू दे

इतक साधं पसायदान मागत असतो. म म देशपांडे, ‘फक्त मोठी असो छाती दु:ख सारे मापायाला’ म्हणतात तेंव्हा सामान्य माणसांसाठीचे एक पसायदानच सामान्यांच्या शब्दांत मागत असतात. 

मातीच्या नंतर शेवटी संदर्भ येतो तो आकाशाचा. आकाशाचा निळा रंग स्वातंत्र्याचे प्रतिक समजले जाते. मुक्त होवून कुठे जायचे तर आकाशात अशी एक समजूत आहे. ‘माझा शेवटचा श्‍वास राहो बनून आकाश’ ही अगदी साधी सर्वव्यापी अशी संकल्पना आहे. आपली राख बनून आपण मातीत मिसळून जातो पण आपले श्‍वास कुठे जातात? तर ते आकाश बनून राहतात.

भारतीय परंपरंतील जगण्याचे तत्त्वज्ञान अगदी साध्या शब्दांत मांडणारी ही कविता. ‘एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण’ असं ती म्हणते तिथे मात्र खुप वेगळी ठरते आणि फार उंचीवर जावून पोचते. सध्या चालू असलेल्या लदाखमधील चिनसोबतच्या संघर्षात जखमी झालेल्या आणि चिन्यांच्या कैदेतून सुटून आलेल्या सैनिकांनी काय भावना व्यक्त केली आहे, ‘आम्हाला परत युद्धावर पाठवा. आम्ही लढायला पंचप्राण देण्यासाठी तयार आहोत.’

देशासाठी लढणे, आपल्या भूमीसाठी लढणे ही संकल्पना फार आधीपासून आपल्या मनांत रूजविल्या गेली आहे. पण म म देशपांडे यांनी ‘साध्या सत्यासाठी’ असे शब्द वापरून संघर्षाचे रूपच पालटले आहे. रोजच्या जीवनातही संघर्ष असतो. त्यासाठी अगदी प्राण पणाला लावून लढायला आपण तयार असतो का? 

रोज आपल्यासमोर काही ना काही गैर प्रकार घडताना दिसतात त्याला आपण कसा प्रतिसाद देतो? ‘साध्या सत्यासाठी’ लढणं हे वाटतं तसं सोपं नाही. त्यामुळे म म देशापांडे यांना देशासाठी त्याग करणार्‍यांसोबतच ‘साध्या सत्यासाठी’ पंचप्राणाची बाजी लावणारा पण फार महत्त्वाचा वाटतो. 

मनोहर महादेव देशापांडे हे स्वातंत्र्योत्तर काळातील कविंच्या पहिल्या पिढीचे प्रतिनिधी (जन्म23 ऑक्टोबर 1929, मृत्यू 25 डिसेंबर 2005). मुळचे यवतमाळचे असलेले देशपांडे ग्वाल्हेर येथून ते लेखा परिक्षण अधिकारी म्हणून निवृत्त झाले. उतारवयात त्यांचा निवास नाशिक येथे होता. ‘वनफूल’, ‘अंतर्देही’, ‘अपार’ हे त्यांचे कविता संग्रह त्यांंचे प्रसिद्ध झाले. त्यांच्या निवडक कवितांचा संग्रह ‘अंतरिक्ष फिरलो पण’ हा 2006 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाला.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

3 comments:

  1. वाचले आवडले

    ReplyDelete
  2. तुम्ही साहेब समीक्षक पण आहात .

    ReplyDelete
  3. मृत आत्मा.

    आत्म्यासंगे रोज, चालते लढाई.
    नव्या तलवारी, नव्याच ढाली.
    निर्लज्ज मनाला, वाटे अपूर्वाई!

    थुंकीलाही ठेवण्या, बोटे न उरली.
    कुरूक्षेत्री खोटी, आंधळी चढाई.
    निर्लज्ज मनाची, बढाई वाढली!

    किती वीर मेले, मोजण्या मनाई.
    खोटी शिरकाणे, वहीत नोंदविली.
    मुर्दाड मनाने, संपविली आई!

    आत्म्यासही कुडी, जीवप्राण असे.
    लावूनिया बोली, त्या छिंदिले शस्त्राने.
    भाडखाऊ मन , मोजीतसे वासे!

    अगा पांडुरंगा, तुलाच ठावा नाही.
    करूनिया धावा, न उपयोग काही.
    मृत आत्म्यास गिधाड, न लावे तोंडही!

    कल्पना चारुदत्त.
    5 जुलै 2020

    ReplyDelete