Monday, July 13, 2020

कॉंग्रेसचा पोपट मेला आहे !


उरूस, 13 जूलै 2020   

राजस्थानमध्ये गंभीर राजकीय संक़टाची छाया पसरली आहे. अशोक गेहलोत सरकार जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण या निमित्ताने जी चर्चा चालू आहे वाहिन्यांवर ती पाहिली की अकबराची एक गोष्ट आठवते. अकबराचा लाडका पोपट मरण पावतो. पण ते बादहशाला सांगायचे कसे? कारण बादशहा आपल्यालाच शिक्षा करेल. मग पंख कसे मिटले आहे, तोंड वासले आहे, डोळे पांढरे पडले आहेत, श्‍वास कसा बंद आहे, मान टाकली आहे असं सगळे सांगत राहतात. पण कुणी कबुल करत नाही की पोपट मेला आहे. मग वास सुटतो आणि पोपट मेल्याचे सत्य समोर येतेच.

कॉंग्रेस पक्षाची अवस्था तशीच झाली आहे. कर्नाटक, मध्यप्रदेश आणि आता राजस्थान. एक संयुक्त आघाडी सरकार (कर्नाटक), एक बहुमत नसलेले पण अपक्षांच्या पाठिंब्यावरचे सरकार (मध्य प्रदेश) आणि आता एक पूर्ण बहुमताचे  स्थिर सरकार (राजस्थान) पत्त्याचा बंगला कोसळावा तसे कोसळत चालले आहेत. याची कुठलीच वस्तुनिष्ठ कारणमिमांसा कॉंग्रेसवाले किंवा त्यांचे हितचिंतक जमात-ए-पुरोगामी करायला तयार नाहीत ही खरी शोकांतिका आहे.

राजस्थान सरकार मधील असंतोष ही काही नविन गोष्ट नाही. सचिन पायलट प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष होते, त्यांनी निवडणुक प्रचारात भरपूर मेहनत घेतली होती, त्यांना मुख्यमंत्री पदाचे आश्वासन देण्यात आले होते. पण प्रत्यक्षात मात्र अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्री करण्यात आले. हाच प्रकार मध्यप्रदेशातही करण्यात आला. तिथेही ज्योतिरादित्य शिंदे यांना डावलून कमलनाथ यांना मुख्यमंत्री केल्या गेले.

दिल्लीत बसलेली पक्षश्रेष्ठी नावाची संस्था मख्ख बसून राहते आपले काही ऐकत नाही ही तक्रार कित्येक वर्षांपासून सातत्याने केली गेली आहे. कंटाळून काही तरूण नेत्यांनी बाहेरचा रस्ता पकडला. राज्या राज्यांतील तरूण नेत्यांना भेटण्या बोलण्याऐवजी राहूल गांधी आपल्या कुत्र्याला बिस्कीटं खावू घालणं पसंद करतात ही वस्तुस्थिती आहे. हा आरोप कुण्या सामान्य माणसाने किंवा राजकीय विरोधकाने केला नव्हता. तर हेमंत बिस्वशर्मा या असम मधील तरूण कॉंग्रेस नेत्यानेच केला होता. शेवटी त्याने कॉंग्रेसचा त्याग केला. परिणामी असम मधून कॉंग्रेसची सत्ता गेली. भाजपला स्वत:च्या बळावर बहुमत तिथे मिळाले. याच असम राज्यांतून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे राज्यसभेवर निवडुन जायचे. त्यांचा तो रस्ताही बंद झाला. आणि हे घडलं ते केवळ माणसं सोडून कुत्र्याला महत्व देणार्‍या नेतृत्वामुळे.

टी. अंजय्या हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. राजीव गांधी तेंव्हा कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस होते. इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाची ही गोष्ट. हैदराबादच्या विमानतळावर टी. अंजय्या यांनी राजीव गांधी यांच्या चपला उचलल्या. राजीव गांधी त्यांना काहीतरी अपमानास्पद बोलले होते. ही बातमी इतकी वार्‍यासारखी पसरली आंध्रप्रदेशांत की पुढे केवळ 9 महिन्यात तेलगु अस्मितेच्या नावाखाली एन.टी.रामाराव यांनी तेलगु देसम पक्षाची स्थापना करून कॉंग्रेसचा पराभव घडवून आणला व एन.टी. रामाराव आंध्राचे मुख्यमंत्री बनले.

पण यापासून काही शिकेल ती कॉंग्रेस कुठली. पुढे चालून ज्या कॉंग्रेस नेत्याने चंद्राबाबूंच्या हातातून मेहनत करून राज्यभर फिरून सत्ता हिसकावून घेतली त्याचे नाव वाय.एस. राजशेखर रेड्डी (वायएसआर नावाने ते लोकप्रिय होते). याच रेड्डी यांचा मुलगा म्हणजे जगन मोहन रेड्डी. त्यानेही असेच कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींशी सतत संपर्क करायचा प्रयत्न केला. रेड्डी यांच्या निधनानंतर त्याला मुख्यमंत्री करा अशी आमदारांची मागणी होती. पण सोनिया गांधी- राहूल गांधी आपल्याच मस्तीत राहिले. उलट त्याच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला. त्याला तुरूंगातही जावे लागले. अहमद पटेल, गुलाम नबी आझाद यांच्यासारखे दरबारी राजकारणी त्यांना सतत घेरा घालून बसलेले. परिणामी जगनमोहन रेड्डीला पक्षातून बाहेर पडावे लागले. त्याने वेगळा पक्ष स्थापन केला आणि आंध्रप्रदेशांतून तेलगु देसमचा नाही तर कॉंग्रेसचा समुळ नायनाट करून दाखवला.

पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी यांचेही उदाहरण असेच आहे. जनतेचे समर्थन असणार्‍या तरूण लोकनेत्यांची उपेक्षा करणे हा कॉंग्रेसचा एक कलमी कार्यक्रम राहिला. समोर सक्षम पर्याय नव्हता तो पर्यंत सत्तेच्या लोभाने कॉंग्रसची सर्कस कशीबशी चालू राहिली. पण हळू हळू स्थानिक पातळीवर प्रादेशीक पक्षांचे पर्याय उभे राहत गेले, देश पातळीवर भाजप सारखा सक्षम पर्याय उभा राहिला आणि कॉंग्रेसचा किल्ला ढासळायला सुरवात झाली. आता तर धक्का मारायचीही गरज उरलेली नाही. एखाद्या पावसात भक्कम गढीची मातीची भिंत कोसळावी तशी अवस्था झालेली आहे.

राजस्थानमध्ये बाहेरून कुणीही हे सरकार पाडण्याचे प्रयत्न केलेले नाहीत. सचिन पायलट यांना जास्तीचे दुखावण्याचे काहीच कारण नव्हते. त्यांच्याकडून पक्षाध्यक्षपद काढून घ्यायची हालचाल अशोक गेहलोत यांनी का सुरू केली? सरकारविरोधी कारवाया केला म्हणून आपल्याच पक्षाच्या उपमुख्यमंत्र्यावर पक्ष अध्यक्षावर देशद्रोहाचे कलम लावावे हे नेमके काय धोरण आहे?

कॉंग्रेसचे प्रवक्ते ज्या प्रतिक्रिया देत आहेत त्याला भाउ तोरसेकर यांनी नेमके नाव दिले आहे, ‘बोलसेनारो व्हायरस बाधा’. म्हणजे असा रोग ज्यात रोगी आपल्याला रेाग आहे हेच कबुल करत नाही. आपलं सगळं ठीकच चालू आहे असंच कॉंग्रेसवाले सांगत राहतात. कॉंग्रेसचे जे हितचिंतक आहेत ते सर्व जमात-ए-पुरोगामी हे भाजपला आंधळा विरोध करत कॉंग्रेसची पाठराखण करत आहेत. त्यांना भाजप नको म्हणू कॉंग्रेस हवी आहे. पण तेही कॉंग्रेसच्या समस्येचे नेमके रोगनिदान करायला तयार नाहीत.

खरं तर कॉंग्रेसचा आणि त्यातही सोनिया-राहूल-प्रियंका या गांधी घराण्याच्या नेतृत्वाचा पोपट मेला आहे आणि हे कबुल करण्याची कुणाची हिंमत नाही. कॉंग्रेस प्रवक्ते संजय झा यांनी आत्मचिंतनाचा आवाज उठवला की लगेच त्यांना पक्ष प्रवक्तेपदावरून हटवले. काल माजी मंत्री व राज्यसभेतील खासदार कपिल सिब्बल यांनी ट्विट करून पक्षाविषयी चिंता जाहिर केली. तबेल्यातून सर्व घोडे पळून गेल्यावर आम्ही जागे होणार का? इतक्या दाहक शब्दांत नेतृत्वावर टीका केली. पण हे ऐकणार कोण?

आता दोनच पर्याय शिल्लक राहतात. एक तर राहूल-सोनिया-प्रियंका यांना बाजूला सारून इतर कर्तबगार कॉंग्रेस नेत्यांनी (असे कुणी आहे का? हाच प्रश्‍नच आहे) पुढे यावे. यांना बाजूला सारून पक्ष हाती घ्यावा. सगळी सुरवात पहिल्यापासून करावी. तळापासून पक्षसंघटना बांधत यावे. पक्षातून बाहेर गेलेल्या सर्व प्रमुख नेत्यांना परत पक्षात आणावे. उदा. शरद पवार, जगन मोहन रेड्डी, ममता बॅनर्जी इ. लोक चळवळ असलेल्या कॉंग्रेसचे मुळ स्वरूप परत प्रकट करावे. त्याला एक  वर्ग निश्‍चितच प्रतिसाद देईल.

याच्या उलट कॉंग्रेसला पूर्णत: बाजूला सारून देशपातळीवर भाजपेतर पक्षांची एक स्वतंत्र आघाडी तयार करण्यात यावी. त्या आघाडीने प्रादेशिक पक्षांना सोबत घेताना देशपातळीवर एक पर्याय उभा करावा. यासाठी कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले आणि आताही बाहेर पडू पाहणार्‍या सर्वांना सोबत घ्यावे. आत्तापासून प्रयत्न केले तर 2024 च्या निवडणुकांत एक राजकीय आव्हान उभे करता येईल.

ही चर्चा कितीही केली तरी ती कुणी कॉंग्रेसवाले मनावर घेणार नाहीत याची मला खात्री आहे. पण राजकीय क्षेत्रात काम करू पाहणारे जे कुणी नविन तरूण कार्यकर्ते असतील त्यांनी लक्षात घ्यावे की राहूल सोनिया प्रियंका यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसमध्ये काम करणे म्हणजे राजकीय आत्महत्या आहे. त्यापेक्षा दुसरा कुठलाही मार्ग अवलंबावा. अगदी स्थानिक पातळीवर स्वत:पुरता एखादा गट स्थापन करून काम केलं तरी फायदा मिळेल. पण कॉंग्रेसमध्ये जाण्याचा फायदा नाही.

राजस्थान मध्ये काही तडजोडी होवून सचिन पायलट परतले किंवा त्यांना आता कॉंग्रेसने मुख्यमंत्री बनवले तरी हा प्रश्‍न सुटणार नाही. कारण या दुखण्याचे मुळ दिल्लीत 24 अकबर रोड (कॉंग्रेसपक्षाचे मुख्यालय) इथे राहूल प्रियंका सोनिया यांच्यापाशी आहे. अंगठी जंगलात हरवली आहे. सोयीसाठी आपल्या घरच्या अंगणात कितीही शोधली तरी सापडणार नाही. 

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

1 comment:

  1. अखेर कॉंग्रेस विसर्जीत करण्याचे महात्मा गांधींचे स्वप्न पुर्णत्वाला यायची चिन्हे दिसताहेत 😊

    ReplyDelete