Monday, July 20, 2020

‘महाभारताचे वास्तव दर्शन’ आणि कुरूंदकर!


उरूस, 20 जूलै 2020 

नरहर कुरूंदकर यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या विचारांची चिकित्सा व्हावी असा विचार पुढे आला. यावर एक चांगली चर्चा महाराष्ट्रात आता घडताना दिसत आहे. माझ्या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिय व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी मी साधार आपली टीका मांडावी अशी अपेक्षा व्यक्त केली. खरे तर माझा स्वत:चा कुरूंदरकर गुरूंजींच्या विचारांचा सखोल अभ्यास नाही. माझी मर्यादा मी मान्यही केली. पण विश्वंभर यांनी व्यक्त केलेली अपेक्षा एका अतिशय जबाबदार ज्ञानी विद्वान माणसाने आधीच पूर्ण केलेली आहे. त्याचीच एक तोंड ओळख वाचकांना करून देण्यासाठी या लेखाचा प्रपंच.

माझ्या जन्माच्याही आधी 1970 सालीच प्राचार्य अनंत महाराज आठवले यांनी ‘महाभारताचे वास्तव दर्शन’ हे पुस्तक लिहीले. या पुस्तकांत महाभारत आणि विशेषत: कर्णावर जे लिखाण मराठीत झाले त्या प्रमुख पुस्तकांचा सविस्तर आढावा घेतला आहे. त्यातील दोष पुराव्यासह दाखवून दिलेले आहेत.

ज्या पुस्तकांची चिकित्सा या ग्रंथांत करण्यात आली आहे त्यात प्रमुख आहेत, 1. हा जय नावाचा इतिहास आहे- आनंद साधले, 2. युगांत- इरावती कर्वे 3. महाभारतातील व्यक्तिदर्शन- शं.के.पेंडसे 4. व्यासपर्व- दुर्गाबाई भागवत या शिवाय ज्या ललित कलाकृती महाभारतावर आधारीत आहेत त्यांचाही आढावा एक परिशिष्ट जोडून घेतला आहे. त्यात 1. मृत्यूंजय-शिवाजी सावंत 2. महापुरूष-आनंद साधले 3. कौन्तेय- वि.वा. शिरवाडकर  या तीन कलाकृतींचा समावेश आहे. या शिवाय माधव मनोहर यांनी या पुस्तकावर घेतलेले आक्षेप आणि त्याला दिलेले उत्तर शिवाय वा.वि.भागवत यांनी महाभारतावर जे लेख 1984 साली पैंजण दिवाळी अंक व सोबत साप्ताहिकांत लिहीले त्याचेही खंडन एका परिशिष्टांत केले आहे. या शिवाय ज्याची फारशी चर्चा झाली नाही असे विद्यावाचस्पती प्रा. श्रीराम पंडित यांचे ‘शोध कर्णाचा’ हे पुस्तक पण अनंत महाराज यांनी विचारार्थ घेतले आहे.

पुस्तकाची दुसरी आवृत्ती 1993 मध्ये तर तिसरी आवृत्ती 2000 मध्ये प्रकाशीत झाली आहे.

पुस्तकाची पहिली आवृत्ती कुरूंदकर गुरूजींच्या हयातीतच प्रकाशीत झाली. स्वत: गुरूजींचे पुस्तक ‘व्यासांचे शिल्प’ हे नंतर प्रकाशीत झाले. हे पुस्तक म्हणजे गुरूजींच्या महाभारत विषयक स्फुट लेखांचा संग्रह आहे. कुरूंदकर गुरूजींनी  महाभारत हा एकच विषय घेवून सविस्तर असे लिखाण केले नाही. हे त्यांच्या बर्‍याच पुस्तकांबाबत दिसून येते. त्यांचे विविध लेख विविध निमित्ताने लिहीलेले एकत्र करून त्याची पुस्तके बनवलेली आहेत.

या पुस्तकांत एक उल्लेख अतिशय स्पष्ट असा आहे की ज्यामुळे कुरूंदकर गुरूजींच्या महाभारत अभ्यासावर प्रश्‍नचिन्ह उभे राहते. त्याचा कुठलाही खुलासा गुरूजींनी आपल्या हयातीत केला नाही. इरावती बाईंनी आपल्या पुस्तकाच्या निवेदनात लिहीलं आहे की प्रा. कुरूंदकर, प्रा. मेहंदळे, प्रा. कालेलकर, प्रा. पुंडलीक, श्री. डिंगरे, प्रा. मंगळूरकर यांनी लिखाणातील चुका काढून टाकण्यात मदत केली. त्यासाठी बाईंनी त्यांचे आभार मानले आहेत. यावर आठवलेंनी असा आक्षेप घेतला आहे, ‘या सर्व विद्वानांनी पुस्तकाचे जे परीक्षण केले ते केवळ स्पेलिंगदुरुस्ती आणि शुद्धलेखनाच्या चुका दूरुस्त करणे एवढ्यापुरतेच होते काय?’

आता गुरूजींचे काम होते की हे पुस्तक 1970 ला प्रकाशीत झाल्यावर त्यात जे आक्षेप आधीच्या अभ्यासकांच्या लिखाणावर घेण्यात आलेले आहेत त्याचे खंडन करावे. यातील ‘युगांत’ सारख्या अकादमी पुरस्कार प्राप्त ग्रंथाशी तर गुरूजींचा सरळच संबंध होता.

योगेश काटे यांनी या संबंधात एक आठवण लिहीली आहे. ‘महाभारताचे वास्तव दर्शन’ प्रकाशीत झाल्यावर रणजीत देसाई यांची ‘राधेय’ कादंबरी प्रकाशीत झाली. तिचे हस्तलिखीत घेवून ते गुरूजींच्याकडे चर्चेसाठी आलेले होते. यावर गुरूजींनी रणजीत देसाईंना दिलेला सल्ला असा. कादंबरीच्या सुरवातीला एक टीप तूम्ही टाका. ही कादंबरी प्रत्येकाच्या मनातील कर्णावर आहे. हा कर्ण महाभारताच्या पानांमध्ये शोधू नये.

गुरूजींनी असा सल्ला रणजीत देसाईंना देण्याचे कारण म्हणजे ‘राधेय’ प्रकाशीत झाल्यावर अनंत महाराजां सारखे अभ्यासक तिच्यातील अवास्तव मांडलेले विचार साधार सप्रमाण खोडून काढतील. त्यापेक्षा आधीच तूम्ही ही भूमिका घ्या. म्हणजे टीकेपासून सुटका होईल. आता ही पळवाट ललित लेखकाला उपलब्ध आहे. पण कुरूंदकरांसारख्या वैचारिक लेखकाला नाही. त्यामुळे अपेक्षा अशी होती की गुरूजींनी या पुस्तकाची दखल घेवून सविस्तर लिहायला हवे होते. पण तसे घडले नाही.

बरं अनंत महाराज आठवले असं नाव उच्चारलं की कुणी तरी एक सांप्रदायिक व्यक्ती आहे. तिने केलेला अभ्यास आणि त्यांचे विचार एका सश्रद्ध भारतीय संस्कृती आणि परंपरेच्या भक्ताचे असणार. आपण त्याची दखल घ्यायची गरज नाही. पण असं म्हणायची काही सोय अनंत महाराजांनी शिल्लक ठेवलेली नाही. कारण त्यांनी सुरवातीलाच एक भूमिका स्पष्ट केली आहे की भांडारकर संशोधन संस्थेची चिकित्सक आवृत्तीच त्यांनी आपल्या विवेचनासाठी वापरली आहे. हीच आवृत्ती बहुतेक विद्वानांनी वापरली आहे. आणि आपली मांडणी तर्काच्याच आधारावर घासून तपासून घ्या असा आग्रह अनंत महाराजांचा आहे. ‘... महाभारत एक धर्मग्रंथ आहे व आठवले धर्मनिष्ठ असल्याने आम्ही सुधारक म्हणून आमचे खंडन करतात असा अपसमज कुणी करून घेऊ नये. घटनेकडे बघण्याचे अनेक दृष्टिकोन संभवत असतील कदाचित, पण महाभारतातील घटना शब्दबद्ध झालेल्या असल्याने त्यांचाच विचार लेखनसमयी करावयाचा आहे. त्यामुळे तेथील शब्दातून अमुक अर्थ काढता येईल की नाही हा वादाचा विषय संभवतच नाही. कोणाच्याही दृष्टीने संभवत नाही. महाभारतातील विधाने आपल्या सोयीने ग्राह्य वा अग्राह्य ठरवणे उचित नाही. माझ्या लेखनाच्या मूल्यमापनात हा विचार ध्यानात ठेवावा ही विनंती.’

कर्णाच्या बाबतीतले केवळ एकच उदाहरण आठवलेंच्या पुस्तकातले माहितीस्तव देतो. द्रौपदी स्वयंवराचा प्रसंग आहे. कर्ण धनुष्याला बाण लावतो आणि तो सोडणार तोच द्रौपदी उच्चारते की मी सूतपूत्राला वरणार नाही. या श्‍लोकावर कर्णाची कशी अवहेलना झाली याची कथा रचली जाते. पण महाभारताच्या संशोधीत आवृत्तीत मात्र हा श्लोकच नाही. त्याचे कारण म्हणजे कर्णाला मुळात धनुष्य वाकवताच आलेले नाही. तेंव्हा त्याला प्रत्यंचा जोडणे आणि पुढे बाण सोडणे शक्य नाही. कर्णच नाही तर शल्यालाही हे करता आलेले नाही. भांडारकर संशोधन संस्थेने जी प्रत सिद्ध केली आणि सर्वच विद्वान जी प्रत प्रमाण म्हणून मानतात त्यात पुढचा श्लेाक आला आहे ज्याचा मराठी अनुवाद असा, ‘अरे ! जे धनुष्य कर्ण, शल्य, यांच्यासारख्या बलवान आणि धनुर्वेद-निष्णात म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रमुख राजांनाही नुसते वाकविता आले नाही ते या ब्राह्मण बटूला कसे सज्ज करता येईल?’

पुढचा हा श्लोक संशोधीत आवृत्तीत स्विकारला तर आपोआपच मागचा संदर्भ प्रक्षिप्त ठरतो. जर कर्णाला धनुष्य वाकविताच आले नाही. तर त्याचा पुढे अपमान द्रौपदीने केला याला काही अर्थच शिल्लक राहत नाही.

कर्णाच्या पराक्रमाबाबत अखेरच्या महायुद्धाच्या आधी किमान दोन प्रसंगांत कर्णाला अर्जूनासमोर पराभव स्विकारावा लागल्याचे स्पष्ट उल्लेख आणि पुरावे महाभारतात आहेत. दुर्योधनाला वनविहार करताना गंधर्वांनी पकडले आणि बंदिस्त केले त्यावेळी कर्ण पळून गेला. अर्जूनाने तेंव्हा दुर्याधनाला वाचविले. दुसर्‍यांदा तर प्रत्यक्ष मैदानावर कर्णाचा पराभव झालेला आहे. विराटाच्या गोग्रहणाच्या वेळच्या युद्धात सर्वांचा पराभव अर्जूनाने केला. कर्णाचाही पराभव केला शिवाय कर्णाचा एक भाऊही यात ठार झाला.

असे कितीतरी तर्कसंगत श्‍लोक संशोधीत आवृत्तीतलेच घेवून त्यातून अनंत महाराज आठवले यांनी महाभारताचा अन्वयार्थ लावून दाखवला आहे. यासाठी त्यांनी भांडारकर संशोधन संस्थेचीच प्रत वापरली आहे. ही वापरत असताना त्याही प्रतीतील मर्यादा दाखवून दिलेल्या आहेत.

विश्वंभर चौधरी यांनी एक अपेक्षा व्यक्त केली म्हणून ‘महाभारताचे वास्तव दर्शन’ या ग्रंथाचा मी छोटा परिचय करून दिला. कुरूंदकर गुरूजींच्या आणि त्या काळातील इतर विद्वानांच्या वैचारिक ललित पुस्तकांतून येणार्‍या महाभारताच्या दर्शनावर साधार आक्षेप घेणारा हा सविस्तर ग्रंथ आहे. हा ग्रंथच मुळात ‘आक्षेपाच्या संदर्भात’ असा लिहीला गेलेला आहे. याच पद्धतीचे विचारांचे खंडन मंडन कुरूंदकर गुरूजींना अपेक्षीत होते. ते आज होताना दिसत नाही ही खंत आहे.

मी स्वत: या विषयाचा अभ्यासक नाही. ज्या कुणी हे लिहीलं आहे ते फक्त मी वाचकांच्या निदर्शनास आणून देत आहे.  कुरूंदकर गुरूजींनी ज्या ज्या विषयावर लेखन केले त्या त्या विषयावर अभ्यास संशोधन करणार्‍यांनी त्याची दखल घेत त्या विषयाचे नविन आकलन समोर मांडावे. लक्षात न आलेले पैलू उलगडून दाखवावेत. गुरूजींच्या ज्या पैलूं कडे लक्ष वेधले आहे त्या दिशेने अभ्यास करून विस्तार करावा. असे करणार असू तरच आपण गुरूजींचा वारसा चालवत आहोत असे सिद्ध होईल. अन्यथा  ‘आरती ओवाळण्याचे’ आरोप होत राहतील.

अनंत महाराज आठवले यांनी सन्यास घेतल्यानंतर त्यांची ओळख श्री स्वामी वरदानंदभारती अशी बनली. त्यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांत कुरूंदकर गुरूजींना अपेक्षीत असलेल्या ज्ञानयज्ञात आपण सहभागी झालो तर उत्तमच. हे पुस्तक कुणाला हवे असल्यास खालील क्रमांकांवर संपर्क साधावा.

(स्वाती  शिरडकर, औरंगाबाद मो. 9890898078, देबडवार पुस्तक भांडार नांदेड 9423615127, यशवंत प्रकाशन पुणे  8766980160, नेर्लेकर बुक सेलर्स पुणे 9422323600 web site www.santkavidasganu.org )

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

(या लेखावर प्रा. डाॅ. श्रीनिवास पांडे यांनी एक आक्षेप घेतला. नरहर कुरूंदकर गुरूजींनी 'महाभारताचे वास्तव दर्श' रा पुस्तकावर लेख लिहील्याचे लक्षात आणून दिली. ही दूरूस्ती मी करतो.
याला योगेश काटे यांनी जे उत्तर दिले तेही वाचकांसाठी देत आहे- -  जी  वाचाला लेख तो अभिवादन मधील.
खंडन नाही करु शकले कै. कुरुंदकर गुरुजी  मतभेद आहे. एवढच म्हणाले  व का मतभेद आहेत याची. कारणमीमांसा    नाही केली. नेहमी प्रमाणे शब्दच्छल केला. कर्णावरचे मत मान्य केले त्यांनी त्यात.  कुरुंदकर म्हणतात अनंत महाराज व त्यांचा (कुरुंदकरां)  महाभारतकडे बघण्याचा परिपेक्ष्य वेगळा आहे. श्री अनंत महाराज यांचा परिपेक्ष हा.सांस्कृतिक आहे अस म्हणतात व त्यांचा ऐतिहासिक आहे म्हणतात. इथेच सगळी मेख आहे.आणि कलमंदीर येथील वादविवाद सभेत  अनंत महाराज यांनी प्रश्न विचारला तेंव्हा महाभारत इतिहास नाही तर कल्पना आहे अस सांगितलं.
रुक्मिणी या शब्दाचा विपर्यस्त अर्थ काढला तो कसा चुकीचा आहे ते श्री प्रा.आठवले यांनी महाभारताच्या त्यांच्या ग्रंथात सिध्द केलय.व्यासांचे शिल्प मध्ये  बाळशास्त्री हरदास व अनंतराव आठवले हे सांस्कृतिक नजरेतुन पाहतात एवढच लिहलं. एक एक मुद्दा घेवुन खंडन नाही केलं. दखल घेतली हे म्हणणं बरोबर आहे पण म्हणजे उपरोक्त लेखकाचे म्हणण्या प्रमाणे चिकीत्सा नाही केली. अस आहे व ते खर आहे. आतापर्यंत श्री प्रा.आठवले यांच्या ग्रंथाचे खंडन मराठी साहित्य विश्वात कोणही करु शकले नाही.)

2 comments:

  1. सर, आपला लेख आवडला खरच चिकित्सा ही झालीच पाहिजे. आपण उपस्थित केलेल्या महाभारताचे वास्तव दर्शन या पुस्तकात मांडलेल्या श्लोकांचा उल्लेख केला आहे. याची कुरुंदकरांनी चिकित्सा केलेली नाही. हा लेख वाचल्यानंतर मला डॉ. जगदीश कदम यांनी गुरुजींची घेतलेली मुलाखत आठवली त्यातील दोन प्रश्नांची उत्तरे कदाचित या चिकित्सेला उत्तर म्हणून लागु पडतील अस मला वाटले ती देत आहे.... प्रश्न - सर, आपला धर्म वगैरे गोष्टींवर विश्वास आहे का?

    - तेव्हापासूनच माझा धर्मावर विश्वास नाही. आजही नाही. मी स्वत: होताहोईतो धर्मकृत्य टाळतो. पण चार लोकांच्या आग्रहाखातर एखादे वेळी सहभागी होतो. फक्त हे सांगून सहभागी होतो की, यापैकी कशावरही माझा विश्वास नाही. कारण जे अस्तित्वात नाही, त्याच्याशी मला शत्रुत्व करता येत नाही. म्हणून धर्म हा माझ्यासाठी चेष्टेचा, करमणुकीचा, अभ्यासाचा विषय आहे; परंतु तो श्रद्धेचा विषय नाही. भोवतालच्या नातेवाइकांच्या मात्र हा श्रद्धेचा विषय आहे.

    माझा धर्मावर विश्वास नाही, ही गोष्ट जे माझ्या धर्माचे नाहीत त्यांना आवडते; पण त्यांच्याही धर्मावर माझा कवडीचा विश्वास नाही, हे माझे म्हणणे त्यांना आवडत नाही. माझा धर्मावर विश्वास नाही म्हणजे, जगातल्या कोणत्याच धर्मावर विश्वास नाही. भोवतालच्या लोकांना जगातील कोणत्या तरी एका धर्माचा अभिमान असतो. उरलेल्या धर्मांना ते शिव्या देतात. त्यामुळे कोणत्याही धर्मावर श्रद्धा असणाऱ्या माणसाशी माझी मनोवृत्ती जुळत नाही.
    प्रश्न - संस्कृतमधील जुने काव्यशास्त्र आज फारसे उपयोगाचे नाही, असे आपणास वाटते का?

    - संस्कृतमधलं जुनं काव्यशास्त्र हा अभ्यासाचा विषय असतो, श्रद्धेचा नाही. म्हणून जुनं काव्यशास्त्र मोठं निर्दोष आहे, असं मी समजत नाही; पण त्या काव्यशास्त्रात काही अर्थ नाही, असंही समजत नाही. त्यातही काही महत्त्वाच्या बाबी आहेत. प्रश्न कुठं येतो? हे जुनं काव्यशास्त्र नव्या साहित्याच्या अभ्यासाला उपयोगी पडेल काय? मला स्वत:ला असं वाटतं की, हे जुनं काव्यशास्त्र नव्या वाङ़्‌मयाच्या अभ्यासाला उपयोगी पडणार नाहीच, पण जुन्या वाङ्‌मयाच्या बाबतीतसुद्धा त्याच्या संपूर्ण आकलनाला हे जुनं काव्यशास्त्र अपुरं पडतं. म्हणून वाङ्‌मय नवं असो, जुनं असो- कोणत्याही वाङ़्‌मयाच्या अभ्यासाला जुनं काव्यशास्त्र अपूर्ण आहे, हे लक्षात घेऊन त्याचा ऐतिहासिक अभ्यास केला पाहिजे.

    ReplyDelete