Thursday, July 16, 2020

कुरुंदकरांच्या आरत्या, चिकित्सा आणि आपण


उरूस, 16 जूलै 2020 

काल (15 जूलै) महान विचारवंत लेखक नरहर कुरूंदकर यांची जयंती होती. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. कुरूंदकर हयात असते तर आज 88 वर्षांचे असले असते. त्यांच्या जयंती निमित्त समाज माध्यमांवर (सोशल मिडिया) दिवसभर त्यांच्यावर आरत्या ओवाळलेल्या पाहण्यात आल्या. न राहवून रात्री मी त्यावर एक पोस्ट टाकली, ‘आज दिवसभर कुरूंदकरांच्या आरत्या ओवाळणे चालू होते. त्यांच्या विचारांची कठोर चिकित्सा होणार कधी?’.

याने कुरूंदकर भक्त दुखावल्या गेले. आणि तशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवरच उमटल्या.
एक प्रा. संतोष शेलार यांचा अपवाद वगळता कुणीही कुरूंदकर गुरूजींच्या लिखाणाची चिकित्सा करणारे काही लिहीलेले काल माझ्या वाचनात आले नाही. हा नेमका काय प्रकार आहे?

कुरूंदकर हे ज्या वैचारिक परंपरेत येतात त्यात चिकित्सेला अतोनात महत्त्व आहे. इतरांच्या विचारांची चिकित्सा कुरूंदकरांनी केली आहे. स्वत: कुरूंदकरही आपल्या विचारांची चिकित्सा झाली पाहिजे याच मताचे होते.
त्यांच्या विचारांची चिकित्सा झाली पाहिजे असं म्हणणे म्हणजे त्यांचा अपमान अवहेलना होते असं मुळीच नाही. चिकित्सेने केवळ विचारांचे खंडन होते असेही नाही. त्यांनी दाखवलेल्या विचारांच्या दिशेने पुढचा प्रवास करून पुढचा टप्पा गाठण्यासाठीही चिकित्सा होणे गरजेचे असते.

कुरूंदकरांना बाबत जो अभिमान माझ्या प्रदेशात (मराठवाडा आणि त्यातही परत परभणी नांदेड जिल्हा) आहे तो आहेच. अगदी मलाही आहे. कुरूंदकरांवर काही जणांची श्रद्धा आहे. त्या श्रद्धेपोटी जयंत पुण्यतिथी साजरी होणे, त्यांच्या आठवणी जागवल्या जाणे, त्यांचे पुतळे उभारणे, स्मारक होणे हे सगळं घडतं. पण याचा कुरूंदकरांच्या वैचारिकतेही  काहीच संबंध नाही.

जागजागो ग्रामदैवतं असतात तशी ही साहित्यिक सांस्कृतिक दैवतं असू शकतात. भारतीय मानसिकता याला पोषक आहे. (आम्हीही परभणीला बी. रघुनाथ यांच्या स्मृतीत याच पद्धतीनं कार्यक्रम करतो. बी. रघुनाथ यांचे एक भव्य स्मारकही उभारल्या गेले आहे.) पण त्यामुळे त्यांच्या विचारांची चिकित्सा करण्याचा विचार पुढे आला तर त्यावर टीका का केली जाते?

खरं तर आपल्या विचारांची पुरेशी चिकित्सा होत नाही हे पाहून स्वत: कुरूंदकरच अस्वस्थ झाले असते. आरती ओवाळणे हा जो शब्द मी वापरला तो नेमका चिकित्सेच्या उलट आहे. श्रद्धा असते तिथे आरती ओवाळली जाते. आणि श्रद्धा बाजूला ठेवून तर्ककठोर विचार असतो तिथेच चिकित्सा होवू शकते.

म्हणजे मुळात या दोन भिन्न गोष्टी आहेत हे आधी लक्षात घेतले पाहिजे. ज्यांना नरहर कुरूंदकर यांना दैवत बनवून त्यांची आरती ओवाळायची आहे, आठवणींची पोथी लिहून ठेवायची आहे, तिची पारायणे करायची आहेत तो एक स्वतंत्र श्रद्धेशी निगडित प्रकार आहे. ही ज्यांची भावनिक गरज आहे त्यांनी ते करावे. पण जे वैचारिक श्रेत्रातील आहेत, ज्यांना विचारांचे आणि त्या अनुषंगाने होणार्‍या चिकित्सेचे महत्त्व आहे त्यांच्यासाठी हा आरतीचा कार्यक्रम अनावश्यक आहे.

इंद्रजीत भालेराव यांनी आरती आणि चिकित्सा सोबत असु शकते असं एक समतोल वाक्य वापरलं आहे. ते खरं आहे. खंत आहे ती अशी की केवळ आरतीच होते आहे. त्या मानाने चिकित्सा होत नाही.

उदा. म्हणून कुरूंदकरांचे एक पुस्तक आपण घेवू. त्याचे नाव आहे, ‘हैदराबाद : विमोचन आणि विसर्जन’. हे पुस्तक  1985 मध्ये म्हणजेच कुरूंदकर गुरूजींच्या मृत्यूनंतर प्रकाशीत झाले. हे पुस्तक म्हणजे वेळोवेळी गुरूजींनी लिहीलेले लेख (कुरूंदकर ‘गुरूजी’ याच संबोधनाने आमच्या मराठवाड्यात आजही परिचित आहेत) आणि सेलू येथे भांगडिया व्याख्यान मालेतील तीन व्याख्याने यांचा समावेश असलेला संग्रह आहे.

या पुस्तकाची 13 वर्षांनी दुसरी आवृत्ती प्रकाशीत झाली 1998 मध्ये. अपेक्षीत असे होते की या पुस्तकाला सविस्तर अशी प्रस्तावना जोडली जावी. जागजागो टीपा देण्यात याव्यात. काही नविन संदर्भ उपलब्ध झाले त्यांचा उल्लेख व्हावा. तशी अपेक्षा संपादक द.पं.जोशी यांनी व्यक्त केलेली आहे. पण असं काहीच घडलं नाही. या दुसर्‍या आवृत्तीलाही आता 22 वर्षे उलटून गेली आहेत. आपण गुरूजींच्या नावाने नुसतेच गळे काढत आहोत. पण या पुस्तकाची चिकित्सक प्रस्तावना, टीपांसह नविन आवृत्ती काढायला तयार नाहीत ही खंत आहे.

अनंत भालेराव यांनी उतारवयात मोठी मेहनत घेवून ‘हैदराबादचा मुक्तिसंग्राम आणि मराठवाडा’ हे पुस्तक 1987 मध्ये सिद्ध केले. या पुस्तकांत जागजागी टीपा दिल्या आहेत. संदर्भ ग्रंथांची यादी जोडली आहे. संशोधनाची शिस्त सांभाळत हा ग्रंथ सिद्ध झाला आहे. मग हीच बाब गुरूजींच्या विचारांचे अभ्यासक, चाहते का करत नाहीत?

शेषराव मोरे यांनी गुरूजींचे आशिर्वाद घेतले आणि आयुष्य सावरकर, मुस्लिम प्रश्‍न याच्या अभ्यासावर खर्च केले. आपल्या चिकित्सक अभ्यासातून मोठे ग्रंथ सिद्ध केले. या पद्धतीचे काम हीच खरी गुरूजींना श्रद्धांजली असू शकते. बाकी आपण जे काही कर्मकांड दरवर्षी पुण्यतिथी जयंतीला करत आहोत तो वेगळा भाग आहे. त्यावर मला काही टिका करायची नाही. अशा समारंभांमध्ये मीही सहभागी झालो आहे. माझ्या वैयक्तिक श्रद्धेचा तो भाग आहे. पण म्हणून वैचारिक पातळीवर होत असलेली हानी न पाहता समाधान व्यक्त करत कसे काय स्वस्थ बसून राहू?

असे काही प्रश्‍न उपस्थित केले की लगेच प्रतिक्रिया उमटते. तूम्हाला कुणी रोकले आहे? तूम्ही करा काय करायचे ते. आमच्या आरत्या ओवाळणे आम्ही करत राहू. जो काही उरूस भरवायचा आहे, संदल काढायचा आहे तो आम्ही काढत राहू. जी काही ‘कुरूंदकर जत्रा’ भरवायची आहे ती भरवत राहू.

आता असल्या पोरकट वादाला काही उत्तर नसते. स्वत: गुरूजी वैचारिक क्षेत्रातील खंडन मंडन मानणारे होते. त्यांनाही त्यांच्या विचारांचे ‘भजन’ वैचारिक पातळीवरच अपेक्षीत होते. असले कर्मकांडवाले ‘भजन’ आपली खरी वैचारिक प्रतिमा ‘भंजन’ करू शकते याची त्यांनाही नक्कीच जाणीव असणार.

महाभारतावर इरावती कर्वे, दुर्गा भागवत, आनंद साधले, दाजी पणशीकर यांच्या सोबतच कुरूंदकरांनीही ‘व्यासांचे शिल्प’ नावाचे पुस्तक लिहीले आहे. पण त्यांनी मांडले त्याच्या पुढे जावून नंतर रविंद्र गोडबोले, विश्वास दांडेकर यांनी लिहीले आहे आणि गुरूजींचे प्रकाशक असलेल्या देशमुख आणि कंपनीनेच ती पुस्तके  प्रकाशित केले आहे. खुद्द नांदेडातच अनंत महाराज आठवले यांनी ‘महाभारताचे वास्तव दर्शन’ सारखा अप्रतिम ग्रंथ पूर्वासूरींना खोडून काढणारा प्रतिवाद करणारा लिहीला आहे. कुरूंदकर हयात असले असते तर त्यांनी या ग्रंथाची योग्यता आपल्याच शब्दांत मांडली असती.

कुरूंदकरांनी समाजवादावर केलेले भाष्य, नेहरूंच्या विचारांची केलेली मांडणी आजच्या काळात तपासून पाहण्याची गरज आहे. स.रा. गाडगिळांच्या ‘लोकायत’ला लिहीलेली प्रस्तावना- नंतर झालेल्या संशोधनांत अजून हा विषय पुढे गेलेला आहे. अशी काही वैचारिकतेच्या क्षेत्रातील चिकित्सेची चांगली उदाहरणे सांगता येतील. हे सगळं सकोप निरोगी वैचारिक वातवरणाला पोषक असं लिखाण कुरूंदकरांना आवडले असते.

आज ‘आरती’ संप्रदायापासून कुरूंदकरांना वाचवायची गरज निर्माण झाली आहे असे मला प्रमाणिकपणे वाटते. कुरूंदकरांचे कुटूंबिय, मराठवाड्यातील त्यांचे चाहते, शिष्य यांच्याशी माझे वैयक्तिक पातळीवर अतिशय चंागले संबंध आहेत. गुरूजींच्या प्रखर बुद्धीमत्तेबद्दल प्रतिभेबाबत माझ्या मनात कुठलीच शंका नाही म्हणूनच त्यांच्या विचारांची चिकित्सा झाली पाहिजे असं मी म्हणून शकतो. किमान वैचारिक पाया असणारे हे समजून घेतील याची खात्री आहे.

माझ्या शब्दांनी ज्यांच्या भावना दुखावल्या असतील त्या सर्वांची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

9 comments:

  1. श्रीकांत जी, आपले अभिनंदन , आपली लिखाणाची शैली ही ऋषितुल्य नरहर कुरुंदकर यांच्या लिखणाशी साम्य असल्याचे जाणवले, ह्यातून आपण कुरुंदकरांनी स्मृति जागवल्या बद्दलही आपले आभार

    ReplyDelete
  2. बाप रे माझी तूलना गुरूजींशी करू नका. मला माझी "औकात" पूर्ण माहित आहे. गुरूजींच्याच शिकवणीप्रमाणे त्यांच्याही विचारांची चिकित्सा झाली पाहिजे इतकीच माफक अपेक्षा...

    ReplyDelete
  3. विचारांची चिकित्सा झाली पाहिजे.
    निव्वळ आरत्या, उरुस भरवून काय फायदा?
    संतुलित विवेचन,, 🌹💐🙏

    ReplyDelete
  4. विचारांची चिकित्सा झाली पाहिजे.
    निव्वळ आरत्या, उरुस भरवून काय फायदा?
    संतुलित विवेचन 🌹🌹💐🌸

    ReplyDelete
  5. तुम्ही उपस्थित केलेले प्रश्न रास्त आहेत. अभिनंदन.

    ReplyDelete
  6. गुरुजींची आरती कुणी करत असेल असे मला जाणवत नाही.कुरुंदकर गुरुजींनी जे विचार मांडलेत तेच समजून घ्यायला अजून पंचवीस वर्षे लागतील.कारण कुरुंदकर गुरुजी समजून घ्यायला आकलनाच्या पातळीवर समजून घेण्या-याची आकलनाची उंची इथे कमी पडते.बौद्धीक क्षमतेने थोडतरी कुरुंदकर होता यायला पाहिजे तरच हे शक्य होईल.आज विद्वत्ते पेक्षा विद्वान असल्याचे प्रमाणपत्र बाळगणा-या विद्वानांची संख्या खुप मोठी आहे.या सर्टीफाईड विद्वानां कडूूू गुरुजींच्या विचाराची चिकीत्सा किंवा खंडनाची आपेक्षा करणे हेच मुळी मनोरंजक ठरेल.

    ReplyDelete
  7. बऱ्याच वेळा प्रतिथयश लेखकांचे परिपक्व झाल्यावरचे लिखाण हे थोडे गूढ होत जाते. जवळच्याना संदर्भ माहीत असतो म्हणून समजते. नवीन वाचकास कळत नाही व तो लेखकाच्या बाबतीत नकारात्मक होतो. करीता विचारांचे मागचे विचार हे शल्यचिकित्सा (postmortem) झाल्याशिवाय कळत नाही त्यात चूक काहीच नाही. श्रीकांतजी आपले म्हणणे योग्यच आहे.आपल्यावर झालेल्या टीकेचा अभ्यास केल्यास परिपक्वता लवकर येते.

    ReplyDelete
  8. बऱ्याच वेळा प्रतिथयश लेखकांचे परिपक्व झाल्यावरचे लिखाण हे थोडे गूढ होत जाते. जवळच्याना संदर्भ माहीत असतो म्हणून समजते. नवीन वाचकास कळत नाही व तो लेखकाच्या बाबतीत नकारात्मक होतो. करीता विचारांचे मागचे विचार हे शल्यचिकित्सा (postmortem) झाल्याशिवाय कळत नाही त्यात चूक काहीच नाही. श्रीकांतजी आपले म्हणणे योग्यच आहे.आपल्यावर झालेल्या टीकेचा अभ्यास केल्यास परिपक्वता लवकर येते.

    आर्किटेक्ट अनिरुद्ध नाईक

    ReplyDelete
  9. श्रीकांतजी,आपण स्पष्टपणे काहीशी तिरकस मतमांडणी केली .छान वाटले.परंतु कुरुंदकर गुरुजींच्या आठवणी सांगणे याचा अर्थ 'आरत्या ओवाळणे' असा लावणे योग्य वाटत नाही.आरत्या फक्त भक्तांनीच ओवाळायच्या असतात. नरसिंग देशमुख म्हणतात त्याप्रमाणे गुरुजींच्या विचारांची चिकित्सा करणे येरा गबाळ्याचे काम निश्चितच नव्हे.जो माणूस वयाच्या नवव्या वर्षी रामायण, महाभारत,भागवत अशा प्रकारचे ग्रंथ हातावेगळे करतो आणि अठराव्या वर्षी भक्कम भूमिका घेतो.त्याच्या बुध्दीवैभवाचे आवार सगळ्यांच्या आकलन कक्षेत येईलच असे नाही. कुरुंदकर ही केवळ तार्किकतेवर उभारलेली इमारत नव्हती.त्यांनी केलेल्या धर्मचिकित्सेची उंची आजवर कोणालाही गाठता आलेली नाही.ही चिकित्सा गृहतिके समोर ठेवून पीएच.डी.चा प्रबंध लिहावा तशी सुध्दा नाही.आपल्याकडे या जातीचेच पायली पायली लोक दिसतात.त्यांनाच आपण विद्वान,विचारवंत म्हणून थोपटत असतो. कुरुंदकर गुरूजी यांपैकी नव्हते.आज गुरुजी असते तर हुकुमशाही वृत्तीवर त्यांची लेखणी एकीकडे तुटून पडली असती आणि दुसरीकडे घराणेशाहीचा खरपूस समाचार घेण्यातही ती अग्रभागी राहिली असती.आज सर्वदूर वैचारिक लेचेपेचेपणा दिसतो.तो दिसला नसता.
    चला या निमित्ताने आपणही वेगळ्या पध्दतीने गुरुजींची आठवण जागविली.

    ReplyDelete