Wednesday, September 18, 2013

मराठवाड्याने तेलंगणात जावे का?

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 17 सप्टेंबर 2013 
--------------------------------------------------

बरोबर एक वर्षांपूर्वी मराठवाड्यातील एका मित्राशी बोलताना मी म्हणालो, ‘‘आज 17 सप्टेंबरच्या मुहूर्तावर आपण तेलंगणात जाण्याची मागणी करायला पाहिजे. पिण्याचं पाणीही नाकारणार्‍या महाराष्ट्रात रहायचंच कशाला?’’ आमच्या सोबत असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील तिसरा मित्र आश्चर्याने म्हणाला, ‘‘वेगळं राज्य वगैरे ठिक आहे पण हे तेलंगणाचे झंझट कशाला? आपला त्यांच्याशी काय संबंध?’’ म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला (1 मे 1960) 53 वर्षे पूर्ण झाली पण राज्यातील इतर भावांना अजून माहित नाही की मराठवाडा हा हैदराबाद राज्याचा भाग होता. मराठवाड्याची राजधानी ही हैदराबाद होती. आणि इतकंच नाही तर ज्या संपूर्ण दक्षिण भारताला ‘इडली-वडा-दोसा सांबर’ म्हणून आपण चिडवतो हे पदार्थ या हैदराबादचे नाहीत. हैदराबाद भोवतीचा जो तेलंगाणा प्रदेश आहे ज्याचे आता स्वतंत्र राज्य करण्यास केंद्र शासनाने मंजूरी दिली आहे त्यांचे जेवण हे मरावाड्याप्रमाणेच ‘ज्वारी/बाजरीची भाकरी, वांग्याची भाजी, तुरीच्या डाळीचे वरण आणि भात’ हे आहे. मराठवाड्याचे पाच जिल्हे (आता 8) कर्नाटकाचे तीन जिल्हे आणि आंध्रप्रदेशातील तेलंगाणा विभागाचे 7 जिल्हे असा हा प्रदेश होता.
हैदराबाद संस्थानावर निजामाच्या असफजाही घराण्याची राजवट होती. त्यामुळे या राजवटीला निजामी राजवट असा शब्द आहे. पण सर्रास सगळे ‘निजामशाही’ राजवट असा शब्द वापरतात. आणि परत ही निजामशाही म्हणजे शिवाजी महाराजांचे वडिल शहाजी राजे ज्यांच्या पदरी होते ती निजामशाही असेही समजतात. 
दक्षिणेत गुलबर्गा येथे हसन गंगू बहमनी याने बहमनी साम्राज्याची स्थापना केली. याच साम्राज्याची पुढे पाच शाह्यात विभागणी झाली. 1. हैदराबाद जवळील गोवळकुंडा येथील कुतूबशाही. 2.बीदर (कर्नाटक)  येथील बरीदशाही 3. विजापूर (कर्नाटक) येथील आदिलशाही 4. एलिचपुर (खान्देश) येथील इमादशाही 5. अहमदनगर (महाराष्ट्र) येथील निजामशाही.  निजामशाही, बरीदशाही, इमादशाही राजवटी बरखास्त झाल्या. फक्त आदिलशाही व कुतूबशाही मात्र  जास्त काळ टिकल्या. याच कुतूबशाही सुलतानाच्या पदरी असलेल्या निजामाच्या पूर्वजांनी राज्य बळकावले व दिल्लीच्या मोगलांचे मांडलिकत्व पत्करून आपल्या ‘असफजाही’ घराण्याची राजवट पक्की केली. निजाम या पदामुळे या राजवटीला निजामी राजवट असे संबोधले जाते. 
भारत स्वतंत्र झाला तरी हैदराबाद संस्थान निजामाच्या अधिपत्याखालीच होते. 17 सप्टेंबर 1948 ला जनरल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली लष्काराने  "पोलिस कार्रवाई" असे नाव देवून हे संस्थान स्वतंत्र भारतात विलीन केले. हा सगळा इतिहास मला त्या माझ्या पश्चिम महाराष्ट्रातील मित्राला समजावून सांगावा लागला. त्यानेही तोंडाचा आ करून काहीतरी नवेच आपण ऐकत आहोत असा भाव चेहर्‍यावर बाळगला. 
वेगळे राज्य मागितले की कुणीही गल्लीबोळातील विद्वान उठतो आणि आपला जाड भिंगाचा चष्मा सावरीत मोठ मोठी जडजंबाळ आडकेवारी फेकत ‘‘पण हे राज्य आर्थिक दृष्ट स्वयंपूर्ण होणार नाही’’ असा बीनतोड (त्याच्यापरीने) युक्तीवाद आपल्या तोंडावर फेकतो. 20 वर्षांपूर्वी शेतकरी संघटनेने छोट्या राज्यांची संकल्पना मांडताना अवाढव्य प्रशासनिक खर्चाच्या राज्यांची संकल्पना खोडून सुटसूटीत प्रशासनाची छोटी राज्ये अशी संकल्पना मांडली होती.  त्याच अनुषंगाने बळीराज्य मराठवाडा, बळीराज्य विदर्भ, बळीराज्य उत्तर महाराष्ट्र, बळीराज्य पश्चिम महाराष्ट्र, बळीराज्य कोकण अशा महसुल विभागाप्रमाणे राज्यांचे चित्र रेखाटले होते. बळीराज्य म्हणणण्याचा उद्देश हे राज्य पोशिंद्यांचे असावे असा होता. पण इथे राज्य म्हटले की लगेच किती अधिकारी लागणार, किती इमारती बांधाव्या लागणार, किती नव्या फायली तयार होणार असल्या पैशा खाणार्‍या लांबलचक गोष्टींची यादी सुरू होते.
राज्य म्हणजे स्वयंपूर्ण स्वाभिमानी सामान्य माणसांची अस्मिता असे चित्र आमच्या डोळ्यासमोर येतच नाही. सध्या धावणार्‍या 1000 लालदिव्यांची जागा उद्या 2000 लालदिव्यांच्यागाड्या घेणार हीच आमची कल्पना. "बारीपाडा" या गावाबद्दल मी मागच्या लेखात लिहीले होते त्यावर मला आलेल्या असंख्य फोनपैकी अनेकांनी विचारले की ‘‘आहो, असे स्वाभिमानी गाव खरेच आहे काय?’’ म्हणजे आम्ही समजतो की जनता म्हणजे लाचार, भिकार, लोचट अशी कणाहीन माणसांची फौज आहे. आणि हीचे कल्याण करणारा कोणीतरी वर मुंबईला, दिल्लीला बसलेला आहे.
जरा प्रशासनाच्या पातळीवर छोटी छोटी राज्ये निर्माण झाली तर त्याने माणसांचे प्रश्न सोडवायला मदतच होईल किंवा जो अडथळा असेल तो नाहीसा होईल. आता मराठवाड्याच्या प्रत्येक गावातून मुंबईला जायला गाडी कशी मिळावी हीच प्रत्येकाला चिंता असते. म्हणजे निमाजाविरूद्ध लढणारे ताठ कण्याचे स्वामी रामानंद तीर्थांचे नेतृत्व जावून मुंबई आणि दिल्लीचे गुलाम असलेल्या हरामी लोचटानंद स्वार्थांचे नेतृत्व आले आहे. 
आमच्या एका उद्योगपती मित्राला बहुजन समाज पक्षाचा एक कार्यकर्ता हप्ता मागायला यायचा. काही दिवसांनी या कार्यकर्त्याने आपल्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र पक्षच काढला आणि हप्ता मागायला पूर्वीसारखाच आला. मित्राने त्याला विचारले, ‘‘अरे इतका मोठा पक्ष तूझ्या पाठिशी असताना तू कशाला सोडलास?’’ तो म्हणाला, ‘‘साहेब त्यांना हप्ता पोचविण्यापेक्षा ते दिल्लीला ज्याला देतात त्याच्याशीच आपण सरळ टाका भिडवला.’’ 
जर मराठवाड्यासाठी मुंबई दिल्लीकडे भिक मागणार असेल, शेतकर्‍यांसाठी पॅकेज दिल्लीहूनच सुटणार असेल आणि आमची मुंबईची विधानसभा नामर्दासारखी हातात हात घेवून बसून राहणार असेल तर मराठवाड्यानं डायरेक्ट दिल्लीकडे हात पसरलेले काय वाईट आहे? नाहीतरी इतिहासात अल्पकाळ का होईना देवगिरीच्या किल्ल्यावरून अल्लाउद्दीन खिलजीने संपूर्ण देशाचे राज्य केले होतेच. मग संपूर्ण देशाचे सोडा आमच्या प्रदेशाची तरी राजवट आमच्या हाती राहू द्या. आणि तसे नसेल तर आम्हाला तेलंगणात जावू द्या. नाहीतरी सांस्कृतिक आणि व्यापाराच्या दृष्टीने आजही आमची नाळ तेलंगणाशी जुळलेली आहेच.
अस्मितेच्या पातळीवर मराठवाडा स्वतंत्र आहेच. मराठी भाषेचा उगम आमच्याकडेच झाला, मराठीतील पहिला कवी मुकूंदराज आमच्याकडेच झाला, नामदेव, जनाबाई, ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदास अशी मोठी संत परंपरा आमच्याकडे आहे. उर्दू भाषेतील पहिला कवी वली दखनीही आमच्याकडचाच. आमच्या परिसरात बोलली जाणारी दखनी भाषा ही तर उर्दूच्याही आधीची. आणि तिच्यात उर्दूच्या 300 वर्षे आधी ग्रंथरचना झाली होती. मग जिच्यात आधी ग्रंथ रचना झाली ती दखनी भाषा उर्दूची बोलीभाषा म्हणून हिणवण्याचे काय कारण? या भाषेचे व्याकरणही मराठी प्रमाणे चालते. या प्रदेशातील हिंदू आणि मुसलमानांची एक अतिशय समृद्ध अशी सुफी परंपरा उर्वरीत महाराष्ट्राला आजही नीट समजू शकली नाही. कारणं काहीही असो जर तूम्ही आम्हाला समजू शकला नसाल तर आम्ही तूमच्यासोबत रहायचे कशाला?
आज एका महाराष्ट्रात असूनही नगर नाशिक मधून मराठवाड्याला हक्काचे पाणी देण्यास नकार मिळतो आहे. न्यायालयाने आदेश देवूनही हे पाणी दिले जात नाही. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केल्यास राज्य कर्जबाजारी आहे आणि हे कर्ज वाढतच आहे. मुळात ही शासनव्यवस्थाच कालबाह्य झाली आहे.  निजामाची राजवट आमच्या पूर्वजांनी ताठकण्याने  वागून भिरकावून लावली होती. 17 सप्टेंबरच्या मुहूर्तावर व्यवस्थापन शास्त्रात जगभरात मान्य असलेल्या 28 टक्के इतक्या खर्चात काम करणारे नविन जनताभिमुख प्रशासन मागण्याची हीच वेळ आली आहे. नसता सांस्कृतिक दृष्ट्या जवळच्या असणार्‍या तेलंगाणात तरी गेले पाहिजे.      

श्रीकांत अनंत उमरीकर,
मो. 9422878575.

Tuesday, September 10, 2013

अन्नसुरक्षेवर बारीपाड्याची शासनाला थप्पड

उरूस, दै. पुण्यनगरी,  मंगळवार 10 सप्टेंबर 2013 


बारीपाडा हे महाराष्ट्रातले एक छोटेसे गाव (ता. साक्रि, जि. धुळे). पलीकडे गुजरातचा डोंगराळ डांग जिल्हा पसरलेला.  मागील महिन्यात शासन जेंव्हा अन्नसुरक्षेच्या ‘भिकमाग्या’ विधेयकाची तयारी करत होतं तेंव्हा हे गाव एका वेगळ्याच गडबडीत होतं. गेली दहा वर्षे ‘वनभाज्यांची पाककला स्पर्धा’ या गावात आयोजित केली जाते. यावर्षी 180 स्त्रियांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. गावाची लोकसंख्या जेमतेम 700. गावात 100 च्या जवळपास घरे. जवळपासच्या वाडी वस्त्यांमधील स्त्रीयांनीही या स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला. शहरी लोकांना माहित नसलेल्या जवळपास 27 भाज्या या बायकांनी शोधून काढल्या व त्या शिजवून स्पर्धेत मांडल्या.

एका म्हातार्‍या बाईला मी अन्नसुरक्षा विधेयका बाबत विचारले. ती माझ्याकडे बघतच राहिली. मी परत विचारल्यावर तीने साधा प्रश्न केला. ‘काय देवून राहिले भाउ त्यात?’ मी आपलं पोपटपंची केल्याप्रमाणे, ‘1 रूपयाला ज्वारी/बाजरी, 2 रूपयाला गहू, 3 रूपयाला तांदूळ’ असं सांगितलं. ती म्हातारी हसून म्हणाली, ‘ज्वारी आमी खाईना, गहू बी जमत नाई.’ मला वाटले आता हीला तांदूळ तरी उपयोगी पडत असतील. मी म्हणालो, ‘तांदूळ खाता न तूम्ही.’ तीने मान डोलावली. ‘मग हा तांदूळ तूम्हाला मिळंल की खायला.’ म्हातारी परत माझ्याच तोंडाकडे टकामका बघत राहिली. ‘त्यो तसला तांदूळ आमी खाईना.’ मला कळेना शासनाच्या या भिकमाग्या धोरणातील तांदूळात नाही म्हणण्यासारखं काय आहे. मग मला बाजूला उभ्या असलेल्या एका तरूण पोरानं समजावून सांगितलं, ‘साहेब, यांच्याकडं जो तांदूळ होतो त्याला आंबेमोहोरासारखा घमघम वास येतो. त्याचं नाव इंद्रायणी. हा तांदूळ हे लोक  शेतात स्वत:पुरता घेतात. बाहेर फारसा विकतही नाहीत.’

मला वाटलं ही बाई शेतकरी असेल म्हणून हीला शासनाचा तांदूळ नको. मग मी त्या तरूणाला विचारले, ‘गावात इतर गोर गरीब असतील ना. त्यांना तर हे अन्न फायद्याचे ठरेल.’ त्या तरूणाने मला हाताला धरून जवळच असलेल्या ग्रामपंचायतीच्या एका सभागृहात नेले. अतिशय चांगले बांधलेले सभागृह. तिथे विविध माहितीचे फ्लेक्स लावून ठेवलेले होते. त्यात गावची लोकसंख्या, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या असली बरीच माहिती होती. एका मोलाच्या माहितीकडे त्यानं माझे लक्ष वेधले. त्यानं काहीही न बोलताही माझे डोळे खाडकन उघडले. तिथे लिहीलं होतं ‘दारिद्य्र रेषेखालील लोकसंख्या शुन्य!!’  या छोट्या गावात जिथे एकही दोन मजली इमारत नाही, ग्रामपंचायतीचे सभागृह, शाळेच्याखोल्या सोडल्या तर एकही सिमेंटची इमारत नाही,  तिथे हे गाव ते अभिमानाने सांगत आहे की आमच्याकडे कोणीही दरिद्री नाही.
म्हणजे तिकडे दिल्लीला ‘सगळा भारत कसा दरिद्री आहे आणि कसा भुकेने मरत आहे. त्याला कसे जगवले पाहिजे.’ असं मा. सोनिया गांधी सांगत आहेत. आणि इकडे महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवरचे एक छोटेसे गाव अभिमानाने सांगत आहे की आमच्या गावात दारिद्य्ररेषेखाली कुणीच नाही.

गावात 4 थी पर्यंत शाळा. शाळेत जाणं प्रत्येक घरातील लहान मुलाला अनिवार्य केलेलं. शाळेत रजा न देता गैरहजर राहणार्‍या शिक्षकाला गावानं 5000 रूपयाचा दंड ठरवून दिला आहे. परिणामी इथे नौकरी करायला दांडीबहाद्दर मास्तर घाबरतात. गावात सर्वत्र सिमेंटचे रस्ते. व्यवस्थीत नाल्या काढलेल्या. कुठेही घाण कचरा साठलेला नाही.

अंगणवाडी सेविका किंवा ग्रामसेवक यांचे मोबाईल नंबर पंचायतीच्या भिंतीवर ठळकपणे लिहून ठेवलेले. सर्व योजनांची निधीची माहिती लिहून ठेवलेली. मी विचारले, ‘याची काय गरज?’ माझ्या सोबतचा तरूण पोरगा म्हणाला, ‘कुनीबी फोन लावून इचारू शकते ना भाउ.’ म्हणजे इकडे दिल्लीला संसदेत विरोधपक्षांनी गोंधळ घालावा म्हणून सत्ताधारीच प्रयत्न करतात कारण काय तर गोंधळात महत्त्वाची विधेयके पटापट मंजूर करून घेता येतात. चर्चा होऊ देण्यापेक्षा गुपचूप वाच्यता न होऊ देता काम करण्यावर दिल्लीच्या राजकारणाचा भर. तर इथे एक छोटं गाव आपला कारभार स्वच्छपणे गावकर्‍यांसमोर मांडून पारदर्शी पद्धतीनं काम करत आहे.

एखाद्या गावात जैवविविधता किती आहे, म्हणजे किती झाडे, पशु पक्षी, सजीव या परिसरात आढळतात याची नोंद करण्याचा एक मोठा प्रकल्प शासनानं हाती घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाचे रमेश मुंगीकर मुद्दाम या गावात येवून लोकांशी संवाद साधताना मी पाहिले. मी त्यांना कारण विचारले असता ते म्हणाले की ‘गेल्या 9 वर्षांपासून अशी नोंद ठेवणारे बारीपाडा हे महाराष्ट्रातले एकमेव गाव आहे.’म्हणजे इकडे शासकीय नोंदी ठेवायच्या म्हटलं की भल्या भल्यांची कोण धांदल उडते. शिवाय या नोंदी खोट्या असतात हे तर सांगायची गरजच नाही.

 या गावानं तब्बल 1100 एकर जंगल राखलं आहे. सकाळी एका घरात मला चहा पिण्यासाठी बोलावलं. घरच्या माणसानं मला आत अगदी आत स्वयंपाकघरात येण्यास सांगितलं. त्या छोट्या खोलीत मला वाटलं चहा चुलीवर  उकळत असेल. तर तिथे गॅस चालू होता. या गावानं 1100 एकर जंगल राखलं म्हणून यांना विशेष योजनेखाली एलपीजी गॅस सिलेंडर मिळतात.

या गावाच्या या आगळ्या वेगळ्या कहाणीमागचे नायक चैतराम पवार शांतपणे फारसं काहीच न बोलता सर्वत्र फिरून कामं होतं आहेत की नाहीत हे पहात होते. त्यांना काही विचारलं की हसून अतिशय मोजकं बोलून ते पुढे कामाला निघून जायचे.

वनभाज्यांच्या पाककला स्पर्धेसाठी जवळपासच्या भागातून हजार एक नागरिक तिथे जमा झाले होते. सर्वांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून या गावाने 30 रूपये इतके अल्प शुल्क आकारले होते. चैतराम पवारांच्या पाठिशी उभे राहणारे हेडगेवार रूग्णालयाचे डॉ. आनंद फाटक, समरसता मंचाचे रमेश पांडव यासारख्या लोकांनीही रांगा लावून ही 30 रूपयांची कुपनं घेतली. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे शुटिंग करायला आलेले एबीपी माझाचे मिलींद भागवत आणि त्यांच्या सगळ्या टिमनेही कुपनं घेतली. नागलीची भाकरी, तुरीचे वरण, तेर नावाची वनभाजी व त्या भागातील प्रसिद्ध इंद्रायणी तांदूळाचा सुवासिक भात असं जेवण सगळ्यांसाठी तिथल्या बायकांनी शिजवलं होतं.

कार्यक्रम आटोपला. स्पर्धा संपली. मांडव काढत असताना जवळच्या आंब्याखाली आम्ही बसून होतो. जवळच तिथले गावकरी स्त्री पुरूष बसून दिवसभराचा सगळ्या कार्यक्रमाचा आढावा घेत होते. एकूण 407 लोकांनी कुपनं घेतली आणि  ताटं मात्र 500 च्यापुढे गेली होती. कुपनं न घेता कोण जेवलं असं मी विचारता ते गावकरी लाजले आणि काही बोलेचनात. मला वाटले गावातीलच काही लोक, कार्यकर्ते असतील. पण मला कळले की गावातील एकही माणूस जेवायच्या ठिकाणी आला नव्हता. ते तर बिचारे आपल्या घरीच जेवले होते. कुणीच काही सांगेना. मला दिवसभर साथ करणार्‍या तरूण मुलाला मी जरा बाजूला घेतले. हळू आवाजात विचारले, ‘काय रे कुणीच काही सांगेना, कोण होते हे फुकटे जेवणारे?’ त्या पोरानं जे उत्तर दिलं त्यानं अन्नसुरक्षेच्या भिकेची खरी गरज कुणाला आहे हे अगदी स्पष्टपणे उघड झालं. तो पोरगा म्हणाला, ‘अहो साहेब, हे जे शासनाचे लोक आले होते ना, वन विभागाचे, पोलिसांचे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे ते सगळे फुकट जेवून गेले.’

ज्याला गरीब समजून त्याच्यासाठी कळवळा दाखवला जात आहे तो सामान्य गरीब आदिवासी अतिशय स्वाभिमानी आहे. तो कधीही भीकमाग्या योजनांची मागणी करत नाही. पण या गरीबांचा कळवळा दाखवून ज्यांना आपली पोटं भरायची आहेत त्यांनीच या योजना आणल्या आहेत हे या गावानं काहीच न बोलता आपल्या कृतीनं दाखवून दिलं.

Tuesday, September 3, 2013

शरद जोशी तूमचे आता करायचे काय?

उरूस, दैनिक पुण्य नगरी, मंगळवार 3 सप्टेंबर 2013


आदरणीय शरद जोशी, सा.न.
3 सप्टेंबर हा तूमचा 78 वा वाढदिवस. 78 वर्षे पूर्ण करून तूम्ही 79 व्या वर्षात पदार्पण करत अहात. तूम्हाला मन:पूर्वक शुभेच्छा ! आज तूमची आठवण होते आहे ती तूमच्या वाढदिवसामुळे तर आहेच पण त्याही पेक्षा तूम्ही वर्तविलेल्या भविष्यामुळे. तूम्ही दहा वर्षांपूर्वीच म्हणाला होता की रूपया डॉलरच्या तूलनेत 60 च्याही पलीकडे घसरेल म्हणून. तेंव्हा स्वाभाविकच सगळ्यांना वाटले या माणसाचे काही खरे नाही. जवळपास सगळ्या राज्यकर्त्यांनी या इशाराकडे दुर्लक्ष केले. 1991 ला मुक्तअर्थव्यवस्था भारताने स्विकारली. त्याचे मन:पूर्वक समर्थन फक्त तीनच नेत्यांनी केले होते. एक पंतप्रधान पी.व्हि.नरसिंहराव, जे की सध्या हयात नाहीत, दुसरे तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग,जे की हयात असून आर्थिक प्रश्नावर पूर्णपणे मृतवत झाले आहेत आणि तिसरे तूम्ही. तेंव्हा तर डाव्यांनी असा गहजब केला होता की डंकेल साहेब तूमच्या गायीचे वासरूही ओढून नेईल. पण तसे काही झालेच नाही.
राजकीय पटलावर वारंवार कोलांटउड्या खाण्यात पटाईत असलेले मर्द मराठा राजकारणी शरद पवार तर असं काही सध्या बोलत आहेत की त्यांच्या लिखीत भाषणाखाली शरद पवार या नावातील पवार खोडून जोशी लिहीलं तर ही भाषणं 20 वर्षांपूर्वीच्या तूमच्याच भाषणाच्या कार्बन कॉपी म्हणून खपून जातील.
अन्न सुरक्षा विधेयक नुकतेच मंजूर झाले आहे. तूम्ही अशा प्रकारच्या सर्व ‘भीकमाग्या’ धोरणांचा कडाडून विरोध केला होता आणि आजही करत अहात. अन्न सुरक्षा विधेयक मंजूर करताना हे सगळ्यांना माहित आहे की जो पोशिंदा आहे, जो अन्नधान्य पिकवतो त्याच्या उत्पादन खर्चाची सुरक्षा मंजूर केल्याशिवाय हे प्रत्यक्षात येवूच शकत नाही. रडणार्‍या पोराला भूक लागली असताना अन्न तर देता येत नाही. मग खुळखुळा वाजवून त्याचं लक्ष दुसरीकडे वेधावं तसं चालू आहे. हे सगळं तूम्ही ठामपणे केंव्हापासूनच सांगत आला आहात. पण तूम्हाला कसं सांगावं.... हे तूमचे सगळे ‘स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग’ राजकारणात परवडत नसतात. भले तूमचं म्हणणं काळाच्या पटावर  खरं ठरो राजकारणाच्या सारीपाटावर या सोंगट्या कामाला येत नाहीत.
आपल्याकडे बरेच नेते कुठलाही विचार न देता भावनेला हात घालतात, गर्दी जमवतात आणि बघता बघता मतांचे भरघोस पीक काढतात. तूम्ही मात्र वेगळेच निघालात. तूम्ही सातत्याने आर्थिक गंभीर विचार अडाणी समजल्या जाणार्‍या शेतकर्‍यांसमोर मांडला. तरी शेतकर्‍यांनी प्रचंड गर्दी करून तूम्हाला दाद दिली. तूम्ही ना शेतकर्‍याच्या जातीत जन्मला, ना तूम्ही शेतकर्‍याचा पोषाख घातला, ना शेतकर्‍याची गावरान भाषा वापरली तरी शेतकरी बाया बापड्यांनी तूम्हावर जीव कुर्बान केला. 31 हुतात्मे तूमच्या आंदोलनात शहीद झाले. तूम्ही कधीही काळजाला हात घालणारी भाषा केली नाही पण  कुणब्याचे वर्षानुवर्षाचे दुखणे शुद्ध आर्थिक परिभाषेत मांडले आणि त्याचे आसु घळा घळा गालावर उतरले.
अडीच हजार वर्षांपूर्वी भगवान गौतम बुद्धाला बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली होती, बाराशे वर्षांपूर्वी शंकराचार्यांना केदारनाथच्या धवल डोंगराच्या सान्निध्यात ‘निर्वाणषटक’ सुचलं होतं, चारशे वर्षांपूर्वी भामरागडच्या डोंगरावर ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ म्हणत तुकाराम महाराजांची समाधी लागली होती याच परिसरात आणि याच अवस्थेत तूम्हालाही शेतीच्या दु:खाचे मुळ सापडले. मी तूम्हाला गुरू मानतो. तेंव्हा उगीच हळवी भाषा वापरणार नाही, पण हे खरेच आहे. ’शेतीचा प्रश्न समजण्यासाठी शेतीवर मी माझे पोट ठेवले’ हे तूम्ही म्हणालात हाच तर कृती मार्ग होता आमच्या दार्शनिकांचा.
आपल्याकडे जिवंतपणी मान्यता न मिळण्याची मोठी दुष्ट परंपरा आहे. पण तूमच्या बाबतीत हे घडलं नाही. ही पंरपरा खंडित झाली. तूमच्या डोळ्यांसमोरच लाखो शेतकर्‍यांनी ‘भीक नको घेवू घामाचे दाम’ ही घोषणा दिली आणि आपल्या आपल्या परीने अमलात आणली.
आपले विचार सुत्रबद्ध पद्धतीने लिहून ठेवण्याची आपल्या दार्शनिकांची परंपरा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या परंपरेतले अगदी अलिकडचे उदाहरण. तूम्हीही तूमचे सगळे विचार स्पष्टपणे चार हजार पृष्ठांचा मजकूर भरेल इतके लिहून ठेवले आहेत. आजही कुणी उठून तूमच्यावर बाष्कळपणे टिका करू पाहतो त्याला तूम्ही काहीच उत्तर न देता शांतपणे स्मितहास्य करता. कारण तूम्ही हे सगळं सविस्तर सोप्या शब्दांत मांडून ठेवलं आहे.
तूम्हाला सोडून गेलेल्यांना आजतागायत हे कळले नाही की आपण शरद जोशींना तर सोडून आलो पण त्यांचा विचार आपला पिच्छा सोडायला तयार नाही. आश्चर्य म्हणजे जेंव्हा जेंव्हा तूमच्या विचारांना ते प्रामाणिक राहिले, त्यावर आपल्या थोड्याफार प्रज्ञेने काही मंथन करीत राहिले तोपर्यंत लोकांनी त्यांना अल्प प्रमाणात स्वीकारले, पण तूमच्या विचारांपासून शेतकरी हितापासून ते जेंव्हा दूरावले तेंव्हा क्षणात त्यांना लोकांनीही झिडकारून दिले.
महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरूजी यांनी सामाजिक चळवळी करत असताना आपला विचार मांडण्यासाठी अतिशय सुबोध भाषा वापरली. चरख्यातून एकसारखे सुत बाहेर यावे अशी भाषा. ही परंपरा तूम्हीही पुढे चालविली. अडाण्यातल्या अडाणी शेतकर्‍यालाही तूमचे शेतीचे अर्थशास्त्र विज्ञापीठातील विद्वानापेक्षा सहज आत्मसात झाले. आमच्या परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालूक्यात अंबरवाडी नावाचे गाव आहे. तिथली एक गरीब महिला चांदवडच्या महिला अधिवेशनासाठी एका टपरीवाल्याकडे वर्गणी मागायला गेली. तो टपरीवाला तीला म्हणाला, ‘म्हातारे, तूझ्या बिल्ल्याशी, शेतीशी माझा काय संबंध? मी कह्याला वर्गणी देवू?’ ही फाटक्या लुगड्यातली म्हातारी त्याला म्हणाली, ‘बाबा तूहा धंदा चालते आमच्या जीवावर. कुणब्याच्या कापसाला नाही भेटला भाव तर तू काय धंदा करशील? पोटात काय तुर्‍हाट्या भरशील का भौ? आडात असलं तर पोहर्‍यात येतं. कुणब्याला भेटलं तर सर्‍या जगाला भेटंल. एका दाण्याचे हजार दाणे आमच्या शेतातच होतेत. तूह्या टपरीत एक कप चहाचा दहा कप नाही होत.’
सांगा शरद जोशी ही भाषा या अडाणी म्हातारीच्या तोंडी कुठून आली. मानवत जवळच्या कोल्हा पाटीचा शेतकरी संघटनेचा एक कार्यकर्ता इंडिया आणि भारत ही तूम्ही केलेली मांडणी समोरच्या अडाणी शेतकर्‍यांसमोर मांडताना असं म्हणाला, ‘तिकडं शहरात मान्सं पहाटे पहाटे फिरायला जातेत. कारन त्याहींच्या अंगात जास्तीचं रगत दाटायलं. आन् हीतं आमचा गडी नांगरामागं फिरू फिरू परेशान. याच्या अंगात रगत आटायलं.’ आता सांगा नं यापेक्षा जास्त चांगल्या सोप्या आणि समर्पक शब्दांत तूमचा विचार काय सांगणार?
शिवाजी महाराजांना कुळवाडीभुषण ही पदवी महात्मा फुल्यांनी बहाल केली. महाराजांचे विश्लेषण शेतकर्‍यांचा राजा शिवाजी म्हणून करताना तूम्हीच फक्त असे निघालात की ज्याने मांडून दाखवले, मिर्झा राजे जयसिंहा सेाबतचा तह हा जून महिन्यातला होता. नांरटीचे दिवस समोर होते. तह केला नसता तर नांगरट झाली नसती. प्रजेला खायला भेटले नसते. तूमची सगळी फौजच मुळात चार महिने शेती आणि आठ महिने मुलूखगिरी अशी होती. सांगा ना शरद जोशी शेतकर्‍याच्या पोटी जन्मून मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर जावून बसणार्‍यांनी शेती विरोधी धोरणंं आखुन आपल्याच बापाचा गळा कापायला कमी केलं नाही असं कसं? नारायण कुलकर्णी कवठेकरांनी लिहीलं तसं ‘टाकांच्या निभांनी तूझी कणसं खुडतील’ असे हे का वागले? महात्मा फुल्यांना वाटलं होतं की भट कारकुनाच्या जागी बहुजन कारकून आला तर सामान्य लोकांचे भले होईल. पण फक्त तूम्हीच निघालात हे सांगणारे की ‘भट कारकून जावून बहुजन कारकून आला किंवा गोरा इंग्रज जावून काळा इंग्रज आला तरी शेतकर्‍याचे शोषण थांबत नाही. ही व्यवस्थाच तशी बनवली गेली आहे.’
सामान्य बायाबापड्यांना हे पटलं म्हणून तर देवघरात त्यांनी तूमचे फोटो लावले. जातीय अस्मितेची टोकं नको तेवढी तीव्र होण्याच्या काळात तूम्ही ठामपणे आपल्या विचारांवर उभे राहिलात आणि सामान्य शेतकरी बायाबापड्यांना शेतीच्या प्रश्नावर विवेकाच्या पातळीवर आणून उभं केलंत, तूमची मांडणी दिवसेंदिवस खरी ठरत चालली आहे. म्हणूनच आता आम्हाला कळेना तूमचं करायचं काय? काळावर खोट्या ठरलेल्या माणसाबाबत काही करावंच लागत नाही. त्यांचा सोक्षमोक्ष काळच लावतो. प्रश्न खरा ठरणार्‍यांचा असतो. सांगा शरद जोशी तूमचे आता करायचे काय?     
प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांनी तूम्हाला शब्दांत पकडण्याचा थोडासा प्रयत्न केला आहे. त्याशिवाय तूम्ही तरी सांगा तूम्हाला शब्दांत तरी पकडायचं कसं?

लोंढा गढूळ पाण्याचा
तुवा बांध बांधलास
तडा तडकला त्याचा
तुवा सांध साधलास

रानभर पांगलेले
पाणी गोळा झाले कसे?
चुकलेल्या हिशोबाचे
आणे सोळा झाले कसे?

शेतकर्‍याच्या हिशोबाचे  सरकारी धोरणाने चुकविलेले आणे तूम्ही नेमके मांडून दाखवले. तूमच्या वाढदिवसा निमित्ता लाख लाख शुभेच्छा !
तुमचा
श्रीकांत

--
श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद.
मो. 9422878575.

Tuesday, August 27, 2013

भारतीय आशयाचा चीनी चित्रपट - ‘रोड होम’

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 27 ऑगस्ट 2013

चीन म्हटलं की आपलं डोकं उठतं. त्यात परत आपल्या राजकीय नेत्यांच्या हलगर्जीपणामुळे तर ही भावना अजूनच वाढीला लागली आहे. मग चीनवरची यशवंतरावांनी केलेली कॉमेंट ‘तो चीन असला तर आम्ही प्राचीन आहो’ वगैरे वगैरे आठवत आम्ही मनात उत्साह भरून घेतो. पण या चीनशी आपलं सांस्कृतिक नातं आहे हेच आजकाल आपण विसरलो आहोत. चीनचा सामान्य माणूस, त्याच्या परंपरा, रीतीरिवाज यात आपल्याशी जूळणारं खुपकाही आहे हे लक्षात येत नाही.

‘रोड  होम’ नावाचा एक सुंदर चीनी चित्रपट नुकताच पाहण्यात आला. चीनच्या खेड्यातील एक साधी प्रेमकथा रंगवणारा हा चित्रपट त्याचे शब्द काहीही न कळता फक्त खाली येणार्‍या इंग्रजी उपशिर्षकांवरून जवळपास पूर्णपणे समजून येतो आणि बघता बघता भारतीय मनाला हात घालतो.

या चित्रपटातील काळ हा 1919 चा आहे. 100 वर्षांपूर्वीचे ते चीनी खेडे पाहताना आपल्या खेड्यांची आठवण येत राहते. आपल्या रिती- परंपरांना, मतांना चिकटून राहिलेली म्हातारी माणसे पाहताना त्यांच्याशी आपले नाते सहज जूळून येते. चीनमधील त्या खेड्यात शिक्षेचा भाग म्हणून एका शिक्षकाला नौकरीवर पाठवले जाते. तो येतो तेंव्हा त्याला पाहणारी एक 16 वर्षांची मुलगी त्याच्या प्रेमात पडते. शाळेचे बांधकाम चालू असताना सगळे पुरूष त्यावर काम करत असतात. आणि स्त्रिया  त्यांना जेवणखाण बनवून आणून देतात. एका टेबलावर स्त्रीया सुंदर चिनीमातीच्या भांड्यांमधून शिजवलेले सुग्रास अन्न मांडून ठेवतात. पुरूष येवून ते बाऊल उचलून घेवून जातात. या मुलीला आपण शिजवलेले अन्न या शिक्षकाने खावे असे वाटत असते. पण नेमका हाच बाउल त्याने उचलला की नाही हे कळत नाही. या शिक्षकाला रोज एका घरी जेवायला बोलावले जाते. जेंव्हा या मुलीच्या घरची पाळी येते तेंव्हा तीची आई या शिक्षकाला हे सगळे सांगते. ही कशी तूमच्यासाठी शाळेचे बांधकाम चालू असताना जेवण पाठवायची वगैरे वगैरे. त्या बिचार्‍या शिक्षकाला हे काहीच माहित नसते. पण तोही मग हीच्या हळू हळू प्रेमात पडतो. सुट्ट्यांमध्ये तो वापस जाताना केसांना लावायची एक छोटी पिन तीला भेट देवून जातो. त्याला जाताना जेवण द्यायचे म्हणून ही धावतपळत त्याच्या गाडीमागे जाते. पण गाडी निघून जाते आणि हीच्या हातातील भांडी खाली पडतात. चीनीमातीचा तो बाउल पडतो आणि त्याचे तुकडे होतात. ही ते तुकडे तसेच रूमालात बांधून परत आणून घरी कपाटातील त्या बाउलच्या जागेवर ठेवून देते. तिच्या आंधळ्या आईला चाचपडताना हे तुकडे हाती लागतात. ती त्यावरून आपली मुलगी प्रेमात पडल्याचे ओळखते.

हा प्रसंग तर इतका सुंदर आहे. ती आंधळी म्हातारी बाउलचे तुकडे कसे जोडावेत याचा विचार करत बसते. एके दिवशी तीला दुरूस्ती कामे करणार्‍या म्हातार्‍या सुताराचा आवाज येतो. ती त्याला आत बोलावून घेते. आता मातीचा बाउल परत जोडायचा कसा? मला मोठी उत्सूकता होती की 100 वर्षांपूर्वी जेंव्हा फेव्हिकॉल सारख्या कुठल्याही साधनांचा शोध लागलेला नव्हता अशा काळात आता हा दिग्दर्शक काय दाखवतो. तो सुतार हातानं  चालवायचे एक छोटं ड्रिल मशीन काढतो. अतिशय नाजूकपणे बारीक छिद्र पाडून त्यात तार ओवून घेतो. त्या ड्रिल मशीनला गती देताना तो जी छोटी काठी फिरवतो त्यावरून तर मला सारंगीवर नजाकतीने फिरणार्‍या गजाचीच आठवण झाली.

दुसर्‍या दिवशी ती मुलगी तो जोडलेला बाउल त्या जागी पाहते आणि आपलं प्रेम आपल्या आईलाही कळल्याचं तिला उमगतं. अशा कितीतरी सुंदर साध्या साध्या प्रसंगातून दिग्दर्शकाने आपल्या कलासक्त दृष्टीचे दर्शन घडवले आहे. त्या शिक्षकानं भेट दिलेली ती पीन धावळीत पडणं आणि थकून घरी परत आल्यावर घराच्या कुंपणापाशीच ती सापडणे असे काही प्रंसग फार भावनोत्कट झाले आहेत.

खरं तर ही कहाणी फ्लॅशबॅक पद्धतीनं चालू आहे. वडिल वारल्याची खबर मिळते म्हणून तरूण मुलगा गावात आला आहे. त्याची आई वडिलांचा अंत्यविधी पारंपारिक पद्धतीनं व्हावा म्हणून हट्ट धरून बसली आहे. आणि या तरूण मुलाला आपल्या आईवडिलांची प्रेमकथा आठवत चालली आहे. या 17 वर्षांच्या तरूण मुलीचे त्या 20 वर्षीय शिक्षकाशी लग्न होते. त्या शिक्षकाचा वृद्धापकाळाने मृत्यू झालेला असतो. या प्रेमी जोडप्याचा हा तरूण मुलगा आईला समजावतो की आता थंडीच्या काळात माणसं मिळणं शक्य नाही तेंव्हा आपल्या जन्मगावी वडिलांची अंत्ययात्रा पायी घेवून जाणं शक्य नाही. पण आई तयार होत नाही. शवावर पांघरायचे वस्त्र स्वत: पत्नीने विणायची एक प्रथा त्या समाजामध्ये आहे. पण आई हे वस्त्र वीणण्याचा हट्ट धरून बसलेली.  आता हे वस्त्र विणण्यासाठी हातमाग शोधणं आलं. हा तरूण मुलगा हातमाग आणतो. घरात तो बसवतो. आणि त्याची म्हातारी आई रात्रभर कष्ट करून ते सुंदर वस्त्र विणते.

थंडीच्या काळात अंत्ययात्रेसाठी लोकांना आणायचं म्हणजे त्यांना मजूरी देणं, त्यांच्या बिड्यांची दारूची व्यवस्था करणं यासाठी पैसे लागणार. हा तरूण मुलगा आईच्या समाधानासाठी हे सगळं करायला तयार होतो. गावच्या सरपंचाला पुरेशी रक्कम देतो व आईच्या मनाप्रमाणे सारं काही करायला सांगतो. आश्चर्य म्हणजे जेंव्हा अंत्ययात्रा सुरू होते तेंव्हा अपेक्षेपेक्षा आणि सांगितलेल्या लोकांपेक्षा भरपूर लोकं गोळा होतात. कारण हे सगळे त्या शिक्षकाचे विद्यार्थी असतात. शिवाय ते पैसेही घ्यायला तयार होत नाहीत.

ज्या शाळेत आपल्या नवर्‍यानं शिकवलं त्या जागेवर या म्हातारीचा भलताच जीव असतो. तीला आपल्या नवर्‍याचा आवाज त्या परिसरात सतत कानावर येतो आहे असे भास होत राहतात. त्यामुळे ती गावातून हलायला तयार नसते. मुलगा तीला आता आपल्याबरोबर चल असा आग्रह करत असतो. वडिलांच्या अंत्यविधीनंतरच्या सकाळी म्हातारी उठते तर तिला गावच्या शाळेतून नवर्‍याच्या आवाजासारखा आवाज यायला लागतो. ती इतक्या वयातही धावत सुटते. तिला वाटतं हा नेहमीसारखा आपला भास असेल. पण प्रत्यक्ष जावून बघते तर तिचा मुलगा वडिलांच्या जागी उभं राहून मुलांना वडिलांनी शिकवलेलंच जुनं पुस्तक शिकवत असतो. त्यानं एक दिवस तरी शिववावं अशी या म्हातार्‍या जोडप्याची इच्छा असते. आणि तो मुलगा ती पूर्ण करतो. ही म्हातारी जवळची रक्कम नवर्‍याच्या स्मरणार्थ शाळेच्या बांधकामासाठी म्हणून देणगी देते. इथेच हा सुंदर चित्रपट संपतो.

पूर्ण चित्रपटात दाखवलेलं खेडं, मातीच्या सारवलेल्या भिंती, सकाळी दारापुढे सडा टाकायची पद्धत, चुलीवर अन्न शिजवणे, आपल्या माणसांसाठी हट्टाने परंपरांचे पालन करत त्यांना चिकटून राहणे, गावच्या सरपंच/प्रमुखाला मृत्यू सारख्या प्रसंगी स्वत:च्या जबाबदारीचे आलेले भान, आपल्या मुलांकडून पालकांच्या अपेक्षा अशा कितीतरी गोष्टी या पूर्णपणे भारतीय मानसिकतेशी जुळणार्‍या वाटत होत्या.

पूर्णचित्रपटभर शाळेच्या, गावाच्या सभोवतालचा निसर्ग हा एक अविभाज्य घटक म्हणून येतो. लसलसणारी पिके, बर्फाळ रस्त्यांनी गोठवून टाकलेले चलनवलन, लख्ख उन्हानं प्रज्वलीत केलेली जीवन आशा, नायिकेच्या मानसिकतेप्रमाणे बदलत जाणारा सभोवताल ही योजना तर केवळ अप्रतिम.

या चित्रपटाला कुठल्या महोत्सवात कुठला पुरस्कार मिळाला मला माहित नाही. या चित्रपटाचे जागतिक चित्रपटात काय स्थान आहे मला माहित नाही, नागपुरच्या अंजली करंजकर या चित्रपटप्रेमी मैत्रिणीने हा चित्रपट आम्हा काही पागलांना औरंगाबादला प्रसाद कोकीळ यांच्या घरी सहज म्हणून दाखवला. त्याचा साधा सुंदर आशय कुणी काहीही न सांगता आम्हा पाच दहा जणांच्या मनात अलगद उतरत गेला. कलेचे यापेक्षा वेगळे काय प्रयोजन असे शकते?    

 श्रीकांत अनंत उमरीकर
जनशक्ती वाचक चळवळ,
औरंगाबाद.
 मो. 9422878575.
     

Sunday, August 25, 2013

संमेलन निवडणुकीत अर्धीमुर्धी लोकशाही का?


सालाबादप्रमाणे साहित्य संमेलनाची निवडणूक जाहीर झाली आहे. साहित्य संमेलनाची गरज , संमेलनाध्यक्षपदाची निवडप्रक्रिया याबद्दलच्या जुन्याच चर्चा पुन्हा रंगात आल्या आहेत. मात्र , यातील केवळ त्रुटी शोधून भागणार नाही , तर त्यात सुधारणा सुचवून त्यासाठी मजबूत पर्यायांचा शोध घेणे आवश्यक आहे. याच मुद्द्यांवर लेखक-प्रकाशक आणि औरंगाबादच्या जनशक्ती चळवळीचे श्रीकांत उमरीकर यांच्याशी केलेली बातचित

राजीव काळे

> अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली आहे. त्या निमित्ताने नेहमीच्या चर्चांनाही आता जोर येईल...

खरं आहे. ही अशी निवडणूक पद्धत गेली कित्येक वर्ष प्रचलित आहे.

> त्यासाठीची मतदारांची रचना कशी आहे ?
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या चार घटकसंस्था आहेत. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद ,मुंबई मराठी साहित्य संघ , मराठवाड्यातील मराठवाडा साहित्य परिषद आणि विदर्भातील विदर्भ साहित्य संघ. या चार संस्थांकडे प्रत्येकी १७५ मतं आहेत , तर संलग्न संस्थांकडे प्रत्येकी ५० मतं आहेत. हे एकूण मतदार ११६०च्या घरात जातात.
ही रचना योग्य आहे , असं वाटतं ? अजिबातच नाही. या संस्थांची मतांच्या हिश्शानुसार केलेली मांडणी कुठल्याही तर्काला धरून नाही. म्हणजे , घटकसंस्थांकडील आजीव सदस्य व त्यांच्याकडील मतांचा हिस्सा आणि संलग्न संस्थांकडील आजीव सदस्य व त्यांच्याकडील मतांचा हिस्सा यांच्यातील परस्परप्रमाण अतिशय तर्कविसंगत आहे. मुदलात हा मतांचाही जो हिस्सा ठरवून दिलेला आहे , तो कुठल्या निकषावर , या प्रश्नाचं उत्तर महामंडळाकडे नाही.

> अध्यक्षपदासाठी निवडणूक व्हावी , असं तुम्हाला वाटतं ?

नाही. निवडणुकीस माझा पूर्ण विरोध आहे.

> पण लोकशाही व्यवस्थेत अशी निवडणूक असायला हरकत काय ?
याचं उत्तर दोन भागांत देता येईल. पहिला मुद्दा आकड्यांचा. आधी उल्लेख केल्याप्रमाणे घटकसंस्था , संलग्नसंस्था यांच्याकडील मतहिस्सा कुठल्याही तर्काला धरून नाही. आणि लोकशाही म्हणता तर मग ही लोकशाही मर्यादित स्वरूपात कशासाठी ? घटकसंस्थांची संख्या वाढवत का नाही ? कोकणासाठी , दक्षिण महाराष्ट्रासाठी , उत्तर महाराष्ट्रासाठीही प्रत्येकी एक स्वतंत्र घटकसंस्था असायला हरकत काय ? त्यातून या सगळ्या प्रक्रियेचं विकेंद्रीकरण होईल. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आता असलेल्या मतदारांची संख्या. सध्याच्या सगळ्या घटकसंस्था व संलग्नसंस्था यांच्याकडील आजीव सदस्यांची एकत्रित आकडेवारी जवळपास २० ते २२ हजार एवढी आहे. हा आकडा इतका मोठा असताना मतदान करण्याचा हक्क केवळ ११६० जणांनाच का ? बाकीच्यांना का नाही ? या प्रश्नाचे कोणतेही सयुक्तिक उत्तर महामंडळाकडे नाही. निवडणुकीसाठी तुम्ही लोकशाहीची साक्ष काढता ना , मग ती अशी अर्धीमुर्धी असून कशी चालेल ? लोकशाही हवी तर ती पूर्ण स्वरूपाचीच हवी ना. ती अधिक व्यापक स्वरूपाची हवी. निवडणुकीस विरोध असण्यामागील दुसरं कारण बहुमतासंदर्भातले. मुळात साहित्यादी कलेला बहुमताचं तत्त्व लागू करणंच चुकीचं आहे. बरं , ज्यातून बहुमत ठरतं ती मंडळी कोण आहेत ? याच अल्पमताच्या-बहुमताच्या गलबल्यात अध्यक्षपदाच्या निवडणुकीत इंदिरा संत पराभूत झाल्या आणि रमेश मंत्री निवडून आले. हा काय प्रकार ?

> मग निवडणुकीला पर्याय काय असू शकतो ?

पर्याय शोधायचा म्हटलं तर सहजशक्य आहे. आपल्याकडच्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी, इतकेच काय , साहित्य महामंडळाच्याच विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीही निवडणूक होत नाही. मग याच संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीचा आग्रह कशासाठी ? निवडणूक घेण्यापेक्षा माजी संमेलनाध्यक्षांचा समावेश असलेली एक समिती स्थापन करून त्याद्वारे अध्यक्ष निवडला जावा.

पण तिथेही मतभेद होण्याची शक्यता आहेच की. कुणाची पसंती एकाला असेल , तर कुणाची दुसऱ्याला.

> होऊ देत की मतभेद. चर्चा होऊ दे त्यांच्यात. अगदी वादही झाले तरी चालतील. पण अशी चर्चा करताना , वाद घालताना आपण एखाद्या साहित्यिकाच्या नावाचे का समर्थन करीत आहोत , याची तार्किक कारणं त्यांना द्यावी लागतील ना. मग त्यांच्यातील बहुमताच्या गणितावर होऊ दे संमेलनाध्यक्षांची निवड.
> या सगळ्यासाठी महामंडळाच्या घटनेत दुरुस्ती करावी लागेल...

देशाच्या घटनेत दुरुस्ती होऊ शकते , तर महामंडळाच्या घटनेत दुरुस्ती करणं काय अशक्य आहे ? विश्व मराठी साहित्य संमेलनाची तरतूद महामंडळाच्या घटनेत नव्हती. पण त्यासाठी दुरुस्ती केलीच ना. मग याबाबत काय अशक्य आहे ? वास्तविक पाहता साहित्यिकांनी जोर लावला तर अशी घटनादुरुस्ती शक्य आहे. ती प्रक्रिया थोडी किचकट आहे , हे खरं. पण करायचं म्हटलं तर करता येईल. त्यासाठीची इच्छाशक्ती कुणाकडे दिसत नाही.

> संमेलनाच्या आगेमागे सगळेच साहित्यिक निवडणुकीला पर्याय हवा , असं म्हणतात. प्रत्यक्षात करत काहीच नाहीत. असं का ?

खरं सांगायचं तर महामंडळाशी दोन हात करण्याची कुणाचीही तयारी नाही. बहुतांश मंडळींचे कुठेना कुठे , काही ना काही हितसंबंध गुंतलेले असतात. मग कुठे त्यांच्याशी दोन हात करून वाईटपणा पदरात पाडून घ्या , असा त्यामागचा ' व्यवहारी ' विचार येतो. हे लोक ज्या व्यासपीठावर टीका करीत असतात , त्यांचा मोह मात्र त्यांना सुटत नाही.

> या सगळ्यातून साहित्य संमेलन नामक जो उत्सव उभा राहतो , त्याबाबत तुमचे मत काय ?

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचं स्वरूप पूर्णपणे जत्रांसारखं झालेले आहे. लोक जत्रेला जसे मौजमजेसाठी जातात , तसंच आहे हे. लोक येतात मनोरंजनासाठी आणि साहित्यिक येतात ते मिरवण्यासाठी. एकंदर संमेलनांचं स्वरूपच असं झालं आहे की त्याकडे कुणी गांभीर्याने पहात नाही. खुद्द साहित्य महामंडळच त्याकडे पुरेशा गांभीर्यानं बघत नाही , तर इतरांची कथा काय सांगणार. आपल्याकडे पुरस्कारप्राप्त असे किती लेखक संमेलनांत दिसतात ? तेच ते लेखक येणार , तेच ते कवी कविता म्हणणार. तेच ते दर्जाहीन परिसंवाद.

> संमेलनांचा दर्जा वाढवण्यासाठी काय करता येईल ?

साधी गोष्ट आहे. संमेलनांमध्ये लेखकांचा , कवींचा थेट सहभाग वाढायला हवा. नॅशनल बुक ट्रस्ट घ्या , साहित्य अकादमी घ्या. वास्तविक या दोन्ही सरकारी संस्था. पण संमेलनादरम्यान त्यांच्यात ताळमेळ कुठे असतो ? तसा मेळ घालून संमेलनात काही भरीव असं करता येणं शक्य आहे. पण प्रत्येकाचे स्वतंत्र असे सुभे निर्माण झाले आहेत.

> साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ही फार महत्त्वाची व्यक्ती. मात्र संमेलनाचा दोन-तीन दिवसांचा काळ सोडला तर इतर वेळी त्यांचं अस्तित्व फारसं जाणवत नाही. असं का ?

खरं तर संमेलनाध्यक्ष म्हणजे संमेलनाचा , साहित्याचा एक रीतीचा ब्रँड अँबेसिडरच. पण तो पूर्णपणे मिरवण्यापुरता गुळाचा गणपती ठरतो आहे. संमेलनाध्यक्ष ही बाब महामंडळच गांभीर्याने घेत असल्याचं दिसत नसल्याने पुढे सारेच खुंटते. संमेलनाध्यक्षांशी चर्चा करून मराठी साहित्याच्या प्रसारासाठी , विकासासाठी काही कार्यक्रम महामंडळाने आखायला हवेत , ते राबवायला हवेत. तसं काही होताना दिसत नाही. संमेलनाध्यक्षपदावर निवडून आलेली काही कमअस्सल माणसं सोडा ; पण वसंत आबाजी डहाके , नागनाथ कोत्तापल्ले यासारख्या ,साहित्याकडे अतिशय गांभीर्याने पाहणाऱ्या अध्यक्षांकडून काही अपेक्षा होत्या. ते काहीतरी काम करतील , असं वाटलं होतं. पण तसं घडलं नाही.

> संमेलनाध्यक्षांना त्यांच्या कार्यकालासाठी एक लाख रुपये देण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा खरोखर उपयोग होईल ?

मला नाही वाटत तसं. प्रवासाचा वाढता खर्च लक्षात घेतला तर हे एक लाख रुपये किती पुरणार ? आणि असे पैसे देण्यापेक्षा महामंडळाने त्या त्या ठिकाणच्या साहित्य संस्था , वाचनालये यांच्या सहकार्याने काही साहित्यिक उपक्रम हाती घेऊन त्यात संमेलनाध्यक्षांना सहभागी करून घ्यायला हवं. ते फारसं होताना दिसत नाही.

> संमेलनास मिळणाऱ्या सरकारी मदतीचं काय ?

५० लाख रुपये अनुदानासाठी सरकारने अर्थसंकल्पीय तरतूदच केली आहे. पण खरं तर सरकारने जागा , वीज ,पाणी अशा मूलभूत सुविधा पुरवण्याबाबत सहकार्य करायला हवं असं वाटतं.

> संमेलनांवरील अवाढव्य खर्च कमी करणं आणि सरकारी मदतीशिवाय ती साजरी करणं खरोखर शक्य आहे ?

का नाही ? नक्कीच. वायफळ खर्चाला आळा घालता येईलच की. पण तुम्ही गर्दी खेचण्यासाठी म्हणून अमिताभ बच्चनला बोलावणार. तो आला की वाढत्या गर्दीसाठी तुम्हाला मांडवाचा आकार वाढवावा लागणार. आकार वाढला की खर्च वाढणार. असलं काहीतरी दिखाऊ करण्यापेक्षा संमेलनातून खरोखरच काही साध्य होईल , याकडे लक्ष द्यायला हवं ना. ते होताना दिसत नाही , ही खेदाची गोष्ट.

Sunday, August 18, 2013

दु:ख 14 आणि 15 ऑगस्टचे

उरूस, दैनिक पुण्य-नगरी,  रविवार 18 ऑगस्ट 2013 


कवी भ.मा.परसवाळे यांनी फाळणीवर अप्रतिम अशा दोन ओळी लिहील्या आहेत. आत्तापर्यंत मराठीत फाळणीवर इतकं नेमकं भाष्य नाही. त्यांच्या ‘जागजागी’ या कवितेत ते लिहीतात
बेसुमार फाडले फाडताना वेडेवाकडे
आता शिवताना चोळ येताहेत जागजागी !

पाच भारतीय जवानांची हत्या नुकतीच करण्यात आली. नुकताच स्वातंत्र्य दिन साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर परसवाळेंच्या ओळी तपासून पहा. फाळणी करताना जो काही प्रदेश आम्ही फाडून ठेवला ते सारे शिवताना चोळ येत चालले आहेत जागजागी. फाळणीची जखम बूजतच नाही. त्यावर खपली धरतच नाही.
बोरकरांसारखा ‘आनंदयात्री’ कवी स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्या भारतमातेचे वर्णन करताना लिहीतो
सगळा यज्ञ संपल्यानंतर 
उरली हाती राखच कशी
कुंकू भाळी लागताच कशी 
आई झाली वेडीपिशी

खरं तर बोरकरांची भूमिका ही 
मलाही दिसती व्यथा जगाच्या 
परी परिसतो कथा निराळ्या 
कसे उद्याच्या फुलपाखरा 
म्हणून किड्याच्या ओेंगळ आळ्या 

अशी राहिलेली आहे. असे लिहीणार्‍या बोरकरांनाही स्वातंत्र्यमिळाल्यावर आनंदाच्या ओळी नाही सुचल्या.
भीष्म सहानी यांच्या ‘तमस’ कादंबरीतून फाळणीचे दु:ख भळभळत राहिले आहे. दूरदर्शन वर गोविंद निहलानी यांनी दिग्दर्शित केलेली ही मालिका फार मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांचे काळीज हलवून गेली होती.
1965 च्या पाकिस्तान युद्धानंतर दोन्ही देशातील तणाव कमी व्हावा म्हणून काही सांगितिक कार्यक्रम दोन्ही देशांमध्ये आयोजित केले होते. भारताच्या प्रतिनिधी म्हणून गझल सम्राज्ञी बेगम अख्तर यांचा एक कार्यक्रम वाघा बॉर्डरजवळ पाकिस्तानात आयोजित केला होता. पाकिस्तानी सैनिकांसाठी आयोजिलेल्या या कार्यक्रमांत अख्तरीबाईंनी नियोजीत गझल सोडून दिली व अचानक एक दादरा गायला सुरवात केली. त्यांच्या शब्दांनी आणि सुरांनी  पाकिस्तानी सैन्याची  ती अख्खी बटालीयन रडायलाच लागली. त्या दादर्‍याचे बोल होते,
हमरी अटरीया पे आवो सजनवा
सारा झगडा खतम हो जावे ।

फार जणांना असे वाटत रहाते की पाकिस्तानात जे गेले ते खुप आनंदात होते किंवा आजही आहेत. एखाद्या मोठ्या वाड्यातील भावाभावांची वाटणी झाल्यावर लहाना भाऊ वेगळं घर करतो. तेंव्हा मोठ्या वाड्यातील लोकांना वाटत रहातं की त्यानंच भांडण काढलं होतं, त्यानंच वाटणी मागितली होती, आता तो वेगळा झाला तेंव्हा खुप खुष असेल. पण प्रत्यक्षात तसं काही नसतं. तो लहान भाऊही दु:खी होवून बसलेला असतो. एक अपरिहार्य म्हणून वाटणी झालेली असते पण वेदना दोन्ही बाजूला सारखीच असते.
ज्या कवीला वेगळ्या पाकिस्तानच्या कल्पनेचे जनक समजण्यात येते त्या अल्लामा इकबाल यांना फार लवकरच धर्मपिसाट लोकांची वृत्ती लक्षात आली आणि त्यांनी आपल्या कवितेतून आपल्या खर्‍या भावनेला वाट करून दिली.
मस्जिद तो बना दी शब भर मे, 
ईमां की हरारत वालों ने ।
मन अपना पुराना पापी है, 
बरसों से नमाजी बन न सका ॥

पुढे इकबाल म्हणतात नुसते बोलण्यापुरते आम्ही धर्मयोद्धे झालो पण प्रत्यक्ष कृतीत काही उतरलंच. आमची कृती ही जून्याच रीतपरंपरांप्रमाणे राहिली.   1875 ला सियालकोट पंजाब इथे जन्मलेले इकबाल हे मुळचे काश्मिरी ब्राह्मण. इकबाल लिहीतात
‘इकबाल’ बडा उपदेशक है 
मन बातों मे मोह लेता है ।
गुफ्तार का यह गाजी तो बना 
किरदार का गाजी बन न सका ॥ 

(गुफ्तार-वार्ता, गाजी-धर्मयोद्धा, किरदार-आचरण, कर्म, चरित्र) 
गालिब नंतरचा उर्दूतला दुसरा मोठा कवी म्हणजे फैज अहमद फैज. फैज यांची जन्मशताब्दि नुकतीच झाली. फैज पाकिस्तानातच राहिले. 14 ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन. ही पहाट कशी होती? आपण वेगळा पाकिस्तान मिळवला आहे मग तिथल्या सर्वात मोठ्या कवीला काय वाटत होते? फैजच्या ओळी आहेत
ये दाग दाग उजाला ये शब गझिदा सहर
वो इंतिजार था जिसका ये वो सहर तो नही
ये वो सहर तो नही जिसकी आरजू लेकर
चले थे यार की मिलेगी कही ना कही

(शब गझिदा म्हणजे काळोख डसलेली)
एम.जे.अकबर यांची ‘ब्लडब्रदर्स’ नावाची कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. तिचा मराठी अनुवाद राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. अकबर आपल्या वडिलांना एकदा विचारतात, ‘तूम्ही तेंव्हा पाकिस्तानात गेला होतात. मग परत कशाला भारतात आलात?’ अकबर यांच्या वडिलांनी दिलेले उत्तर मोठे मार्मिक आणि भारतीय मुसलमानांच्या मानिकसतेवर नेमके बोट ठेवणारे आहे. अकबर यांचे वडिल म्हणाले, ‘पाकिस्तान फारच मुसलमान झाले होते.’
पाकिस्तानइतकेच मुसलमान भारतात आहेत. भारतातील मुसलमानच नव्हे तर पाकिस्तान, बांग्लादेश येथील मुसलमानही हे सगळे एका मोठ्या परंपरेचा हिस्सा आहेत. आजही जगात भारतीय उपखंडातील मुसलमान यांची एक वेगळी ओळख आहे. अगदी त्यांची उर्दू ही भाषासुद्धा. ही भाषा दिल्ली आणि अवतीभोवतीच्या प्रदेशात जन्मली वाढली. जी जगात इतर कुठल्याच देशातल्या मुसलमानांची भाषा नाही. कट्टर समजल्या जाणार्‍या या मुसलमानांनी धर्मापेक्षा आपल्या परंपरा, आपली वेगळी भाषा हीच्याशी निष्ठा जपली. बांग्लादेश बांग्ला भाषेच्या आणि संस्कृतिच्या मुद्द्यावर वेगळा झाला. इतकेच नाही तर बांग्लादेशी मुसलमानांनी रविंद्रनाथ टागोरांनी लिहीलेले गीत आपले राष्ट्रगीत म्हणून निवडले. पण आपण हे समजून न घेता ‘हाकलून द्या यांना तिकडे’ वाली भाषा वापरत रहातो. 
कुणाची काय भूमिका असायची ती असो पण लेखक कवींनी मात्र ही फाळणी म्हणजे एक जखम आहे असेच मानले आणि आपल्या साहित्यकृतीतून ही वेदना मांडून ठेवली. 
कबीर प्रोजेक्ट म्हणून बेंगलोरची एक संस्था एक अतिशय अतिशय आगळे वेगळे काम करते. कबीरावरती जिथे कुठे काही आढळते त्याचे चित्रीकरण, त्याची माहिती ते घेवून ठेवतात. त्याचे माहितीपट बनवून ठेवतात. त्यांनी ‘कबीर इन पाकिस्तान’ नावाची एक सुंदर सीडी काढली आहे. कराचीचे सुफी कव्वाल फरिदुद्दीन अय्याज यांनी गायलेला कबीर यात आहे. कबीराने सहाशे वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले गाताना हे कव्वाल आजच्या सामान्य पाकिस्तानी आणि भारतीय नागरीकांची भावना किती खरी सांगितली आहे
कबीरा कुवा एक है पानी भरे अनेक
भांडा ही मे भेद है पानी सबमे एक. 

याच फरिदूद्दीन अय्याज यांची कव्वाली माझ्या मोबाईलची रिंगटोन आहे. 

Sunday, August 11, 2013

पुरोगामीत्वाला टांग । कॉम्रेड अण्णा भाऊ फक्त मांग ॥


उरूस, दैनिक पुण्य नगरी   रविवार 11 ऑगस्ट 2013 


अण्णा भाऊ साठे यांची जयंती 1 ऑगस्टला सर्वत्र साजरी झाली. त्यांच्यावर विविध वर्तमानपत्रांतून लेख प्रसिद्ध झाले. हे लेख वाचताना मोठी विसंगती मात्र जाणवत राहिली. इतका काळ निघून गेला. उदारीकरणाचे मोठे पर्व त्याचे नाविन्य संपवून इथे रूळले तरी आपली मानसिकता मात्र अजूनही मध्ययुगीनच राहिली आहे.

अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात बहुतांश ठिकाणी पुढाकार घेतला तो त्यांच्या मांग जातीच्या विविध संघटनांनी. अण्णा भाऊंचे लेखन हे फक्त मांगांसाठी होते काय? (मी जाणीवपूर्वक मांग हाच शब्द वापरतो आहे कारण मातंग हा संस्कृत शब्द त्याच जातीचे लोक अग्रहाने नाकारतात. शिवाय शासन दरबारी नोंद मांग अशीच आहे.)

उलट अण्णा भाऊ हे कम्युनिस्ट पक्षाचे कार्डधारक होते. स्वाभाविकच पक्षाची जी ध्ययेधारेणे त्यांची सर्वोच्च समिती (पॉलिट ब्युरो) ठरवेन ती अण्णा भाऊंना बंधनकारक होती. सर्व कम्युनिस्ट चळवळ वर्गलढ्याच्या सिद्धांतावर उभी आहे. या डाव्या चळवळीनी जातीय प्रश्नांना कधीच हात घातला नाही. अण्णा भाऊंनीही आपली सगळी वाङ्मय निर्मिती सामंतशाहीच्या विरोधात केली. किंवा त्यांच्यावर प्रभाव असलेल्या तमाशाच्या रंजनप्रधान शैलीप्रमाणे केली. 

ज्येष्ठ लेखक बाबूराव बागुल यांनी अण्णा भाऊंच्या वाङ्मयाचे स्पष्ट शब्दांत विश्लेषण केले आहे. ‘..अण्णा भाऊंच्या कथांत अस्पृश्यतेतून आलेली कथा कमी प्रमाणात होती. त्यांची कादंबरी तर मोठ्या संख्येने मराठावर्गात, श्रीमंत शेतकर्‍यांत घडली गेली. वर्गकलहाचे तत्त्वज्ञान त्यांनी हिंदूंच्या नैतिक मूल्यावर नेले. अन्याय, अत्याचार करणारे आणि त्याचा प्रतिकार करणारे असे त्यांच्या कादंबरीला ‘राम रावण पार्टीचे’ रूप आले. खेडे, खेड्यांची जातीयवादावर असलेली उभारणी आणि अस्पृशतेसंबंधी असंतोष त्यांच्या कथांत कमी होता. सामंतशाहीच्या गुणावगुणावर, त्यांच्या कथेचा लोभ जडलेला होता.’ (मराठवाडा दिवाळी अंक 1969)

कम्युनिस्ट पक्षाने अण्णा भाऊंची जयंती धोरण म्हणून तरी का होईना साजरी करण्याचा निर्णय कधी घेतला नाही. कम्युनिस्टांच्या पोस्टरवर कधी अण्णा भाऊंचा फोटोही दिसत नाही. त्याचे एक कारण असेही असावे की अण्णा भाऊंनी कम्युनिस्ट विचार आपल्या लेखनात मांडले पण स्वतंत्रपणे कुठले विचार प्रकट केले नाहीत. आणि शिवाय आपल्याकडची  कम्युनिस्ट चळवळ तशी व्यक्तीला महत्त्व देणारी नाही. ज्योती बसूंसारख्या ज्येष्ठ नेत्याला पंतप्रधान होण्यासाठी त्यांच्याच पक्षाने परवानगी नाकारली होती. मग तिसऱ्या आघाडीचे पुढे काय झाले हा इतिहास आहे.   

मग प्रश्न असा पडतो की कम्युनिस्ट असलेले अण्णा भाऊ पूर्णपणे मांग अस्मितेचा विषय बनले कसे? अण्णा भाऊंचे मुळ वाक्य असे होते, ‘पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तोलली नसून ती कष्टकर्‍यांच्या तळहातावर पेललेली आहे.’ अण्णा भाऊंवर लेख लिहीताना सर्वांनी कष्टकरी हा शब्द काढून तिथे दलित हा शब्द घुसडला. 18 जूलै 1969 ला अण्णा भाऊ गेले त्यावेळी त्यांच्याच मांग समाजाचे बाबुराव भारस्कर हे महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात मंत्री होते. मांग समाजाची अस्मिता आणि त्या निमित्ताने दलित जातीत आंबेडकरांशिवाय अजून एक अस्मिता निर्माण करता येवू शकते हे त्यांना जाणवले. 

बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरामुळे एक अढी सवर्ण हिंदू समाजात निर्माण झाली. पण आश्चर्य म्हणजे पूर्वाश्रमीच्या महारेतर इतर दलित जातींतही झाली. त्यांनी बाबासाहेबांसोबत बौद्ध होणे नाकारले. इतकंच नाही तर ज्या ठिकाणी पूर्वाश्रमीच्या महारांनी गावगाड्याची कामे नाकारली ती त्यावेळी मांगांनी पुढे होऊन स्विकारली. खरे तर सगळी दलित अस्मिता जोरकसपणे बाबासाहेबांच्या प्रतिमेत एकवटली असती तर मोठेच परिवर्तन झाले असते. पण हे घडले नाही. कॉंग्रेसने असे धोरण ठरवले की पूर्वाश्रमीच्या महार जातीतील इतर नेत्यांना पाठबळ द्यायचे त्याप्रमाणेच इतर दलित जातीतील लोक शोधून त्यांनाही मोठे करायचे. 

यात अस्मितेचा विषय म्हणून अण्णा भाऊ हाती लागले. आणि त्यांचे पुतळे गावोगावी उभारण्याचा कार्यक्रम सुरू झाला. बरं हे कॉंग्रसने केले असे नाही तर भाजप-शिवसेनेनेही मांग समाजाच्या नेत्यांना उचलून धरले. युती सरकारच्या काळात तर सर्वात जास्त मांग आमदार निवडून आले होते.

हे सगळं होत असताना अण्णा भाऊंच्या साहित्याचा कोणी विचार केला असेही नाही. त्याची कुणाला गरजही वाटत नाही. काळ बदलला असताना आजही आपला समाज केवळ जातीचा आणि त्यातही परत आरक्षणाची सोय म्हणून अण्णा भाऊंचा वापर करू पहाताना बघणे हे केवळ वेदनादायक आहे.   

मांग समाज हा खरे तर कलाकार समाज. अजय अतूल सारखी आजची आघाडीची संगीतकार जोडी याच मांग जातीतून आलेली आहे. पण तिला कुठेही आपल्या जातीय अस्मितेचा वापर करण्याची गरज वाटत नाही. उलट संगीताच्या मुख्य प्रवाहात मिसळून जात त्यांनी तो प्रवाह समृद्ध केला आहे. आज संगीत कलेची बाजारपेठ मोठ्याप्रमाणात विस्तारली आहे. या विस्तारलेल्या बाजारपेठेत मांग समाज खुप मोठे योगदान देवू शकतो. पण आपण हे विसरून त्याला जातीत अडकून टाकतो. दलित साहित्यात आत्मकथनाशिवाय सकस काही नाही असा जो आरोप केला जातो त्याला नामदेव कांबळे आणि उत्तम बंडू तुपे सारखी दोन महत्त्वाचे अपवाद मांग जातीतूनच आलेले आहेत. 

जागतिकीकरणाचा काळात सगळ्यात जास्त फायदा दीन दुबळ्या दलितांना झाला कारण ते जून्या व्यवस्थेत नाडल्या गेलेले होते. त्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते. ज्या प्रमाणे महात्मा फुले म्हणाले, ‘बरे झाले इंग्रज आले. नसता या भटा बामणांनी आमच्या पोराबाळांना शिकूच दिलं नसतं.’ याच धर्तीवर आता असं म्हणायची पाळी आहे, ‘बरं झालं जागतिकीकरणामुळे मोकळे वारे खेळायला लागले. नसता या जून्या व्यवस्थेनं आम्हाला संधीच दिली नसती.’

आपल्याकडची बरीच तालवाद्ये ही कातड्याची बनवलेली असतात. म्हणून त्यांना स्पर्श करणेही सवर्ण पाप समजायचे. ही वाद्ये मांग समाजाने बनविली, त्यांचा विकास केला व आपल्याकडे संगीत जिवंत ठेवले. आता तर त्याला जगभरातून मागणी येत चालली आहे. म्हणजे ज्या उदारीकरणावर टिका  डाव्या/परिवर्तनवादी/दलित चळवळी करत राहिल्या त्याच उदारीकरणाच्या काळात या वर्गाला मोठी संधी प्राप्त होताना दिसत आहे. 

एकेकाळी ‘जगातील कामगारांनो एक व्हा’ असे म्हणत जागतिकीकरणाचे समर्थन करणारे आता मात्र ‘जगातील ग्राहकांची एक बाजारपेठ’ अशी धोरणं सुरू झाली की विरोध करायला लागले. कम्युनिस्ट विचारसरणीचे अण्णा भाऊ बदलत्या काळात एक चांगले प्रतिक होवू शकत असताना त्यांना जातीय अस्मितेचे प्रतिक करून आपण काय मिळवत आहोत?

Sunday, August 4, 2013

महामंडळाची घटना बदला : अबब ! महानोर काय बोललात !!

दै. पुण्यनगरी, उरूस सदरातील लेख  रविवार 4 ऑगस्ट 2013 

रेल्वे स्थानकावर एकदा आम्ही गाडीची वाट पहात होतो. गाडी येण्याचे चिन्ह दिसत नव्हते.  हेमंत पार्डीकर हा आमचा मिश्किल मित्र अचानक म्हणाला, ‘‘चला, आता गाडी येती!’’ कशावरून असे विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘ते काय, भजेवाल्यानं भजे तळायला घेतले आहेत. म्हणजे आता गाडी येते.’’ गंमत म्हणजे गाडी खरेच आली. असंच काहीसं सध्या साहित्य संमेलनाच्या बाबतीत झालं आहे. वर्तमानपत्रांनी महानोरांच्या अध्यक्षपदाचा विषय तळायला घेतला की साहित्य संमेलन जवळ आलं आहे असं खुशाल समजावं
सासवडच्या साहित्य संमेलनाची घोषणा होताच महानोरांच्या अध्यक्षपदाचा विषय लगेच सुरू झाला. 4 थ्या विश्व संमेलनाचे अध्यक्षपद महानोरांना देण्याचा निर्णय साहित्य महामंडळाने घेतला. संमेलनाचे सगळे नियोजन झाले. महानोरांच्या पदराखाली लपून फुकटची परदेश वारी आपल्या पदरात पाडून घेण्याचा महामंडळाचा डाव टोरांटोच्या संयोजकांनी उधळून लावला आणि महानोरांची संधी हुकली. बरं दुसर्‍या वर्षी परत लंडनची चर्चा सुरू झाली. परत महानोरांच्या अध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली. आणि ‘फिर वही फुकट परदेश वारी लाया हू’ हे गीत महामंडळाच्या सदस्यांनी गायला सुरवात केली. पण लंडनचे संयोजकीही चतूर निघाले. ते काही यांच्या तिकीटाचे पैसे देईनात. आता विश्व संमेलनाचा नाद सोडून अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे का होईना अध्यक्षपद महानोरांना देऊत म्हणून त्यांच्या अध्यक्षपदाची चर्चा परत सुरू करण्यात आलेली दिसते आहे.
ना.धो. महानोर तसे नशिबवान. त्यांना संमेलनाचे अध्यक्षपद स्वत:ला मिरवण्यासाठी आणि त्या निमित्ताने आपली महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळविण्यासाठी भुषविण्याची गरज नाही. महानोरांना फार मोठी लोकप्रियता समिक्षकप्रियता लाभली. महानोर बारा वर्षे विधान परिषदेचे सदस्य होते. आपली आमदारकीची ही मोठी कारकीर्द त्यांनी गाजवली. त्यामुळे महानोरांना संमेलनाच्या अध्यक्षपदाची तशी गरज नाही. नाहीतर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद म्हणजे तीन दिवसांचा गणपती. अलीकडच्या काळातील या पदावर बसलेल्या चांगल्या आणि सामान्य अशा दोन्ही प्रकारच्या लोकांनी कुठलेही भरीव काम या काळात साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात केले नाही. सध्याचे अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांनी महाराष्ट्रभरच्या वाचनालयांना भेटी देण्याचा संकल्प जाहिर केला होता. अर्धे वर्ष संपले पण कोत्तापल्लेंनी कुठल्या वाचनालयांना भेटी दिल्या हे कुणालाच माहित नाही. त्याआधी वसंत आबाजी डहाके यांनीही महाराष्ट्रभर फिरण्याचे जाहिर केले होते. त्याचे काय झाले तेच जाणे. म्हणजे अध्यक्ष होवून कुणी काही करू शकतो हे आज तरी दिसत नाही. त्यामुळे महानोर हे अध्यक्षपदासाठी त्याअर्थाने उत्सूक असतील हे शक्य नाही.
जेंव्हा अशा बातम्यांचा धुराळा उडाला तेंव्हा महानोरांनी संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानाने एकमताने निवडणुकीशिवयाय बहाल करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यासाठी महामंडळाची घटना बदलण्याची सुचनाही त्यांनी केली. खरं तर महानोर स्वत: महामंडळाचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांना महामंडळाची काम करण्याची पद्धत पूर्ण माहित आहे. पण तरी त्यांनी महामंडळाची घटना बदलण्याची सुचना केली. हे म्हणजे फारच झाले. एकवेळ भारताची घटना बदलणे सोपे आहे. एकवेळ धर्मग्रंथांमध्ये काही बदल होणे सोपे आहे. पण महामंडळाची घटना बदलायची म्हणजे केवढे पाप!! ती बदलायची कशी आणि कोणी?
नाही नाही म्हणत तेलंगणाचे वेगळे राज्य करण्याचा निर्णय झाला पण महामंडळाची घटना बदलून बिनविरोध अध्यक्ष निवडायचा हे काय भलतेच... जून्या नाटकांच्या भाषेत सांगायचे तर, ‘मुुंग्यांनी मेरू पर्वत तर गिळला नाही ना! सुर्य पश्चिमेला तर उगवला नाही ना!!’’
अखिल भारतीय साहित्य महामंडळ हे शासनाच्या पैशावर स्वत:चा छोटा मोठा स्वार्थ साधून घेण्यार्‍या फुकट फौजदारांचा अड्डा झाला आहे.महामंडळाचे अध्यक्षपद निवडणुका शिवाय मिळवता येते, विविध घटक संस्थांच्या साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद निवडणुकी शिवाय बहाल करण्यात येते, जे तीन विश्व संमेलनं पार पडली (घटना बाह्य असली तरी) त्यांचेही अध्यक्षपद निवडणुकी शिवायच त्या त्या मान्यवर ज्येष्ठ साहित्यीकाला बहाल करण्यात आले होते. इतकंच काय पण महामंडळाच्या ज्या घटक संस्था आहेत त्यांच्या कार्यकारीणीचे अध्यक्षपदही ‘म्यानेज’ केले जाते पण त्यासाठी निवडणुक होत नाही. मग निवडणुकीचा हा अट्टाहास अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीच का? याचे मात्र उत्तर देण्यास महामंडळ तयार नाही.
महामंडळाचे कार्यालय तीन तीन वर्षाच्या बोलीवर पुणे-नागपूर-औरंगाबाद-मुंबई असे फिरत राहते. हे असे का? सगळ्यांनी मिळून वाटून खायची जर ‘उदात्त’ भूमिका असेल तर हे वाटून ‘खाणे’ समप्रमाणात का नाही? महाराष्ट्राची महसुलाच्या दृष्टिने 6 विभागात वाटणी करण्यात आली आहे. मग महामंडळाच्याही 6 घटक संस्था करण्यात काय अडचण आहे? महाराष्ट्रातील 10 सर्वसाधारण विद्यापीठांच्या मराठी विभागांचा सहभाग नोंदवून घ़टक संस्थांचा विस्तार का केला जात नाही? महाराष्ट्रात दहा हजार सार्वजनिक वाचनालयांपैकी अ/ब वर्गाच्या दीड हजार वाचनालयांना सहभागी कसे करून घेता येईल असा व्यापक विचार का केला जात नाही?     
  महामंडळाच्या ज्या घटक संस्था आहेत त्या सगळ्यांची मिळून (मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर व बृहन्महाराष्ट्रातील संलग्न संस्था) आजीव सभासद संख्या जवळपास वीस हजार आहे. या सगळ्यातून एक हजार लोकांना निवडणुकीसाठी मतदार म्हणून नोंदविण्यात येते. आणि यातून साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडणुकीद्वारे निवडला जातो.
आजतागायत मतदार कुणाला केले आणि का केले जाते याचे एकही संयुक्तीक कारण महामंडळ देवू शकलेले नाही. पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 10 हजार आजीव सभासदांपैकी फक्त 175 जणांना मतदार केले जाते. पण हैदराबादच्या मात्र 120 जणांतून 40 जणांना मतदार केले जाते. हे असे का? याचे उत्तर नाही. परत विचारायचेही नाही.
 आता महानोर म्हणतात की महामंडळाची घटना बदला. आता ही घटना बदला म्हणजे हे सगळे वाटून खाण्याचे हिशोब संपून जाणार की. तूमचं काय महानोर तूम्हाला या कशाचीच काही गरज नाही. पण महामंडळाच्या ‘सह्याजीराव’ पदाधिकार्‍यांचा मात्र पूर्ण जीवच महामंडळाचे ‘सदस्य’ असण्यातच आहे. ते कसे काय घटना बदलणार...
तेंव्हा महानोर हा खुळा हट्ट सोडा.....तूम्हाला मराठी काव्यरसिकांनी त्यांच्या हृदयात बिनविरोध कायमस्वरूपी पद देवून ठेवले आहे....तूमची भावना खरी आहे पण....पण लक्षात कोण घेतं? 
  
    मो. 9422878575.
     

Monday, July 29, 2013

आम्ही जाणारच की कवातरी पट्दिशी....

दैनिक कृषीवल च्या उरूस सदरातील माझा शेवटचा लेख. १४ मार्च २०१२ पासून ते २७ जुलै २०१३ पर्यंत मी हे सदर लिहिले. कृषीवल चे संपादक संजय अवटे, त्यांचे सर्व सहकारी आणि या लिखाणाला प्रतिसाद देणारे सर्व वाचक या सर्वांचे मनपुर्वक आभार! हे सदर याच नावाने दैनिक "पुण्य नगरी" मध्ये ४ ऑगस्ट पासून चालू होते आहे.

आम्ही जाणारच की कवातरी पट्दिशी....


वसंत बापटांची मोठी सुंदर कविता आहे
तूमी जीव लावला मैत्र आपुलं जूनं
तूमी माफ केल्याती शंभर आमूचं गुन्हं
ही मैफल तूमची अखंड चालो अशी
आम्ही जाणारच की कवातरी पट्दिशी....
एखाद्या मैफिलीचा शेवट करताना मी आवर्जून ही कविता सांगायचो. समोरच्या श्रोत्यांकडे पाहून ‘ही मैफल तुमची अखंड चालो अशी...’ असं म्हणायचं.  मंचावर बसलेले सर्व कवी किंवा गायक वादक त्यांच्याकडे बोट दाखवून ‘आम्ही जाणारच कवातरी पट्दिशी’ असं म्हणायचं. फार जणांना ही कविता आवडते.
मग ग.दि.माडगुळकरांची एक कविता सापडली. म्हणजे चारच ओळी माहित झाल्या. मैफल संपल्यानंतरचे वातावरण त्यात सुचित केले होते.
कोन्यात झोपली सतार सरला रंग
पसरली पैंजणे सैल टाकूनी अंग
गालिच्या दुमडला तक्के झुकले खाली
तबकात राहिल्या देठ लवंगा साली.
या ओळींना तर श्रोत्यांची दाद हमखास ठरलेली असायची. मला या ओळी एखाद्या कवितेच्या शेवटच्या ओळी आहेत असं वाटायचं. नंतर कळालं की ग.दि.माडगुळकरांच्या ‘जोगिया’ या सुंदर कवितेच्या या सुरवातीच्या ओळी आहेत.
कुठल्याही गाण्याच्या कार्यक्रमात गायक वादकांना शेवटची भैरवी म्हणायचा आग्रह मी करायचो. सुप्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अमजद अली खान औरंगाबादला जवाहरलाला नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयात 20 वर्षांपूर्वी कार्यक्रमासाठी  आलेले होते. त्यांनी त्यांचे वादन अतिशय सुंदररित्या सादर करून कार्यक्रम संपवत असल्याची घोषणा केली. त्यांची सुंदर भटियाली धून मी कॅसेटवर ऐकली होती. ती ऐकायची इच्छा होती. वाद्य संगीतात भैरवीच्या सुरावटीच्या धुनने समारोप केला जातो. बर्‍याचजणांना कार्यक्रम संपवू नये असे मनोमन वाटत होते. पण इतक्या मोठ्या कलाकाराला कोण सांगणार? मी मोठ्या धैर्याने उठून उभा राहिलो आणि त्यांना भटियाली धून वाजविण्याची विनंती केली. आश्चर्य म्हणजे अमजद अलींनी ती मान्यही केली. आणि 45 मिनीटे अप्रतिम अशी भटियाली धून वाजवली. त्या निरोपाच्या सुरावटीत श्रोते अक्षरश: नाचत होते.
भैरवीचा महिमाच मोठा विलक्षण. माझा अधिक्षक अभियंता मित्र शशांक जेवळीकर शास्त्रीय संगीताचा मोठा दिवाना. नुसताच दिवाना नाही तर त्याचा त्या विषयावरचा अभ्यास अतिशय चांगला व नेमका. त्याचा वाढदिवस होता त्या दिवशी मी त्याच्या घरी जावून रात्री उशीरा गप्पा मारत  बसलो होतो. किराणा घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका गंगुबाई हनगल यांचा अप्रतिम बागेश्री त्यानं ऐकलवला. गंगुबाईंचा आवाज अप्रतिम लागलेला. कुठल्याही सप्तकात स्थिर लागलेले स्वर. त्यांच्या गाण्यानंतर काय ऐकावं तेच कळेना. किशोरी अमोणकरांची भैरवी त्यानं ऐकवली. त्या भैरवीच्या सुरावटीतच आधीच्या गाण्यातून आम्हाला बाहेर काढण्याची ताकद होती. 
अशा भैरवीच्या कितीतरी सुंदर आठवणी आहेत. ‘उरूस’ या सदराची आज भैरवी सादर करताना माझ्याही मनात आर्त सुर दाटून आले आहेत. मे महिन्यात माझे जवळचे स्नेही असलेल्या दिवाकर कुलकर्णींच्या मुलीचे लग्न होते. त्या लग्नात मला अलिबागचे डॉ. कुमठेकर भेटले. ‘उरूस’ सदरातील माझ्या लेखनाची आठवण करून देऊन, ते सदर लिहीणार्‍याशी माझी प्रत्यक्ष भेट झाली याचा किती आनंद वाटतो आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांची पत्नी जया ही मला लहानपणापासून ओळखते. अनोळखी अशा वाचकांनीही खुप चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 
माझे हे लिखाण मी सातत्याने माझ्या ब्लॉगवर देत आलो. त्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद लाभला. माझ्या ब्लॉगला भेट देणार्‍या वाचकांची संख्या 7000 चा टप्पा पार करून गेली. त्यात मोठा वाटा ‘उरूस’ सदरातील लेखांचा आहे. सहित्य-संस्कृती-कला या क्षेत्रातील घडामोडींवर लिखाण करावं अशी अपेक्षा संपादक संजय आवटे यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार विविध विषयांवरील लेख या सदरात मी लिहीले. बर्‍याचदा ‘सदर’ लिखाण हे मोठी अडचण किंवा अवघड जबाबदारी वाटते असं मत माझ्या काही लेखक मित्रांनी व्यक्त केलं आहे. काही मित्रांनी यामूळे  चालू असलेली सदरं बंदही केली आहेत. किंवा काही जणांची सदरं रखडत चालली. माझ्याबाबत मात्र हे घडलं नाही. या लिखाणातून मला खुप आनंद  मिळाला. मला कुठलाही त्रास या लिखाणाचा झाला नाही. मनात विषयाची जूळणी तयार असायची. लिहीताना हे सगळं जुळून यायचं. आणि सलग कागदावर उमटायचं.
साहित्य संस्कृती कला यांचं जीवनात काय स्थान आहे? या गोष्टी हव्यातच कशाला? असे प्रश्न व्यवहारिक पातळीवर काहीजणांना पडत असतात. कशाला लिहायचं? कोण वाचणार आहे? काही अडलं आहे का? अशी भावना  बळावताना दिसते. पण याचं अतिशय सुंदर उत्तर ज्ञानेश्वरांनी दिले आहे
जैसे भ्रमर भेदी कोडे । छेदी कठीण काष्ट कोरडे ।
पै कलिकेमाजी सापडे । कोवळीया ॥
अतिशय कठीण लाकूड पोखरणारा भुंगा कोवळ्या कमळाच्या कळीत मात्र अडकून पडतो. त्याला काय ती कळी पोखरून बाहेर पडता येत नाही? पण ती पोखरायीच नसते. कलेचे तसेच आहे. हे जे आपल्या भोवती कोवळं सुंदर जग कला तयार करते त्यात अडकूनच त्याचा आनंद घ्यायचा असतो. असा आनंद मला स्वत:लाही घेता आला आणि मला खात्री आहे माझ्या वाचकांनीही तो घेतला असावा.
जयपूर घराण्याचे महान गायक पंडित मल्लिकार्जून मन्सूर हे बसवेश्वरराचे एक सुंदर भजन गायचे. त्यात गायकाने देवाकडे एक अपेक्षा व्यक्त केली आहे. माझ्या मस्तकाचा भोपळा बनू दे, देहाचा दांडा बनव, शिरांच्या तारा बनवून आपल्या बोटांनी त्या छेडत हे परमेश्वरा तू मला हृदयी जवळ घेवून गा. या ओळींचा अर्थ ज्येष्ठ विचारवंत कार्यकर्ते साहित्यीक विनय हर्डीकर यांनी त्यांच्या लेखात दिला होता. मला कानडी येत नाही. या अर्थावरून मी त्याचा मराठीत भावानुवाद केला
मस्तक भोपळा । शिरा जणू तारा ।
दांडी या शरिरा । बनव गा ॥
बोटांनी छेडित । अशी एकतारी ।
लावुनिया उरी । गा तू देवा ॥
ही झाली एका गायकाने व्यक्त केलेली भावना. एक लेखक काय भावना व्यक्त करेल? मी आज या भैरवीत माझ्या वाचकांप्रती ही भावना व्यक्त करतो आणि तूम्हा सर्वांचा निरोप घेतो.
जगण्याचा आशय
शब्दांत मांडून ठेवला आहे तूमच्या समोर
डोळ्यांतून तो शिरो तूमच्या मेंदूत
   माझ्या शब्दांतील कंपने जुळू देत
   तूमच्या हृदयातील कंपनांशी
आणि उमटू देत झंकारांचा पदन्यास
तरच पूर्ण होईल
माझ्या काळजापासून
तूमच्या काळजापर्यंतचा हा प्रवास